Saturday, 16 September 2023

अंतरराष्ट्रीय पेटंट आणि भारताची भुमिका,जय हो


परत एकदा माकड आणि टोपीवाल्याची गोष्ट आठवली..

 परत एकदा माकड आणि टोपीवाल्याची गोष्ट आठवली..


मोगऱ्याचं फूल ओंजळीत घेतलं की त्याचा गंध मनाला, शरीराला प्रसन्न करून जातो.

 *माणसं मनातली......* 🌹

मोगऱ्याचं फूल ओंजळीत घेतलं की त्याचा गंध मनाला, शरीराला प्रसन्न करून जातो.

सहवासातील माणसाचं देखील असंच असतं.

काही माणसं काही क्षणातच मनाला खूप आवडतात, आपली होऊन जातात.

तर, काही कितीही सहवासात राहिली, तरी त्यांची आतून ओढ नसतेच...

चेहरा बघण्यापेक्षा नेहमीच समोरच्याच्या मनात उतरून बघावं. शोधूनही तिथं माणूसपण सापडत नसेल, तर त्याचं सुंदर दिसणंही मग किळसवाणं वाटतं...

शरीराची सुंदरता वया बरोबर संपते, तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहाते. शरीराला वय असतं, मनाला ते कधीच नसतं...

शेवटी काय, आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो, शरीर तर निमित्त मात्र असतं.

माणसाच्या स्वभावात गोडवा, शालीनता, प्रामाणिकपणा, आणि विनयशीलता असेल, तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवीहवीशी वाटते...

म्हणूनच बाहेर लक्ष दिव्याची सुंदर आरास असूनही, देवघरातील समईच्या तेजापुढं आपण नतमस्तक होतो...

आयुष्यात अशी माणसं कधी भेटली तर त्यांच्यावर जीवापाड प्रेम करावं!!

आपल्या आवडत्या माणसाचं आपल्या सोबत असणं, ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई...

ती प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असं नाही.

आजकाल अशी माणसं भेटतात तरी कुठे?

नशिबानं कधी भेटलीच तर हळुवार जतन करून ठेवावीत...

  कदाचित, पुन्हा भेटतील ,न भेटतील?

मुंबईकरांचे जीवन सुसह्य होण्यात अभियंत्यांचे योगदान महत्त्वपूर्ण

 मुंबईकरांचे जीवन सुसह्य होण्यात अभियंत्यांचे योगदान महत्त्वपूर्ण


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            मुंबई, दि. १५ : मुंबईकरांचे जीवन सुसह्य झाले पाहिजे. मुंबईकरांना सोयी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. यासाठी मुंबईत गेल्या वर्षभरात एक लाख कोटींहून अधिक रकमेचे पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू करण्यात आले असून मुंबईकरांचे जीवन सुसह्य होण्यात अभियंत्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अभियंत्यांचा गौरव केला.


            भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे रवींद्र नाट्य मंदिर येथे राष्ट्रीय अभियंता दिन सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. खासदार राहुल शेवाळे, वंदे भारत ट्रेनचे जनक सुधांशू मणी, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तसेच प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू, उपायुक्त उल्हास महाले आदी यावेळी उपस्थित होते.


            मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. येथील रहिवाशांना अपेक्षित अशा सोयी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणात विकास प्रकल्प हाती घेतले आहेत. मुंबईला अधिक वेगवान करणारा सागरी किनारा मार्ग, एमटीएचएल प्रकल्प, मुंबई मेट्रोचे जाळे, समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे मार्ग हे अभियंत्यांच्या मेहनतीचा परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या दोन वर्षात दोन टप्प्यात मुंबईतील सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार असून खड्डेमुक्त रस्त्यांचे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले.


            अभियंत्यांनी कामाचा दर्जा राखावा, मुंबईकरांना दर्जेदार सुविधा द्याव्यात, शासन देखील पूर्ण पाठिंबा देईल, असे सांगून मागील वर्षी दिलेल्या वचनाची पूर्तता करून अभियंत्यांच्या वेतनश्रेणीचा प्रश्न सोडविण्यात आला असून त्यांना थकबाकी सुद्धा देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


            आपल्या अभियांत्रिकी क्षमतेच्या जोरावर भारताने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले आहे. तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रोत्साहनातून संपूर्ण भारतीय बनावटीची वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे. याचा गौरवपूर्ण उल्लेख करून या घटना भारताच्या अभियांत्रिकी क्षमतेचे प्रतीक असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


