Wednesday, 27 September 2023

विधान परिषदेच्या मुंबई, कोकण विभाग पदवीधर तसेच नाशिक आणि मुंबई विभाग शिक्षक मतदारसंघांसाठी मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर

 विधान परिषदेच्या मुंबई, कोकण विभाग पदवीधर

तसेच नाशिक आणि मुंबई विभाग शिक्षक मतदारसंघांसाठी मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर

-  मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

 

            मुंबईदि. 26 : विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण विभागाच्या पदवीधर मतदारसंघासाठी तसेच नाशिक आणि मुंबई विभागाच्या शिक्षक मतदारसंघांसाठी मतदार नोंदणी ३० सप्टेंबरपासून सुरू होणार आहेअशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली. यासंदर्भात आज मंत्रालयात श्री. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व नोंदणीकृत मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत श्री. देशपांडे यांनी ही माहिती दिली. या मतदार नोंदणीसाठी १ नोव्हेंबर २०२३ ही अर्हता दिनांक असेल असे श्री. देशपांडे यांनी सांगितले. 

            या मतदारसंघांची मुदत पुढच्या वर्षी म्हणजेच जुलै २०२४ ला संपणार आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांसाठी दरवेळी मतदारांची नव्याने मतदार नोंदणी करावी लागते. त्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघांकरीता येत्या ३० सप्टेंबरपासून मतदार नोंदणीच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होईल. हा टप्पा ६ नोव्हेंबरला संपेल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर २०२३ या कालावधीतही मतदार नोंदणी केली जाणार आहे.

            पदवीधर मतदारसंघांसाठीत्या-त्या मतदारसंघातील सर्वसाधारण रहिवासी असलेले आणि १ नोव्हेंबर २०२३ च्या किमान ३ वर्षे आधी भारतातील मान्यतापात्र विद्यापीठाची पदवी किंवा समकक्ष पदवी प्राप्त पदवीधर व्यक्ती मतदार नोंदणीसाठी पात्र असतील. पदवीधर मतदार नोंदणीसाठी अर्ज क्र. १८ भरून त्यासोबत निवासाचा आणि पदवीचा पुरावा जोडावा लागेल. पदवीचा पुरावा म्हणून पदवी प्रमाणपत्र किंवा गुणपत्रिकाही ग्राह्य धरली जाईल, असेही  श्री. देशपांडे यांनी सांगितले. 

            शिक्षक मतदारसंघासाठी त्या-त्या मतदारसंघातील सर्वसाधारण निवासी असलेले आणि १ नोव्हेंबर २०२३ पूर्वी लगतच्या सहा वर्षामध्ये किमान तीन वर्षे माध्यमिक शाळेपेक्षा कमी दर्जा नसलेल्या शैक्षणिक संस्थेत शिक्षक म्हणून काम केलेले व्यक्ती मतदार नोंदणीसाठी पात्र असतील. शिक्षक मतदार नोंदणीसाठी अर्ज क्र. १९ भरूनत्यासोबत निवासाचा पुरावा आणि विहित नमुन्यातील शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाचे प्रमाणपत्र  द्यावे लागणार आहे.

            मतदारांच्या नावात बदल झाले असतीलतर अर्जासोबत राजपत्रविवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा संबंधित कायदेशीर पुरावादेखील जोडावा लागेल. मतदाराने अर्जात आधार क्रमांक नमूद करणे ऐच्छिक असेल आणि आधार क्रमांक दिला नाही म्हणून अर्ज नाकारला जाणार नाही. कोणत्याही परिस्थितीत मतदाराचा आधार तपशील सार्वजनिक केला जाणार नाहीअसेही  श्री. देशपांडे यांनी यावेळी स्पष्ट केले.

            राजकीय पक्ष देखील मतदार नोंदणीसाठीचे विहीत नमुन्यातील अर्ज स्वतः छापूनत्याचे वितरण करू शकतील. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यावतीने पदवीधर आणि शिक्षक मतदारांची अधिकाधिक नोंदणी व्हावीयासाठी जनजागृती केली जात आहे.  विद्यापीठेमहाविद्यालयेशाळाविविध संस्था संघटनाशासकीयनिमशासकीय कार्यालयबँका या ठिकाणी पोहोचून पदवीधरांना नाव नोंदणी करण्यासाठी अर्ज दिले जातीलअशी माहितीही त्यांनी दिली. राजकीय पक्षांनीही मतदार नोंदणी वाढविण्यासाठी त्यांच्यास्तरावर प्रयत्न करावेत असे आवाहनही श्री. देशपांडे यांनी केले.

            या मतदार नोंदणीसाठी येत्या शनिवार ३० सप्टेंबर २०२३ रोजी जाहीर सूचना प्रसिध्द केली जाईलवर्तमानपत्रातील नोटीसची प्रथम पुनर्प्रसिद्धी सोमवार १६ ऑक्टोबरलाद्वितीय पुनर्प्रसिद्धी बुधवारी २५ ऑक्टोबरला केली जाईल. अर्ज क्र. १८ आणि १९ द्वारे ६ नोव्हेंबर २०२३ पर्यंत दावे आणि हरकती स्वीकारल्या जातील. त्यानंतर सोमवार २० नोव्हेंबरला हस्तलिखिते तयार करून प्रारुप मतदार याद्यांची छपाई केली जाईल. या प्रारुप मतदार याद्या २३ नोव्हेंबरला प्रसिद्ध होतील. त्यावर २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर २०२३ पर्यंत दावे आणि हरकती स्वीकारले जातील. त्यानंतर २५ डिसेंबरपर्यंत दावे आणि हरकती निकाली काढून यादीची छपाई केली जाईल आणि ३० डिसेंबरला अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल, असे मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे यांनी सांगितले.

            यासोबतचविधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांच्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम - २०२४ अंतर्गत प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी दि. १७ ऑक्टोबर ऐवजी २७ ऑक्टोबर २०२३ रोजी होणार असल्याची माहिती  श्री. देशपांडे यांनी यावेळी दिली .

            राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकरउपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी यांच्यासह इतर अधिकारी आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Tuesday, 26 September 2023

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचानिधी वेळेत वितरीत करावा

 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचानिधी वेळेत वितरीत करावा


- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे


            मुंबई, दि. 26 : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा निधी लाभार्थींना निर्धारित वेळेत वितरीत करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.


                   मंत्रालय दालन येथे आढावा बैठकीत मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, सहसचिव श्री.अहिरे, उपसचिव वि.रा.ठाकूर, सहसचिव स्मिता निवतकर, महिला व बालविकास आयुक्तालयाचे उपायुक्त राहुल मोरे उपस्थित होते.


            मंत्री कु. तटकरे म्हणाल्या, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना ही शून्य ते १८ वयोगटातील अनाथ, निराधार, निराश्रीत, बेघर, संरक्षण व निवाऱ्याची गरज असलेल्या मुला-मुलींना संस्थाबाह्य कौटुंबिक वातावरणात संगोपन व्हावे त्यांना मुलभूत सुविधा मिळाव्यात व त्यांचा विकास व्हावा यासाठी राबविण्यात येते. प्रतिलाभार्थी व संस्थांना देण्यात येणारा निधी वेळेत वितरीत करावे तसेच आगामी कालावधीकरिता निधीची मागणी वेळेत सादर करावी, असे आदेश मंत्री कु. तटकरे यांनी दिले.


            मंत्री कु. तटकरे म्हणाल्या, ईरशाळवाडी या दरडग्रस्त आपत्तीतील बाधित अनाथ मुलांना आवश्यक ती सर्व मदत व सहाय्य विभागाकडून करावी. अंगणवाडी केंद्रात जाणारी बालके, शाळेत जाणारी बालके, शून्य ते १८ वयोगटातील मुलांची स्थिती तपासून विभागाच्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करावी. यामध्ये पात्र लाभार्थींना बालसंगोपन योजनेचा लाभदेखील वेळेत वितरीत करावा. दुर्घटनेतील बालकांना आवश्यकता पाहून वेळोवेळी समपुदेशन देखील करण्यात यावे. महिला व बाल विकास विभागातंर्गत विविध समित्यांची स्थापना करून याचा नियमित कामकाज आढावा घेण्याचे निर्देश मंत्री कु. तटकरे यांनी यावेळी दिले.

ब्राझीलच्या शिष्टमंडळाने घेतली कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची भेट

 ब्राझीलच्या शिष्टमंडळाने घेतली कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची भेट


महाराष्ट्र आणि ब्राझील दरम्यान सोयाबीन, कापूस, ऊस आदींच्या


संशोधन व व्यापारासंदर्भात झाली चर्चा


 


            मुंबई, दि. 26 :- ब्राझीलच्या राजकीय दूतावासामार्फत ब्राझील सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची आज मुंबई येथे भेट घेऊन कृषी, कृषी व्यापार व गुंतवणूक आदी विषयांवर चर्चा केली. यावेळी ब्राझीलच्या शिष्टमंडळाने मंत्री श्री. मुंडे यांना ब्राझील भेटीचे निमंत्रण दिले.


            कृषीमंत्री श्री. मुंडे यांनी ब्राझीलच्या शिष्टमंडळातील अधिकाऱ्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले.


            कमी पावसात जास्तीत जास्त उत्पादित होणारे सोयाबीन, वातावरण बदलावर व त्यानुसार शेतीमध्ये केलेले प्रयोग, त्याचे संशोधन, कमी पाण्यात ऊसाचे अधिकाधिक उत्पादन करणे तसेच बेदाण्याची ब्राझीलमध्ये मोठी मागणी असल्याने त्यावरील आयात कर कमी करणे, ब्राझील या देशासोबत तेथील यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या बाबी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने कृषी विद्यापीठाच्या संशोधकांना ब्राझीलला पाठवण्याबाबतही यावेळी चर्चा झाली. तसेच शिष्टमंडळाने मंत्री श्री. मुंडे यांना नोव्हेंबरमध्ये ब्राझील दौऱ्याचे निमंत्रण दिले. याशिवाय दिल्लीमध्येही होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले.


            या शिष्टमंडळात ब्राझील दूतावासाचे सचिव तथा व्यापार व गुंतवणूक विभागाचे प्रमुख वेगणर, भारतीय दुतावासातील राजदूत केनेथ नोब्रेगा, कौन्सिल जनरल जोआओ मेंदोना, कृषी विभागाचे अँजिलो किरोज आदी अधिकाऱ्यांचा समावेश होता.


            मंत्री श्री. मुंडे यांनी राज्यातील पारंपरिक शेती व त्यामध्ये होत असलेल्या नवनवीन प्रयोगांविषयी माहिती दिली तसेच राज्यातील कृषी क्षेत्रात असलेल्या गुंतवणुकीच्या संधींबाबतही माहिती दिली.


००००

गावाच्या स्वच्छतेसाठी नागरिकांचा सहभाग उत्साहवर्धक

 गावाच्या स्वच्छतेसाठी नागरिकांचा सहभाग उत्साहवर्धक


- पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील


स्वच्छता संवाद कार्यक्रमास सुमारे 2,53,162 नागरिकांचा सहभाग


 


            मुंबई, दि. 26 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्वच्छ भारत अभियान टप्पा-2 अंतर्गत महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण भारत देश स्वच्छ करावयाचा आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यात “स्वच्छता ही सेवा” या अभियानांतर्गत “कचरामुक्त भारत” हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामध्ये नागरिकांचा सहभाग उत्साहवर्धक असल्याचे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.


                स्वच्छ भारत दिवस 2023 च्या निमित्ताने दि.15 सप्टेंबर ते दि.2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत स्वच्छता ही सेवा (SHS) “कचरामुक्त भारत” उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय स्वच्छता संवाद कार्यक्रमाचे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रधान सचिव संजय खंदारे, अभियान संचालक शेखर रौंदळ, अवर सचिव चंद्रकांत मोरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संबंधित अधिकारी, नागरिक उपस्थित होते.


              मंत्री श्री. पाटील म्हणाले, स्वच्छ भारत अभियान टप्पा-2 अंतर्गत राज्यातील 24,340 गावे म्हणजेच 60% पेक्षाअधिक गावे हागणदारी मुक्त (ODF Plus ) जाहीर झाली आहेत. ही बाब महाराष्ट्र राज्यातील नागरीकांसाठी निश्चितच दिलासादायक आहे, या पंधरवड्यानिमित्त दैनंदिन स्वच्छता विषयावर उपक्रम राबविण्याबाबत जिल्ह्यांनी उत्तम नियोजन केले आहे. त्या अनुषंगाने राज्यात सद्यस्थितीत 10,188 उपक्रम राबविण्यात आले असून सुमारे 43,85,441 नागरिकांनी सहभाग नोंदवला आहे.


              दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे झालेल्या स्वच्छता संवाद कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, सरपंच यांनी त्याचा जिल्हा, तालुका, गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी केलेल्या उपाय योजनाबाबत आपले अनुभव सांगितले. त्यांनी केलेल्या उपाय योजना राज्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहेत. या कार्यक्रमात प्रशासनाबरोबर नागरिकांचा सहभाग मोलाचा ठरत आहे. ही बाब महाराष्ट्र शासनासाठी उत्साहवर्धक आहे. आपण सर्व जण एकत्र येवून राज्याला स्वच्छ राज्य म्हणून मार्च 2024 पर्यंत घोषित करण्याबाबत प्रयत्न करुया, असे आवाहन मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी केले.


               स्वच्छता संवाद या दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आयोजित कार्यक्रमाला राज्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, ग्रामस्थ सुमारे 2,53,162 यांनी सहभाग नोंदवला.


             यावेळी मंत्री श्री. पाटील यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, सरपंच, यांच्याशी थेट संवाद साधला.


0000

रायगड जिल्ह्यातील माणगाव विभागीय क्रीडा संकुलाला मंजुरी,

 रायगड जिल्ह्यातील माणगाव विभागीय क्रीडा संकुलाला मंजुरी,आंतरराष्ट्रीय क्रीडा निकषांनुसार आराखडा तयार करावा


- उपमुख्यमंत्री अजित पवार


 


            मुंबई, दि. 26 :- सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, रायगड जिल्ह्यातील खेळाडू, क्रीडा रसिकांसाठी माणगाव येथील विभागीय क्रीडा संकुल सोयीचे ठरणार आहे. रायगड परिसराचा वेगाने होत असलेला विकास आणि खेळाडूंची गरज लक्षात घेऊन माणगाव येथील विभागीय क्रीडा संकुल आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे. त्याच्या उभारणीचे काम दर्जेदार असावे आणि जलदगतीने पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.


            उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात रायगड जिल्ह्याच्या माणगाव येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या उभारणीसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, खासदार सुनील तटकरे, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव नितीन करीर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव (नवि-1) असीमकुमार गुप्ता, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव (नवि-2) के. गोविंदराज, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव आशिष शर्मा, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव नीरज धोटे, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर उपस्थित होते. तर रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, नगररचना संचालक अविनाश पाटील दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.


            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे जिल्ह्यांसाठी माणगाव हे मध्यवर्ती आहे. या चार जिल्ह्यातील युवा खेळाडूंना आणि क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी हे ठिकाण उपयुक्त ठरेल. या विभागीय क्रीडा संकुलासाठी 40 ते 50 एकर जागा आवश्यक असून ती जिल्हा प्रशासनाने तातडीने उपलब्ध करुन देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. क्रीडा संकुलापर्यंत जाणारा मार्गही प्रशस्त असला पाहिजे. त्यादृष्टीने नियोजन करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले.


            माणगाव विभागीय क्रीडा संकुलासाठी निश्चित करण्यात आलेली जागा ही महामार्गालगत असल्याने कोकणातील चारही जिल्ह्यातील तसेच राज्याच्या अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या खेळाडूंसाठी हे ठिकाण सोयीचे आहे. या क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी या विभागीय क्रीडा संकुलाचा आराखडा तयार करताना आंतरराष्ट्रीय क्रीडा निकषांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. या विभागीय क्रीडा संकुलाच्या कामाला गती देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या. नवी मुंबईतील स्पोर्टस् कॉम्प्लेक्सच्या उभारणीचे प्रलंबित कामही तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी महापालिका आयुक्तांना दिले.


००००


नि

लेश तायडे/विसंअ/


पाखरा येशील का परतून😭


 

कोकणी उद्योजक


 

Featured post

Lakshvedhi