जावळी तालुक्यातील 21 गावांच्या पाणीप्रश्नी
जलजीवन मिशन योजनेत समावेश करणार
- गुलाबराव पाटील
मुंबई, दि. 23 : सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील 21 गावांचा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत समावेश होता. सन 2014 पासून प्रादेशिक करंजे योजनेचा वीज पुरवठा थकबाकी असल्यामुळे कायमस्वरुपी खंडीत करण्यात आला आहे. त्यामुळे ही योजना बंद आहे. या गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जलजीवन मिशन येाजनेत समावेश करुन यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज विधान परिषदेत दिली.
याबाबत विधान परिषद सदस्य शशिकांत शिंदे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना पाणी पुरवठा मंत्री श्री.पाटील बोलत होते.
याबाबत कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद सातारा यांनी मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पुणे विभाग यांच्याकडे अभिप्रायासाठी प्रस्ताव सादर केला आहे. हा अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर तो प्रस्ताव शासनाकडे सादर होणार आहे. त्यानंतर या प्रस्तावाला मान्यता देऊन स्वतंत्र योजनांचे सुधारणात्मक पुनर्जोडणी योजनांना विहित पद्धतीने मंजुरी देऊन यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले
No comments:
Post a Comment