ऑटोरिक्षा-टॅक्सी संवर्गातील वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र
नूतनीकरण विलंब शुल्क आकारण्यास स्थगिती
- मंत्री दादाजी भुसे
मुंबई, दि. ११ : ऑटो रिक्षा-टॅक्सी, विविध संवर्गातील वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्यास प्रति दिवस ५० रुपये एवढे विलंब शुल्क आकारण्यात येत होते. या विलंब शुल्क आकारण्यास स्थगिती देण्यात येत असल्याची माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.
मंत्री श्री.भुसे म्हणाले की, ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक संघटना तसेच विविध परिवहन संवर्गातील वाहनधारकांच्या संघटनांकडून याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले होते.मोटार वाहन नियमामधील राज्य शासनास प्राप्त अधिकारांच्या आधारे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण विलंबास विलंब शुल्क आकारण्यात येते. योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी येणाऱ्या १५ वर्षाच्या आतील सर्व परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्यानंतर प्रति दिवस ५० रुपये विलंब शुल्क आकारण्यात येते. या कार्यवाहीस स्थगिती देण्यात येत आहे. या निर्णयामुळे ऑटो रिक्षा-टॅक्सी, विविध परिवहन संवर्गातील वाहनधारकांना दिलासा मिळणार असल्याचे मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment