रेडिओवरील संवादाद्वारे जीवनाला उभारी देण्याचे काम - ॲड. आशिष शेलार
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड शेलार म्हणाले, सांस्कृतिक प्रवासाची मोठी वाटचाल रेडिओच्या माध्यमातून झाली आहे. शासनाने या प्रवासाची दखल घेत पुरस्कार सुरू केले आहे. 1923 मध्ये रेडिओ बॉम्बे नावाने रेडिओ वाहिनी सुरू झाली. रेडिओ क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्काराच्या माध्यमातून सन्मान करणारे महाराष्ट्र हे देशात पहिले राज्य आहे. कोरोना काळात जीवनाला उभारी देण्याचे काम रेडिओवरील संवादाद्वारे करण्यात आले. यावेळी या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचे महत्व लक्षात घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील रेडिओ जॉकींशी संवादही साधला होता. मराठी संस्कृती रेडिओ वाहिन्यांवरील कार्यक्रमांमधून समाजापर्यंत जावू देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी रेडिओ नसते, तर मी नसते, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते आशा रेडिओ जीवन गौरव पुरस्कार 2025 हा विश्वनाथ ओक यांना देण्यात आला. तसेच आशा सर्वोत्कृष्ट पुरूष निवेदक पुरस्कार हा रेडिओ मिर्ची वाहिनीचे रेडिओ जॉकी जितूराज यांना, आशा सर्वोत्कृष्ट महिला निवेदक पुरस्कार हा रेड एफ एम वाहिनीच्या रेडिओ जॉकी मल्लिशा यांना प्रदान करण्यात आला. तसेच आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ केंद्र पुरस्कार रेडिओ सिटी यांना, तर आशा सर्वोत्कृष्ट कम्युनिटी रेडिओ केंद्राचा पुरस्कार विकास भारती रेडिओ केंद्र नंदूरबार यांना प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे कार्यक्रमात 12 रेडिओ प्रकारात पुरस्कार देण्यात आले. राज्यात 16 रेडिओ वाहिन्या, 58 कम्युनिटी रेडिओ वाहिन्या व 60 केंद्र अस्तित्वात आहेत.
No comments:
Post a Comment