मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्तीसगड सीमेवरील दुर्गम कवंडे गावात
- 12 कुख्यात नक्षल्यांची शस्त्रांसह शरणागती
- आत्मसमर्पण केलेल्यांच्या सामूहिक विवाह सोहळ्यालाही उपस्थिती
- सी-60 जवानांचा सत्कार, अत्याधुनिक एके-103 आणि पिस्तुले दिली
- बुलेटप्रुफ वाहनांसह 19 वाहने पोलिसांच्या सेवेत
- कोरमा नाल्यावरील आंतरराज्यीय पुलाची ड्रोनने पाहणी
गडचिरोली, (जिमाका), दि.6 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज थेट महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील कवंडे गावात पोहोचले. या अतिदुर्गम आणि नक्षलप्रभावित भागात जाणारे ते राज्याचे पहिले मुख्यमंत्री ठरले. त्यांच्या उपस्थितीत कोट्यवधींचे बक्षीस असलेल्या 12 नक्षलवाद्यांनी शस्त्रांसह शरणागती पत्करली. शस्त्रांसह शरणागती पत्करणारे अशाप्रकारची ही पहिलीच घटना आहे.
यापूर्वी शरणागती पत्करलेल्या पूर्वीच्या 13 नक्षल्यांचा सामूहिक विवाह सोहळाही गडचिरोलीत आयोजित करण्यात आला. त्याला हजेरी लावत मुख्यमंत्री फडणवीस यांनी नवदाम्पत्यांना नवजीवनाच्या शुभेच्छा दिल्या. सायंकाळी त्यांनी सी-60 जवानांचा सत्कार केला आणि त्यांना अत्याधुनिक अशी एके-103 शस्त्रे आणि एएसएमआय पिस्तुल, बुलेटप्रुफ जॅकेट्स प्रदान केली. त्यांच्या शौर्याची प्रशंसाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. जिल्हा नियोजन विकास निधीतून 19 चारचाकी वाहने खरेदी करण्यात आली आहेत. त्यातील काही बुलेटप्रुफ वाहने आहेत. त्यांच्या चाव्या त्यांनी पोलिस दलाकडे सुपूर्द केल्या. या दौऱ्यात वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ मिलिंद नरोटे, पोलिस उपमहानिरीक्षक अंकीत गोयल, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment