असे मनोधैर्य वाढवीनारे पंतप्रधान आपल्याला मिळाले आपण खरंच खूप नशीबवान आहोत.🚩🚩🚩🇮🇳🇮🇳
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Tuesday, 21 November 2023
एका शेतकऱ्याचे निवेदन! कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची तत्परता
एका शेतकऱ्याचे निवेदन! कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची तत्परता
अन् संपूर्ण देशात लागू झाली योजना!
प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेतून फळ पिकांना स्वयंचलित ठिबक
प्रणालीसाठी मिळणार प्रति हेक्टरी 40 हजार रुपयांचे अनुदान
मुंबई दि. 21 : अकोला येथील शिवार फेरीच्या दौऱ्यात एका शेतकऱ्याने कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना स्वयंचलित ठिबक सिंचन योजनेसाठी अनुदान देण्याबाबत निवेदन दिले, मंत्री श्री. मुंडेंनी कृषी विभागामार्फत याबाबत केंद्राकडे पाठपुरावा केला आणि मंत्री श्री. मुंडे यांच्या या तत्परतेने संपूर्ण देशात फळ पिकांना स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणालीसाठी हेक्टरी तब्बल 40 हजार रुपये अनुदान देण्याचे निश्चित झाले! मंत्री श्री. मुंडे यांनी दाखवलेल्या या तत्परतेबद्दल निवेदन कर्त्या शेतकऱ्यासह असंख्य शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
कृषी मंत्री श्री. मुंडे हे मागील महिन्यात डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे शिवार फेरी कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले होते, बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी सचिन अग्रवाल यांनी श्री मुंडे यांना निवेदन दिले होते. संत्रा फळ पिकाची गळती झाली असून फळबागांना स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणाली बसवण्यासाठी अनुदान देण्यात यावे, अशी विनंती श्री. अग्रवाल यांनी निवेदनाद्वारे केली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारच्या कृषी योजनांचा आढावा घेत असताना प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेत काही सुधारणा सुचवल्या होत्या. मंत्री श्री. मुंडे यांनी देखील शेतकऱ्यांच्या निवेदनाची दखल घेत याबाबत केंद्र सरकारकडे विभागामार्फत पाठपुरावा केला. केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेमध्ये राज्य सरकारने सुचवलेली सुधारणा स्वीकारत ऑटोमेशन अर्थात स्वयंचलित ठिबक प्रणाली विकसित करण्यासाठी प्रति हेक्टरी 40 हजार रुपये अनुदान देण्याचे निश्चित केले आहे. कृषी विद्यापीठातील तज्ञ, ऑटोमेशन क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधी, अनुभवी शेतकरी यांची एक समिती याबाबतचे निकष निश्चित करणार असून, या अहवालानंतर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील सचिन अग्रवाल यांनी याबाबत एक पत्र लिहून मंत्री श्री. मुंडे यांचे आभार व्यक्त केले आहेत. याआधीही मंत्री श्री. मुंडे यांनी भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेत संत्रा कलमासाठी प्रति कलम 70 रुपये प्रमाणे अनुदान तसेच सेंद्रिय व रासायनिक खतांसाठी 100 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता फळ पिकांसाठी स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणालीसाठी हेक्टरी 40 हजार रुपये अनुदान मिळणार असल्याने फळ उत्पादक शेतकरी मंत्री श्री. मुंडे यांचे आभार व्यक्त करत आहेत.
निवेदनाचे फलित... एका सामान्य शेतकऱ्याच्या निवेदनाची कृषी मंत्री धनंजय मुंडे व त्यांच्या कार्यालयाने दखल घ्यावी आणि त्यातून एखादी योजना राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना लागू व्हावी, हे उदाहरण म्हणजे आदर्श ठरावे असेच आहे! |
राज्य कला प्रदर्शनासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने कलाकृती पाठविण्याचे आवाहन
राज्य कला प्रदर्शनासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने
कलाकृती पाठविण्याचे आवाहन
मुंबई, दि. 21 : राज्य कला प्रदर्शनाचे यंदाचे 63 वे वर्ष आहे. जहांगीर आर्ट गॅलरी येथे 13 फेब्रुवारी 2024 रोजी होणाऱ्या प्रदर्शनासाठी राज्यातील कलाकारांकडून 30 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने कलाकृती मागविण्यात येत आहेत. राज्यातील जास्तीत जास्त कलाकारांनी प्रदर्शनात सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रभारी कला संचालक राजीव मिश्रा यांनी केले आहे.
रेखा, रंगकला, शिल्पकला, उपयोजित कला, मुद्राचित्रण व दिव्यांग या विभागासाठी राज्याचे रहिवाशी असलेल्या कलावंतांकडून ऑनलाईन स्वरूपात कलाकृती मागविण्यात येत आहे. कला संचालनालयाच्या www.doa.maharashtra या संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरूपात कलाकृती सादर करण्याचे आवाहन प्रभारी कला संचालक राजीव मिश्रा यांनी केले आहे. प्रदर्शनातील पारितोषिकपात्र कलाकृतींना प्रत्येकी 50 हजार याप्रमाणे एकूण 15 पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी 22620231/32 या क्रमांकावर अथवा directorateofart@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा.
००००
वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासन आणि वैद्यकीय आरोग्य यंत्रणा असे दोन स्वतंत्र विभाग करण्याच्या कार्यवाहीचे निर्देश
वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासन आणि वैद्यकीय आरोग्य यंत्रणा
असे दोन स्वतंत्र विभाग करण्याच्या कार्यवाहीचे निर्देश
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या कामकाजाचा आढावा
मुंबई दि. 21 :- शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासन आणि वैद्यकीय आरोग्य यंत्रणा असे दोन स्वतंत्र विभाग कार्यरत असणे गरजेचे आहे. याबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाने आवश्यक उपाययोजना करून त्यानुसार कार्यवाही करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. या आढावा बैठकीस वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, आयुष संचालनालयाचे संचालक डॉ. रमण घुंगराळेकर आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, आरोग्य सेवेसाठी शासकीय रुग्णालये सामान्य माणसाला आधार वाटतात. यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सर्व आवश्यक सेवा-सुविधा आणि यंत्रसामग्री उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य दिले आहे. ज्या जिल्ह्यात नवीन वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले आहेत ती शक्यतो शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी व्हावीत. यामुळे सामान्य माणसाला तातडीने वैद्यकीय उपचार मिळतील, यासाठीही वैद्यकीय शिक्षण विभागाने प्रयत्न करावेत. तसेच आरोग्य सेवा जलद मिळण्यासाठी डॉक्टरांसह अन्य रिक्त पदे लवकर भरावीत.
वैद्यकीय शिक्षण विभागाला आवश्यक सर्व सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात येतील असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, वैद्यकीय शिक्षण विभागाने आरोग्य सेवेमध्ये चांगले काम करावे.
भंडारा व वर्धा येथील नवीन शासकीय महाविद्यालय जागे संदर्भात तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी संबधित जिल्हाधिकारी यांना बैठकीमधून दूरध्वनीवरून दिल्या.
बैठकीत चंद्रपूर, गोंदिया, नंदुरबार, सातारा, रायगड-अलिबाग, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, येथील नवीन शासकीय महाविद्यालय बांधकाम, जे. जे. रुग्णालयातील अतिविषेशोपचार रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथील बाह्यरुग्ण विभागाच्या बांधकामाबाबत आढावा घेण्यात आला.
वैद्यकीय शिक्षण विभागाने सादर केलेल्या पुरवणी मागण्या मंजूर व्हाव्यात, अशी मागणी वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. मुश्रीफ यांनी यावेळी केली.
वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव श्री. वाघमारे यांनी सादरीकरणातून विभागाच्या कामकाजाचा आढावा सादर केला.
००
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून हुतात्म्यांना अभिवादन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून
हुतात्म्यांना अभिवादन
महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची संकल्पना मुख्यमंत्र्यांनी मांडली
मुंबई, दि. २१: महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०७ हुतात्म्यांना हुतात्मा स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हुतात्मा चौक येथील स्मृतिस्थळावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी राज्याचा सर्वांगीण विकास करण्याची संकल्पना मांडली.
पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, २१ नोव्हेंबर हा महाराष्ट्रासाठी महत्वाचा दिवस असून या दिवशी केवळ अभिवादन, पुष्पचक्र अर्पण करून चालणार नाही. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील १०७ हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवणीचा हा दिवस आहे. या दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याचा सर्वांगीण विकास करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आदिंनीही पुष्पचक्र
भल्या पहाटे मुख्यमंत्र्यांकडून प्रदूषण नियंत्रण कामाची प्रत्यक्ष पाहणी
भल्या पहाटे मुख्यमंत्र्यांकडून प्रदूषण नियंत्रण कामाची प्रत्यक्ष पाहणी
मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढविण्याच्या महानगरपालिकेला सूचना
नागरिकांनी स्वच्छतेच्या कामात सहभागी होण्याचे आवाहन
मुंबई, दि. 21 : शहरात काही दिवसांपासून वाढलेल्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची तसेच स्वच्छतेच्या कामाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पहाटे प्रत्यक्ष पाहणी केली. प्रदूषण नियंत्रणासाठी आधुनिक साधनसामग्री वाढविण्याची सूचना त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांना यावेळी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पहाटे पश्चिम उपनगरातील कलानगर जंक्शन, मिलन सबवे, टर्नर रोड, जॉगर्स पार्क आदी परिसरास भेट देऊन प्रदूषण नियंत्रणाच्या आणि स्वच्छतेच्या कामाची पाहणी केली. या पाहणी प्रसंगी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, सहआयुक्त (परिमंडळ 3) रणजित ढाकणे, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्रीमती चंदा जाधव, प्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) प्रशांत तायशेटे, डी विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे, एच पूर्व विभाग सहायक आयुक्त श्रीमती स्वप्नजा क्षीरसागर, एच पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त विनायक विसपुते, के पूर्व विभागाचे सहायक आयुक्त मनीष वळंजू तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, शहरात मागील काही दिवसात वाढलेले प्रदूषणाचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. रस्त्यांवरील धूळ तसेच हवेतील धुलीकण कमी करण्यासाठी दिवसाआड पाणी फवारणी करण्याच्या त्याचप्रमाणे वॉटर फॉगर, जेटींग मशिन, सक्शन मशिन, स्मॉग गन आदींचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रस्ते धुण्यासाठी एक हजार टँकर भाड्याने घेण्यात येणार आहेत. मुंबईत शासनाच्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांबरोबरच बांधकामाची अनेक कामे सुरू आहेत. या कामांच्या ठिकाणी प्रदूषण होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. काम सुरू असलेल्या इमारतींना ग्रीन कव्हर अत्यावश्यक करण्यात आले आहे. डेब्रिस उघड्या वाहनांमधून नेण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. अर्बन फॉरेस्टचे क्षेत्र वाढवून शहरावरील ग्रीन कव्हर वाढविण्यात येणार आहे. हवेतील धुलीकण कमी करण्यासाठी शहरात 40 ठिकाणी वॉटर फॉगर आणि स्मॉग गन लावण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे मुख्य रस्त्यांबरोबरच छोटे रस्ते, गल्ल्या, नाले, समुद्र किनारे आदी ठिकाणी सुद्धा स्वच्छता ठेवण्याबाबत निर्देश देण्यात आल्याचे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले.
प्रारंभी डी विभागामध्ये पेडर रोड येथे दुभाजक स्वच्छता कामाची पाहणी करून दौऱ्याची सुरुवात करण्यात आली. एच पूर्व विभागामध्ये कलानगर, खेरवाडी जंक्शन, मराठा कॉलनी, मिलन भूयारी मार्ग परिसर; के पूर्व विभागामध्ये श्रद्धानंद मार्ग, दयालदास मार्ग, पायावाडी, मिलन उड्डाणपूल आणि त्यानंतर एच पश्चिम विभागामध्ये जुहूतारा रस्ता, लिंकिंग मार्ग आणि टर्नर मार्ग आदी ठिकाणी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी रस्ते, पदपथ स्वच्छता तसेच धूळ प्रतिबंधक कामांची पाहणी केली. दौऱ्याच्या अखेरीस त्यांनी वांद्रे पश्चिम येथील कार्टर रस्ता स्थित जॉगर्स पार्क येथे भेट देवून तेथील सुविधांची पाहणी केली.
नागरिकांशी साधला संवाद
महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईत स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या कामाची प्रत्यक्ष पाहणी करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पहाटे वांद्रे पश्चिम येथील जॉगर्स पार्क परिसरास भेट दिली. येथील नागरिकांशी संवाद साधून त्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच शासन करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. शासनाच्या स्वच्छतेच्या कामात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी स्थानिक नागरिकांनी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या समोर आपापल्या भागातील समस्या देखील मांडल्या. खारदंडा परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे होते. त्यावर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने स्वतंत्र आणि नवीन जलवाहिनी या परिसरासाठी अंथरण्याचे काम सुरू असून ते पूर्ण झाल्यावर ही समस्या सुटेल, असे श्री.शिंदे यांनी आश्वस्त केले. खार भूयारी मार्ग येथे वाहतुकीचा सातत्याने खोळंबा होत असल्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री म्हणाले की ही समस्या सोडवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने खार भुयारी मार्ग येथे रेल्वे उड्डाणपूल बांधण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. हा उड्डाणपूल पूर्ण झाल्यावर तेथील वाहतुकीची समस्या कायमस्वरूपी सुटेल, असे त्यांनी नमूद केले. जॉगर्स पार्क येथे उद्यानातील प्रसाधनगृहांमध्ये शौचकूपांची संख्या वाढवावी, उद्यानामध्ये अधिक झाडे लावून हिरवळ वाढवावी, असे निर्देश देखील मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी दिले.
स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत चहापान
मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी स्वच्छतेची पाहणी करताना प्रत्यक्ष स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चहापान केले. शासनामार्फत स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मुंबईतील सर्व 46 वस्त्यांमध्ये संपूर्ण सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी कर्मचाऱ्यांना दिली. मुंबई स्वच्छ राखण्यामध्ये आपले महत्वपूर्ण योगदान असल्याचे सांगून त्यांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
00000
बी.सी.झंवर/विसंअ
गोष्ट मधमाशांची.. नाशिकच्या नव्या वैभवाची!
गोष्ट मधमाशांची.. नाशिकच्या नव्या वैभवाची!
मधमाशांचं अस्तित्त्व संपल तर आपण किती वर्ष जगू…? तुम्हाला माहित आहे का मधमाशांचे २५ हजार प्रकार असतात?... कामकरी मधमाशा सर्वाधिक कष्टाळू असतात…? मादी मधमाशी सर्वाधिक आयुष्य जगते…? नर मधमाशी सर्वांत दुदैवी जीवन जगते…? मधमाशा अष्टकोनीच घर का बांधतात…? आपण मधमाशांकडून काय शिकू शकतो…? हे आणि याहूनही अधिक प्रश्न मला का पडले? ते पिंपळगाव बसवंत येथील हनीपार्क पाहताना. मला पडलेल्या प्रश्नांनी मला खूप काही शिकवलं. नाशिकचं नवीन वैभव ठरलेल्या हनीपार्कमधील.. मधमाशांची गोष्ट नक्की समजून घेण्यासारखी आणि आवर्जून पाहण्यासारखी आहे.
रमेश पडवळ, नाशिक / मोबा. ८३८००९८१०७
मधमाशी… हा विषय तसा आपल्या सर्वांसाठीच दुर्लक्षित. पण, एका वाक्यानं माझं अंतर्मन मधमाशांकडे वेधलं गेलं. हे वाक्य साध्यासुद्या माणसाचं नव्हतं तर ते होत खुद्द प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन यांचं. आइन्स्टाइन म्हणतात,‘पुथ्वीवरून मधमाशा नष्ट झाल्या तर मानवासह निसर्ग नष्ट व्हायला अवघे चार वर्ष लागतील.’ पिंपळगाव बसवंत येथील हनीपार्क म्हणजेच भारतातील पहिले अॅपी ‘बसवंत गार्डन’मध्ये प्रवेश केल्यावर हे वाक्य डोळ्यात भरत आणि कितीतरी वेळ ते वाचत रहावं आणि असं कसं होऊ शकतं? या प्रश्नाभवती डोक्यातील मेंदूची कालवाकालव होते. पण, हे खूद्द प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन सांगतायेत म्हटल्यावर फक्त विरंगुळा हा हनीपार्क पाहण्याचा हेतू गळून पडतो आणि आपण काही तरी शिकण्यासाठी येथे आलो आहोत, याचा भान जागं होतं. खरचं मधमाशा नष्ट झाल्या तर आपलं आयुष्य चारवर्षांत संपुष्ठात येईल का? हे जाणून घेण्याची एक ओढ मला लागली आणि मधमाशांची शिकविलेल्या शिस्तीच्या धड्यासह त्यांनी कष्टानं बनविलेलं मध मला चाखायला मिळालं. अ..अं… गोष्ट संपलेली नसून ती आता कुठं सुरू झाली आहे.
मधमाशी म्हटलं की मला बालपणी अंब्याच्या झाडावरून तिचं पोळ हिसकावून काढण्याची आठवण झाली अन् ते काढताना पाठभर चावलेल्या मधमाशा मला आठवल्या, की आजही अंगावर शहारा येतो. तुम्हीही कधीतरी असं काही तरी केलं असेलच ना? पण हे चुकीचं होतं. हे आज कळालं. मधमाशी तशी कोणाच्या अध्यात ना मध्यात. अल्पायुषी असूनही जगण्यासाठी धडपडणारी. फक्त धडपडनं नाही तर जे आयुष्य मिळालयं ते शिस्तबद्ध, आखीवरेखीव आणि आपल्या मागच्या पुढच्यांचा विचार करत जगणारी! असं आता कोणालाही जगावं वाटतं नाही, प्रत्येकजण आपल्याला कसं सुखावह जगता येईल इतकाच विचार करताना दिसतो पण, हा विचार मधमाशीला शिवतही नाही. म्हणूनच तिचं अंतर्मन माणसाच्या भावविश्वाशी जोडलं गेलं असावं. गोष्ट सुरू होते.. अल्बर्ट आइन्स्टाइन यांच्या वाक्यापासून. खरचं मधमाशीच्या एकूणच जीवनक्रमाशी आपलं आयुष्य जोडलं गेलं असेल तर मधमाशीला जाणून घ्यायला हवंच. पिंपळगाव बसवंत हे एक प्राचीन गाव आहे, त्यामुळे या गावाशी माझं एक वेगळं नातं आहे. अनेकदा या गावातील प्राचीन मंदिर, नदीकाठच्या समाधी, घाट आणि जैन साधूंचा सहवास असं बरचं काही अनुभवायला यापूर्वी अनेकदा गेलो आहे. बसवंत पासून वणी रस्त्यावर मुखेड गावाकडे निघालात की, हनीपार्क नावाचं एक वेगळं विश्व संजय पवार या उद्योजकानं उभारलं आहे. नाशिकची लोकं तशी खटपटी हे आजचं नाही तर दोन हजार वर्षांपासून आतापर्यंत असंख्य उदाहरणं देता येतील. त्याच रेषेतील हा माणूस असावा. प्रत्यक्ष कधी भेटलेलो नाही पण, त्यांनी कष्टानं जे काही उभारलंय ते पाहावं असं वाटलं म्हणून हनीपार्कमध्ये सकाळी साडेदहाच्या सुमारास पोहचलो. गेटमधून आत गेल्या-गेल्या उजव्या हाताला अल्बर्ट आइन्स्टाइन भेटले आणि तेथे जाण्याचा दृष्टीकोन बदलला. तेथील एका गाईड मित्रांन मधमाशांचं आयुष्य उलगडायला सुरूवात केली. खरंतर मधमाशांबद्दल आपल्याला फारसं माहित असण्याच काही कारण नाही म्हणूनच तुम्हाला हे माहित आहे का? या फलकापासून मधमाशांच्या भावविश्वाचा प्रवास सुरू झाला. साखरेच्या कणाऐवढा मेंदू असलेली मधमाशीला पाच डोळे असतात हे मी पहिल्यांदाच ऐकत होतो. इतकचं नाही तर मधमाशी ३०० प्रकारच्या चवी ओळखण्याची क्षमता बाळगूण असते. ती ताशी १५ ते २० किलोमीटर वेगाने उडते आणि एकाच उड्डाणामध्ये ५० ते १०० फुलांना भेटी देत मधचा कण आणि कण गोळा करते. हे एकताना मला चक्कर येणंच बाकी राहिलं होतं तेवढ्यात गाईड मित्रांन डोक्यात दगड टाकावा असं काही सांगितलं. ते म्हणजे, एक मधमाशी तिच्या आयुष्यात फक्त एक चमचा मध गोळा करते यासाठी तिला ४ लाख किलोमीटरचा प्रवास करावा लागतो, म्हणजेच ती पृथ्वीला दोन प्रदक्षिणा एवढे अंतर त्या एक चमच्या मधासाठी घालते. मधमाशीबद्दलची ही माहिती ऐकताना मी थबकून गेलो. विशेष म्हणजे हनीपार्कमधील प्रवास अनुभवताना असंख्य फलकांपैकी ही माहिती पहिल्याच फलकावर लिहिली आहे तर पुढे काय काय असेल अशा विचारात मी पडलो.
मी सगळंच काही आपल्याला सांगणार नाही. कारण मी लिहिलेलं तुम्ही वाचणार अहात पण गाईड मित्राच्या तोंडून ते भरभरून ऐकतानाची मज्जा काही वेगळीच आणि आजूबाजला मधमाशा पाहताना ते समजून घेणं वेगळं आणि अनोख ठरतं. माझी दोन्ही मुले माझ्या इतकीच उत्सुकतेनं सर्वकाही ऐकत होती. पत्नीनं तर डोक्याला हात लावला होता. आपण किती किती आळशी आहोत, याची जाणीव मला झाली होती. पण माणसाला मधमाशांचे महत्त्व आताच नाही तर दोन हजार वर्षांपूर्वी समजले होते. इजिप्त आणि चीन बहुदा भारतातील मंडळींना मध व मेणासाठी तेव्हा मधमाशांची महती लक्षात आली होती. विशेष म्हणजे, मानवाला सर्वात प्रथम माहित असलेला गोड पदार्थ म्हणजे मध होय. जगभरात मधमाशांच्या किती जाती असतील, असं गाईड विचारल्यावर त्यांनाही वेगवेगळ्या जातीत विभागल्याचं लक्षात आलं. असतील तीन चार? असं वाटलं पण, २५ हजार जातींचं मधमाशांचं विश्व असेल अशी साधी कल्पनाही आम्ही केली नव्हती. त्यापैकी फक्त ५ जाती मधामुळे सर्वाधिक परिचित आहेत. मधमाशीचा आकार किती असतो हे वेगळं सांगायला नको, कधीतरी त्यांच्याशी गाठभेट झाली असेलच. पण त्यांच्या घरात त्यांचे प्रामुख्याने तीन प्रकार असतात. एक मादी, दुसरा नर आणि तिसरी कामकरी मधमाशी. मादी अर्थातच कुटुंब वाढविण्याचे काम करते, नर त्यासाठी तिला सहकार्य करतो आणि कामकरी मधमाशी सतत काम करत राहते. या तिघांचं कामाचं तंत्र एका विशिष्ट सुत्रात गुंफलेलं आहे. हे समजून घेताना मला नर मधमाशीबद्दल खूप वाईट वाटलं. बिचारा नर! असं म्हणण्याचं कारण म्हणजे, त्याला ना मध गोळा करता येत, ना कोणाला चावण्यासाठी डंख त्यांच्याकडे असतो. मादी तिचं काम झाल्यावर नराचं ओझं नको म्हणून त्याला मारून टाकण्याचा आदेश देते. कारण त्यानंतर उगाचं नराला पोसण्यासाठी मध वाया जाऊ नये म्हणून कामकरी मधमाशा मादीच्या आदेशानंतर नराला मारून टाकतात. किती वाईट ना? पण, हेच जीवनाचं सूत्र आहे. हे एकून मी थक्क झालो होतो. गाईड मित्राला मी वारंवार प्रश्न विचारून त्रास देत होतो आणि तोही आनंदान माझ्या प्रश्नांची उत्तर देत होता. कामकरी माशी साधारण सहा महिने आयुक्त घेऊन आलेली असते तर मादी मधमाशी दोन ते पाच वर्षांपर्यंत जगते. यासाठी ती फक्त राजअन्न सेवन करते. राजअन्नामुळे तिचं वाय दीर्घायु ठरतं. हे राजअन्न मध २५ हजारांना मिळतं आणि आपल्या नटनट्या हेच राजअन्न तारुण्य टिकविण्यासाठी खातात. मधमाशांचं भावविश्व कामाभवती गुंफलं गेलं आहे. त्यांच्या मधाची पोळ, वयोमानानुसार बदलणारी त्यांची कामे असोत वा फुलांमधून मध गोळा करण्याची छंद असो. हे सगळं करताना कामाची इतक्या बारकाईने आखणी केलेली असते की, त्यांचं सूत्र अंगी भिनवलं तर कोणत्याही क्षेत्रात अपयश येणे कठीणचं. असं म्हणण्याचं कारण म्हणजे, तुम्हाला आत्मनिर्भर व्हायचं असेल तर तुमचे आई-वडिल तुम्हाला कष्टाची सवय कशी लावतात यावर सर्वकाही अवलंबून आहे. मी सातवीत असल्यापासून रांगोळी विकायला सुरूवात केली होती. तेव्हा कोणी मुलाला कामवायला का पाठवता असं म्हणत नसे. तर घराला हातभार लावतोय म्हणून कौतुक होई. आता मुलांना कामाला लावणे सोडा घरातील कामे सांगितली तरी काय आई-बाप आहेत मुलांकडून कामे करून घेतात, अशी दुसणे लोक देतात. पण, मधमाशी आपल्या पिलांना वयाच्या १ ते ३ दिवसात घराची स्वच्छता करायला शिकविते, ४ ते ६ दिवसात मोठ्या अळ्यांना खाद्य द्यायला लावते, ७ ते १० दिवसाच्या मधमाशा लहान अळ्यांना खाद्य देतात, तर ११ ते १२ दिवसाच्या मधमाशा राणी माशीला खाद्य देणे आणि तिची सेवा करतात. १३ ते १८ दिवस वयाच्या मधमाशा मेण स्त्रवणे व घरे बांधण्याची कामे करतात, १९ ते २० दिवसाची मधमाशी वसाहतीचे संरक्षणसाठी रखवालदारीचे काम करतात, २१ च्या पुढे मकरंद, पराग, पाणी भरणे आणि गरजेनुसार इतक कामे करतात. आहे ना अनोखं. असं बरंच काही हनीपार्कमध्ये अनुभवायला पाहायला आणि समजून घ्यायला मिळते. त्यामुळेच पिंपळगाव बसवंत येथे अभिनव असे ‘बसवंत हनी बी पार्क- मधमाशी पालन प्रशिक्षण केंद्र’ तसेच ‘बसवंत कृषी उद्योग पर्यटन केंद्र’ वेगळं ठरतं. देशातील पहिले अॅपी- अॅग्री टुरिझम सेंटर म्हणून या केंद्राची ओळख आहे. मधमाशीचे मानवी जीवनातील महत्त्व सर्वांपर्यंत पोहचवून तिचे संरक्षण व संवर्धन करणे, हा या प्रकल्पाचा बीजविषय आहे. मधमाशी पालनाच्या माध्यमातून पिकांची उत्पादन वाढ तसेच स्वयंरोजगार निर्मितीतून शाश्वत ग्रामविकासाची संकल्पना येथे रंजक व अभ्यासपूर्ण स्वरुपात साकारण्यात आली असून, येथे दोन लघुपटाच्या माध्यमातून मधमाशीचे महत्त्व समजावून सांगितले जाते. या केंद्रात वर्षभर विविध परिसंवाद व चर्चासत्रे आयोजिली जातात. त्यात राज्यस्तरीय ‘मधुक्रांती’ परिसंवाद, हनी बी फेस्टिवल, बसवंत फळ महोत्सव, द्राक्ष आणि किशमिश महोत्सव, मुख्याध्यापक/ प्राचार्य परिषद, पर्यटन महोत्सव तसेच इतरही उपक्रम नियमित होत असतात. मधमाशांसंदर्भातील विविध स्पर्धांच्या माध्यमातून चिमुकले या हनीपार्कशी जोडले गेले आहेत. त्यामुळे या पार्कमधील पृथ्वी आणि त्यावर बसलेली मधमाशी आपल्याला पृथ्वी रक्षणाचा संदेश देताना दिसते.
इतकेच नाही तर मधमाश्यांची वसाहत (अॅपिअरी) येथे उभारण्यात आली असून, येथे मधमाशा हाताळताही येतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मधाची चवही चाखता येते. हनीपार्कपासून जवळत बसवंत गार्डनही साकारण्यात आले असून, येथे बैलांचे विविध प्रकार आणि त्यांची शिल्प उभारण्यात आले आहेत. याशिवाय आग्या मधमाशी प्रतिकृती, बी-प्लँट नर्सरी- सीड बँक, मधमाशीच्या संदर्भातील विविध पुस्तकांचे खुले वाचनालय, ग्रामीण भागातील संस्कृती आणि मधमाशीचे कार्य वारली पेंटिंग्जच्या माध्यमातून समजावून देणारा विभागही आहे. येथील आर्ट गॅलरीत बांबू पेंटिंग, पॉट पेंटिंग, स्टोन पेंटिंग, बोहाडा संग्रहालय अशी आकर्षणे आहेत. याबरोबरच येथील खाद्यपदार्थ आणि विक्री विभागात आऊटलेट आणि कॅफे, मधुबन फूडकोर्ट, विसावा, सोव्हिनिअर शॉप, गेम झोन कॅफे अशा विविध सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
बसवंत कृषी-उद्योग पर्यटन केंद्रात ‘गांव समृद्ध, तर देश समृद्ध’ ही महत्त्वाची विचारधारा अधोरेखित करणाऱ्या ‘सेवरगांव’ या स्वयंपूर्ण आदर्श गावाची (मिनिएचर व्हिलेज) संकल्पना प्रतिकृतीद्वारे मांडण्यात आली आहे. अलीकडे प्रक्रिया उद्योगांतून रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. यासाठी एक मध्यम स्वरूपाचे फूड प्रोसेसिंग युनिट, मध प्रक्रिया युनिट तसेच चॉकलेट फॅक्टरी येथे उभारून प्रशिक्षणाची सोय देखील केली आहे. द्राक्षांची माहिती, बेदाणा निर्मिती प्रक्रिया आणि विविध प्रकारच्या बेदाण्यांची मांडणी येथे केली आहे. हे सगळं पाहताना मधमाशा या सगळ्याच्या केंद्रबिंदू असल्याचेही वारंवार अनुभवायला मिळतं. मधमाशीच जीवन माणसाला प्रेरीत करतानाचा अनुभव येथे घेता येतो. मधमाशी आतापर्यंत आपल्याला कळालीच नव्हती, ती आता उलगडली हा अनुभव येथे मिळतो हे नक्की.
मधमाशीला समजून घेता घेता आणि येथे उभं केलेलं विश्व अनुभवता अनुभवता चार-पाच तास कसे निघून जातात हे कळत नाही. हा वेगळा प्रयोग नाशिकचं वेगळेपण नक्की अधोरेखित करेल यात शंका नाही. हा आणि आणखी एक मधमाशी आपल्या बचावासाठी तुम्हाला चावत नाही तर ती आपल्या कुटुंबापासून तुम्हाला लांब ठेवण्यासाठी चावते. चावताना ती आपलं बलिदान देते. जेव्हा मधमाशी तुम्हाला चावते त्यानंतर काही मिनिटात तिचा मृत्यू होतो. तिला चावण्याची हौस नसते, असते ती तिच्या कुटुंबाची काळजी. हा विचारही मला खूप काही सांगून गेला. चला, तर मधमाशीचं विश्व अनुभवायला.. हनीपार्कला!
(अधिक माहितीसाठी संपर्क : संदीप वाघ : ९९२२१०९५५७)
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...







