Wednesday, 14 May 2025

पावसाळ्यापूर्वी पिटसई कडक्याची गणी गावातील नागरिकांचे निवारागृहात स्थलांतर करावे

 पावसाळ्यापूर्वी पिटसई कडक्याची गणी गावातील

नागरिकांचे निवारागृहात स्थलांतर करावे

- मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

मुंबईदि. १४ : तळा तालुक्यातील पिटसई कडक्याची गणी आदिवासी वाडी येथे मुसळधार पावसामुळे दरड कोसळणे आणि पूरस्थिती निर्माण होते . त्यामुळे मान्सूनपूर्व सतर्कतेचा भाग म्हणून या गावातील नागरिकांचे तात्पुरत्या स्वरूपात निवारागृहात स्थलांतर करावेअसे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिले.

मंत्रालयात रायगड जिल्ह्यातील मौजे पिटसई कडव्याची गणी, आदिवासी वाडीचे (ता. तळा) इतरत्र स्थलांतर करण्यासंदर्भात बैठक झाली. यावेळी खासदार सुनिल तटकरेआपत्ती व्यवस्थापन संचालक सतीशकुमार खडके,  पुनर्वसन विभागाचे सहसचिव संजय इंगळे,  तळा तहसीलदार स्वाती पाटीलआपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील म्हणाले,  तळा तालुक्यातील पिटसई कडक्याची गणी आदिवासी वाडी या ठिकाणी पावसामुळे दरड कोसळण्याची मोठ्या प्रमाणावर शक्यता आहे. त्यामुळे  पावसाळा सुरु होण्याआधी संभाव्य धोका टाळण्याच्या दृष्टीने येथील ३७ कुटुंबियांचे तातडीने स्थलांतर करावे.

भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाकडून पिटसई गावाचा तात्काळ सर्वेक्षण अहवाल प्राप्त करून घ्यावा. तसेच तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात यावीजेणेकरून या ३७ कुटुंबियांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करता येईलअसेही मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले.


पवना प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील

 पवना प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील

- मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

मुंबईदि. १४ : पवना प्रकल्पामुळे बाधित झालेल्या धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहेअसे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले.

मंत्रालयात मावळ तालुक्यातील पवना धरण व टाटा कंपनीच्या धरणग्रस्तांच्या प्रश्नांबाबत पुणे जिल्ह्यातील मौजे कोंढरी व धानवली (ता. भोर) या गावाचे पुनर्वसन करण्याबाबत आढावा बैठक झाली. यावेळी आमदार शंकर मांडेकरआमदार सुनील शेळकेपुनर्वसन विभागाचे सहसचिव संजय इंगळे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील म्हणाले, पवना प्रकल्पात मान्य असे बाधित ७६४ प्रकल्पग्रस्त असून त्यांना प्रत्येकी दोन एकर जागा देण्याबाबत शासन सकारात्मक आहे. परंतु उच्च न्यायालयात जमीन वाटप प्रक्रियेस स्थगिती आदेश दिल्यामुळे वाटपाची प्रक्रिया थांबली आहे.

धरणग्रस्तांचे पुनर्वसनरोजगारवसाहतीतील मूलभूत सुविधा आदी विषयावर यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच टाटा कंपनीकडून प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. टाटा कंपनीच्या धरणग्रस्तांना प्रकल्पग्रस्त दाखले टाटा कंपनीने द्यावेअशी सूचना मंत्री जाधव-पाटील यांनी केली.

भोर तालुक्यातील दरड प्रवण क्षेत्रातील कोंडरी व धानवली गावांचे पुनर्वसन व भोर तालुक्यातील भाटघर व वीर प्रकल्पामुळे बाधित झालेल्या गावांना आवश्यक नागरी सुविधा पुरविण्याबाबत उपाययोजना करण्याबाबतही चर्चा करण्यात आली

लष्कराचा सन्मान आणि आभार व्यक्त करण्यासाठी तिरंगा रॅली

 लष्कराचा सन्मान आणि आभार व्यक्त करण्यासाठी तिरंगा रॅली

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. 14 : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर मुळे दहशतवादाचे कंबरडे मोडण्याचे काम भारतीय लष्कराने केले आहे. या कामगिरीबद्दल लष्कराचे आभार व्यक्त करणे आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

   ऑगस्ट क्रांती मैदान येथे तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून जगाला भारताचे लष्करी सामर्थ्य दिसून आले आहे. पाकिस्तानला भारताच्या लष्करी सामर्थ्यापुढे गुढगे टेकावे लागले आहेत. भारताची संरक्षण तयारी आणि सुरक्षा यंत्रणा भक्कम असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पहलगाम येथील क्रूर हल्ल्याचे प्रत्यूत्तर भारताने दिले आहे.

रॅलीच्या सुरुवातीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपस्थितांनी स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन केले.

ऑगस्ट क्रांती मैदान येथून सुरू झालेली रॅली गिरगाव चौपाटी येथील शहीद तुकाराम ओंबळे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून समाप्त करण्यात आली. समारोपावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपस्थितांनी शहिद तुकाराम ओंबळे यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण केले आणि टिळक स्मारकास अभिवादन केले.

या रॅलीमध्ये पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेकौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढासांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलारयांच्यासह मुंबईतील आमदारलोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते.

वसई विरार महानगरपालिका पाणीपुरवठा योजना आढावा बैठक वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील नळ जोडणी काम तातडीने पूर्ण करावे -

 वसई विरार महानगरपालिका पाणीपुरवठा योजना आढावा बैठक

वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील नळ जोडणी काम तातडीने पूर्ण करावे

- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई दि 14 : वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रालगतच्या ग्रामीण भागातील समाविष्ट गावासाठी जलजीवन मिशन योजनेंतर्गत प्रलंबित असलेली कामे याकरिता मुंबई महानगर विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)जिल्हा परिषदमहाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महानगरपालिका याची एकत्र बैठक घेऊन नळ जोडणीचे ( टॅपिंगचे )कामे तातडीने पूर्ण करावे,असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

मंत्रालयात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रालगतच्या ग्रामीण भागातील समाविष्ट गावासाठी जलजीवन मिशन योजनेंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेविषयी आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार स्नेहा-दुबे पंडितपाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, वसई-विरार महानगरपालिकाचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, अभियान संचालक सुषमा सातपुते, कार्यकारी अभियंता सुरेंद्र ठाकरेमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अजय मुळे, अजय सिंह उपस्थित होते.

वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील कामांच्या गुणवत्तेबाबत स्वतंत्र यंत्रणेमार्फत तपासणी संबंधित अधिकाऱ्यांनी करून घ्यावी. वसई विरार महानगरपालिका पाणीपुरवठा योजनेचे कामे ऑक्टोबर महिन्यापर्यंत वितरण व्यवस्थेची सर्व प्रलंबित कामे पूर्ण करून पाणी जोडणीसाठी टॅपिंगचे काम पूर्ण होऊन सर्वांना पाणी उपलब्ध होईल यादृष्टीने कारवाई करावी, असे निर्देश मंत्री श्री. पाटील यांनी दिले. तसेच अर्नाळा व १६ गावे, तिल्हेर व १२ गावे, अर्नाळा किल्ला व ७ गावे या योजनेंतर्गत प्रलंबित असलेली कामे पूर्ण करण्याच्या सूचनाही  मंत्री श्री. पाटील यांनी दिल्या.

 

००००

महारेलद्वारे मुंबईतील पहिला केबल स्टेड रोड ओवर ब्रिज महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करणार,रे रोड केबल स्टेड रोड ओवर ब्रिज व टिटवाळा रोड ओवर ब्रिजचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

 महारेलद्वारे मुंबईतील पहिला केबल स्टेड रोड ओवर ब्रिज

महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रे रोड केबल स्टेड रोड ओवर ब्रिज व टिटवाळा रोड ओवर ब्रिजचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

 

मुंबई, दि. 14 : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात रेल्वे ब्रिजचे काम महारेलनी हातामध्ये घेतले आहे. आतापर्यंत 32 पूल महारेलनी पूर्ण केले आहेतयावर्षी 25 पूल महारेलच्या माध्यमातून पूर्ण होणार आहेत. महाराष्ट्राला रेल्वे फाटक मुक्त करायचे आहेत्या दृष्टीने महारेलकडे जबाबदारी दिली आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

महाराष्ट्र रेल इनफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट कॉर्पोरेशनमहाराष्ट्र शासन आणि रेल्वे मंत्रालय यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या रे रोड केबल स्टेड रोड ओवर ब्रिज व टिटवाळा रोड ओवर ब्रिजच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होतेयावेळी कौशल्यरोजगारउद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढाआमदार मनीषा कायंदेमहाराष्ट्र राज्य बाल संरक्षण आयोगच्या अध्यक्षा सुशीबेन शाहआमदार मनोज जामसुतकरआमदार प्रवीण दरेकरमहारेलचे महाव्यवस्थापक राजेशकुमार जयस्वाल आदी मान्यवर उपस्थित आहेत. तर टिटवाळा येथे आमदार विश्वनाथ भोईरमाजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील आदी मान्यवर दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेरे रोड केबल स्टेड ब्रिजचे काम अतिशय अडचणीच्या स्थितीतवाहतुकीला कमीत कमी बाधा पोहोचवतवाहतुक पूर्णपणे सुरू ठेवून हे काम महारेलने पूर्ण केले आहे. हे काम करत असताना उत्तम तंत्रज्ञान वापरूनगतिशीलतेने दर्जेदार काम पूर्ण केले आहे. पूल देखील एक आकर्षणाचे केंद्र असतेते आपल्या शहराचे एक प्रकारे मूल्य वाढवणारी अशा प्रकारची एक वास्तू असतेहा विचार करून त्याच्यामध्ये विद्युत रोषणाईसह अन्य वेगवेगळ्या प्रकारे कामे करुन उत्कृष्ट वास्तु तयार केली आहे.  नागपूरमध्येही महारेलच्या माध्यमातून अशा प्रकारचे 10 पूल तयार झालेले आहेतत्याचेही लोकार्पण लवकरच करणार असल्याचे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

रे रोड केबल स्टेड ब्रिज

संत सावता माळी मार्गावरील रे रोड आणि डॉकयार्ड रोड रेल्वे स्थानकांदरम्यान हार्बर लाईनवरील मध्य रेल्वेच्या मार्गावर रे रोड स्थानकाजवळ ६ लेनचा केबल स्टेड रोड ओवर ब्रिज आहे. हा महारेलद्वारे मुंबईतील पहिला केबल स्टेड रोड ओवर ब्रिज आहे.

टिटवाळा रोड ओवर ब्रिज

कल्याण- इगतपुरी विभागातील टिटवाळा आणि खडवली रेल्वे स्थानकांदरम्यान कल्याण रिंग रोडवर टिटवाळा रेल्वे स्थानकाजवळ ४ लेनचा रोड ओवर ब्रिज आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी महाराष्ट्राचे "भूषण" उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा

 सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी महाराष्ट्राचे "भूषण"

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा

 

मुंबई, दि. १४ : भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आज शपथ घेतली हे महाराष्ट्रासाठी "भूषण" आहेअशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आपल्या वडिलांकडून सामाजिक कार्याचा वसा घेतलेले न्या. भूषण  गवई सर्वोच्च न्यायालयातील अनेक घटनात्मक खंडपीठांचा भाग होते. ज्याद्वारे अनेक चांगले ऐतिहासिक निकाल त्यांनी दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून  न्या. गवई यांनी "महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ" नागपुरात स्थापन व्हावे यासाठी महत्त्वाचे योगदान दिले होते. विविध न्यायालयांमधील पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठीही त्यांचे विशेष योगदान आहे.

 

न्यायालयीन सेवेत आपल्या दीर्घ आणि निष्कलंक कार्यकाळात त्यांनी विविध उच्च पदांवर काम करताना न्यायनीतिमत्ता आणि पारदर्शकतेचे भान राखले आहे.

 

त्यांच्या कारकीर्दीत भारतीय न्यायव्यवस्था अधिक सुदृढ आणि लोकाभिमुख होईलअसा मला विश्वास आहेअसे सांगून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी 52व्या सरन्यायाधीश पदाची घेतली शपथ

 न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी 

52व्या सरन्यायाधीश पदाची घेतली शपथ

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ

 

नवी दिल्ली, 14 : राष्ट्रपति भवनात आयोजित एका विशेष समारंभात न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी भारताचे 52व्या मुख्य न्यायाधीश (CJI) म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

या समारोहाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदीउपराष्ट्रपती जगदीप धनखडलोकसभा अध्यक्ष ओम बिर्लागृहमंत्री अमित शाहसंरक्षण मंत्री राजनाथ सिंह, कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवालसर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश संजीव खन्नासर्वोच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीशवरिष्ठ सरकारी अधिकारी आणि कायदा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. निवृत्त मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना यांचा कार्यकाल 13 मे 2025 रोजी संपल्यानंतर न्यायमूर्ती गवई यांनी हे पद आज त्यांच्याकडून स्वीकारले.

न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960 रोजी महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला. आंबेडकरवादी नेतेमाजी खासदार आणि विविध  राज्यांचे राज्यपाल राहिलेले रा.सु. गवई यांचे ते सुपुत्र आहेत. त्यांच्या कुटुंबाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा समृद्ध वारसा असून ते बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत. न्यायमूर्ती गवई यांनी 1985 मध्ये नागपूर विद्यापीठातून बी.ए. एल.एल.बी. पूर्ण करून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. 1987 मध्ये त्यांनी मुंबई येथे उच्च न्यायालयात स्वतंत्र वकिली सुरू केलीप्रामुख्याने नागपूर खंडपीठात. 1992-93 मध्ये त्यांनी सहाय्यक सरकारी वकील आणि अतिरिक्त लोक अभियोजक म्हणून कार्य केले. 2003 मध्ये त्यांची उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. 2005 पासून ते कायमस्वरूपी न्यायाधीश झाले. 24 मे 2019 रोजी त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदोन्नती मिळाली.

न्यायमूर्ती गवई यांची सरन्यायाधीशपदासाठी नियुक्ती सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठेतेनुसार झाली असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 29 एप्रिल 2025 रोजी त्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली. न्यायमूर्ति गवई यांचा सरन्यायाधीश म्हणून कार्यकाल सहा महिन्यांचा असेल. ते 23 नोव्हेंबर 2025 रोजी 65व्या वर्षी निवृत्त होतील.

न्यायमूर्ती गवई यांनी 700 हून अधिक खंडपीठांमध्ये सहभाग घेतला असून 300 हून अधिक निर्णयांचे लेखन केले आहे. ज्यामध्ये संविधानिकप्रशासकीयनागरीफौजदारी आणि पर्यावरणीय कायद्यांचा समावेश आहे.

Featured post

Lakshvedhi