सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Thursday, 17 October 2024
राजधानीत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी
राजधानीत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी
नवी दिल्ली, १५ : भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात आज साजरी करण्यात आली.
दिल्लीतील कॉपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त रूपिंदर सिंग यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी अपर निवासी आयुक्त नीवा जैन, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपवार, स्मिता शेलार तसेच उपस्थित कर्मचाऱ्यांनी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
परिचय केंद्रात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन
महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना आदरांजली वाहण्यात आली.
ज्येष्ठ साहित्यिकांच्या साहित्याचा नवीन पिढीने आदर्श घ्यावा
ज्येष्ठ साहित्यिकांच्या साहित्याचा नवीन पिढीने आदर्श घ्यावा
- डॉ.सदानंद मोरे
मुंबई, दि. 15 : लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे समग्र वाङ्मय हा विद्वत्तेच्या क्षेत्रातील अनमोल ठेवा आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सुनीलकुमार लवटे यांनी अतिशय परिश्रमपूर्वक त्यांच्या कार्याविषयीचे साहित्य 18 खंडांमध्ये एकत्रित केले असून नवीन पिढीने अशा साहित्यिकांचा आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे यांनी केले.
माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात येते. या निमित्ताने राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या समग्र वाङ्मयावर साहित्य चर्चेचे आयोजन डॉ.मोरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या चर्चेत डॉ.लवटे आणि डॉ.अशोक चौसाळकर हे चर्चक म्हणून सहभागी होते.
डॉ.मोरे म्हणाले, वाचकांनी दर्जेदार साहित्य वाचावे यासाठी अशी साहित्य निर्मिती होणे आणि ती वाचकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. साहित्य आणि संस्कृती मंडळ सातत्याने असा प्रयत्न करीत असून यापुढे देखील अशी उत्तमोत्तम विषयांवर आधारित साहित्य निर्मिती केली जाईल. मंडळाकडे अतिशय कमी मनुष्यबळ असताना देखील दर्जेदार साहित्य प्रकाशित होत असल्याबद्दल कौतुक करुन साहित्य प्रेमींचे प्रोत्साहन आणि पाठबळ मिळत रहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
डॉ.लवटे यांनी तर्कतीर्थांवरील 18 खंड हे प्रचंड कार्य असल्याचे सांगून यासाठी हजारो हातांनी संदर्भ पुरविल्याचे सांगितले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या साहित्य जीवनाविषयीचे विविध पैलू उलगडून सांगताना त्यांनी भाषण आणि इतर साहित्यिकांच्या पुस्तकांना प्रस्तावना लिहिण्यासाठी कधीच नकार दिला नसल्याचे तथापि पुस्तक परिक्षण मात्र ते अतिशय चोखंदळपणे करीत असल्याचे डॉ.लवटे यांनी नमूद केले. तर्कतीर्थांवरील 18 खंडांच्या प्रकाशनासाठी साहित्य आणि संस्कृती मंडळासह शासकीय मुद्रणालयाचे आभार व्यक्त केले. विश्वकोश मंडळाच्यावतीने मराठी विश्वकोशाचे लेखन कसे झाले याबाबतचे दस्तऐवज संग्रहित व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
डॉ.चौसाळकर यांनी देखील तर्कतीर्थ आणि त्यांच्या साहित्याबाबत माहिती दिली. डॉ.लवटे यांनी केवळ 3-4 वर्षात त्यांचे कार्य एकत्रित करुन हे प्रचंड कार्य पूर्ण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. याचप्रमाणे राजारामशास्त्री भागवत तसेच आचार्य जावडेकर यांचे समग्र वाङ्मय प्रकाशित व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्रारंभी मंडळाच्या सचिव डॉ.मीनाक्षी पाटील यांनी मंडळाच्या कार्याची माहिती दिली. मंडळामार्फत आतापर्यंत 688 पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आल्याचे त्या म्हणाल्या. मंडळामार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या एका पुस्तकावर वाचन प्रेरणा दिनानिमित्त चर्चा केली जाते, त्यानुसार आज तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या समग्र वाङ्मयावर साहित्य चर्चेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि तंत्रज्ञान आधारित
निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि तंत्रज्ञान आधारित
भारत निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेला अधिक पारदर्शक, वेगवान आणि तंत्रज्ञान आधारित बनवण्यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. या बदलांमुळे मतदार आणि उमेदवारांना अधिक सोयी आणि सुलभता मिळणार आहे. मतदार नोंदणी प्रक्रिया डिजिटल झाली असून, मतदारांना घरबसल्या ऑनलाइन फॉर्म भरून नोंदणी करता येते. मतदान केंद्राची माहितीही ऑनलाइन पाहता येते. ई-ईपीआयसी हे नवीन डिजिटल मतदार ओळखपत्र डाउनलोड करून सुरक्षित ठेवण्याची सुविधा मिळाली असून, सी-विजिल अॅपच्या माध्यमातून मतदारांना कोणत्याही गैरकृत्यांची माहिती थेट आयोगाला देता येते, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता येते.
उमेदवारांसाठीही आयोगाने सुविधा पोर्टल उपलब्ध केले आहे, ज्याद्वारे उमेदवार नामांकन आणि शपथपत्र ऑनलाइन दाखल करू शकतील. याशिवाय, उमेदवारांच्या KYC ची संपूर्ण माहिती, जसे की गुन्हेगारी नोंदी, आयोगाच्या पोर्टलवर उपलब्ध आहे. प्रचारासाठी सभा, रॅलींसाठी ऑनलाइन परवानगी घेण्याची सुविधाही उपलब्ध झाली आहे. या नवीन तंत्रस्नेही पद्धतीमुळे निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक बनली आहे. याबाबत, ऑनलाइन सुविधा उपलब्ध असल्यामुळे मतदार आणि उमेदवारांना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.
****
नांदेड, केरळ आणि उत्तराखंड यासाठी पोटनिवडणुकीची तारीख निश्चित
नांदेड, केरळ आणि उत्तराखंड यासाठी पोटनिवडणुकीची तारीख निश्चित
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, नांदेडमध्ये होणाऱ्या लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होईल. नांदेड लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली. यासोबतच, केरळमधील एका विधानसभेच्या मतदारसंघात आणि वायनाड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक 13 नोव्हेंबर रोजी होणार आहे. तसेच, उत्तराखंडमधील एका विधानसभेच्या मतदारसंघात 20 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक घेण्यात येईल.
भारत निवडणूक आयोगाकडून जिल्हा निवडणूक अधिकारी (DEOs) आणि पोलीस अधीक्षक (SPs) यांना विशिष्ट निर्देश दिले आहेत, ज्यायोगे निवडणूक प्रक्रियेमध्ये सर्व पक्षांसाठी समान पातळी निर्माण केली जावी. यात पूर्ण निष्पक्षता राखून कार्य करण्याबाबत आणि सर्वांसाठी समान पातळी सुनिश्चित करणे, मतदानाच्या दिवशी राजकीय पक्षांच्या डेस्कच्या उभारणीसाठी क्षेत्राचे स्पष्ट चिन्हांकन करणे, सर्व मतदान केंद्रांमध्ये 100% वेबकास्टिंग सुनिश्चित करणे, सर्व मतदान केंद्रांमध्ये मूलभूत सुविधा सुनिश्चित करणे - विशेषतः शहरी भागात लांब रांगा असतील तिथे वयस्करांसाठी बसण्याची सोय, मतदारांची सोय पाहता मतदान केंद्रे निवासस्थानापासून 2 किलोमीटरच्या आत असल्याची खातरजमा, 'पब्लिक डिफेसमेंट अॅक्ट' अंतर्गत लोकांचा अनावश्यक छळ टाळणे, केंद्रीय निरीक्षकांची माहिती सार्वजनिक करणे व सोशल मीडियावर लक्ष ठेवून, खोट्या बातम्यांवर त्वरीत प्रतिसाद देण्याबाबतचे निर्देश दिले आहेत.
Wednesday, 16 October 2024
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी यंत्रणा सज् मतदानाचा टक्का वाढवावा
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी यंत्रणा सज्
मतदानाचा टक्का वाढवावा
- मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम
मतदार यादीत नाव नोंदणीची 19 ऑक्टोबरपर्यंत संधी
मुबंई, दि. 16 : भारत निवडणूक आयोगाने दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यातील एकूण 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी एका टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. यासाठी यंत्रणा सज्ज असून मतदारांनी सक्रिय सहभाग घेत मतदानाचा टक्का वाढवावा, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस.चोक्कलिंगम यांनी येथे केले.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या कार्यक्रमा संदर्भात मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत श्री.चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी विजय राठोड उपस्थित होते.
अजूनही ज्यांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवलेले नाही त्यांना दि. 19 ऑक्टोबरपर्यंत नाव नोंदणी करण्याची संधी अद्याप उपलब्ध असून ऑफलाईन तसेच ऑनलाईन दोन्ही पद्धतीने मतदार आपले नाव मतदार यादीत नोंदवू शकता. निरंतर मतदार नोंदणीचा कार्यक्रम अद्याप सुरु आहे. त्यामुळे ज्या पात्र नागरिकांची अद्यापपर्यंत मतदार नोंदणी झालेली नाही, अशा नागरिकांकडून उमेदवारांचे नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या अंतिम दिनांकाच्या 10 दिवस अगोदरपर्यंत म्हणजेच दि. 19 ऑक्टोबर 2024 पर्यंत प्राप्त झालेले अर्ज क्र. 6 मतदार यादीमध्ये नोंद घेण्यासाठी विचारात घेण्यात येतील. तरी या संधीचा लाभ घेऊन सर्व पात्र नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करत मतदानाचा आपला हक्क आर्वजून बजावावा, असे आवाहन श्री.चोक्कलिंगम यांनी केले.
निवडणूक कार्यक्रमाची रुपरेषा
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 ची अधिसूचना मंगळवार दि. 22 ऑक्टोबर 2024 रोजी राजपत्रात निर्गमित करण्यात येईल. तर नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत मंगळवार दिनांक 29 ऑक्टोबर 2024 रोजी पर्यंत आहे. नामनिर्देशन पत्रांची छाननी बुधवार दि. 30 ऑक्टोबर 2024 रोजी करण्यात येईल. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत सोमवार दि. 4 नोव्हेंबर 2024 रोजी पर्यंत आहे. बुधवार दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान घेण्यात येणार असून शनिवार दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी करण्यात येईल. सोमवार दि. 25 नोव्हेंबर 2024 रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल. त्याचप्रमाणे राज्यातील लोकसभेच्या 16 - नांदेड या एका लोकसभा मतदारसंघात सुद्धा पोटनिवडणूक घेण्यात येणार असल्याची माहिती श्री. चोक्कलिंगम यांनी यावेळी दिली.एकूण 9 कोटी 63 लाख 69 हजार 410 मतदार
राज्यात दि. १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत पुरुष मतदारांची संख्या ४ कोटी ९७ लाख ४० हजार ३०२ इतकी असून महिला मतदारांची संख्या ४ कोटी ६६ लाख २३ हजार ७७ इतकी तर तृतीय पंथी मतदारांची संख्या ६ हजार ३१ इतकी आहे. आतापर्यंत एकूण ९ कोटी ६३ लाख ६९ हजार ४१० मतदारांची नोंदणी झाली असून यामध्ये सन २०११ च्या जनगणनेनुसार १००० पुरुषांमागे ९२९ महिला (Gender Ratio) असे प्रमाण आहे. सन २०१९ मध्ये मतदार यादीतील महिलांचे प्रमाण 1 हजार पुरुषांमागे 925 इतके होते. यामध्ये वाढ होण्याच्यादृष्टीने महिलांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिम राबविण्यात आल्याने 2024 मध्ये या प्रमाणात 936 अशी लक्षणीय सुधारणा झाली आहे.
सध्याच्या मतदार यादीत १८-१९ वर्षे वयोगटामधील नव मतदारांची संख्या 20 लाख 93 हजार 206 एवढी आहे. याशिवाय 1 लाख 16 हजार 355 इतक्या सेनादलातील (Service Voters) मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. अद्ययावत मतदार यादीमध्ये 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांची संख्या 12 लाख 43 हजार 192 इतकी आहे. यापैकी इच्छुक मतदारांना टपाली मतपत्रिकेद्वारे गृह मतदानाची सुविधा उपलब्ध होऊ शकेल. मतदार यादीतील 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांपैकी 47 हजार 716 इतके मतदार 100 वर्षावरील आहेत.
सन 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीसाठी असलेले मतदार व सद्यस्थितीत अद्ययावत मतदार यादीप्रमाणे असलेले मतदार यांचा तुलनात्मक तक्ता खालीलप्रमाणे आहे:-
अ.क्र.
| तपशील
| सन 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीचे मतदार
| दि.30 ऑगस्ट, 2024 रोजी प्रसिध्द झालेल्या अंतिम मतदार यादीतील मतदार | दि.15.10.2024 रोजी अद्यावत मतदारांची संख्या
|
1 | पुरुष | 4,67,37,841 | 4,93,33,996 | 4,97,40,302 |
2 | महिला | 4,27,05,777 | 4,60,34,362 | 4,66,23,077 |
3 | तृतीयपंथी | 2,593 | 5,944 | 6,031 |
| एकूण | 8,94,46,211 | 9,53,74,302 | 9,63,69,410 |
आदर्श आचारसंहिता
आदर्श आचारसंहिता
भारत निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असल्यामुळे संपूर्ण राज्यात कालपासून तात्काळ प्रभावाने आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. ही आचार संहिता विधानसभा नविन सभागृह स्थापन होण्याची घटनात्मक अधिसूचना प्रसिद्ध होईपर्यंत लागू राहिल. त्यामुळे या कालावधीत स्वेच्छाधीन निधीतून अनुदानाचे वाटप, मंत्र्यांचे दौरे व शासकीय वाहनांचा वापर, एकत्रित निधीतून शासकीय जाहिरात प्रसिध्द करणे, नवीन कामांची किंवा नवीन योजनांची घोषणा करणे, शासकीय सार्वजनिक/खासगी संपत्तीचे विद्रुपीकरण इत्यादी बाबींवर निर्बंध लागू झाले आहेत.
आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत निवडणूक खर्चावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. याकरिता राज्यस्तरावर आणि जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उमेदवाराने नामनिर्देशन पत्र भरल्यापासून त्याच्या निवडणूक खर्चाची गणना सुरु करण्यात येईल. मात्र, नामनिर्देशन भरण्यापूर्वी निवडणूक प्रचारासाठीचे साहित्य खरेदी केलेले असल्यास व त्याचा वापर नामनिर्देशनानंतर केला गेल्यास त्या खर्चाचाही समावेश निवडणूक खर्चामध्ये करता येईल. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीकरिता प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा रु.40 लाख इतकी आहे.
राज्यस्तरावर व जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती
राजकीय पक्षांच्या व उमेदवारांच्या जाहिराती प्रमाणिकरण करण्यासाठी राज्यस्तरावर व जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती (Media Certification and Monitoring Committee) स्थापन करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे या समितीकडून पेड न्यूज संदर्भातही प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर कार्यवाही करण्यात येते.
सर्व राजकीय पक्ष, प्रसिध्दी माध्यमे आणि शासकीय विभाग प्रमुख यांच्यासोबत बैठका घेऊन त्यांना आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत राज्य व जिल्हास्तरावर माहिती देण्यात येणार आहे. तसेच प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी आणि मतमोजणीच्या दिवशी मतदान केंद्र/मतमोजणी केंद्रावर प्रसिध्दी माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रवेश मिळण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून प्राधिकार पत्र सुध्दा निर्गमित करण्यात येणार आहेत. मात्र त्यासाठीच्या शिफारशी माहिती व जनसंपर्क महासंचालनालया मार्फत विहित मुदतीत व प्रपत्रात करावयाच्या आहेत.
तसेच आदर्श आचारसंहितेच्या काळात राजकीय पक्षांनी व उमेदवारांनी "काय करावे किंवा करु नये" ("DOs & DON'Ts) याची प्रत मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच, या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या हस्तपुस्तिका संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. भारत निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ https://eci.gov.in वर निवडणूक संदर्भातील सर्व सूचनांचा तपशील उपलब्ध आहे. तसेच उमेदवारांनी दाखल केलेली शपथपत्रे व खर्चाचे तपशील वेळोवेळी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
