Wednesday, 3 June 2026

अमृत संस्थेमार्फत पर्यटन क्षेत्रातील उद्योजकांसाठी उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रमाचे आयोजन

 अमृत संस्थेमार्फत पर्यटन क्षेत्रातील उद्योजकांसाठी

 उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रमाचे आयोजन

 

मुंबई, दि. 3 : ‘महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी’ (अमृत) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘अमृत पर्यटन’ उपक्रमांतर्गत पर्यटन क्षेत्राशी संबंधित उद्योजक, व्यावसायिक व नवउद्योजकांसाठी उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रम (Entrepreneurship Development Programme - EDP) आयोजित करण्यात आला आहे. पर्यटन क्षेत्राशी संबंधित सर्व उद्योजक, व्यावसायिक तसेच इच्छुक युवक-युवतींनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी, स्थानिक रोजगार निर्मिती वाढविण्यासाठी तसेच पर्यटनाशी संबंधित उद्योजकांना सक्षम करण्याच्या उद्देशाने ‘अमृत पर्यटन’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील पर्यटन स्थळे, पर्यटन सेवा, स्थानिक उत्पादने आणि पर्यटन व्यवसायांना नव्या संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ह्लाईंग यांच्याकडून मुंबई विमानतळाची पाहणी

 म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ह्लाईंग 

यांच्याकडून मुंबई विमानतळाची पाहणी

 

            मुंबई, दि. 3 : येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांनी आज पाहणी केली. पाहणी दरम्यान त्यांनी विमानतळावरील प्रवाशी सोयी सुविधा, स्वयंचलित बॅग तपासणी यंत्रणा, जलद 'इमिग्रेशन' सुविधेसह सुरक्षा व्यवस्थेची विमानतळ अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

            राष्ट्राध्यक्ष ह्लाईंग यांच्यासोबत म्यानमार राष्ट्रपती कार्यालयाचे केंद्रीय मंत्री खिन माउंग यी, वित्त आणि महसूल मंत्री डॉ. कान झॉ, कृषी मंत्री मिन नाउंग, उद्योग आणि सूक्ष्म, लघ व मध्यम उद्योग विकास मंत्री डॉ. चार्टी थान, परराष्ट्र व्यवहार मंत्री टिन माउंग स्वे, म्यानमारच्या मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर डॉ. खिन नाइंग ऊ, संरक्षण दलातील लेफ्टनंट जनरल मो म्यिंट स्वे, राष्ट्रीय नियोजन, गुंतवणूक आणि परकीय आर्थिक संबंध मंत्री यू थंत सिन ल्विन, स्थलांतर आणि लोकसंख्या मंत्री डॉ. खाइंग खाइंग सो, वाणिज्य मंत्री मिन मिन आदी यावेळी उपस्थित होते. राजशिष्टाचार अधिकारी दिलीप शेडमेखे, अदानी समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विष्णू झा, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे पोलीस उपमहानिरीक्षक दीपक अग्रवाल हे अधिकारी देखील उपस्थित होते.

महाराष्ट्रातील सात पर्वतीय बोगद्यांपैकी एमटी -5, एमटी -6 आणि एमटी -7 या बोगद्यांचे वेधन

 महाराष्ट्रातील सात पर्वतीय बोगद्यांपैकी एमटी -5, एमटी -6 आणि एमटी -7 या बोगद्यांचे वेधन आता पूर्ण झाले असून ते एकमेकांशी जोडले गेले आहेत. एम टी -8 या 350 मीटर लांबीच्या बोगद्याचे काम यापूर्वीच ५ ऑक्टोबर २०२३ रोजी पूर्ण झाले होते.

सध्या एम टी -3 बोगद्याचे उत्खनन 80 टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले असून एमटी -4 बोगद्याचे काम सुमारे 60 टक्के पूर्ण झाले आहे. एमटी -1 आणि एमटी -2 या बोगद्यांचे कामही वेगाने सुरू आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गिका महाराष्ट्रातील बोईसर आणि गुजरातमधील वापी या महत्त्वाच्या औद्योगिक पट्ट्यातून जात असून, या विभागातील बांधकाम कार्याला गती मिळाली आहे. वापी आणि बोईसर स्थानकांदरम्यान असलेल्या एमटी -8, एमटी -7 आणि एमटी -6 या तिन्ही डोंगराळ बोगद्यांचे उत्खनन यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे भारतात प्रगत बोगदा-निर्मिती, आधुनिक बांधकाम तंत्रज्ञान आणि उच्च-गती रेल्वे पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी चालना मिळत आहे. सुरक्षित, आधुनिक आणि भविष्यासाठी सज्ज अशा रेल्वे वाहतुकीचा मजबूत पाया या प्रकल्पाद्वारे उभा

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रात तिसऱ्या पर्वतीय बोगद्याचे काम पूर्ण

 मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत

महाराष्ट्रात तिसऱ्या पर्वतीय बोगद्याचे काम पूर्ण

 

नवी दिल्ली, दि.2- मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील तिसऱ्या पर्वतीय बोगद्याचे  यशस्वी वेधन पूर्ण झाले असून, भारताच्या पहिल्या हाय-स्पीड रेल्वे मार्गिकेच्या उभारणीत आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील आंबेसरी गावाजवळ या बोगदयाचे काम काम पूर्ण करण्यात आले आहे.

४१७ मीटर लांबी आणि १४.४ मीटर रुंदी असलेला हा बोगदा अत्याधुनिक देखरेख व सुरक्षा प्रणालींनी सुसज्ज करण्यात आला आहे. बुलेट ट्रेनच्या सुरक्षित आणि कार्यक्षम संचालनासाठी आवश्यक असलेल्या सर्व आधुनिक तांत्रिक सुविधा या बोगद्यात उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

या यशासह, महाराष्ट्रात गेल्या पाच महिन्यांत तीन पर्वतीय बोगद्यांचे काम पूर्ण झाले असून, प्रकल्पाच्या तांत्रिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक विभागातील कामाला वेग मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी एम टी -5 आणि एम टी -6 या बोगद्यांचेही यशस्वी वेधन पूर्ण झाले होते.

संपूर्ण उत्खनन प्रक्रियेदरम्यान संरचनात्मक स्थिरता, अचूक अंमलबजावणी आणि कामगारांच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक भूतांत्रिक उपकरणे आणि रिअल-टाइम मॉनिटरिंग प्रणालींचा वापर करण्यात आला. सरफेस सेटलमेंट पॉइंट्स, थ्री डी टार्गेट्स, स्ट्रेन गेजेस आणि सिस्मोग्राफ्सच्या साहाय्याने कंपने, बोगद्याची स्थिरता आणि सभोवतालच्या संरचनांवर सातत्याने देखरेख ठेवण्यात आली. तसेच, वायुवीजन प्रणाली, अग्निसुरक्षा व्यवस्था, नियंत्रित प्रवेश आणि सतत भूतांत्रिक निरीक्षण यांसारख्या सर्वसमावेशक सुरक्षा उपाययोजना राबविण्यात आल्या.

यापूर्वी २ जानेवारी २०२६ रोजी पालघर जिल्ह्यातील सफाळेजवळ १.५ किलोमीटर लांबीच्या एमटी-५ बोगद्याचे वेधन पूर्ण करण्यात आले होते. त्यानंतर ३ फेब्रुवारी २०२६ रोजी एमटी-०६ या ४५४ मीटर लांबीच्या बोगद्याचे वेधन न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथडच्या साहाय्याने यशस्वीरित्या पूर्ण झाले.

महाराष्ट्रातील सात पर्वतीय बोगद्यांपैकी एमटी -5, एमटी -6 आणि एमटी -7 या बोगद्यांचे वेधन आता पूर्ण झाले असून ते एकमेकांशी जोडले गेले आहेत. एम टी -8 या 350 मीटर लांबीच्या बोगद्याचे काम यापूर्वीच ५ ऑक्टोबर २०२३ रोजी पूर्ण झाले होते.

सध्या एम टी -3 बोगद्याचे उत्खनन 80 टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले असून एमटी -4 बोगद्याचे काम सुमारे 60 टक्के पूर्ण झाले आहे. एमटी -1 आणि एमटी -2 या बोगद्यांचे कामही वेगाने सुरू आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गिका महाराष्ट्रातील बोईसर आणि गुजरातमधील वापी या महत्त्वाच्या औद्योगिक पट्ट्यातून जात असून, या विभागातील बांधकाम कार्याला गती मिळाली आहे. वापी आणि बोईसर स्थानकांदरम्यान असलेल्या एमटी -8, एमटी -7 आणि एमटी -6 या तिन्ही डोंगराळ बोगद्यांचे उत्खनन यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे भारतात प्रगत बोगदा-निर्मिती, आधुनिक बांधकाम तंत्रज्ञान आणि उच्च-गती रेल्वे पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी चालना मिळत आहे. सुरक्षित, आधुनिक आणि भविष्यासाठी सज्ज अशा रेल्वे वाहतुकीचा मजबूत पाया या प्रकल्पाद्वारे उभारला जात आहे.

बिडी कामगारांच्या किमान वेतनवाढीबाबत उद्योजकांनी सकारात्मक भूमिका घ्यावी

 बिडी कामगारांच्या किमान वेतनवाढीबाबत उद्योजकांनी सकारात्मक भूमिका घ्यावी

-कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर

 

मुंबई, दि.२ : बिडी कामगारांच्या उपजीविकेचा प्रश्न गांभीर्याने घेतला पाहिजे. कामगारांचा उदरनिर्वाह या उद्योगावर अवलंबून असल्याने त्यांना योग्य न्याय मिळावा, तसेच त्यांच्या किमान वेतनात वाढ करण्याबाबत या क्षेत्राशी संबंधित उद्योजकांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहन कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी केले 

 

बिडी कामगारांच्या किमान वेतन व महागाई भत्त्याच्या प्रश्नासंदर्भात कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली बीकेसी  येथील कामगार भवनात बैठक आयोजित करण्यात आली होती.

 

बैठकीस कामगार विभागाचे उपसचिव दिपक पोकळे, तसेच संबंधित अधिकारी, मालक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी बिडी कामगारांना किमान वेतनासोबत महागाई भत्ता देण्यात यावा, अशी मागणी केली.

 

मालक प्रतिनिधींनी या संदर्भातील आपले सविस्तर निवेदन शासनाकडे सादर करावे, असे सांगत कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर म्हणाले, प्राप्त निवेदनाचा विचार करून शासनस्तरावर पुढील निर्णय घेण्यात येईल. बिडी कामगारांच्या किमान वेतनाबाबत सर्व संबंधित घटकांच्या भूमिका विचारात घेऊन न्याय्य व समतोल निर्णय घेण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. असेही ते म्हणाले.

बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा संदेश गिरिशिखरांवरून देणारी ग्रिहीथा; ११व्या वर्षीच शंभरहून अधिक गडक्कीले सर · बाल गिर्यारोहक ग्रिहीथा विचारेचा मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते गौरव

 बेटी बचाओ, बेटी पढाओचा संदेश गिरिशिखरांवरून देणारी ग्रिहीथा;

११व्या वर्षीच शंभरहून अधिक गडक्कीले सर

·         बाल गिर्यारोहक ग्रिहीथा विचारेचा मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते गौरव

 

मुंबई, दि. २ : सह्याद्रीच्या गडकिल्ल्यांपासून ते आंतरराष्ट्रीय पर्वतरांगांपर्यंत आपल्या जिद्दीची पताका फडकावणाऱ्या ११ वर्षीय बाल गिर्यारोहक ग्रिहीथा विचारे हिने अल्पवयातच शंभरहून अधिक गड-किल्ले आणि पर्वतशिखरे सर करून राज्यातील मुलींसमोर प्रेरणेचा नवा आदर्श उभा केला आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मंत्रालयात सत्कार करून गौरव केला.

 

मंत्रालयात ग्रिहीथाशी संवाद साधताना मंत्री तटकरे म्हणाल्या, मुलीच्या जन्माचे महत्त्व आणि तिच्या क्षमतांची उंची तुझ्याकडे पाहून समजते. अवघ्या चिमुकल्या वयात यशाची अनेक शिखरे पार करून तू राज्यातील आणि देशातील मुलींसाठी प्रेरणास्थान ठरली आहेस. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओचा संदेश गिर्यारोहणाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर पोहोचवत आहेस, ही अभिमानास्पद बाब आहे. ग्रिहीथाच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत राज्य शासनामार्फत तिला बाल पुरस्कारासाठी सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

 

ग्रिहीथा स्नेहा सचिन विचारे हीने अवघ्या ११ व्या वर्षी महाराष्ट्रातील ११० हून अधिक गड-किल्ले, देशातील १८ राज्यांतील ऐतिहासिक दुर्ग तसेच माऊंट एव्हरेस्ट बेस्ड, किलिमंजारो साऊथ आफ्रिका, किनाबालू मलेशीया, बाझारडूझू अझबैजन अशी चार आंतरराष्ट्रीय शिखरे सर केली आहेत. वयाच्या सहाव्या वर्षी कुटुंबासमवेत सुरू झालेला तिचा गिर्यारोहणाचा प्रवास आज विक्रमाच्या उंचीवर पोहोचला आहे.

 

कळसुबाई, भीमाशंकर, अलंग-मदन-कुलंग, गोरखगड, बोरंड्याची नाळ, आधाराई, काळू धबधबा, ढाक भैरी, जीवधन यांसारखे आव्हानात्मक ट्रेक तिने यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. सह्याद्रीतील कठीण समजल्या जाणाऱ्या अनेक मोहिमा पार करताना तिने धैर्य, चिकाटी आणि आत्मविश्वासाचे दर्शन घडविले आहे.

 

ग्रिहीथाने सांगितले की, विविध राज्यांतील गड-दुर्ग सर करताना तिने बेटी बचाओ, बेटी पढाओचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. तिच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. लहान वयातच तिने किलीमांजारोसारख्या आंतरराष्ट्रीय शिखराची मोहीम पूर्ण केली असून, एव्हरेस्ट मोहिमेदरम्यान तीव्र थंडी आणि प्रतिकूल हवामानाचा सामना करत जिद्दीने यश संपादन केले. जगातील प्रत्येक खंडातील सर्वोच्च शिखर सर करण्याचे स्वप्नही तिने व्यक्त केले.

०००

वंचित समाजाला शासकीय प्रमाणपत्रे देण्यासाठी व्यापक मोहीम राबविणार

 वंचित समाजाला शासकीय प्रमाणपत्रे देण्यासाठी व्यापक मोहीम राबविणार

 -मंत्री अतुल सावे

 

मुंबई, दि. २ : लातूर जिल्ह्यातील भटक्या-विमुक्त, मायक्रो ओबीसी तसेच इतर वंचित घटकांतील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा आणि त्यांना आवश्यक असलेली जात, रहिवासी व इतर शासकीय प्रमाणपत्रे वेळेत उपलब्ध व्हावीत, यासाठी व्यापक मोहीम राबविण्यात यावी, असे निर्देश इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिले.

 

लातूर जिल्ह्यातील विमुक्त जाती-भटक्या जमाती, अनुसूचित जाती-जमाती, इतर मागास प्रवर्ग आणि इतर वंचित समाजघटकांच्या विविध समस्यांबाबत मंत्री सावे यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार अभिमन्यू पवार, भटके-विमुक्त समाजाचे प्रतिनिधी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

मंत्री अतुल सावे यांनी यावेळी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना वंचित समाजातील नागरिकांना शासकीय प्रमाणपत्रे आणि योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष शिबिरे, जनजागृती मोहीम आणि प्रशासकीय समन्वयाच्या माध्यमातून प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या. समाजातील कोणताही पात्र नागरिक केवळ कागदपत्रांच्या अभावामुळे शासनाच्या लाभांपासून वंचित राहू नये, यासाठी शासन सकारात्मक असून आवश्यक ते निर्णय घेतले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

बैठकीत समाज प्रतिनिधींनी वंचित घटकांतील अनेक नागरिकांना जात प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे मिळविताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. आवश्यक प्रमाणपत्रांच्या अभावामुळे शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, शैक्षणिक सवलती, शिष्यवृत्ती, आरक्षणाचा लाभ आणि इतर विकासात्मक उपक्रमांपासून अनेक कुटुंबे वंचित राहत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

भटके-विमुक्त, मागासवर्ग समाज विकास चळवळीचे अभ्यासक अशोक निवृत्ती तांबे यांनी यावेळी सविस्तर भूमिका मांडताना, भटक्या-विमुक्त आणि मायक्रो ओबीसी समाजातील नागरिकांना त्यांच्या हक्काच्या योजना व सवलती सहानुभूतीपूर्वक आणि सुलभ प्रक्रियेद्वारे मिळवून देण्यासाठी शासनाने विशेष उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली. तसेच विद्यमान शासन निर्णयांमध्ये आवश्यक सुधारणा करून प्रमाणपत्र वितरण प्रक्रिया अधिक सुलभ करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

यावेळी संबंधित विषयावर नवीन शासन निर्णय जारी करण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेला प्राथमिक मसुदाही बैठकीत सादर करण्यात आला.

Featured post

Lakshvedhi