Friday, 12 July 2024

पुण्यातील अपघात प्रकरणी पोलिसांमार्फत वेळेत गुन्हा दाखल

 पुण्यातील अपघात प्रकरणी 

पोलिसांमार्फत वेळेत गुन्हा दाखल

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            मुंबईदि. 11 : पुणे येथील कल्याणीनगर-एअरपोर्ट रोडवर 19 मे 2024 रोजी पहाटे 2.30 वाजता झालेल्या अपघात प्रकरणी पोलिसांनी सकाळी 8.13 वाजता गुन्हा नोंदविला आहे. पुणे पोलीस आयुक्तांनी यात सक्रियतेने कार्यवाही केली असल्याचे उपमुख्यमंत्री तथा गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.

            विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी या घटनेत पुणे पोलीस आयुक्तांसह दोषी असलेल्यांवर कारवाई करण्यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री विक्रम काळेसतेज पाटीलशशिकांत शिंदेकिरण सरनाईक आदींनी सहभाग घेतला.

            या घटनेसंदर्भात माहिती देताना उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले कीही घटना पहाटे 2.30 वाजता घडली असून यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबतचा गुन्हा सकाळी 8.13 वाजता नोंदविण्यात आला. यामध्ये प्रारंभी 304 (अ) या कलमाची नोंद करण्यात आली. तथापि सकाळी 10.30 वाजता वरिष्ठ अधिकारी आल्यानंतर त्यांनी यात बदल करून या कलमाऐवजी 304 हे कलमांतर्गत गुन्हा नोंद केला. आरोपीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असल्याने बाल न्यायालयासमोर प्रकरण नेण्यात आले. तेथे देखील 304 या कलमाचीच नोंद असल्याची माहिती त्यांनी दिली. या प्रकरणी आरोपीची तातडीने वैद्यकीय तपासणी केली नसल्याबद्दल पोलीस निरीक्षकांवर कारवाई केली असून पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सक्रियतेने कार्यवाही केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता नसल्याचेही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले. या प्रकरणी आरोपीचे रक्त नमुने बदलण्यात सहभागी असलेल्या डॉक्टरवर तसेच ड्रायव्हरला गुन्ह्याचा आरोप स्वत:वर घेण्यासाठी दबाव टाकल्याप्रकरणी आरोपीचे वडील आणि आजोबांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

            या घटनेनंतर पुण्यातील अनधिकृत पब आणि बारवर कारवाई करण्यात येत असून इतर पब आणि बार वेळेवर बंद होतात किंवा नाही यावर देखरेखीसाठी कृत्रिम बुद्ध‍िमत्तेवर आधारित सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. यासाठी नियमावली तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. जळगाव पाचोरा रोडवरील रामदेववाडी गावाजवळ 7 मे 2024 रोजी घडलेल्या अपघात प्रकरणी तपास करण्यास विलंब लागल्याबाबत विचारलेल्या प्रश्नावरया घटनेत जमावाने आरोपींना मारहाण केल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यास्तव विलंब लागल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

0000 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम त्वरीत पूर्ण करणार

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे

काम त्वरीत पूर्ण करणार

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            मुंबईदि. 11 : मुंबईतील इंदू मिल येथे उभारण्यात येणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे बांधकाम वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. पुतळ्याचे प्रारुप (मॉडेल) सुद्धा मान्य झाले आहे. तथापि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या स्मारकातील हा पुतळा भव्य असल्याने त्यासाठी वेळ लागत आहे. स्मारकाचे हे संपूर्ण काम लवकर पूर्ण करण्यात येईलअसे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.

            सदस्य विजय उर्फ भाई गिरकर यांनी परळ येथील बीआयटी चाळीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या जागेत स्मारक उभारण्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य अमोल मिटकरी यांनी सहभाग घेतला. चर्चेदरम्यान इंदू मिल येथे उभारण्यात येत असलेल्या स्मारकाबाबत विचारलेल्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले.

            मूळ प्रश्नावर बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले कीबीआयटी चाळ क्रमांक १ मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या खोली क्र. ५० व ५१ येथे राष्ट्रीय स्मारक उभारण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून सुसाध्यता अहवाल प्राप्त करून पुढील आवश्यक ती कार्यवाही केली जाईल. या अनुषंगाने मुख्यमंत्रीउपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन तेथे सध्या राहत असलेल्या कुटुंबांच्या पुनर्वसनाबाबत चर्चा करण्यात येईलअसेही त्यांनी सांगितले.

00000

अंगणवाड्या उभारणी, दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पात तरतुदीसाठी प्रस्ताव तयार करणार

 अंगणवाड्या उभारणीदुरुस्तीसाठी अर्थसंकल्पात

तरतुदीसाठी प्रस्ताव तयार करणार

- मंत्री आदिती तटकरे

             मुंबईदि. 11 : अंगणवाड्या उभारणी तसेच दुरुस्तीसाठी पुढील अर्थसंकल्पात तरतूद करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव महिला व बाल विकास विभागामार्फत तयार करण्यात येईल, अशी माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितली.

            याबाबत सदस्य मोनिका राजळे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी सदस्य भास्कर जाधव यांनी उपप्रश्न उपस्थित केला.

            मंत्री कु. तटकरे म्हणाल्या कीअंगणवाड्यांसाठी जिल्हा परिषदेच्या खोल्या उपलब्ध करून देण्याबाबत महिला व बालविकास विभागाने ग्रामविकास विभाग व शालेय शिक्षण विभागास प्रस्ताव पाठवला असून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे राज्यातील 22 हजार 500 अंगणवाड्यांचा इमारतीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. सर्व अंगणवाड्या स्मार्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू असून वित्त आयोगजिल्हा परिषदेचा निधीडोंगरी विकास निधी,जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून अंगणवाड्यांची दुरुस्ती तसेच नवीन बांधकाम केली जात आहेत. अंगणवाड्यांमधील शौचालयाकरिता केंद्र शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पाच हजार 375 अंगणवाड्यांपैकी चार हजार 65  अंगणवाडी केंद्रांना स्वतःची इमारत आहे. अहमदनगर जिल्ह्यात 15व्या वित्त आयोगाने जिल्हा परिषद विकास आराखडा मध्ये 98 अंगणवाडी बांधकामे प्रस्तावित करण्यात आली असल्याचे मंत्री कु. तटकरे यांनी सांगितले.

****

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुधारित किमान वेतनातील फरकाच्या रकमेसाठी अर्थसंकल्पात तरतूद

 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुधारित किमान वेतनातील

फरकाच्या रकमेसाठी अर्थसंकल्पात तरतूद

- मंत्री गिरीश महाजन

            मुंबईदि. ११ : राज्यात सध्या २७ हजार ९११ ग्रामपंचायती असून त्यात ४८ हजार १८८ कर्मचारी कार्यरत आहेत. या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना उद्योगउर्जा व कामगार विभागाच्या अधिसूचनेनुसार किमान वेतन लागू करण्यात आले आहे. शासनाने या कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतनातील फरकाची रक्कम प्रदान करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असल्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.

                  याबाबत सदस्य सुनील भुसारा यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या सूचनेच्या चर्चेमध्ये ओमप्रकाश उर्फ बच्चू कडूनाना पटोलेदीपक चव्हाण, सुरेश वरपूडकर यांनी सहभाग घेतला.

               मंत्री श्री. महाजन म्हणाले कीग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन व आकृतीबंधाबाबत शिफारस करण्यासाठी यावलकर समिती गठित करण्यात आली होती. या समितीने सादर केलेल्या अहवाल  वित्त विभागाकडे पाठवण्यात आला आहे. तसेच ग्रामपंचायतीचे उत्त्पन्न व लोकसंख्येचा विचार करून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनासाठी सहाय्यक अनुदानाच्या हिस्साची टक्केवारी ठरविण्यात आली आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधीची रक्कम नियमानुसार जमा करण्यात येत असून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात वाढ करण्यात आली असून अनुदानही वेळोवेळी देण्यात येत असल्याचे मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले.

*****

डीएननगरच्या ‘हाय फ्रिक्वेंसी ट्रान्स्मीटर’बाबत केंद्रीय नागरी उड्डाण विभागासमवेत बैठक

 डीएननगरच्या हाय फ्रिक्वेंसी ट्रान्स्मीटरबाबत

केंद्रीय नागरी उड्डाण विभागासमवेत बैठक

- मंत्री उदय सामंत

            मुंबईदि. 11 : अंधेरी (पश्चिम) डीएननगर येथील भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या हाय फ्रिक्वेन्सी ट्रान्स्मीटर परिघातील इमारतींचा पुनर्विकास करणेगोराई येथील जागा प्राधिकरणाला देणे व डीएन नगर येथील जागा महानगरपालिकेला देण्याबाबत यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली आहे. याबाबत केंद्रीय नागरी उड्डाण विभागाला पत्रही देण्यात आले आहे. लवकरच केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री, लोकप्रतिनिधी, संबंधित अधिकारी यांच्यासमवेत बैठकीचे आयोजन करण्यात येईलअसे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

               याबाबत सदस्य मनीषा चौधरी यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

            मंत्री श्री. सामंत म्हणाले कीभारतीय विमानतळ प्राधिकरण व महानगरपालिका यांच्या संयुक्त सभेमध्ये गोराई येथील महानगरपालिकेच्या जागेवर ट्रान्स्मीटर स्थलांतरित करून डीएननगर येथील प्राधिकरणाच्या जागेवर महापालिका उद्यानाचा विकास करणार आहे. या निर्णयामुळे भविष्यात विमानतळाच्या  हाय फ्रिक्वेन्सी ट्रान्स्मीटर परिघाच्या आत असलेल्या इमारतींचा पुनर्विकास करता येईल. याबाबत केंद्रीय नागरी उड्डाण विभागासोबत बैठक घेवून चर्चा करण्यात येईल.

००००

मुसळधार पावसाने नुकसान झालेल्या पुणेकरांना निकषानुसार मदत करण्यात येणार

 मुसळधार पावसाने नुकसान झालेल्या

पुणेकरांना निकषानुसार मदत करण्यात येणार

- मंत्री उदय सामंत

            मुंबईदि. 11 : पुणे शहरातील धानोरी कालवडयेरवडा व लोहगाव परिसरात 4 जून 2024 रोजी ढगफुटीसदृश पाऊस झाला. धानोरी रस्त्यावरून पावसाचे पाणी काही नागरिकांची घरे व दुकानांमध्ये शिरले. या मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना निकषानुसार नुकसान भरपाई देण्यात येईलअसे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

            याबाबत सदस्य सुनील टिंगरे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये सदस्य भीमराव तापकीरअशोक पवार यांनीही भाग घेतला.

            मंत्री श्री. सामंत म्हणाले कीपुणे शहरातील धानोरी कालवडयेरवडा व लोहगाव परिसरातील नुकसानाबाबत पुन्हा सर्वेक्षणाच्या आयुक्तांना सूचना देण्यात येतील. पुणे शहरात भविष्यात मुसळधार पाऊस झाल्यास पूर येवून होणारे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजनांचा कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात येईल. याबाबत पुणे शहरातील सर्व लोकप्रतिनिधींची अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येईल, असेही सांगण्यात आले.

००००

तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरु; इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याचे आवाहन

 तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरु;

इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याचे आवाहन

संचालक डॉ. प्रमोद नाईक यांची 'दिलखुलासव 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात मुलाखत

 

            मुंबईदि. 11 : तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून राज्यातील युवकांना चांगले करिअर घडविण्याची आणि व्यवसायाभिमुख तांत्रिक शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध आहे. यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांसाठी प्रवेश नोंदणी करावीअसे आवाहन महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक यांनी 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमाच्या माध्यमातून केले आहे.

            महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने अलिकडच्या काळात कौशल्य विकास उपक्रमांवर विशेष भर दिला आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच युवकांना चांगले करिअर आणि  व्यवसायाभिमुख तांत्रिक शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी राज्य तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत विविध योजना आणि उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत राबविण्यात येणारे विविध प्रकारचे अभ्यासक्रमप्रवेश प्रक्रिया,अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध रोजगाराच्या संधी अशा विविध विषयांवर संचालक डॉ. नाईक यांनी 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात माहिती दिली आहे.

            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखतशुक्रवार दि. 12 आणि शनिवार दि. 13 जुलै 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲप वर प्रसारित होणार आहे. तर 'जय महाराष्ट्रकार्यक्रमातून ही  मुलाखत शुक्रवार दि. 12 जुलै 2024 रोजी सायंकाळी 7.30 वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे. निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स- https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

यूट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR  

0000

Featured post

Lakshvedhi