छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याला विस्तारित करण्याचा
श्रीमंत बाजीराव पेशवे यांचा इतिहास -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊ माँसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली जनतेला एक करून मुघल साम्राज्याच्या चारही आक्रमकांना सळो की पळो करून सोडले. या प्रेरणेतून अनेक पराक्रमी योद्धे तयार झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याला विस्तारित करण्याचा श्रीमंत बाजीराव पेशवे यांचा इतिहास आहे.
त्यांनी लढलेल्या ४१ लढायापैकी एक ही लढाईत पराभव स्वीकारला नाही. उत्तरेला काबूलपर्यंत आणि पूर्वेला बंगालपर्यंत मराठी साम्राज्यचा विस्तार करण्याचे काम थोरल्या बाजीराव पेशव्यांनी केले. वेग ही त्यांची सर्वात मोठी रणनीती होती. युद्धासाठी मुघलांची सेना जेव्हा ८ ते १० कि.मी. प्रवास करत तेव्हा बाजीरावांची सेना ६० ते ८० कि.मी. चा प्रवास दररोज करत. पालखेड येथे झालेल्या युद्धाचा उल्लेख रणनितीनुसार सर्वात चांगली लढाई होय असा माँटगोमेरी यांच्यासारख्या सेनानींनी त्यांच्या युद्ध कौशल्याचा गौरव केला आहे, असे श्री. फडणवीस यांनी नमूद केले.
इंग्रजांनी आणि त्यानंतर काहींनी आपल्या इतिहासातील अनेक नायकांवर अन्याय केला आणि आपल्या हिंदवी स्वराज्याचा आणि मराठी साम्राज्याचा इतिहास त्यांनी आपल्या इतिहासातच विलीन करुन टाकला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात या नायकांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा आता प्रयत्न सुरू आहे. थोरले बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्यासाठी जिथे देशाच्या संरक्षण सज्जतेचे प्रशिक्षण दिले जाते अशा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीसारख्या ठिकाणापेक्षा दुसरे योग्य स्थान नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
एअर मार्शल (नि.) भूषण गोखले यांनी प्रास्ताविक केले. एनडीए येथे महान राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा समोरच असून बाजूला महाराजा रणजितसिंह, पहिले बाजीराव पेशवे, नरवीर तानाजी मालुसरे यांचे अश्वारूढ पुतळे आहेत. ते येथील प्रशिक्षणार्थी कॅडेटला प्रेरणा देतात. बाजीराव पेशव्यांनी त्यांच्या जीवनकाळात सर्व युद्धे जिंकली.
विनय सहस्त्रबुद्धे म्हणाले, हे स्मारक पराक्रमाचे, पराक्रमातून निर्माण होणाऱ्या प्रतिरोधाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी भारतीय इतिहासात पराक्रम गाजविला आहे. भारतीय भाषाच नव्हे तर जगातील भाषांत हा इतिहास पुढे आणला पाहिजे, असेही ते म्हणाले.
No comments:
Post a Comment