Wednesday, 16 July 2025

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी डिजिटल पायाभूत सुविधा उभारण्यावर भर

 कृषी क्षेत्राच्या विकासासाठी डिजिटल पायाभूत सुविधा उभारण्यावर भर

- कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

मुंबई, दि. १५ : राज्य शासनाने कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून शाश्वत कृषी विकासासाठी ‘महाकृषी एआय धोरण 2025 ते 2029’ तयार केले आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना हवामान, माती, पिकांची स्थिती व बाजारभावासंदर्भात विश्वासार्ह माहिती मिळण्यासाठी डिजिटल पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती कृषिमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी विधान परिषदेत दिली.

विधान परिषदेच्या नियम 260 अन्वये प्रस्तावावर सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते.

मंत्री ॲड.कोकाटे म्हणाले की, राज्यातील चार कृषी विद्यापीठांमध्ये एआय संशोधन केंद्रे स्थापन होणार असून, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी यासाठी प्रारंभी रुपये 500 कोटींची तरतूद केली आहे. आवश्यकता भासल्यास आणखी निधीची तरतूद होणार असल्याचेही त्यानी सांगितले.

कृषी विभागातील सरळ सेवा कोट्यातील 1,230 पदे आणि पदोन्नती कोट्यातील 277 पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा आयबीपीएस यांच्यामार्फत ही पदे भरती केली जाणार आहेत. त्याचबरोबर जागतिक बँकेच्या सहकार्याने सुमारे रु. 6000 कोटींचा प्रकल्प २१ जिल्ह्यांमध्ये राबवला जाणार असून, 7,201 गावे यात समाविष्ट असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 राज्य शासनाने महसूल मंडळाऐवजी गावपातळीवर उत्पादनाची आकडेवारी संकलन करण्याचा निर्णय घेतला आहे. हवामान अंदाज केंद्रे गावात उभारण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. त्याचबरोबर, सन 2015-16 साली 10 वी कृषी गणना करण्यात आली होती. 11 वी गणना सुरू असून, दोन टप्प्यांचे काम पूर्ण झाले आहे तर तिसऱ्या टप्प्यावर काम सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 आशियाई विकास बँकेच्या अर्थसाहाय्याने 'मॅग्नेट' प्रकल्पांतर्गत 15 फळपिकांची मूल्यसाखळी विकसित होत आहे. द्राक्षे, पपई, हळद, अंजीर, टोमॅटो, शेवगा आणि आले या नव्या पिकांचा समावेश प्रस्तावित आहे. याचा उद्देश निर्यात वाढवणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

             विविध योजनांद्वारे राज्यात शाश्वत, शेतकरी-केंद्रित आणि तंत्रज्ञानाधारित कृषी परिसंस्था उभारणे, हे राज्य शासनाचे उद्दिष्ट असल्याचे कृषी मंत्री ॲड.कोकाटे यांनी यावेळी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi