Friday, 21 April 2023

लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांच्या समन्वयाने ‘सरकार आपल्या दारी’ उपक्रम यशस्वी करू

 लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांच्या समन्वयाने ‘सरकार आपल्या दारी’ उपक्रम यशस्वी करू


          - महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा


            मुंबई, दि. २१ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रमात १६७२ तक्रारी आज दाखल झाल्या असून लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या समन्वयाने महिलांनी मांडलेल्या समस्या प्राधान्याने सोडवण्यात येतील, असे महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.


        परेल येथील मुंबई महापालिकेच्या जी दक्षिण वॉर्ड येथे आयेाजित ‘सरकार आपल्या दारी’ कार्यक्रमात मंत्री श्री.लोढा बोलत होते. यावेळी मुंबई महानगपालिकेचे जी दक्षिण वॉर्ड चे संतोष धोंडे यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.


          मंत्री श्री.लोढा म्हणाले, ‘सरकार आपल्या दारी’ कार्यक्रमात १६७२ तक्रारी दाखल झाल्या असून आज प्रत्यक्ष हजर असलेल्या १६२ अर्जदार महिलांच्या समस्यांचे निराकरण केले जावे यासाठी कार्यवाहीचे आदेश लगेचच सर्व यंत्रणांना दिले आहेत. स्थानिक प्रशासनाने पुढील तीन महिन्याच्या कालावधीत उर्वरित १५१० तक्रारी निपटारा करण्याचे आदेश मंत्री श्री.लोढा यांनी दिले.


       यावेळी महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. जी दक्षिण वॉर्ड येथे बँका, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि शासनाच्या विविध विभागांकडून महिलांकरिता राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या माहितीचे स्टॉल लावण्यात आले होते. महिला व बचत गटांची नोंदणी प्रक्रिया याचीही माहिती महिलांना देण्यात आली. यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांचा मंत्री श्री. लोढा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


            सी वॉर्ड येथे २५ एप्रिल रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमात महिलांना तक्रारीसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये ऑनलाईन अर्जही करता येणार आहे. हा उपक्रम ३१ मे २०२३ पर्यंत दुपारी ३ ते सायंकाळी ५.३० या वेळेत सुरू राहणार आहे. अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी https://forms.gle/7GzCSACLYsj38amq9 या लिंकवर जाऊन माहिती भरता येवू शकणार आहे.


०००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi