लोकसहभागातून मतदार जागृती मोहिम यशस्वी करा
- मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे
नागपूर दि. 22 : 1 नोव्हेंबरला प्रारुप यादी प्रसिध्द करण्यात येत असून या कालावधीत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. यात नवमतदार, दिव्यांग मतदारांची नोंदणी प्राधान्याने करून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी लोकसहभागातून मोहिम यशस्वी करा, अशा सूचना प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केल्या. 1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्ष पूर्ण झालेले युवक-युवतींना मतदार यादीत समाविष्ट करण्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात नागपूर विभागाचा निवडणूक विशेष पुनर्रीक्षण कार्यक्रमाचा आढावा बैठक आयोजित करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी विमला आर., मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, विभागीय उपायुक्त आशा पठान, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर, तहसिलदार राहूल सारंग तसेच जिल्ह्यातील विभागाचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी उपस्थित होते.
16 नोव्हेंबर रोजी राज्यात सर्व ग्रामपंचायतीमध्ये विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मतदार यादीचे वाचन करण्यात येणार आहे. तसेच नवीन मतदारांची नोंदणी, गावातील लग्न होवून बाहेरगावी गेलेल्या महिलांना यादीतून वगळणे तसेच लग्न होवून गावात आलेल्या महिलांची नोंदणी करणे, त्यासोबतच दिव्यांगाची नोंदणी करणे व त्यांना चिन्हांकित करण्याचे काम या शिबिरात करण्यात येणार आहे. मतदार जागृतीसाठी पोस्टर, होर्डींगद्वारे विस्तृत जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
2022 मध्ये नागपूर महानगर पालिकेची निवडणूक होत आहे. त्या अनुषंगाने मतदार जागृतीसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करावे. त्यामध्ये दिव्यांग, तृतीयपंथी तसेच वारांगणा यांनाही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने त्यांची मतदार नोंदणी करून घ्यावी. जेणेकरून मतदाराची टक्केवारी वाढेल. महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासनाने समन्वयाने काम करून मतदार जागृती करावी, तसेच लसीकरण केंद्रावरसुध्दा मतदार जागृती करावी, असे त्यांनी सांगितले. महानगर पालिका क्षेत्रात कर निरीक्षकाद्वारे मतदार जागृती करावी. कर निरीक्षकांनी घरोघरी जावून तक्रारी जाणून घ्यावा. तसेच माहितगार लोकांना मतदार नोंदणी प्रक्रियेत सहभागी करावे. 13 व 14 नोव्हेंबर, 27 व 28 नोव्हेंबर रोजी शिबिराचे नियोजन करा, रहिवासी दाखला, छायाचित्र, घोषणापत्र, आदीबाबत नागरिकांना माहिती द्या व शिबिरात नोंदणी करून घेण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. वंचित घटकांसाठी स्वयंसेवी संस्था अधिकारी यांची घोषणा पत्रानुसार प्रक्रियेत सहभागी करा. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एकत्रित नियोजन करून मतदार जागृती करावी. यासाठी पोस्टर, होर्डींगद्वारे प्रसिध्दी करावी.
सहायक निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदार यादीतील अडचणी दूर करण्यासाठी 1 नोव्हेंबरपासून कामास गती द्यावी. तसेच सूचना व तक्रारीचे निराकरण करण्यास प्राधान्याने लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले.
व्होटर हेल्पलाईनद्वारे सुध्दा मतदारांना आपले नाव पाहता येईल. शाळा व महाविद्यालयामधील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांद्वारे ग्रामीण भागात शिबिराद्वारे मतदार जागृतीबाबत जनजागृती करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शाळा महाविद्यालयात 25 पेक्षा जास्त लोकांना मोहिमेबाबत माहिती देवून मतदार यादीत नाव नोंदविल्यास त्यांचा जिल्हा व राज्य पातळीवर सत्कार करण्याचे योजना आखावी. आदिवासी दुर्गम भागातील जनतेला मतदार नोंदणी प्रक्रियेत सामावून घ्यावे.
जिल्ह्यातील राष्ट्रीय पक्षांचे बैठका घेवून त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सहभागी करा व मतदार जागृती मोहिमेची विस्तृत जनजागृती करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यासोबतच अधिकार आहे, याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. नागपूर विभागात मतदार जागृती करून मतदारांची टक्केवारी वाढविण्यावर प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिले. नवमतदारांना मतदार नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करून त्यांची नोंदणी करून घेण्याची त्यांनी सांगितले. या बैठकीत सहाही जिल्ह्याचे निवडणूक विषयक अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
0000
No comments:
Post a Comment