Tuesday, 17 October 2023

जागतिक सागरी शिखर परिषदेस मंगळवारपासून मुंबईत प्रारंभ

 जागतिक सागरी शिखर परिषदेस मंगळवारपासून मुंबईत प्रारंभ

महाराष्ट्रातील बंदर विकासासंदर्भातही विशेष चर्चासत्र

            मुंबई, दि. 16 : जागतिक सागरी शिखर परिषद 17 ते 19 ऑक्टोबर, 2023 या कालावधीत मुंबई येथे होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे मंगळवारी सकाळी 9-30 वाजता दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे या परिषदेचे उद्घाटन करणार असून राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल, राज्याचे बंदरे मंत्री संजय बनसोडे यांची यावेळी उपस्थिती राहणार आहे. बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर ही परिषद होत आहे. या परिषदेत महाराष्ट्रातील बंदरे विकासासंदर्भातही विशेष चर्चासत्र होणार आहे.


            मुंबईत होणारी ही जागतिक सागरी शिखर परिषद राज्यातील सागरी क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणार आहे. मुंबई बंदरास 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विशेष टपाल तिकिटाचे अनावरण, देशाच्या सागरी विकासाला चालना देणाऱ्या धोरणा संदर्भातील पुस्तकाचे प्रकाशन याशिवाय प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते विविध उपक्रमांचे उद्धाटन यावेळी करण्यात येणार आहे.


राज्याच्या बंदर विकासासंदर्भात चर्चासत्र


            राज्यातील बंदरे विकास, परिवहन, उद्योग, पर्यटन क्षेत्रातील वाटचालीसंदर्भात मंगळवारी दुपारी 2 ते 3-30 या दरम्यान चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. राज्याचे बंदरे विभागाचे मंत्री श्री. बनसोडे हे यामध्ये सहभागी होणार आहेत. याशिवाय, परिवहन व बंदरे विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटिया, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, उद्योग व खनिकर्म विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यामध्ये सहभागी होणार आहेत. याशिवाय, बंदरे विकास आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांचाही यामध्ये सहभाग असणार आहे.


महाराष्ट्राचे विशेष पॅव्हेलियन


            राज्यातील बंदरांचा विकास, पर्यटन क्षेत्रातील संधी आणि उद्योग क्षेत्राची भरारी यासंदर्भातील माहिती देणारे विशेष पॅव्हेलियन या सागरी शिखर परिषदेत असणार आहे.


                                                                        00000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi