सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Wednesday, 18 September 2024
नेत्रदान ही लोक चळवळ बनावी नेत्रदानाचा संकल्प करण्याचे राज्यपाल सी.पी.
नेत्रदान ही लोक चळवळ बनावी
नेत्रदानाचा संकल्प करण्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे आवाहन
मुंबई, दि. 17:– नेत्रदान हे महान कार्य असून या माध्यमातून आपण आपल्या आयुष्यानंतर इतरांच्या माध्यमातून जगू शकतो. यासाठी नेत्रदान ही लोक चळवळ बनावी आणि सर्वांनी नेत्रदानाचा संकल्प करावा, असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.
राज्यपाल श्री.राधाकृष्णन यांच्या संकल्पनेतून जे.जे. रुग्णालय आणि राजभवन यांच्या संयुक्त विद्यमाने राजभवन येथे 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2024 या कालावधीत नेत्रदान संकल्प अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नेत्रदानाचा संकल्प करणाऱ्यांचा आज राज्यपालांच्या हस्ते नेत्रदान कार्ड देऊन गौरव करण्यात आला. राज्यपालांचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, सह सचिव श्वेता सिंघल, जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, नेत्र शल्यचिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉ.सुजाता चहांदे आदी यावेळी उपस्थित होते.
राज्यपाल म्हणाले, कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू हा वेदनादायी असतो, तथापि त्यांच्या अवयवांच्या माध्यमातून इतर गरजूंना नवीन आयुष्य मिळू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 74 व्या वाढदिवसानिमित्त राजभवन येथे आयोजित नेत्रदान संकल्प अभियानात 740 जणांनी संकल्प करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, प्रत्यक्षात एक हजारांहून अधिक फॉर्म भरले गेले. याबाबत समाधान व्यक्त करून हा प्रतिसाद पाहता पुढील वर्षी पंतप्रधानांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त 7500 संकल्पाचे उद्दिष्ट ठेवू या, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पंतप्रधान श्री.मोदी यांनी कोविडच्या दुर्दैवी काळात लस तयार करण्यास प्रोत्साहन देऊन केवळ देशातीलच नाही तर इतर देशांमधील गरजू रुग्णांचे प्राण वाचविले होते. त्यांच्या या कार्यामुळे इतरांना प्रेरणा मिळत असल्याचा उल्लेख राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी केला. मी स्वतः यापूर्वीच नेत्रदानाचा संकल्प केला आहे असे सांगून माझ्या कुटुंबातील मृत्यू झालेल्यांचे देखील नेत्रदान करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. सर्वांनी असा संकल्प केल्यास नेत्रहीन गरजूंची यादी संपण्यास फार वेळ लागणार नाही असे सांगून अधिकाधिक लोक नेत्रदानाचा संकल्प करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या अभियानात सहभागी झालेल्या अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांचे तसेच डॉक्टर्सचे राज्यपालांनी यावेळी आभार मानले. नेत्रदानाचा संकल्प केलेल्यांचे फॉर्म राज्यपालांच्या हस्ते जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ.सापळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. आजच्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
डॉ.सापळे यांनी यावेळी नेत्रदानाचे महत्व सांगून राज्यपालांनी या अभियानास पाठबळ दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. तर, राज्यपालांचे परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ यांनी ‘आय कॅन सी क्लियरली नाऊ’ ही या वर्षी नेत्रदान संकल्प अभियानाची थीम असल्याचे सांगून राजभवन येथे राबविण्यात आलेल्या अभियानाबाबत माहिती दिली.
00000
Governor presides over Eye Donation Awareness Camp
Mumbai, 17:- Maharashtra Governor C. P. Radhakrishnan presided over an Eye Donation Awareness Camp on the occasion of the 74th birth anniversary of Prime Minister Narendra Modi at Raj Bhavan, Mumbai, on Tuesday, 17th September.
Principal Secretary to the Governor Pravin Darade, Joint Secretary Shweta Singhal, Comptroller Jitendra Wagh, Dean of JJ Group of Hospitals Dr. Pallavi Sapale, Head of the Department of Ophthalmology Dr. Sujata Chahande, Superintendent Dr. Sanjay Surase, and officers and employees of Raj Bhavan, Mumbai, were present.
000
मुख्यमंत्री - माझी लाडकी बहिण योजनेमुळे गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित
मुख्यमंत्री - माझी लाडकी बहिण योजनेमुळे गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
विसर्जनासाठी आलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकींवर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडून पुष्पवृष्टी
'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषात गणरायाला निरोप
मुंबई दि. 17 – मुख्यमंत्री - माझी लाडकी बहिण योजनेमुळे राज्यातील भगिनींचा गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित झाला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. गिरगाव चौपाटी येथे गणेश विसर्जन सोहळ्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, गेले दहा दिवस राज्यात उत्सवाचे वातावरण आहे. हा राज्यातील एक महत्वाचा आणि मोठा उत्सव आहे. बळीराजावरील अरिष्ट टळू दे, राज्यातील शेतकरी सुखी होऊदे, राज्यातील जनता सुखी आणि समृद्ध होऊदे अशी प्रार्थना गणरायाला केली आहे. जनतेला सुखी करण्यासाठी शासन अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे. जनतेचे कल्याण हेच शासनाचे उद्दीष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
अनंत चतुर्दशीनिमित्त गिरगाव चौपाटीवर गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी आलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकींवर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुष्पवृष्टी केली. यावेळी “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…” या घोषणांनी सगळा परिसर दुमदुमून गेला.
यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मंडपात आगमनापूर्वी सुवासिनींनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांचे ओवाळून औक्षण केले. तसेच महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्री. गगराणी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
गिरगाव चौपाटीवर आज सायंकाळपासून भाविकांचा जनसागर जमला होता. दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायांना भावपूर्ण निरोप देण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत मुंबईत विविध ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली असून गिरगाव चौपाटी येथे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी गणेश मूर्तींवर पुष्पवृष्टी करून गणरायांना निरोप दिला. मान्यवरांनी यावेळी उपस्थित असलेल्या विविध देशांच्या दूतावासाच्या प्रतिनिधींची भेट घेतली.
देश विदेशातील पर्यटकांना गणेश विसर्जन सोहळ्याचे दर्शन घडविण्यासाठी पर्यटन विभागाने आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवअंतर्गत उभारलेल्या विशेष गणेश दर्शन गॅलरीसही राज्यपाल श्री. राधाकृष्णन, मुख्यमंत्री श्री. शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री. आठवले, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी भेट देऊन गणेशाची आरती केली.
त्याचप्रमाणे हा सोहळा अनुभवण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या विदेशी पर्यटकांशी संवाद साधला. पोलीस नियंत्रण कक्ष, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या मंडपालाही भेट दिली. यावेळी समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी राज्यपाल श्री. राधाकृष्णन, मुख्यमंत्री श्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या निर्माल्यापासून खतनिर्मिती उपक्रमाला भेट दिली. यावेळी त्यांनी या उपक्रमाचा शुभारंभ करण्यासोबतच इथे जमलेल्या श्री साधकांशी संवाद साधला. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेला हा निर्माल्यापासून खत निर्मिती करण्याचा प्रकल्प अत्यंत स्तुत्य असून त्यात 10 हजार श्रीसाधक सहभागी झाले आहेत हे निश्चितच कौतुकास्पद आहे. या उपक्रमामुळे पर्यावरणाचे रक्षण होत असून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने टाकलेले सकारात्मक पाऊल असल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. तसेच यावेळी त्यांनी या श्री साधकांसोबत आणि इतर नागरिकांसोबत मनसोक्त सेल्फी घेतले.
0000
वृत्त क्र.
पूर्वजांविषयी कृतज्ञतेची* *महालयारंभ*
🌹⚜️🚩🔆🕉🔆🚩⚜️🌹
🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻
*पूर्वजांविषयी कृतज्ञतेची*
*महालयारंभ*
🚩⚜️🚩🔆🙏🔆🚩⚜️🚩
*भारतीय संस्कृतीचा कृतज्ञता हा स्थायीभाव आहे. या कृतज्ञता भावनेत विशाल दृष्टिकोन आहे. ही कृतज्ञता जशी जिवंत व्यक्तींविषयी असते.. निसर्गाविषयी असते तशीच आमच्या पितरांविषयीही. हा कृतज्ञता संस्कृती संस्कार वेगवेगळ्या सणावारातून व्यक्त होतो.*
*आज हा कृतज्ञता भाव व्यक्त करणारा पितृपक्ष पंधरवडा प्रारंभ होतोय. या जगतात आज असलेले आमचे अस्तित्व आहे ते या थोर पितरांमुळेच.*
*आम्हांला जगाचा इतिहास ठाऊक असतो. पण ज्यांच्या कृपेने हे अस्तित्व आहे त्यापैकी आमच्या खापर पणजोबांचे नावही आम्हांला ठाऊक नसते. पण ते होते म्हणूनच आम्ही आहोत हे मात्र सत्य आहे.*
*भारतीयांच्या वंश उगमाचे मुळपुरुष हे विश्वामित्र, जमदग्नी, भारव्दाज, गौतम, अत्री, वशिष्ठ, कश्यप आणि अगस्ती हे आठ ऋषी समजले जातात. त्यांच्यापासून जवळपास ५० प्रमुख गोत्रांचा विशाल परिवार देशभरात निर्माण झालाय.*
*या आमच्या पूर्वजांचे किती किती म्हणून उपकार सांगावेत ? आज जगात विज्ञान.. तंत्रज्ञानक्षेत्रात प्रगती झालीय. माहितीचे स्रोत घरबसल्या उपलब्ध आहेत. तरीही या प्रगतीनंतरही घर कुठे घ्यावे हा प्रश्न पडतो. पण हजारो वर्षे सुविधांचा अभाव असतानाही आमच्या पूर्वजांनी जिवापाड संघर्ष करुन आमच्या घराण्याची वंशवेल.. धर्म.. संस्कृती.. स्वातंत्र्य अबाधित राखलेय.*
*आमच्या पूर्वजांनी अतिवृष्टी.. महापूर.. अवर्षण.. भूकंप अशा घटनांचा.. अचानक उदभवणाऱ्या अनाकलनीय साथीच्या रोगांचा.. लहरी जुलमी परकीय आक्रमकांचा सामना केलाय. जीव वाचवत प्रसंगी रानोमाळ भटकत डोंगर दऱ्यात ते आश्रय घ्यायचे. या सर्वच संकटातून वाट काढून कुटुंबाचे पालनपोषण केलेय.. ही वंशवेल वाढवलीय. आदर्श समाजव्यवस्था निर्माण करणाऱ्या परंपरा.. रीतीरिवाज.. श्रद्धास्थाने यांचे रक्षण केलेय. या त्यांच्या कार्यामुळेच आज आम्ही हे आनंदी जीवन जगतोय. येत्या पंधरा दिवसात पितरांविषयी हाच कृतज्ञता भाव श्रद्धापूर्वक श्राद्धातून व्यक्त केल्या जाणार.*
*आजपासून या पंधरा दिवसात एकदिवस आपल्या मातृ पितृ गोत्रातील सर्वच पितरांचे तसेच गुरुवर्य, सहकारी.. आप्तेष्ट पितरांचे स्मरण करुन श्राद्धविधी.. तर्पण केले जाते. तर्पण अर्थात तृप्त करणे. ते जिथेकुठे असतील त्यांना आवडणारे सारे पदार्थ अर्पण करणे. त्यांच्या स्मरणार्थ दानधर्म करणे. त्यांच्यासोबतच आम्ही चराचराची.. पंचमहाभूताचीही काळजी घेतो.*
*कावळा हे निसर्गाच्या जीवसाखळीचा महत्त्वाचा पक्षी. ते निसर्गात स्वच्छता दूताचे काम करतात. त्यांना जगवणे मानवी हिताचे आहे. वड असो वा पिंपळ या प्राणवायूच्या वृक्षाच्या संवर्धनासाठी एकाक्ष कावळ्यांची मदत होते. म्हणूनच या पंधरवाड्यात त्यांना भात अर्पण केला जातो. या पंधरवाड्यात आमच्या पूर्वजांच्या आठवणीत आम्ही रमतो.*
*जन्म-मृत्यू हे अटळच. पण घराण्यातील संस्कृती संस्कारच जीवनाला खरा अर्थ देतात. आमची श्रद्धा आहे ती संत वचनांवर.*
*देह जावो अथवा राहो,*
*पांडुरंगी दृढ भावो..*
*संत आम्हांला भक्ती मार्ग दाखवतात. संत नामदेव म्हणतात की हा देह जावो किंवा राहो, याची पर्वा नाही. पण परमेश्वरावरील विश्वास अढळ आहे. त्या पांडुरंगावर त्यांचाच नाही तर आमचा.. आमच्या घराण्याचा हजारो वर्ष दृढ विश्वास आहे, आणि म्हणूनच या भवसागरात आम्ही आनंदी जीवन जगतोय.*
🌺🌿🌸🍃🌸🍃🌸🌿🌺
*हे आदिमा, हे अंतिमा*
*जे वांछिले ते तू दिले*
*कल्पद्रुमा*
*या मातीचे आकाश तू*
*शिशीरात या मधुमास तू*
*देशी मृता तू अमृता*
*पुरोषोत्तमा*
*देणे तुझे इतुके शिरी*
*झालो ऋणी जन्मांतरी*
*अपकार मी, अपराध मी*
*परी तू क्षमा*
🌺🌿🌸🔆🙏🔆🌸🌿🌺
*गीत : वसंत निनावे* ✍
*संगीत : यशवंत देव*
*स्वर : रामदास कामत*
🎼🎶🎼🎶🎼 🎧
*🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*
*-१८.०९.२०२४-*
🌻🌿🥀☘🌺☘🥀🌿🌻
Tuesday, 17 September 2024
मराठवाड्याची सर्वक्षेत्रात कालबद्ध प्रगती हेच ध्येय - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन सोहळा उत्साहात
मराठवाड्याची सर्वक्षेत्रात कालबद्ध प्रगती हेच ध्येय
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन सोहळा उत्साहात
छत्रपती संभाजीनगर, दि.१७- कृषी, दळणवळण, उद्योगविकासातून रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधा विकास अशा सर्व क्षेत्रात मराठवाड्याची कालबद्ध प्रगती करणे हेच शासनाचे ध्येय असल्याचे प्रतिपादन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कार्यक्रमात केले.
येथील सिद्धार्थ उद्यानात मराठवाडा मुक्ती संग्राम स्मृतीस्तंभ येथे मुख्य शासकीय कार्यक्रम संपन्न झाला. यावेळे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. पोलीस दलातर्फे शस्त्र सलामी, मानवंदना नंतर ध्वजारोहण करण्यात आले.
हुतात्म्यांना अभिवादन व स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण
ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित केले. आपल्या भाषणात सुरुवातीला त्यांनी मुक्ति लढ्यातील हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली. मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, मुक्तिसंग्रामासाठी स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, दिगंबरराव बिंदू, रवी नारायण रेड्डी, देवीसिंह चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, शंकरसिंह नाईक, विजयेंद्र काबरा, बाळासाहेब परांजपे यांनी लढ्याचे नेतृत्व केले. काशिनाथ कुलकर्णी, दगडाबाई शेळके, विठ्ठलराव काटकर, हरिश्चंद्र जाधव, जनार्दन होर्टीकर गुरुजी, सूर्यभान पवार, विनायकराव चारठाणकर, विश्वनाथराव कातमेश्वरकर अशा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी मराठवाडा मुक्ती संग्राम अजरामर केला आहे. भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी निजामाविरुध्द पोलीस कारवाई सुरु केली. पोलीस कारवाई सुरु होताच काही दिवसातच भारतीय सेनेने हैद्राबाद संस्थानावर ताबा मिळविला आणि लढ्याला यश प्राप्त झाले.
स्मृतीस्मारकासाठी १०० कोटींचा निधी
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मराठवाड्याच्या स्वातंत्र्यलढ्याची स्मृती जपण्यासाठी गेल्या वर्षी छत्रपती संभाजीनगर येथे स्मृती स्मारक उभारण्यासाठी १००कोटी रुपये निधी दिला आहे. तसेच मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा नियोजन निधीतून प्रत्येक जिल्ह्याला दोन कोटी रुपये दिले. गेल्या सव्वादोन वर्षांपासून मराठवाड्याच्या विकासासाठी शासनाने ठोस पाऊले उचलली आहेत. गेल्या वर्षी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांची धडाकेबाज अंमलबजावणी सुरु केली आहे. मराठवाड्यातला दुष्काळ हटविण्यासाठी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याकरिता सुमारे १५ हजार कोटीं रुपयांच्या योजनेचा प्रकल्प अहवाल तयार होतोय. त्यात प्रामुख्याने दमणगंगा (एकदरे) गोदावरी (वाघाड) नदीजोड योजना आणि दमणगंगा वैतरणा - गोदावरी (कडवा देव नदी) नदीजोड योजना, पार गोदावरी नदीजोड योजना या योजनांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर शहरासाठी सर्वात महत्त्वाच्या २७४० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचं काम सुद्धा आहे. मराठवाड्यात ४ लाख विहिरीची कामे सुरु आहेत. बीड जिल्ह्यातील श्री पांचाळेश्वर, पोहिचा देव, जालना जिल्ह्यातील जाळीचा देव आणि देवस्थानांच्या विकासासाठी २७५ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. रस्त्यांची कामे वेगाने पूर्ण करण्यावर भर आहे. नाबार्डच्या मदतीनं रस्त्यांची ४४ कामे होत आहेत. हायब्रिड अॅन्यूईटी योजनेतून १०३० कि. मी. लांबीचे रस्ते सुधारताहेत. मराठवाड्यातल्या ७५ ग्रामपंचायतींच्या कार्यालयांसाठी बांधकामे सुरु आहेत. त्यांना भारतनेटद्वारे जोडले जात आहे. मराठवाड्यातल्या शहरांमध्ये वेगवेगळ्या सोयीसुविधांची कामं जोरात सुरु होत आहेत. आवश्यक त्या सगळ्या मान्यता दिल्या आहेत. ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी १०७६ कोटींची वाढीव तरतुद केली त्याचा मराठवाड्यातील १२ लाखांपेक्षा जास्त महिलांना लाभ होतोय. मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देण्यासाठी आठही जिल्ह्यात दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-१ हा २०२७ पर्यंत राबवला जाईल. त्यासाठी एनडीडीबी आणि मदर डेअरी सहकार्य करणार असून त्यात विदर्भातीलही काही जिल्हे आहेत. या प्रकल्पासाठी १४९ कोटी रुपयांना मान्यता देण्यात आली आहे.कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना ५ हजार कोटींचे अनुदान मंजूर केलं आहे.मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय झाला असून त्याचा लाभ लाखो नागरिकांना होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
औद्योगिक गुंतवणुकीतून विकास
शेंद्रा येथील ऑरिक सिटीत २० हजार कोटींची गुंतवणूक असलेला किर्लोस्कर-टोयोटाचा इलेक्ट्रिक- हायब्रीड कार प्रकल्प येतोय. बिडकीनमध्ये १०० एकर जागेवर २ हजार कोटींची गुंतवणूक असलेला एथर एनर्जी कंपनीचा ईव्ही प्रकल्प येतोय. उद्योगांचा विकास व्हावा यासाठी मराठवाड्यातल्या उद्योगांना विद्युत शुल्क माफीच्या कालावधीस मार्च २०२९ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मर्यादा ५० हजार रुपयांपर्यंत वाढविली. मराठवाड्यातल्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होईल. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत मराठवाड्यात २५ हजारपेक्षा जास्त युवकांनी नोंदणी केली आहे. छत्रपती संभाजीनगरात अल्पसंख्याक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेसाठी निधी मंजूर केला आहे. लवकरच तिथेही काम सुरु होईल.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे भगिनींना लाभ
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत १ कोटी ६० लाख भगिनींच्या खात्यात दोन हप्ते जमा झाले आहेत. सुमारे ५ हजार कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. मराठवाड्यातल्या भगिनींना सुद्धा याचा मोठा लाभ मिळाला आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आर्थिक दुर्बल कुटुंबाला वर्षातून तीन वेळा गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार असून त्याचाही फायदा मराठवाड्यातल्या गरीब महिलांना होणार आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी सुद्धा मराठवाड्यातल्या हजारो ज्येष्ठांनी नोंदणी केली आहे. मुलीसाठी मोफत शिक्षण या निर्णयाचा फायदाही मराठवाड्यातील मुलींना मिळतो आहे.
दळणवळण सुविधांचा विकास
जालना मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसमुळे हा भाग आर्थिक राजधानीशी जोडला गेला आहे. जालना ते जळगाव या १७४ किमीच्या नव्या रेल्वे मार्गाची घोषणा झाली आहे. त्यामुळे जालना, सिल्लोड यांची कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणावर वाढेल. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या किनारी भागातील कनेक्टिव्हीटी वाढणार आहे.त्यामुळे येथील विकासाला देखील चालना मिळणार आहे. यंदा पाऊस चांगला झाला आहे. सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.संतांचा संस्कार, मेहनती युवक, शिक्षणाला प्राधान्य देणारे नागरिक,संकटांवर मात करणारा शेतकरी, वाढणारे उद्योग हे सगळं या भूमीचं वैशिष्ट्य आहे. या मराठवाड्याची सर्व क्षेत्रात कालबद्ध प्रगती, हेच शासनाचे ध्येय असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
या सोहळ्यास विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, खासदार सर्वश्री डॉ.भागवत कराड, संदिपान भुमरे, कल्याण काळे, आमदार सर्वश्री प्रदीप जैस्वाल, प्रशांत बंब, संजय शिरसाट, उदयसिंग राजपूत, माजी खासदार चंद्रकांत खैरे, अपर मुख्य सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, मनपा आयुक्त जी.श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड तसेच स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे कुटुंबिय व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मराठवाड्याच्या विकासासाठी भरीव तरतूद-
● छत्रपती संभाजी नगर – गोदावरी काठावरच्या २०० देवस्थानांना जोडणारा सर्वज्ञ अष्टशताब्दी मार्ग - २३४ कोटींची तरतूद
● जालना येथे रेशीम पार्क व प्रशिक्षण केंद्र स्थापन करणार- २५ कोटी.
● परभणी- गंगाखेड येथील संत जनाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मंजूरी दिलीय. त्यासाठी ५० कोटी.
● नांदेड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र माहूरगड हे शक्तीपीठ. याठिकाणच्या सुधारीत विकास आराखड्यास मान्यता दिलीय. नव्याने करावयाच्या व अत्यावश्यक कामांसाठी ८२९ कोटी १३ लाखांची मंजूरी.
● हिंगोली जिल्ह्यातील श्रीक्षेत्र औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ४५ कोटी १४ लाख.
● बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील आयटीआयमधील अल्पसंख्याक तुकड्यांसाठी नवीन कार्यशाळा बांधण्यासाठी १५ कोटी
● धाराशिव मधील सोनारी भैरवनाथ देवस्थान, परांडा येथील विकास आराखड्यासाठी १८६ कोटींना मंजूरी.
● लातूर जिल्ह्यातील मौजे धनेगाव व मौजे चाकूर येथील मुलींची शासकीय निवासी शाळांसाठी ५० कोटी.
एकूण १४३४ कोटी रुपयांची विकासकामे.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या खालील कामांचे
भुमिपूजन व लोकार्पण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले
१. डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानात उभारण्यात आलेल्या डीज़ीटल डोम थिएटरपुनेटेरीयम (तारांगण) – लोकार्पण
२. प्री फॅब्रिकेटेड एसटीपी प्रकल्प लोकार्पण
३. हरित कचऱ्यावर (गार्डन/ग्रीन वेस्ट) वर प्रक्रिया प्रकल्पाचे लोकार्पण
४. पश्चिम विधानसभा मतदार संघ NO NETWORK भागात जलनिःसारण वाहिनी चे भूमीपूजन
५. एन-१२ सिडको येथे विशेष मुलांसाठी शाळा, उपचार व संशोधन केंद्राचे भूमीपूजन
६. शहरात विविध चौकामध्ये १४ स्मार्ट सिग्नल उभारण्याचे भूमीपूजन
७. शहरातील स्मशानभूमीचा सर्वांगिण विकासकामाचे भूमीपूजन
८. १२ कोटी अंतर्गत शहरातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण - भूमीपूजन
९. स्मार्ट सिटी अंतर्गत PM-e (इलेक्ट्रीकल बस) सेवा डेपो इमारतीचे भूमीपूजन
१०. मालमत्ता कर विभागामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाधारीत मालमत्ता कर नियंत्रणकक्षाचे लोकार्पण
११. दिव्यांगक्षरे चालविण्यात येणा-या सक्षम पेट्रोलियम या पेट्रोल पंपाचे लोकार्पण
१२. मिटमिटा मनपा शाळेच्या इमारतीचे भूमीपूजन
१३. नवीन खरेदी करण्यात आलेल्या जेटींग मशीन, व्हॅक्यूम मशीन,स्वीपींग मशीनचे लोकार्पण
१४. स्मार्ट डिजीटल बस सेवा उपलब्ध करण्याच्या हेतूने एकात्मिक वाहतुक व्यवस्थापनसंचालन प्रकल्पाचे लोकार्पण
१५. झोन क्र. ४ मनपा प्रशासकीय कार्यालयाचे लोकार्पण
१६. मनपा शाळा शास्त्रीनगर, गारखेडा येथे सिंथेटिक टर्फचा लोकार्पण.
०००००
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...