देशाचा पैसा व वेळ वाचविण्यासाठी ‘एक देश एक निवडणूक’ या तत्वानुसार सर्व राज्यांच्या विधानसभेच्या आणि लोकसभेची निवडणूक एकाच वेळी घेण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला सर्वांनी पाठिंबा द्यावा. संकटाच्या वेळेत देश म्हणून सर्वांनी एकत्र उभे रहावे, वेळोवेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असेही आवाहन चौहान यांनी केले.
साताऱ्यासारख्या ऐतिहासिक जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर घरकुलांचे वितरण होणे आणि मुदतीपूर्वी घरकुले पूर्ण करण्याचे उद्दिष्ट गाठणे ही अत्यंत महत्वपूर्ण बाब आहे, असे सांगून पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, आज याठिकाणी 16 लाख घरांचा दुसरा हप्ता दिला जात आहे, ज्यामुळे थांबलेल्या कामांना गती मिळेल. सातारा हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा आहे. येथे अनेक सहकारी साखर कारखाने शेतकऱ्यांनी उभे केले आहेत. गेल्या चार वर्षांपासून 'एफआरपी'चे दर वाढत आहेत, जे शेतकऱ्यांच्या दृष्टीने चांगले आहे; परंतु त्याचे लिंकिंग 'एमएसपी'शी (साखर विक्रीचा किमान दर) केलेले नाही. त्यामुळे साखर विक्रीचा किमान दर वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. जर केंद्र सरकारने साखरेची एमएसपी वाढवली, तर कारखान्यांना शेतकऱ्यांची एफआरपी देणे सोपे होईल, असे सांगून घरकुल उद्दिष्टांबद्दल आभार मानताना ज्या लाभार्थ्यांकडे स्वतःची जागा नव्हती, त्यांना जागा घेण्यासाठी एक लाख रुपयांपर्यंत मदत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय मैलाचा दगड ठरला आहे, असेही ते म्हणाले.