उत्तम आरोग्यासाठी योगाभ्यास, आयुर्वेद उपयुक्त
- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
अहमदनगर दि.27 (जिमाका ) : आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी योगाभ्यास व आयुर्वेदाच्या सूत्रांचे पालन करणे गरजेचे आहे. आयुर्वेद हे भारताचे वैशिष्ट्य आहे. आयुर्वेदाचा प्रचार-प्रसार झाला पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
प्रवरा ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाचे भूमीपूजन व डॉ.बाळासाहेब विखे -पाटील रिसर्च फाउंडेशनचे उद्घाटन राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते लोणी येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ.सुजय विखे पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदचे सदस्य राजेश पांडे, प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, कुलगुरू डॉ.व्ही.एन.मगरे, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे विश्वस्त मोनिका सावंत इनामदार यांची प्रमुख उपस्थित होती.
राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, उपचारासाठी ॲलोपॅथीचे आरोग्य क्षेत्रात महत्त्व आहे. त्याचप्रमाणे आयुर्वेद व योगा महत्त्वाचा आहे. आरोग्य क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाने भरारी घेतली आहे. तरीसुद्धा आज आपण आपल्या परंपरेतील आयुर्वेदाकडे वळत आहोत. चरकसंहितेमध्ये 'गोड खा, कमी खा व परिश्रमाचे खा' ही जीवनशैली नमूद केली आहे. 'आयुष मंत्रालय' कार्यरत आहे. कमी दरामध्ये सर्वसामान्य लोकांना औषधी मिळाल्या पाहिजेत. यासाठी देशभरात 'जन औषधी केंद्र' स्थापन झालेले आहेत. योगाच्या प्रचार-प्रसारांवर भर देण्यात येत आहे. 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो.
'प्रवरा मेडिकल ट्रस्ट' ने सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी भरीव योगदान दिले आहे आणि आता आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय सुरू करून नवीन क्षेत्रात पाऊल टाकले आहे. असे गौरवोद्गारही श्री.कोश्यारी यांनी यावेळी काढले.
आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. डॉ.राजेंद्र विखे-पाटील यांनी संस्थेच्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती दिली. डॉ.व्ही.एन.मगरे यांनी प्रास्ताविक केले. खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी आभार मानले
No comments:
Post a Comment