*|| कोजागरी पौर्णिमा - एक असाधारण पौर्णिमा ||*
“पिंडी ते ब्रह्माण्डी” ह्या तत्वावर आधारभूत, आपणा सर्वांना ज्ञात आहे कि सौर मंडलातील सूर्य म्हणिजे पिंडिय आत्मा आणि चन्द्र म्हणिजे मन - केवळ मनुष्याचेच नव्हे तर सर्व जीवांचे.
योगी पुरुष, जे अपरोक्ष ज्ञानाचे साक्षी आहेत, ते म्हणतात की ईश्वरी योजनेनुसार परिपूर्ण मन हे १६ कलांनी युक्त असते. चंद्रास देखील एकंदर १६ कला आहेत. ह्यातील प्रतिपदा पासून पौर्णिमेपर्यंतच्या १५ कलांचे सर्वांना नित्य तिथी रूपी साधारण दर्शन होते. पिंडामध्ये मनाच्या १५ कलांची नांवे अशी आहेत - १) अमृता, २) मनदा, ३) पूषा, ४) पुष्टि, ५) तुष्टि, ६) रति, ७) धृति, ८) शासिनी, ९) चंद्रिका, १०) कांता, ११) ज्योत्सना, १२) श्री, १३) प्रीति, १४) अंगदा, १५) पूर्णा.
मात्र चंद्राची पूर्णामृता नांवाची १६ वी कला साधारण दर्शनास प्रकट होत नसल्याने गूढ अशी आहे. भारतात ज्याला कोजागरी पौर्णिमा म्हणातात, त्या काळात चंद्र हा सर्व १६ च्या १६ कलांनी युक्त असतो. ह्या कारणाने ह्या पौर्णिमेस विशेष महत्व आहे.
भूतलावरील जीव, हा किती कालांनी युक्त आहे, त्या प्रमाणे तो पशु, मनुष्य, अवतार, वा पूर्णावतार म्हणाला जातो. भगवान श्रीकृष्ण हे १६ कला युक्त आहेत. पूर्णामृत ही १६ वी कला मन सदा आत्मसंस्थित असल्याचे द्योतक आहे असे म्हणने योग्य ठरेल.
सर्व तिथितील निशी कालामध्ये चंद्र हा सोमरस ग्रहण करीत असतो आणि दिवसा ह्या सोमरसाचा विसर्ग होतो. म्हणून, सर्व साधारण प्रथेनुसार, रात्र भर चंद्रप्रकाशात दूध वा खीर ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी प्रसाद म्हणून ग्रहण करतात.
ज्या भाग्यशाली व्यक्तींना गुरुकृपेने शक्तिपात दीक्षा प्राप्त आहे, त्या साधकांनी कोजागरी पौर्णिमेस साधनेस बसून, ह्या १६ व्या कलेचा थेट प्रसाद थोडा तरी ग्रहण करावा. कारण षोडशी देवी विचारत आहे, “को जागर्ति - कोण जागे आहे बरे?”
- आनंद मुरलीधर कुलकर्णी, द्वारा श्रीवासुदेव निवास, सिद्धयोग शक्तिपीठ पुणे.
No comments:
Post a Comment