गोष्ट मधमाशांची.. नाशिकच्या नव्या वैभवाची!
मधमाशांचं अस्तित्त्व संपल तर आपण किती वर्ष जगू…? तुम्हाला माहित आहे का मधमाशांचे २५ हजार प्रकार असतात?... कामकरी मधमाशा सर्वाधिक कष्टाळू असतात…? मादी मधमाशी सर्वाधिक आयुष्य जगते…? नर मधमाशी सर्वांत दुदैवी जीवन जगते…? मधमाशा अष्टकोनीच घर का बांधतात…? आपण मधमाशांकडून काय शिकू शकतो…? हे आणि याहूनही अधिक प्रश्न मला का पडले? ते पिंपळगाव बसवंत येथील हनीपार्क पाहताना. मला पडलेल्या प्रश्नांनी मला खूप काही शिकवलं. नाशिकचं नवीन वैभव ठरलेल्या हनीपार्कमधील.. मधमाशांची गोष्ट नक्की समजून घेण्यासारखी आणि आवर्जून पाहण्यासारखी आहे.
रमेश पडवळ, नाशिक / मोबा. ८३८००९८१०७
मधमाशी… हा विषय तसा आपल्या सर्वांसाठीच दुर्लक्षित. पण, एका वाक्यानं माझं अंतर्मन मधमाशांकडे वेधलं गेलं. हे वाक्य साध्यासुद्या माणसाचं नव्हतं तर ते होत खुद्द प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन यांचं. आइन्स्टाइन म्हणतात,‘पुथ्वीवरून मधमाशा नष्ट झाल्या तर मानवासह निसर्ग नष्ट व्हायला अवघे चार वर्ष लागतील.’ पिंपळगाव बसवंत येथील हनीपार्क म्हणजेच भारतातील पहिले अॅपी ‘बसवंत गार्डन’मध्ये प्रवेश केल्यावर हे वाक्य डोळ्यात भरत आणि कितीतरी वेळ ते वाचत रहावं आणि असं कसं होऊ शकतं? या प्रश्नाभवती डोक्यातील मेंदूची कालवाकालव होते. पण, हे खूद्द प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन सांगतायेत म्हटल्यावर फक्त विरंगुळा हा हनीपार्क पाहण्याचा हेतू गळून पडतो आणि आपण काही तरी शिकण्यासाठी येथे आलो आहोत, याचा भान जागं होतं. खरचं मधमाशा नष्ट झाल्या तर आपलं आयुष्य चारवर्षांत संपुष्ठात येईल का? हे जाणून घेण्याची एक ओढ मला लागली आणि मधमाशांची शिकविलेल्या शिस्तीच्या धड्यासह त्यांनी कष्टानं बनविलेलं मध मला चाखायला मिळालं. अ..अं… गोष्ट संपलेली नसून ती आता कुठं सुरू झाली आहे.
मधमाशी म्हटलं की मला बालपणी अंब्याच्या झाडावरून तिचं पोळ हिसकावून काढण्याची आठवण झाली अन् ते काढताना पाठभर चावलेल्या मधमाशा मला आठवल्या, की आजही अंगावर शहारा येतो. तुम्हीही कधीतरी असं काही तरी केलं असेलच ना? पण हे चुकीचं होतं. हे आज कळालं. मधमाशी तशी कोणाच्या अध्यात ना मध्यात. अल्पायुषी असूनही जगण्यासाठी धडपडणारी. फक्त धडपडनं नाही तर जे आयुष्य मिळालयं ते शिस्तबद्ध, आखीवरेखीव आणि आपल्या मागच्या पुढच्यांचा विचार करत जगणारी! असं आता कोणालाही जगावं वाटतं नाही, प्रत्येकजण आपल्याला कसं सुखावह जगता येईल इतकाच विचार करताना दिसतो पण, हा विचार मधमाशीला शिवतही नाही. म्हणूनच तिचं अंतर्मन माणसाच्या भावविश्वाशी जोडलं गेलं असावं. गोष्ट सुरू होते.. अल्बर्ट आइन्स्टाइन यांच्या वाक्यापासून. खरचं मधमाशीच्या एकूणच जीवनक्रमाशी आपलं आयुष्य जोडलं गेलं असेल तर मधमाशीला जाणून घ्यायला हवंच. पिंपळगाव बसवंत हे एक प्राचीन गाव आहे, त्यामुळे या गावाशी माझं एक वेगळं नातं आहे. अनेकदा या गावातील प्राचीन मंदिर, नदीकाठच्या समाधी, घाट आणि जैन साधूंचा सहवास असं बरचं काही अनुभवायला यापूर्वी अनेकदा गेलो आहे. बसवंत पासून वणी रस्त्यावर मुखेड गावाकडे निघालात की, हनीपार्क नावाचं एक वेगळं विश्व संजय पवार या उद्योजकानं उभारलं आहे. नाशिकची लोकं तशी खटपटी हे आजचं नाही तर दोन हजार वर्षांपासून आतापर्यंत असंख्य उदाहरणं देता येतील. त्याच रेषेतील हा माणूस असावा. प्रत्यक्ष कधी भेटलेलो नाही पण, त्यांनी कष्टानं जे काही उभारलंय ते पाहावं असं वाटलं म्हणून हनीपार्कमध्ये सकाळी साडेदहाच्या सुमारास पोहचलो. गेटमधून आत गेल्या-गेल्या उजव्या हाताला अल्बर्ट आइन्स्टाइन भेटले आणि तेथे जाण्याचा दृष्टीकोन बदलला. तेथील एका गाईड मित्रांन मधमाशांचं आयुष्य उलगडायला सुरूवात केली. खरंतर मधमाशांबद्दल आपल्याला फारसं माहित असण्याच काही कारण नाही म्हणूनच तुम्हाला हे माहित आहे का? या फलकापासून मधमाशांच्या भावविश्वाचा प्रवास सुरू झाला. साखरेच्या कणाऐवढा मेंदू असलेली मधमाशीला पाच डोळे असतात हे मी पहिल्यांदाच ऐकत होतो. इतकचं नाही तर मधमाशी ३०० प्रकारच्या चवी ओळखण्याची क्षमता बाळगूण असते. ती ताशी १५ ते २० किलोमीटर वेगाने उडते आणि एकाच उड्डाणामध्ये ५० ते १०० फुलांना भेटी देत मधचा कण आणि कण गोळा करते. हे एकताना मला चक्कर येणंच बाकी राहिलं होतं तेवढ्यात गाईड मित्रांन डोक्यात दगड टाकावा असं काही सांगितलं. ते म्हणजे, एक मधमाशी तिच्या आयुष्यात फक्त एक चमचा मध गोळा करते यासाठी तिला ४ लाख किलोमीटरचा प्रवास करावा लागतो, म्हणजेच ती पृथ्वीला दोन प्रदक्षिणा एवढे अंतर त्या एक चमच्या मधासाठी घालते. मधमाशीबद्दलची ही माहिती ऐकताना मी थबकून गेलो. विशेष म्हणजे हनीपार्कमधील प्रवास अनुभवताना असंख्य फलकांपैकी ही माहिती पहिल्याच फलकावर लिहिली आहे तर पुढे काय काय असेल अशा विचारात मी पडलो.
मी सगळंच काही आपल्याला सांगणार नाही. कारण मी लिहिलेलं तुम्ही वाचणार अहात पण गाईड मित्राच्या तोंडून ते भरभरून ऐकतानाची मज्जा काही वेगळीच आणि आजूबाजला मधमाशा पाहताना ते समजून घेणं वेगळं आणि अनोख ठरतं. माझी दोन्ही मुले माझ्या इतकीच उत्सुकतेनं सर्वकाही ऐकत होती. पत्नीनं तर डोक्याला हात लावला होता. आपण किती किती आळशी आहोत, याची जाणीव मला झाली होती. पण माणसाला मधमाशांचे महत्त्व आताच नाही तर दोन हजार वर्षांपूर्वी समजले होते. इजिप्त आणि चीन बहुदा भारतातील मंडळींना मध व मेणासाठी तेव्हा मधमाशांची महती लक्षात आली होती. विशेष म्हणजे, मानवाला सर्वात प्रथम माहित असलेला गोड पदार्थ म्हणजे मध होय. जगभरात मधमाशांच्या किती जाती असतील, असं गाईड विचारल्यावर त्यांनाही वेगवेगळ्या जातीत विभागल्याचं लक्षात आलं. असतील तीन चार? असं वाटलं पण, २५ हजार जातींचं मधमाशांचं विश्व असेल अशी साधी कल्पनाही आम्ही केली नव्हती. त्यापैकी फक्त ५ जाती मधामुळे सर्वाधिक परिचित आहेत. मधमाशीचा आकार किती असतो हे वेगळं सांगायला नको, कधीतरी त्यांच्याशी गाठभेट झाली असेलच. पण त्यांच्या घरात त्यांचे प्रामुख्याने तीन प्रकार असतात. एक मादी, दुसरा नर आणि तिसरी कामकरी मधमाशी. मादी अर्थातच कुटुंब वाढविण्याचे काम करते, नर त्यासाठी तिला सहकार्य करतो आणि कामकरी मधमाशी सतत काम करत राहते. या तिघांचं कामाचं तंत्र एका विशिष्ट सुत्रात गुंफलेलं आहे. हे समजून घेताना मला नर मधमाशीबद्दल खूप वाईट वाटलं. बिचारा नर! असं म्हणण्याचं कारण म्हणजे, त्याला ना मध गोळा करता येत, ना कोणाला चावण्यासाठी डंख त्यांच्याकडे असतो. मादी तिचं काम झाल्यावर नराचं ओझं नको म्हणून त्याला मारून टाकण्याचा आदेश देते. कारण त्यानंतर उगाचं नराला पोसण्यासाठी मध वाया जाऊ नये म्हणून कामकरी मधमाशा मादीच्या आदेशानंतर नराला मारून टाकतात. किती वाईट ना? पण, हेच जीवनाचं सूत्र आहे. हे एकून मी थक्क झालो होतो. गाईड मित्राला मी वारंवार प्रश्न विचारून त्रास देत होतो आणि तोही आनंदान माझ्या प्रश्नांची उत्तर देत होता. कामकरी माशी साधारण सहा महिने आयुक्त घेऊन आलेली असते तर मादी मधमाशी दोन ते पाच वर्षांपर्यंत जगते. यासाठी ती फक्त राजअन्न सेवन करते. राजअन्नामुळे तिचं वाय दीर्घायु ठरतं. हे राजअन्न मध २५ हजारांना मिळतं आणि आपल्या नटनट्या हेच राजअन्न तारुण्य टिकविण्यासाठी खातात. मधमाशांचं भावविश्व कामाभवती गुंफलं गेलं आहे. त्यांच्या मधाची पोळ, वयोमानानुसार बदलणारी त्यांची कामे असोत वा फुलांमधून मध गोळा करण्याची छंद असो. हे सगळं करताना कामाची इतक्या बारकाईने आखणी केलेली असते की, त्यांचं सूत्र अंगी भिनवलं तर कोणत्याही क्षेत्रात अपयश येणे कठीणचं. असं म्हणण्याचं कारण म्हणजे, तुम्हाला आत्मनिर्भर व्हायचं असेल तर तुमचे आई-वडिल तुम्हाला कष्टाची सवय कशी लावतात यावर सर्वकाही अवलंबून आहे. मी सातवीत असल्यापासून रांगोळी विकायला सुरूवात केली होती. तेव्हा कोणी मुलाला कामवायला का पाठवता असं म्हणत नसे. तर घराला हातभार लावतोय म्हणून कौतुक होई. आता मुलांना कामाला लावणे सोडा घरातील कामे सांगितली तरी काय आई-बाप आहेत मुलांकडून कामे करून घेतात, अशी दुसणे लोक देतात. पण, मधमाशी आपल्या पिलांना वयाच्या १ ते ३ दिवसात घराची स्वच्छता करायला शिकविते, ४ ते ६ दिवसात मोठ्या अळ्यांना खाद्य द्यायला लावते, ७ ते १० दिवसाच्या मधमाशा लहान अळ्यांना खाद्य देतात, तर ११ ते १२ दिवसाच्या मधमाशा राणी माशीला खाद्य देणे आणि तिची सेवा करतात. १३ ते १८ दिवस वयाच्या मधमाशा मेण स्त्रवणे व घरे बांधण्याची कामे करतात, १९ ते २० दिवसाची मधमाशी वसाहतीचे संरक्षणसाठी रखवालदारीचे काम करतात, २१ च्या पुढे मकरंद, पराग, पाणी भरणे आणि गरजेनुसार इतक कामे करतात. आहे ना अनोखं. असं बरंच काही हनीपार्कमध्ये अनुभवायला पाहायला आणि समजून घ्यायला मिळते. त्यामुळेच पिंपळगाव बसवंत येथे अभिनव असे ‘बसवंत हनी बी पार्क- मधमाशी पालन प्रशिक्षण केंद्र’ तसेच ‘बसवंत कृषी उद्योग पर्यटन केंद्र’ वेगळं ठरतं. देशातील पहिले अॅपी- अॅग्री टुरिझम सेंटर म्हणून या केंद्राची ओळख आहे. मधमाशीचे मानवी जीवनातील महत्त्व सर्वांपर्यंत पोहचवून तिचे संरक्षण व संवर्धन करणे, हा या प्रकल्पाचा बीजविषय आहे. मधमाशी पालनाच्या माध्यमातून पिकांची उत्पादन वाढ तसेच स्वयंरोजगार निर्मितीतून शाश्वत ग्रामविकासाची संकल्पना येथे रंजक व अभ्यासपूर्ण स्वरुपात साकारण्यात आली असून, येथे दोन लघुपटाच्या माध्यमातून मधमाशीचे महत्त्व समजावून सांगितले जाते. या केंद्रात वर्षभर विविध परिसंवाद व चर्चासत्रे आयोजिली जातात. त्यात राज्यस्तरीय ‘मधुक्रांती’ परिसंवाद, हनी बी फेस्टिवल, बसवंत फळ महोत्सव, द्राक्ष आणि किशमिश महोत्सव, मुख्याध्यापक/ प्राचार्य परिषद, पर्यटन महोत्सव तसेच इतरही उपक्रम नियमित होत असतात. मधमाशांसंदर्भातील विविध स्पर्धांच्या माध्यमातून चिमुकले या हनीपार्कशी जोडले गेले आहेत. त्यामुळे या पार्कमधील पृथ्वी आणि त्यावर बसलेली मधमाशी आपल्याला पृथ्वी रक्षणाचा संदेश देताना दिसते.
इतकेच नाही तर मधमाश्यांची वसाहत (अॅपिअरी) येथे उभारण्यात आली असून, येथे मधमाशा हाताळताही येतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मधाची चवही चाखता येते. हनीपार्कपासून जवळत बसवंत गार्डनही साकारण्यात आले असून, येथे बैलांचे विविध प्रकार आणि त्यांची शिल्प उभारण्यात आले आहेत. याशिवाय आग्या मधमाशी प्रतिकृती, बी-प्लँट नर्सरी- सीड बँक, मधमाशीच्या संदर्भातील विविध पुस्तकांचे खुले वाचनालय, ग्रामीण भागातील संस्कृती आणि मधमाशीचे कार्य वारली पेंटिंग्जच्या माध्यमातून समजावून देणारा विभागही आहे. येथील आर्ट गॅलरीत बांबू पेंटिंग, पॉट पेंटिंग, स्टोन पेंटिंग, बोहाडा संग्रहालय अशी आकर्षणे आहेत. याबरोबरच येथील खाद्यपदार्थ आणि विक्री विभागात आऊटलेट आणि कॅफे, मधुबन फूडकोर्ट, विसावा, सोव्हिनिअर शॉप, गेम झोन कॅफे अशा विविध सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
बसवंत कृषी-उद्योग पर्यटन केंद्रात ‘गांव समृद्ध, तर देश समृद्ध’ ही महत्त्वाची विचारधारा अधोरेखित करणाऱ्या ‘सेवरगांव’ या स्वयंपूर्ण आदर्श गावाची (मिनिएचर व्हिलेज) संकल्पना प्रतिकृतीद्वारे मांडण्यात आली आहे. अलीकडे प्रक्रिया उद्योगांतून रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. यासाठी एक मध्यम स्वरूपाचे फूड प्रोसेसिंग युनिट, मध प्रक्रिया युनिट तसेच चॉकलेट फॅक्टरी येथे उभारून प्रशिक्षणाची सोय देखील केली आहे. द्राक्षांची माहिती, बेदाणा निर्मिती प्रक्रिया आणि विविध प्रकारच्या बेदाण्यांची मांडणी येथे केली आहे. हे सगळं पाहताना मधमाशा या सगळ्याच्या केंद्रबिंदू असल्याचेही वारंवार अनुभवायला मिळतं. मधमाशीच जीवन माणसाला प्रेरीत करतानाचा अनुभव येथे घेता येतो. मधमाशी आतापर्यंत आपल्याला कळालीच नव्हती, ती आता उलगडली हा अनुभव येथे मिळतो हे नक्की.
मधमाशीला समजून घेता घेता आणि येथे उभं केलेलं विश्व अनुभवता अनुभवता चार-पाच तास कसे निघून जातात हे कळत नाही. हा वेगळा प्रयोग नाशिकचं वेगळेपण नक्की अधोरेखित करेल यात शंका नाही. हा आणि आणखी एक मधमाशी आपल्या बचावासाठी तुम्हाला चावत नाही तर ती आपल्या कुटुंबापासून तुम्हाला लांब ठेवण्यासाठी चावते. चावताना ती आपलं बलिदान देते. जेव्हा मधमाशी तुम्हाला चावते त्यानंतर काही मिनिटात तिचा मृत्यू होतो. तिला चावण्याची हौस नसते, असते ती तिच्या कुटुंबाची काळजी. हा विचारही मला खूप काही सांगून गेला. चला, तर मधमाशीचं विश्व अनुभवायला.. हनीपार्कला!
(अधिक माहितीसाठी संपर्क : संदीप वाघ : ९९२२१०९५५७)
No comments:
Post a Comment