राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या अभ्यासवर्गातूनसुसंस्कृत युवापिढी राजकारणात येईल
- अंबादास दानवे.
नागपूर, दि. 23 : राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या संसदीय अभ्यासवर्गातून राज्याच्या, देशाच्या राजकारणात सुसंस्कृत व अभ्यासू युवापिढी राजकारणात येईल. राज्याच्या व देशाच्या राजकारणात ही युवापिढी महत्त्वाची भूमिका निभावेल, असा विश्वास विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यांनी व्यक्त केला.
राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या ४९ व्या संसदीय अभ्यासवर्गात ‘द्विसभागृह पद्धतीमध्ये परस्परांतील समन्वय आणि संसदीय लोकशाहीतील वरिष्ठ सभागृहाचे महत्त्वपूर्ण योगदान’ या विषयावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज मार्गदर्शन केले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार महादेव जानकर, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, अवर सचिव सुनिल झोरे तसेच राज्यातील बारा विद्यापीठांतील विद्यार्थी व अधिव्याख्याते उपस्थित होते.
श्री.दानवे म्हणाले, द्विसभागृहामध्ये विधानपरिषद वरिष्ठ सभागृह व विधानसभा कनिष्ठ सभागृह म्हणून ओळखले जातात. दोन्ही सभागृहातील सदस्य जनतेच्या समस्या सभागृहात मांडत असतात. विधानपरिषद व विधानसभा या दोन्ही सभागृहात समन्वयाने काम करुन जनसामान्यांच्या हिताचे कायदे केले जातात. या सभागृहांचे प्रतिनिधित्त्व करण्याची अनेकांची इच्छा असते. आपले द्विसभागृह अमेरिका, इंग्लड येथील सभागृहाप्रमाणे समन्वय साधण्याचे काम करीत असतात. दोन्ही सभागृहात सत्ताधारी व विरोधकांचे बहुमत कमी-अधिक असले तरी येथे कोणाचे व्यक्तिगत मतभेद नसतात. कनिष्ठ सभागृहात एखादा कायदा करतांना त्यामध्ये काही सूचना, बदल वरिष्ठ सभागृह सूचविते. त्यानंतर पाठिंबा दिला जातो. त्याबाबत कुठलीही कटुता ठेवली जात नाही. हे राज्यातील द्विसभागृहाचे वैशिष्ट असल्याचे श्री.दानवे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी श्री.दानवे यांनी विधानपरिषदेतील आजी माजी जेष्ठ व श्रेष्ठ सदस्यांचा त्यांच्या कामकाजाबाबतचा उल्लेख केला. तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना श्री.दानवे यांनी समर्पक अशी उत्तरे दिली. अवर सचिव सुनिल झोरे यांनी श्री.दानवे यांचा परिचय करुन दिला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थींनी कु.गायत्री डुकरे-पाटील यांनी आभार व्यक्त केले.
००००
जनता आणि प्रतिनिधी यांच्यातील संवादच समाजाचा विकास करू शकतो
-विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ.
नागपूर, दि. 23 : लोकशाहीत लोकप्रतिनिधीबद्दल लोकांच्या मनात पुरेसा विश्वास असेल तरच जनता आणि प्रतिनिधी यांच्यात संवाद टिकून राहू शकतो आणि त्यातून संपूर्ण समाजाचा विकास होत असल्याचे प्रतिपादन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले.
राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या ४९ व्या संसदीय अभ्यासवर्गात ‘आदर्श लोकप्रतिनिधी : अपेक्षा आणि वास्तव व संसदीय लोकशाहीत लोकशिक्षणाचे महत्त्व’ या विषयावर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आज मार्गदर्शन केले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार महादेव जानकर, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, अवर सचिव सुनिल झोरे तसेच राज्यातील बारा विद्यापीठांतील विद्यार्थी व अधिव्याख्याते उपस्थित होते.
विधानसभा उपाध्यक्ष श्री झिरवाळ म्हणाले, लोकप्रतिनिधींना मतदार संघाचे प्रतिनिधित्त्व करण्याची संधी मिळते म्हणजे सामान्य लोकांची सेवा करण्याची संधी मिळते. ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, नगरसेवक, खासदार, आमदार हे लोकप्रतिनिधी त्या मतदारसंघातील जनतेचे प्रतिनिधीत्त्व करुन त्यांच्या समस्या, प्रश्न सोडवून एकप्रकारे त्यांची सेवा करीत असतात. गावचा सरपंच सुद्धा गावाचा चांगला विकास करु शकतो. लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदार संघातील विविध विषयांचा सतत अभ्यास केला पाहिजे.
लोकशाहीत शिक्षण हा महत्त्वाचा असा भाग आहे. देशातील प्रत्येक नागरिक शिक्षित झाला पाहिजे. आदिवासी बांधवांचीही शैक्षणिक प्रगती सुरु आहे. आदिवासी भागातील पाणीसाठे वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे स्थलांतर थांबविले जाऊ शकते. आदिवासी बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. युवकांनी पाणी प्रश्नावर अभ्यास करुन चळवळ उभी करावी. भविष्यात पाणीवाटप हा महत्त्वाचा विषय राहणार असून युवकांनी याबाबत सतत जागरुक राहणे आवश्यक असल्याचेही श्री. झिरवाळ यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अवर सचिव सुनिल झोरे यांनी श्री.झिरवाळ यांचा परिचय करुन दिला. तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना श्री. झिरवाळ यांनी समर्पक अशी उत्तरे दिली. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थींनी कु.उषा सुर्यवंशी यांनी आभार व्यक्त केले.
००००
No comments:
Post a Comment