Thursday, 7 April 2022

 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना

राबविण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर सादर करा

 - विजय वडेट्टीवार.

            मुंबई, दि.6 : विमुक्त जाती, भटक्या जमाती,विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गाकरिता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबविण्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर सादर करण्याचे निर्देश इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.

            मंत्रालयातील दालनात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबविण्याबाबत मंत्री श्री. वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी इतर मागास प्रवर्ग विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार, वित्त विभाग, नियोजन विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

            मंत्री श्री.वडेट्टीवार म्हणाले, विमुक्त जाती, भटक्या जमाती,विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गाकरिता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबविण्याबाबत सन २०२१-२२ या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली आहे.तसेच अन्न,नागरी पुरवठा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळ उपसमितीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना ही स्वतंत्र योजना राबविण्याची शिफारस केलेली आहे.सध्या विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गाकरिता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राबविण्यात येत असल्याने विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गाकरिता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबविण्याचे प्रस्तावित आहे. याकरिता विभागाने या योजनेचा परिपूर्ण प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर सादर करावा. असे निर्देशही मंत्री श्री. वडेट्टीवार यांनी बैठकीत दिले.

००००



No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi