Saturday, 28 October 2023

पदपथावरील आणि असुरक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठीच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करणार

 पदपथावरील आणि असुरक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठीच्या

 धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करणार

-राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अध्यक्ष प्रियंक कानूनगो

 

            मुंबईदि.27 :- देशात रस्त्यावर राहणाऱ्या मुलांची समस्या मोठी आहे. त्यामुळे या मुलांचे पुनर्वसनशिक्षणआरोग्याची काळजी घेण्यासाठी देशात प्रथमच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार यासाठी धोरण तयार करण्यात आले आहे.  महाराष्ट्रासह देशातील 22 राज्यांनी हे धोरण स्वीकारले असून आतापर्यंत 23 हजार रस्त्यावरील बालकांची सुटका केली आहे. त्यात महाराष्ट्रातील 4 हजार बालकांचा समावेश असल्याची माहिती राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रियंक कानूनगो यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

            श्री. कानूनगो म्हणाले की, रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसंदर्भात विशेष करून कोणत्याही प्रकारचे धोरण आखले गेले नव्हते. एनटीपीसीआर आणि महाराष्ट्र शासन संयुक्तपणे बालकांची सुटका आणि पुनर्वसन  पोर्टलच्या माध्यमातून काम करीत आहे. रस्त्यावरील मुलांना देशात प्रथमच अशा पद्धतीचे हक्क त्यांना प्रदान करण्यात येत आहेत. आंतरराष्ट्रीय बाल दिवसाच्या अनुषंगाने राष्ट्रीय बाल हक्क आयोग या संदर्भातील बृहत कृती कार्यक्रम राबविणार आहे. कुटुंबात बालकांचे पुनर्वसन केल्यास त्यांचे सशक्तीकरण होऊ शकते हे ओळखून या मुलांना त्यांच्या पालकांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.

            राष्ट्रीय बाल हक्क आयोग बालकांचे हक्क आणि संरक्षण या संदर्भात काम करते. बालकांना  शारीरिक किंवा मानसिक हिंसाइजा किंवा गैरवर्तनदुर्लक्ष किंवा निष्काळजीपणादुवर्तन किंवा शोषणलैंगिक गैरवर्तनासह सर्व बाबींपासून संरक्षण मिळविण्याचा हक्क आहे. प्रत्येक मूल सर्व प्रकारच्या लैंगिक शोषणलैंगिक छळ आणि लैंगिक गैरवर्तनापासून कायद्याद्वारे संरक्षित आहे. मनोरंजन क्षेत्रातील बालकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी देखील बालहक्क आयोग काम करत आहे. बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात बालकांना आणण्यासाठी  मान्यताप्राप्त मदरसे तसेच मान्यता नसलेले मदरसे यांचे मॅपिंग करणारे महाराष्ट्र हे उत्तर प्रदेश नंतर दुसरे राज्य आहेअसेही अध्यक्ष श्री. कानूनगो यांनी सांगितले.

            यावेळी राष्ट्रीय बालहक्क आयोगाच्या सदस्य सचिव रुपाली बॅनर्जीसदस्य प्रीती दलालमहाराष्ट्र राज्य बाल विकास आयुक्तालयाचे उपायुक्त राहुल मोरे उपस्थित होते.

००००

मुंबई शहराच्या २५२ कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्प अहवालास मान्यता मुंबई शहर महिला सुरक्षितता उच्च शक्ती प्रदत्त समितीची बैठक

 मुंबई शहराच्या २५२ कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्प अहवालास मान्यता

मुंबई शहर महिला सुरक्षितता उच्च शक्ती प्रदत्त समितीची बैठक

 

            मुंबईदि. २७ :- मुंबई शहर महिला सुरक्षितता पुढाकार योजनेची उच्च शक्ती प्रदत्त समितीची बैठक आज अप्पर मुख्य सचिव (गृह) यांच्या दालनात झाली. बैठकीला अपर मुख्य सचिव (गृह) सुजाता सौनिकपोलीस आयुक्त विवेक फणसळकर आदी उपस्थित होते. बैठकीत मुंबई शहरासाठी एकूण २५२ कोटी रुपये इतक्या खर्चाच्या प्रकल्प अहवालास मान्यता मिळाली आहे.

            देशात महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने केंद्र शासनातर्फे निर्भया निधी अंतर्गत विविध उपाययोजना राबविण्यात येतात. या निर्भया निधी अंतर्गत  'निर्भया - सेफ सिटीही योजना देशातील ८ शहरात राबविली जात आहे. या केंद्र पुरस्कृत योजनेमध्ये राज्यातील बृहन्मुंबई शहराचा समावेश आहे.

            उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेची अंमलबजावणी अधिक गतीने व परिणामकारकरित्या करण्याचे निर्देश दिले आहेत. बैठकीत मुंबई शहरात महिला सुरक्षिततेच्या अनुषंगाने पोलीस आयुक्तमुंबई यांच्या स्तरावर झालेल्या निविदा प्रक्रियेच्या अनुषंगाने कार्यादेश देण्याचा निर्णय घेण्यात आला.

            या मान्यतेमुळे मुंबई पोलिसांना गुन्ह्यांच्या तपासासाठी सायबर साहित्य उपलब्ध होईल. यामुळे महिलांवरील गुन्ह्यांच्या संदर्भात प्रतिसाद कालावधी कमी होईल. तसेच मुंबई पोलिसांना मोबाईल डाटा टर्मिनस व गुन्ह्याच्या स्थळांच्या चित्रीकरणासाठी साधने उपलब्ध होतील. जनतेच्या माहितीसाठी डिजिटल बोर्डच्या उभारणीस देखील बैठकीत मान्यता देण्यात आली. याव्यतिरिक्त पोलिसांना प्रशिक्षण व्यवस्था व वाहतूक पोलिसांनाही स्मार्टफोन देण्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आला. अत्याधुनिक उपकरणे तसेच पोलिसांना प्रशिक्षणामुळे पोलीस प्रशासनातील क्षमता वृद्धिंगत होवून दोषसिध्दीचे प्रमाण वाढण्यास मदत होईल. या उपाययोजनांच्या माध्यमातून मुंबई शहर महिलांसाठी अधिक सुरक्षित होणार आहेअसा विश्वास यावेळी अपर मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांनी व्यक्त केला.

००००

निवृत्त मी झालो,पण निवांत ती झाली*

 .

        *निवृत्त मी झालो,पण निवांत ती झाली*


      सकाळच्या पहिल्या चहाची

      जबाबदारी माझ्यावर आली

        दूध ऊतू जाऊ न देण्याची 

      काळजी माझ्या शिरी आली

               निवृत्त मी झालो,

              निवांत ती झाली ।


         आजचा नाष्टा ठरवायची 

आणि, करायची पाळी माझ्यावर आली

     कांदा चिरताना आसवे गाळायची

           वेळ आता माझ्यावर आली,

                 निवृत्त मी झालो,

                 निवांत ती झाली ।


       कुकरच्या शिट्यां मोजण्याची

            आता मला सवय झाली

            तव्यावरची गरम पोळीही 

         आताशा चटके देईना झाली

                   निवृत्त मी झालो,

                   निवांत ती झाली ।


          दुधाचा खाडा,पेपरचा खाडा

               फोन बिल, लाईट बिल

               हिशोब ठेवताना माझी

                  त्रेधातिरपीट झाली

                    निवृत्त मी झालो,

                   निवांत ती झाली । 


          घड्याळाच्या  काट्याबरोबर

           फिरण्यातून, ती मुक्त झाली

              लवकर उठण्याची सवय

              आता, तीने सोडून दिली 

                    निवृत्त मी झालो

                   निवांत ती झाली ।


             माझ्यासाठी धावणारी ती

              आता जरा थकू लागली

           थकलेल्या तिच्या पावलांची

            आता मला चाहूल लागली

                     निवृत्त मी झालो

                    निवांत ती झाली ।


   *सर्व निवृत्त सदस्यांसाठी*

वीर अमर जवानांच्या गावातील माती संकलित करणाऱ्या छत्रपती संभाजीनगरच्या

 वीर अमर जवानांच्या गावातील माती संकलित करणाऱ्या छत्रपती संभाजीनगरच्या

उमेश जाधव यांच्या उपक्रमाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून कौतुक

            मुंबईदि. 26 : "देशातील १८५ वीर अमर जवानांच्या गावी जावून त्यांच्या अंगणातील पवित्र माती कलशात एकत्र करणाऱ्या व राष्ट्रभक्तीतून जगावेगळी धडपड करणाऱ्या उमेश गोपीनाथ जाधव या छत्रपती संभाजीनगरच्या तरुणाचा उपक्रम अभिनंदनीयप्रेरणादायी आणि अनुकरणीय असून "मेरी माटीमेरी देश" या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अभियानाला मिळत असलेला प्रतिसाद " राष्ट्र प्रथम" ही भावना जागृत करण्यास प्रेरक ठरत आहेअसे प्रतिपादन वनसांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

            श्री. जाधव यांच्याकडून एकत्रित अमर जवानांच्या गावातील माती कलशाचे पूजन व अभिवादन करून मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी त्यांच्या मलबार हिल येथील शासकीय निवासस्थानाहून दिल्लीकडे रवाना केली. 

            यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, "मेरी माटीमेरा देश" या अभियानास देशभरात उत्तम प्रतिसाद मिळत असून सर्वत्र विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. राज्यातील एक हजार कुंभ घेऊन शुक्रवारी तरुण मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानात एकत्र येणार आहेत. सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री  अजित पवार यावेळी उपस्थित राहतील. असेही त्यांनी सांगितले.

            छत्रपती संभाजीनगर येथील उमेश जाधव या तरुणाने एक लाख 30 हजार किलोमीटर प्रवास करून अमर जवानांच्या गावी जाऊन माती एकत्र केली हे देशभक्तीचे अनोखे उदाहरण आहे. या त्यांच्या उपक्रमात सहभागी होताना विशेष अभिमान वाटत आहेअसेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

            शहीद अमर जवानांच्या कुटुंबीयांना भेटून ही माती जमविण्यासाठी मी देशभरात फिरलोप्रत्येक ठिकाणी वेगळे अनुभव आलेशहीद जवानांच्या विधवांच्या डोळ्यातील विश्वास आणि देशभक्ती बघून अधिक प्रेरणा मिळत गेली. माझे सर्वांनी स्वागत केले. राज्यात मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी या संदर्भात व्यक्त केलेली संवेदनशीलता आणि सहकार्यांची भावना बघून अतिशय भावूक झालो आहे. त्यांचे प्रेरक वक्तव्य आणि देशभक्तीने ओतप्रोत विचार मला नवी ऊर्जा देवून गेलेअशी प्रतिक्रिया श्री. जाधव यांनी यावेळी व्यक्त केली. दिल्ली येथे लष्कर मुख्यालयात ही माती अमृत वाटिकेसाठी देण्यात येईलअसे श्री. जाधव यांनी सांगितले.   

जीसीसी टीबीसी संगणकीय टंकलेखन परीक्षेसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू

 जीसीसी टीबीसी संगणकीय टंकलेखन परीक्षेसाठी

ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू

 

            मुंबईदि. 26 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदपुणे यांच्याशी संलग्न असलेल्या जीसीसी टीबीसी संगणकीय टंकलेखन परीक्षा एप्रिल २०२४ मध्ये होणार आहे. यासाठी राज्यातील सर्व मान्यताप्राप्त संस्थांमधून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थांनी नियमबाह्य कामे केल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईलअसेही यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

            इच्छुक विद्यार्थ्यांनी www.mscepune.in/CT_INST_MUMBAI.aspx या लिंकवर आपल्या जवळच्या मान्यता प्राप्त टायपिंग संस्थांची यादी तपासून पाहावी. त्यानंतर त्या संस्थेला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिलेल्या प्रमाणपत्रावरील त्याच संस्थेचे नाव व पत्ता बरोबर असल्याची खातरजमा करूनच प्रवेश घ्यावाअसे आवाहन परिषदेमार्फत करण्यात आले आहे.

            महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे राज्यात वर्षातून दोन वेळा जीसीसी टीबीसी संगणकीय टायपिंग परीक्षा घेतल्या जातात. प्रत्येक विषयासाठी सहा महिन्यांचा अभ्यासक्रम असून याची प्रती विषय ,५०० रुपये इतके शुल्क आकारले जाते. त्याचबरोबर लघुलेखन परीक्षा देखील घेतल्या जातात. त्यासाठी देखील प्रवेश सुरू झाले असल्याची माहिती परिषदेमार्फत देण्यात आली आहे.

            संस्थेमध्ये अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतानाच परीक्षेचा प्राथमिक अर्ज ऑनलाईन भरून घेतला जाणार आहे. यामुळे ऐनवेळी परीक्षा अर्ज भरून घेणे किंवा क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी भरणे या गैरप्रकारांना आळा बसेलअसेही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

00000

निळवंडे धरणाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन दुष्काळी भाग होणार सुजलाम् - सुफलाम्

 निळवंडे धरणाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन

दुष्काळी भाग होणार सुजलाम् - सुफलाम्

67 हजार हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली


 


            अहमदनगर, दि. 26 :- अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील निळवंडे (उर्ध्व प्रवरा प्रकल्प) धरणाचे जलपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झाले. उर्ध्व प्रवरा प्रकल्प डावा कालवा हा जिल्ह्यातील दुष्काळी व जिरायत भागाला सुजलाम् - सुफलाम् करणारा हा प्रकल्प पथदर्शी ठरणार आहे. डावा, उजवा, उच्चस्तरीय पाइप कालवा व उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव व सिन्नर (जि. नाशिक) या तालुक्यातील 182 गावांमधील 67 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.


            प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते निळवंडे धरण स्थानावर कोनशिलेचे अनावरण करून जलपूजन करण्यात आले. त्यानंतर डाव्या कालवा मार्गिकेने कळ दाबून पाणी सोडण्यात आले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर आदी उपस्थित होते.


निळवंडे धरणाची प्रमुख वैशिष्टे


● उर्ध्व प्रवरा प्रकल्प (निळवंडे २) हा महाराष्ट्र राज्यातील एक मोठा पाटबंधारे प्रकल्प असून मौजे निळवंडे, ता. अकोले, जि. अहमदनगर येथे प्रवरा नदीवर बांधण्यात आलेला आहे.


● धरणाची एकूण लांबी ५३३ मीटर व महत्तम उंची ७४.५० मीटर इतकी आहे. धरणाचा सांडवा ओगी प्रकारचा असून त्यावर १२ मीटर x ६.५ मीटर आकाराच्या ५ वक्राकार द्वारांची उभारणी केली आहे. धरणाचा एकूण जलसाठा २३६ द.ल.घमी (८.३२ TMC) आहे.


● प्रकल्पाच्या ८५ कि.मी. लांबीच्या डाव्या व ९२.५० कि.मी. लांबीच्या उजव्या कालव्याद्वारे तसेच जलाशयावरील ४ उपसा सिंचन योजना तसेच उच्चस्तरीय पाइप कालव्यांद्वारे एकूण ६८ हजार ८७८ हेक्टर एवढी सिंचन क्षमता प्रस्तावित आहे. त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील २४ गावांमधील ४ हजार २३५ हेक्टर, संगमनेर तालुक्यातील ८० गावांमधील २५ हजार 428 हेक्टर, कोपरगाव तालुक्यातील ११ गावांमधील ५ हजार ६६६ हेक्टर, राहाता तालुक्यातील ३७ गावांमधील १७ हजार 231 हेक्टर, श्रीरामपूर तालुक्यातील ३ गावांमधील ९९९ हेक्टर, राहुरी तालुक्यातील 21 गावांमध्ये ८ हजार ८९ हेक्टर तसेच नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील 6 गावांमधील २ हजार ६१२ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. अशा एकूण १८२ दुष्काळी गावांतील ६८ हजार ८७८ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे.


****

शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राज्यातील 85.60 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात मिळाले 1712 कोटी रुपये सर्वाधिक लाभार्थी शेतकरी अहमदनगर जिल्ह्यात

 नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राज्यातील 85.60 लाख

शेतकऱ्यांच्या खात्यात मिळाले 1712 कोटी रुपये

सर्वाधिक लाभार्थी शेतकरी अहमदनगर जिल्ह्यात

जीवनातील अविस्मरणीय क्षण - कृषीमंत्री धनंजय मुंडे

            मुंबई दि. 26 : शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न प्राप्त व्हावे यासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमध्ये दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6 हजार रुपये थेट जमा करण्यात येतात. त्याच धर्तीवर राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘नमो शेतकरी सन्मान’ योजनेचा शुभारंभ आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी (जि. अहमदनगर) येथे करण्यात आला. राज्य सरकारच्या या योजनेमुळे केंद्र आणि राज्याचे मिळून शेतकऱ्यांना आता दरवर्षी 12 हजार रुपये मिळतील.

            प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी एका क्लिकद्वारे राज्यातील 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर 1712.02 कोटी रुपये पाठवून योजनेचा शुभारंभ केला. दरम्यानहा आपल्या जीवनातील ऐतिहासिक व अविस्मरणीय दिवस असल्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत नमूद केले आहे.

            उपमुख्यमंत्री तथा तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2023 24 चा अर्थसंकल्पीय भाषणांमध्ये या योजनेचा शुभारंभ करण्याचे घोषणा केली होती. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर या योजनेला गती दिली. किरकोळ तांत्रिक कारणांमुळे राज्यातील 12 लाख शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेपासून वंचित होते. या शेतकऱ्यांसाठी त्यांनी राज्यभरात विशेष मोहिम घेतली आणि 6 लाख शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत वाढविले. या शेतकऱ्यांना आता नमो किसान सन्मान योजनेचा सुद्धा लाभ मिळणार आहे.

            नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळालेले सर्वाधिक शेतकरी अहमदनगर जिल्ह्यातील आहेत नगर जिल्ह्यातील 5 लाख 17 हजार 611 शेतकऱ्यांना 103 कोटी रुपये वितरित करण्यात आले त्या खालोखाल सोलापूर जिल्ह्यातील 4 लाख 54 हजार 40 शेतकऱ्यांना 90 कोटी 81 लाखकोल्हापूर जिल्ह्यातील 4 लाख 6 हजार 240 शेतकऱ्यांना 81 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.

            ‘नमो शेतकरी सन्मान योजने’तून खात्यावर पैसे जमा झाल्याचे संदेश अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर प्राप्त झाले. त्यानंतर शेतकऱ्यांना आनंद झाला. खात्यावर 2 हजार रुपये प्राप्त झाल्याचा संदेश शेतकऱ्यांना समाधान देऊन गेला. शेतकऱ्यांनी हे संदेश इतरांना दाखवून आनंद व्यक्त केला. दुष्काळसदृश्य परिस्थिती असताना शेतकऱ्यांना यामुळे आधार मिळत आहे.

या योजनेतून जिल्हा निहाय वितरित करण्यात आलेली रक्कम खालील प्रमाणे-

अहमदनगर- 5,17,611 शेतकऱ्यांना 103.52 कोटी

अकोला -1,87,816 शेतकऱ्यांना 37.56 कोटी

अमरावती 2,65,916 शेतकऱ्यांना 53.18 कोटी

संभाजीनगर (औरंगाबाद) 3,26,840 शेतकऱ्यांना 65.37 कोटी

बीड 3,89,527 शेतकऱ्यांना 77.91 कोटी

भंडारा 186031 शेतकऱ्यांना 37.21 कोटी

बुलढाणा 331894 शेतकऱ्यांना 66.38 कोटी

चंद्रपूर 216613 शेतकऱ्यांना 43.32 कोटी

धुळे 142441 शेतकऱ्यांना 28.40 कोटी

गडचिरोली 129639 शेतकऱ्यांना 25.93 कोटी

गोंदिया 212418 शेतकऱ्यांना 42.48 कोटी

हिंगोली 180576 शेतकऱ्यांना 36.12 कोटी

जळगाव 379549 शेतकऱ्यांना 75.91 कोटी

जालना 289771 शेतकऱ्यांना 57.95 कोटी

कोल्हापूर 406240 शेतकऱ्यांना 81.25 कोटी

लातूर 267300 शेतकऱ्यांना 53.46 कोटी

नागपूर 150414 शेतकऱ्यांना 30.08 कोटी

नांदेड 377415 शेतकऱ्यांना 75.48 कोटी

नंदुरबार 96585 शेतकऱ्यांना 29.32 कोटी

नाशिक 385347 शेतकऱ्यांना 77.07 कोटी

धाराशिव (उस्मानाबाद)- 211409 शेतकऱ्यांना 42.28 कोटी

पालघर 80336 शेतकऱ्यांना 16.07 कोटी

परभणी 267107 शेतकऱ्यांना 53.42 कोटी

पुणे 389842 शेतकऱ्यांना 77.97 कोटी

रायगड 98264 शेतकऱ्यांना 19.65 कोटी

रत्नागिरी 127600 शेतकऱ्यांना 25.52 कोटी

सांगली 367179 शेतकऱ्यांना 73.44 कोटी

सातारा 393334 शेतकऱ्यांना 78.67 कोटी

सिंधुदुर्ग 108103 शेतकऱ्यांना 21.62 कोटी

सोलापूर 454040 शेतकऱ्यांना 90.81 कोटी

ठाणे 68367 शेतकऱ्यांना 13.67 कोटी

वर्धा 123376 शेतकऱ्यांना 24.68 कोटी

वाशीम 154052 शेतकऱ्यांना 30.81कोटी

यवतमाळ 277130 शेतकऱ्यांना 55.43को

Featured post

Lakshvedhi