Saturday, 29 April 2023

अल्पसंख्याकांसाठीच्या कर्ज योजनांची परतफेडप्रक्रिया

 अल्पसंख्याकांसाठीच्या कर्ज योजनांची परतफेडप्रक्रिया आता अधिक सुलभऑनलाइन प्रणालीचा प्रभावी वापर.

            मुंबई, दि. 29 : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत (NMDFC) कर्ज स्वरुपात व राज्य शासनामार्फत भागभांडवल स्वरुपात उपलब्ध होणाऱ्या निधीतून राज्यात मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत अल्पसंख्याक समाजाच्या आर्थिक व शैक्षणिक उन्नतीसाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. महामंडळाच्या या योजनांमधील कर्ज परतफेडीसाठी आता ऑनलाईन सेवा विकसित करण्यात आली असून त्यामुळे ही प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे.


            महामंडळाच्या कर्ज वसुलीसाठी आतापर्यंत लाभार्थ्याकडून आगाऊ दिनांकित धनादेश घेण्यात येत होते. महामंडळामार्फत आता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने स्टेट बँक कलेक्ट प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे महामंडळाकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड सहजरित्या व सुलभपणे करणे लाभार्थ्यांना शक्य झाले आहे. कुठूनही ऑनलाईन पध्दतीने कर्जाच्या हप्त्याची परतफेड करणे शक्य झाले आहे. ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर त्याची पावती देखील ऑनलाईन पध्दतीनेच त्वरित लाभार्थ्यांना उपलब्ध होणार आहे.


      महामंडळामार्फत घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी State Bank Collect प्रणालीला प्राधान्य देऊन त्याद्वारेच कर्जाची परतफेड करण्यात यावी, असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. लालमिया शरीफ शेख यांनी महामंडळामार्फत कर्ज घेतलेल्या लाभार्थ्याना केले आहे

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi