Friday, 12 July 2024

पुण्यातील अपघात प्रकरणी पोलिसांमार्फत वेळेत गुन्हा दाखल

 पुण्यातील अपघात प्रकरणी 

पोलिसांमार्फत वेळेत गुन्हा दाखल

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            मुंबईदि. 11 : पुणे येथील कल्याणीनगर-एअरपोर्ट रोडवर 19 मे 2024 रोजी पहाटे 2.30 वाजता झालेल्या अपघात प्रकरणी पोलिसांनी सकाळी 8.13 वाजता गुन्हा नोंदविला आहे. पुणे पोलीस आयुक्तांनी यात सक्रियतेने कार्यवाही केली असल्याचे उपमुख्यमंत्री तथा गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.

            विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी या घटनेत पुणे पोलीस आयुक्तांसह दोषी असलेल्यांवर कारवाई करण्यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री विक्रम काळेसतेज पाटीलशशिकांत शिंदेकिरण सरनाईक आदींनी सहभाग घेतला.

            या घटनेसंदर्भात माहिती देताना उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले कीही घटना पहाटे 2.30 वाजता घडली असून यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबतचा गुन्हा सकाळी 8.13 वाजता नोंदविण्यात आला. यामध्ये प्रारंभी 304 (अ) या कलमाची नोंद करण्यात आली. तथापि सकाळी 10.30 वाजता वरिष्ठ अधिकारी आल्यानंतर त्यांनी यात बदल करून या कलमाऐवजी 304 हे कलमांतर्गत गुन्हा नोंद केला. आरोपीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असल्याने बाल न्यायालयासमोर प्रकरण नेण्यात आले. तेथे देखील 304 या कलमाचीच नोंद असल्याची माहिती त्यांनी दिली. या प्रकरणी आरोपीची तातडीने वैद्यकीय तपासणी केली नसल्याबद्दल पोलीस निरीक्षकांवर कारवाई केली असून पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सक्रियतेने कार्यवाही केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता नसल्याचेही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले. या प्रकरणी आरोपीचे रक्त नमुने बदलण्यात सहभागी असलेल्या डॉक्टरवर तसेच ड्रायव्हरला गुन्ह्याचा आरोप स्वत:वर घेण्यासाठी दबाव टाकल्याप्रकरणी आरोपीचे वडील आणि आजोबांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

            या घटनेनंतर पुण्यातील अनधिकृत पब आणि बारवर कारवाई करण्यात येत असून इतर पब आणि बार वेळेवर बंद होतात किंवा नाही यावर देखरेखीसाठी कृत्रिम बुद्ध‍िमत्तेवर आधारित सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. यासाठी नियमावली तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. जळगाव पाचोरा रोडवरील रामदेववाडी गावाजवळ 7 मे 2024 रोजी घडलेल्या अपघात प्रकरणी तपास करण्यास विलंब लागल्याबाबत विचारलेल्या प्रश्नावरया घटनेत जमावाने आरोपींना मारहाण केल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यास्तव विलंब लागल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

0000 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi