Wednesday, 28 February 2024

मराठी भाषेच्या जतन, संवर्धनासाठी शासन प्रयत्नशील

 मराठी भाषेच्या जतन, संवर्धनासाठी शासन प्रयत्नशील

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

            मुंबई दि. 27 :- संवादाचीविचारांचीसाहित्याची आणि आपुलकीची भाषा म्हणजे आपली मराठी. मराठी भाषेचा प्रचारप्रसार करण्याबरोबरच तिचे जतन आणि संवर्धनासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करण्यात येत असून यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालयाच्या विद्यमाने विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात "कुसुमाग्रज साहित्य जागर" कार्यक्रमाचा शुभारंभ  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या  प्रमुख उपस्थितीत झाला. या  कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरविधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेउच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटीलशालेय शिक्षण व मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकरविधान परिषदेचे  विरोधी पक्षनेते अंबादास दानवेमराठी भाषा समितीचे प्रमुख आमदार चेतन तुपेविधानमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे व विलास आठवले यांच्यासह विधिमंडळ सदस्य उपस्थित होते.

            मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करून मुख्यमंत्री म्हणालेकुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेला आपल्या प्रतिभेचे अलंकार चढवून अनेक साहित्यकृतींची निर्मिती केली  आहे. संतसाहित्यिकविचारवंतकवीगीतकारलेखक ते अगदी पत्रकारांपर्यंत अनेकांनी भाषा जिवंत ठेवण्यातवृद्धींगत करण्यात मोलाचे योगदान दिले असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेमराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न केले जात असून यासाठी ज्येष्ठ साहित्यिक ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याबरोबरच वाचन संस्कृतीला बळ देण्यासाठी शासनामार्फत अनेक उपक्रम राबविले जात आहेत. परदेशातही मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तेथील मंडळांना शासनामार्फत मदत केली जात आहे.

            मराठी भाषेच्या प्रचार व प्रसारसाठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलननाट्य संमेलनविश्व मराठी संमेलनालाही निधी उपलब्ध करून दिला जातो. दक्षिण मुंबईत मराठी भाषा भवन व ऐरोलीतील उपकेंद्रही उभे राहत मराठी भाषा विभागामार्फत मराठी भाषेच्या संवर्धनासाठीही विविध उपक्रम राबविले जात असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

            प्रत्येक राज्याची संस्कृती व भाषा जपण्याची जबाबदारी संविधानाने शासनास दिली आहे. शासनाबरोबरच प्रत्येक नागरिकांनी आपली संस्कृती व भाषा पुढे नेण्याचे काम करणे गरजेचे असल्याचे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर म्हणाले.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेभाषा जिवंत ठेवण्यासाठी ती ज्ञानभाषाव्यवहार भाषा व अर्थाजनाची भाषा म्हणून तिचा उपयोग होणे आवश्यक आहे. मराठी भाषा ही अभिजात भाषा आहेच असे सांगून श्री. फडणवीस म्हणाले मराठीचा जास्तीत जास्त अभ्यास व्हावा ती अधिक समृद्ध व्हावी यासाठी प्रत्येकाने मराठीत व्यवहार केले पाहिजेत. नवीन शैक्षणिक धोरणामुळे प्रत्येकाला मातृभाषेत शिक्षण घेण्याचे दालन मिळाले आहे.

            कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. कुसुमाग्रज हे मानवतेचे कवी होते. कुसुमाग्रजांनी आपल्या अलौकिक प्रतिभेने साहित्याच्या सर्व अंगाना स्पर्श करून साहित्य निर्मिती केली आहे. मराठी भाषा संवर्धनाची जबाबदारी त्यांनी सर्व मराठी माणसावर टाकली असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी ‘तुमची आमची माय मराठी’ ही स्वरचित कविता सादर करुन मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

            उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार म्हणाले मे आणि २७ फेब्रुवारी या दोन दिवसांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. १ मे रोजी मराठी राज्यभाषा दिन आणि २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ यासह अन्य संतांनी आपले अलौकिक विचार मराठी भाषेतूनच मांडले. भाषा समृद्ध करण्यासाठी संत व साहित्यिकांचे योगदान मोलाचे आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. मराठी भाषा जतन व संवर्धनासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे ते म्हणाले.

            उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. मंत्री पाटील म्हणालेनवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदवी आणि पदविका  मराठी व इंग्रजी या दोन्ही माध्यमांतून शिकण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला. तसेच अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी मराठीमध्ये परीक्षा दिली आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात सुद्धा मातृभाषेतून शिक्षणाला अधिक महत्त्व दिले आहे. इंजिनियरमेडिकल सारखे शिक्षण सुद्धा आता मातृभाषेतून घेण्यासाठी पर्याय उपलब्ध करून दिला आहे. मराठी भाषेचा प्रसारासाठी सार्वजनिक ग्रंथालयाना अनुदान वाढवून देण्यात आल्याचे ते म्हणाले.

            शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर म्हणालेसाहित्याला प्रोत्साहन देण्याची शासनाची भूमिका असून विश्व मराठी संमेलनमराठी नाट्य संमेलनअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यांना शासनामार्फत निधी उपलब्ध करून दिला जात आहे. मराठी भाषा दिन राज्याच्या प्रत्येक भागात साजरा करण्यासाठी भरीव निधी दिला जात आहे. मराठी भाषेचा प्रचार प्रसार व संवर्धनासाठी मराठी युवक मंडळ हा उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याचेही श्री. केसरकर  यावेळी म्हणाले.

            मराठी भाषा ही अभिजात भाषेच्या निकषात बसत असून यासाठी शासन स्तरावरून आणखीन पाठपुरावा होणे गरजेचे  असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे म्हणाले.

            विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रस्ताविकात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त घेण्यात येत असलेल्या "कुसुमाग्रज साहित्य जागर" कार्यक्रमाबाबत माहिती दिली. यावेळी त्या म्हणाल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याकरिता विधानसभेमध्ये साधारण ७० वेळेला आणि विधान परिषदेमध्ये १०० वेळेला विविध आमदारांनी गेल्या काही वर्षांमध्ये ठरावप्रश्नलक्षवेधीविशेष उल्लेखअल्पसूचना प्रश्न विचारले आहेत. मराठी भाषेला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी अनेकांनी कार्य केले आहे. यामध्ये  हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचेही नाव आग्रहाने घ्यावे लागेल, असेही त्या म्हणाल्या.

            विधानपरिषदेच्या शतकोत्तर महोत्सवी वर्षानिमित्त पत्रकारांच्या सहकार्याने विधानपरिषदेच्या गेल्या शंभर वर्षातील कामकाजावर आधारित ५ ते ७ पुस्तके लवकरच प्रकाशित करण्यात येणार असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

            मराठी भाषा समितीचे प्रमुख आमदार चेतन तुपे यांनीही मनोगत व्यक्त केले.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi