Wednesday, 17 June 2026

रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत घेण्यासाठी विधि व न्याय विभागाचे मार्गदर्शन घ्यावे

 रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत घेण्यासाठी

 विधि व न्याय विभागाचे मार्गदर्शन घ्यावे

- आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

 

मुंबई, दि. १६ : आदिवासी विकास विभागांतर्गत आश्रमशाळांमध्ये तासिका/रोजंदारी तत्त्वावर कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्यासंदर्भात विविध न्यायालयीन प्रकरणे, न्यायालयाचे वेगवेगळे आदेश आदींचा अभ्यास करून विधि व न्याय विभागाचे कायदेशीर मार्गदर्शन प्राधान्याने घेण्याचे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिले.

 

 मंत्री डॉ. वुईके यांनी याविषयासंदर्भात शासकीय निवासस्थानी बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. आदिवासी विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणाली द्वारे उपस्थित होते. कर्मचारी प्रतिनिधीच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत तासिका व रोजंदारी तत्त्वावरील कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेण्यासंदर्भातील न्यायालयीन आदेश, शासन निर्णय आणि विविध प्रलंबित प्रकरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

 

मंत्री डॉ. वुईके म्हणाले की, आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमध्ये तासिका व रोजंदारी तत्त्वावर कार्यरत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी अनेक वर्षांपासून प्रतिकूल परिस्थितीत आणि प्रतिकूल ठिकाणी सेवा देत आहेत. त्यांच्या मागण्या एवढ्या वर्षांपासून प्रलंबित ठेवणे संयुक्तिक नसून, याकडे सहानुभूतीपूर्वक पाहण्याची गरज आहे. हॆ प्रकरण आणखी प्रलंबित न ठेवता, त्यांना नियमित सेवेत सामावून घेण्याबाबत विधि व न्याय विभागाचे कायदेशीर मार्गदर्शन घेऊन हा मुद्दा निकाली काढावा.

 

मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठांमध्ये कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी विविध रिट याचिका दाखल केल्या आहेत. काही प्रकरणांमध्ये उच्च न्यायालयाने १० वर्षांपेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत शासनाला निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात शासनाने यापूर्वीही विशेष बाब म्हणून पात्र कर्मचाऱ्यांच्या नियमितीकरणाबाबत निर्णय घेतला आहे. बैठकीत न्यायालयाने घालून दिलेल्या निकषांवर सर्व प्रकरणांचा कायदेशीर आणि मानवीय दृष्टीकोनातून विचार करावा. न्यायालयीन आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करताना पात्र कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, तसेच शासनाच्या नियमांचेही पालन व्हावे, याची खबरदारी बाळगण्याचे निर्देश त्यांनी दिले.

हाफकिन संस्था आणि ‘चक्र’ यांच्यात सामंजस्य करार

 हाफकिन संस्था आणि चक्रयांच्यात सामंजस्य करार

            मुंबई, दि. १७ : हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्था आणि महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधे विभागांतर्गत कार्यरत सेंटर फॉर हेल्थ, अप्लाइड नॉलेज अँड रिसर्च ऑटोनॉमी (चक्र) यांच्यात सामंजस्य करार  करण्यात आला.

            १८९९ मध्ये स्थापन झालेली हाफकिन संस्था ही देशातील सर्वात जुन्या जैववैद्यकीय संशोधन संस्थांपैकी एक असून संसर्गजन्य रोगांवरील संशोधन, प्रशिक्षण आणि चाचणी क्षेत्रात अग्रणी भूमिका बजावत आहे.

            या सामंजस्य कराराअंतर्गत प्राध्यापक विकास, क्लिनिकल ट्रायल्स, जैववैद्यकीय संशोधन, ट्रान्सलेशनल मेडिसिन, जीनोमिक्स, सार्वजनिक आरोग्य तसेच क्षमता विकास या क्षेत्रांमध्ये दोन्ही संस्था संयुक्तपणे कार्य करणार आहेत. याशिवाय संयुक्त संशोधन प्रकल्प, प्रशिक्षण कार्यक्रम, प्राध्यापकांची देवाण-घेवाण आणि संशोधनासाठी उपलब्ध पायाभूत सुविधांचा परस्पर वापर यांनाही प्रोत्साहन दिले जाणार आहे.

            या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण, संशोधन, क्लिनिकल ट्रायल्स आणि आरोग्यसेवा क्षेत्रात उत्कृष्टतेला चालना मिळण्यास मदत होणार असून नव्या संशोधनास संधी आणि ज्ञानवृद्धीसाठीही महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

नवीन कामगार संहितांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करावे

 नवीन कामगार संहितांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी

प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करावे

-         कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर

 

            मुंबई, दि. १७: बदलत्या औद्योगिक आणि आर्थिक परिस्थितीत नवीन कामगार संहितांची प्रभावी अंमलबजावणी ही काळाची गरज आहे.  त्यासाठी सक्षम, प्रशिक्षित आणि अभ्यासू अधिकारी वर्ग तयार होणे अत्यंत आवश्यक आहे. या प्रशिक्षणातून सहभागी अधिकारी हे केवळ प्रशिक्षणार्थी न राहता मास्टर ट्रेनर म्हणून उदयास यावेत आणि कामगार विभागातील इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांपर्यंत नवीन कामगार कायद्यांचे ज्ञान पोहोचवावे, असे प्रतिपादन कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी केले आहे.

            परळ येथील ना.मे.लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेच्या वतीने  आयोजित  नवीन कामगार संहिता आणि कामगार कायद्यातील बदल या विषयावरील चार दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये मंत्री ॲड. फुंडकर बोलत होते.

            प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना संबोधित करताना मंत्री ॲड. फुंडकर म्हणाले, कामगार विभाग हा शासन आणि समाज यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे. कामगारांचे संरक्षण, सामाजिक सुरक्षा आणि उद्योगांच्या प्रगतीसाठी विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या जबाबदाऱ्या संवेदनशीलतेने आणि कार्यक्षमतेने पार पाडाव्यात. नवीन कामगार संहितांबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांचा लाभ कामगार आणि उद्योग या दोन्ही घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहावे.

बंदर क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ; राज्यातील सहा आयटीआयमध्ये विशेष अभ्यासक्रम

 बंदर क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ;

राज्यातील सहा आयटीआयमध्ये विशेष अभ्यासक्रम

- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

 

मुंबई, दि. १६: सिंधुदुर्ग, नाशिक, पालघर, औंध-पुणे, नागपूर आणि मुंबई येथील निवडक सहा आयटीआय संस्थांमध्ये बंदरे क्षेत्राशी संबंधित विशेष अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आवश्यक तयारी करण्यात यावी, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे  यांनी दिल्या. विद्यमान आयटीआय मध्येच इमारतींमध्येच विद्यार्थ्यांना हे शिक्षण दिले जाणार असून, अद्ययावत व उद्योगाभिमुख प्रशिक्षणामुळे स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले.

 

राज्यातील बंदरे क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने बंदरे विभागाशी निगडित आयटीआय कौशल्य विकास व पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आवश्यक अधिसूचना जारी करण्याबाबत मंत्रालयातील दालनात मंत्री राणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली.

           

निवडक आयटीआय संस्थांना प्रत्यक्ष भेटी देऊन आवश्यक पायाभूत सुविधा तातडीने विकसित करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच सागरी व किनारी भागांमधील रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन अभ्यासक्रमांची रचना करण्यावर विशेष भर देण्यात आला.

 

विशेषतः शिप बिल्डिंग, पोर्ट ऑपरेशन्स, लॉजिस्टिक्स, मरीन मेकॅनिक्स, कोस्टल मॅनेजमेंट आणि सागरी सुरक्षा यासारखे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. वाढवण बंदर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधींचा विचार करून उद्योगांच्या गरजेनुसार कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रम विकसित करण्याचे निर्देशही मंत्री राणे यांनी दिले. स्थानिक युवकांना प्राधान्याने प्रशिक्षण देऊन त्यांना बंदर क्षेत्रातील रोजगारासाठी सक्षम करण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.

अतिरिक्त प्लाझ्माचा प्रभावी वापर करून जीवनावश्यक औषधनिर्मितीचा प्रस्ताव तयार करा

 अतिरिक्त प्लाझ्माचा प्रभावी वापर करून

जीवनावश्यक औषधनिर्मितीचा प्रस्ताव तयार करा

-         वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

 

मुंबई, दि.१६ : राज्यातील रुग्णांना जीवनावश्यक औषधे व उपचार अधिक सुलभ आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी अतिरिक्त उपलब्ध प्लाझ्माचा प्रभावी वापर करण्याबाबत सविस्तर प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.

 

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण विभागाच्या  विषयांवरील आढावा बैठक झाली. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे सचिव धीरज कुमार, आयुक्त अनिल भंडारी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

बैठकीत राज्यातील रक्तपेढ्यांमधील अतिरिक्त प्लाझ्माच्या वापराबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यात सध्या सुमारे ४५० रक्तपेढ्या कार्यरत असून त्यापैकी ७९ शासकीय क्षेत्रातील आहेत. उर्वरित रक्तपेढ्या खासगी व स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविल्या जातात. शासकीय क्षेत्रात सुमारे २५ हजार लिटर अतिरिक्त प्लाझ्मा उपलब्ध असून खासगी क्षेत्रात हे प्रमाण तीन लाख लिटरपेक्षा अधिक असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

 

या अतिरिक्त प्लाझ्माचा उपयोग करून हिमोफिलिया, थॅलेसेमिया तसेच इतर गंभीर आजारांवरील उपचारांसाठी आवश्यक औषधनिर्मितीची क्षमता विकसित करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. यासंदर्भात सविस्तर प्रस्ताव तयार करून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना मुश्रीफ यांनी दिल्या.

 

याशिवाय वैद्यकीय शिक्षण विभागाच्या विविध योजनांचा आढावा, समित्यांच्या कार्यपद्धतीतील सुधारणा, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आयोजनाची तयारी, गोंदिया येथील प्रकल्पांची प्रगती, वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांतील मनुष्यबळाची उपलब्धता, दंत महाविद्यालय व सभागृह उद्घाटन कार्यक्रमांचे नियोजन तसेच विविध वैद्यकीय संस्थांमधील पायाभूत सुविधांच्या विकासासंदर्भातील विषयांवरही चर्चा करण्यात आली.

होलार समाजाच्या अभ्यासासाठी समिती गठीत करणार

 होलार समाजाच्या अभ्यासासाठी समिती गठीत करणार

-         मंत्री संजय शिरसाट

 

मुंबई, दि. १६ : होलार समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करण्यात येईल. या समितीच्या अहवालाच्या आधारे समाजाच्या विकासासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात येतील, असे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.

मंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली होलार समाजाच्या विविध प्रश्नाबाबत मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, दूरदृश्य प्रणालीद्वारे समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ - मुंडे, होलार समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, होलार समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी 'संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ' अंतर्गत होलार समाज आर्थिक विकास महामंडळ या स्वतंत्र उपकंपनीची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी निधीची तरतूदही करण्यात आली आहे. समाजासाठी शासनाच्या विविध योजना अधिक प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचाव्यात यासाठी विशेष परिपत्रक जारी करण्यात येणार आहे. हे परिपत्रक राज्यातील सर्व जिल्हा कार्यालयांना पाठविण्यात येणार असून त्याद्वारे संबंधित योजनांची माहिती समाजबांधवांपर्यंत पोहोचविण्याचे काम करण्यात येईल.

 

मंत्री शिरसाट म्हणाले की, होलार समाजाच्या विविध मागण्या आणि प्रश्नांना न्याय देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. समाज प्रतिनिधींसोबत सातत्याने संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या जात आहेत.

रायगड जिल्ह्यातील थळ-नवगाव परिसरातील मच्छीमार बांधवांसाठीमच्छीमारांच्या समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करा

 रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांच्या समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करा

- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

 

मुंबई, दि. १६ : रायगड जिल्ह्यातील आरसीएफ कंपनीच्या मरीन आउटफॉल लाईनमुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा आढावा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयात घेतला.

 

यावेळी आवश्यक चॅनेल व संरक्षण बंधारा उभारणी तसेच थळ-नवगाव परिसरातील मच्छीमार बांधवांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

 

मौजे नवेदार-नवगाव येथील मत्स्य जेट्टी तसेच अलिबाग येथील रेवस-मांडवा प्रवासी जेट्टीच्या प्रलंबित विषयांचाही आढावा घेण्यात आला. या प्रकल्पांशी संबंधित विविध बाबींची सद्यस्थिती तपासून प्रलंबित कामांना गती देण्याचे निर्देश मंत्री राणे यांनी दिले. स्थानिक मच्छीमार आणि नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक समन्वय साधण्याबाबतही मंत्री राणे यांनी सूचना केल्या.

Featured post

Lakshvedhi