            मुंबईला सुदृढ, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त करायचे असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्याची सूचना केली. मुंबईसह महाराष्ट्र ड्रग मुक्त करण्याचे शासनाचे धोरण असल्याचे सांगून त्याबाबत कार्यवाही सुरू केली असल्याचे त्यांनी सांगितले. दक्षिण मुंबईमध्ये आयकॉनिक अशा इमारती उभ्या कराव्यात, यासाठी विकासकांना प्रोत्साहन देण्याची सूचना त्यांनी केली. रहिवाशांना अपेक्षित असलेली मुंबई घडवण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जी-20 परिषदेत जग जिंकले. महाराष्ट्रातील व्यवस्था सुद्धा उत्तम होती. याचे शेर्पा अमिताभ कांत यांनी 'मुंबई आपने चमका दी' या शब्दात कौतुक केले. तसेच जपानचे राजदूत सुझुकी हिरोशी यांनी यांनी समुद्री सेतू प्रकल्प पाहून ही एक यशकथा, अभियांत्रिकी आविष्कार असल्याचे म्हटले, ही आपल्या कामाला मिळालेली उत्स्फूर्त दाद आहे, याचा मुख्यमंत्र्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला.


            खासदार राहुल शेवाळे म्हणाले, मागील वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभियंत्यांच्या वेतनश्रेणीचा प्रश्न सोडविण्याचे वचन दिले होते, ते आज पूर्ण केले आहे.


            महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी नागरी सुविधा पुरविणारी महानगरपालिका आता पायाभूत सुविधा विकसित करणारी यंत्रणा झाली असल्याचे सांगितले. मागील वर्षभरात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या पाठिंब्यामुळे झपाट्याने विकासकामे होत असल्याचे सांगून सध्या मुंबईत एक लाख कोटींहून अधिकच्या सुरू असलेल्या कामांची माहिती त्यांनी दिली.


            यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘मी अभियंता’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.


0000

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव;

 








मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव;


विद्यार्थ्यांच्या प्रभातफेरीने शहरात उत्साहाचे वातावरण



औरंगाबाद, दि. 15 (विमाका) : ‘मराठवाडा मुक्ती दिनाचा विजय असो’…! ‘मराठवाडयाचा जयजयकार’…! ‘मराठवाड्याचा विजय असो’…! ‘भारत माता की जय’…! अशा विविध घोषणांनी आज सकाळी शहर दुमदुमले. निमित्त होते, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी काढलेल्या प्रभात फेरीचे. क्रांती चौक येथून प्रारंभ झालेल्या या प्रभात फेरीत विद्यार्थ्यांचा उत्साह आनंददायी होता.


आमदार संजय सिरसाट, विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड, महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या हस्ते प्रभातफेरीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. सुमारे 40 शाळांचे 3 ते साडेतीन हजार विद्यार्थी प्रभात फेरीत सहभागी झाले होते. या फेरीदरम्यान विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी मल्लखांब, कुस्ती, योगासने, बॉक्सिंग, लेझीमची प्रात्यिक्षिके सादर केली. शहराच्या विविध भागातून फिरुन या प्रभात फेरीचा समारोप खडकेश्वर येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झाला.


विविध सांस्कृतिक कार्यक्रम व महिला बचत गटांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन


मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात विद्यार्थी, शिक्षक, नागरिक यांच्या उपस्थितीत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महानगरपालिकेच्यावतीने आयोजित तीन दिवसीय कार्यक्रम आणि महिला बचतगटांच्या प्रदर्शन व विक्रीचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन पार पडले.


या कार्यक्रमास प्रमुख अतिथी व उद्घाटक म्हणून केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, उपायुक्त रणजित पाटील, अपर्णा थेटे आदींसह क्रीडा व शिक्षण विभागाचे अधिकारी, प्रभात फेरीतील सर्व सहभागी विद्यार्थी, शिक्षक, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ठिकाणी देखील विद्यार्थ्यांनी मल्लखांब, कुस्ती, योगासने, बॉक्सिंग, लाठी प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी गायक अभिजित शिंदे व सरला शिंदे यांनी देशभक्तीपर गीते सादर करुन विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित केला. उपस्थित सर्वच विद्यार्थ्यांनी त्यांच्या गाण्यांवर नृत्यही केले.


केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. कराड यांनी उपस्थितांना मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा देताना मराठवाड्याला निजाम राजवटीपासून कशाप्रकारे स्वातंत्र्य मिळाले, अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणाची बाजी लावून हा स्वातंत्र्याचा लढा कसा लढला याची माहिती आपल्या मनोगतात दिली. भविष्यात आपल्या भारत देशाला महासत्ता बनविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


प्रास्ताविकात जी. श्रीकांत यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त महानगरपालिकेच्यावतीने शहरात तीन दिवसांत आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच मराठवाडा स्वातंत्र्यलढ्याबाबत माहिती देऊन विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यसैनिकांचा आदर्श अंगीकारण्यास सांगितले.


तत्पूर्वी यश शिंपले, रवींद्र बोरा, सारा भावले, वैष्णवी मस्के, आर्या नाईक या विद्यार्थ्यांनी मराठवाड्याचा स्वातंत्र्यलढा या विषयावर मनोगत व्यक्त केले.


यावेळी माजी सैनिकांचा सहभाग असणाऱ्या नागरिक मित्र पथकातील सदस्यांचा आणि सफाई कर्मचाऱ्यांचा मान्यवर आणि विद्यार्थ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  


00000


 


 



 


वृत्त क्र. 3111


मराठवाडा मुक्तीसंग्रामात स्वातंत्र्य सेनानींनी दिलेल्या प्रेरणादायी व स्फूर्तीदायी


लढ्यापासून बोध घेत कार्य करण्याची गरज


अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विशेष व्याख्यानमालेतील सूर


 


औरंगाबाद, दि. १५ (विमाका) : मराठवाडा मुक्तीसंग्रामात निजामाच्या जुलमी राजवटीविरुद्ध स्वातंत्र्य सेनानींनी दिलेला लढा आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी व स्फूर्तीदायी असून यापासून सर्वांनी बोध घेत कार्य करण्याची गरज असल्याचा सूर मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्ष सांगता समारंभाच्या निमित्त आयोजित विशेष व्याख्यानमालेत उमटला.


औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने 'मराठवाडा मुक्तीसंग्रामा’च्या अमृत महोत्सवी वर्ष सांगता समारंभाच्या निमित्ताने वंदे मातरम् सभागृह येथे ‘मुक्तीसंग्रामात धगधगता मराठवाडा' आणि 'लढ्यातील महिला क्रांतिकारक' या विषयावर विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत, उपायुक्त अपर्णा थेटे, नंदा गायकवाड, राहुल सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी भारत तीनगोटे, व्याख्याते सारंग टाकळकर, डॉ. रश्मी बोरीकर, उपस्थित होते.


मराठवाडा मुक्तीसंग्राम मराठवाड्याच्या इतिहासातील सोनेरी पान - सारंग टाकळकर


'मुक्तीसंग्रामात धगधगता मराठवाडा' या विषयावर व्याख्यान देताना श्री टाकळकर म्हणाले की, मराठवाडा मुक्तीसंग्रामात निजामाविरुद्धच्या लढाईत सर्व जाती, धर्माच्या लोकांनी सहभाग घेतला होता. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, गोविंद पानसरे, दगडाबाई शेळके, माणिकचंद पहाडे, नारायण पवार अशा विविध स्वातंत्र्य सेनानींचे मुक्ती संग्रामात मोठे योगदान होते. भारतीय सैनिकांनी निझामाविरुद्ध 'ऑपरेशन पोलो' ही मोहीम राबवून निजामाच्या अधिपत्याखालील सर्व भाग काबीज करत हैद्राबाद संस्थान निजाम मुक्त केले. त्यामुळे मराठवाडा मुक्ती संग्राम हा मराठवाड्याच्या इतिहासातील सोनेरी पान असून हा लढा पुढील पिढीपर्यंत पोहचविण्याची गरज असल्याचेही श्री. टाकळकर यांनी सांगितले.


             स्वातंत्र्याच्या ध्येयाने प्रेरीत होऊन अत्यंत तळमळीने मराठवाडा मुक्ती संग्रामाचा विलक्षण असा लढा लढला गेला. यामध्ये सुमारे ६० हजारांपेक्षा अधिक सत्याग्रहींनी सहभाग घेतला, २५ सत्याग्रहींनी तुरुंगवास भोगला, तर 102 वीरांनी या लढ्यात हौतात्म्य पत्करले असल्याचेही श्री. टाकळकर यांनी सांगितले.


मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी रणरागिणींची साथ - डॉ. रश्मी बोरीकर


'लढ्यातील महिला क्रांतिकारक' या विषयावर व्याख्यान देतांना डॉ. बोरीकर म्हणाल्या, मराठवाडा मुक्तीसंग्रामात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अनेक महिला स्वातंत्र्यसैनिक मुक्ती लढ्यात सहभागी झाल्या होत्या. स्वतःच्या जीवाची, पर्वा न करता या महिला स्वातंत्र्यसैनिकांनी भूमिगत स्वातंत्र्यसैनिकांपर्यंत शस्त्रास्त्रे पुरविण्याचे काम केले. मराठवाड्याच्या मुक्तीसाठी रणरागिणींनी खंबीरपणे साथ दिली. मुक्तीसंग्रामानंतर महिलांनी समाजकारण आणि राजकारणात सहभागी होऊन कार्य केले असल्याचेही त्या म्हणाल्या.


            यावेळी 'हैद्राबाद मुक्तीसंग्रामातील बालवीर' या ना

टकांचे सादरीकरण करण्यात आले.


0000


सैन्यदलातील परीक्षा पूर्व प्रशिक्षणाच्यानिवड चाचणीसाठी २५ सप्टेंबरला मुलाखत


सैन्यदलातील परीक्षा पूर्व प्रशिक्षणाच्यानिवड चाचणीसाठी २५ सप्टेंबरला मुलाखत


            मुंबई, दि.१५ : भूदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी सेवा निवड मंडळाची (SSB) परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांसाठी या परीक्षेचे पूर्व प्रशिक्षण नाशिक येथे मोफत देण्यात येणार आहे. यासाठी मुंबईतील उमेदवारांनी २५ सप्टेंबर २०२३ रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात मुलाखतीसाठी उपस्थित रहावे असे आवाहन मुंबईचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.


            सैन्यदलातील अधिकारी पदासाठीच्या परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी उमेदवारांना प्रशिक्षण, निवास व भोजन नि:शुल्क देण्यात येते. नाशिक रोड येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र येथे ३ ते १२ ऑक्टोबर या कालावधीत हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी मुंबईतील उमेदवारांची निवड चाचणी मुलाखतीद्वारे होणार आहे.


            मुंबईतील उमेदवारांनी मुलाखतीस उपस्थित राहताना सैनिक कल्याण विभागाच्या संकेतस्थळावरील एसएसबी - ५४ कोर्स संदर्भातील अर्ज सादर करावे, किंवा व्हॉट्स ॲप 9156073306 या क्रमांकावर एसएसबी-54 हा मेसेज केल्यास कोर्ससाठी संबंधित परिशिष्ट उपलब्ध करून दिले जाणार आहे. शिफारस पत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट सादर करावी.


            केंद्रामध्ये एस. एस. बी. कोर्समध्ये प्रवेश मिळण्यासाठी पुढे नमूद केलेली कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येताना सोबत घेवून येणे आवश्यक असणार आहे.


अ) उमेदवार हा कम्बाईड डिफेन्स सव्हिसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेन्स अॅकेडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) उत्तीर्ण असावा. त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेला असावा.


ब) एनसीसी 'सी' सर्टिफिकेट 'ए' किंवा 'बी' ग्रेड मध्ये उत्तीर्ण झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी.


क) टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे.


ड) विद्यापीठ प्रवेश योजनेसाठी (University Entry Scheme) एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबी साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.


                        अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड यांचा ई-मेल आय डी : training.petenashik@gmail.com अथवा दूरध्वनी क्र. 0253-2451032 अथवा भ्रमणध्वनी क्र. 9156073306 यावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मुंबई शहर यांनी केले आहे.


00000000

शिवकालीन किल्ले राज्य व संस्कृतीचे रक्षक

 शिवकालीन किल्ले राज्य व संस्कृतीचे रक्षक  


- राज्यपाल रमेश बैस


            मुंबई, दि. 15 : राज्यातील प्रत्येक गडकिल्ल्याची स्वतःची गाथा आहे. रायगड, शिवनेरी, सिंहगड, प्रतापगड हे शिवकालीन किल्ले केवळ महाराष्ट्राचाच नाही, तर संपूर्ण देशाचा जिवंत सांस्कृतिक वारसा आहेत. राज्यातील किल्ले हे राज्याचे तसेच संस्कृतीचे रक्षक असून विशेषज्ञांच्या मदतीने त्यांचे रक्षण व जीर्णोद्धार केला पाहिजे. तसेच तेथे शैक्षणिक पर्यटन वाढवले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.   


            स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे देण्यात येणारे तिसरे 'शिखर सावरकर' पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 15) राजभवन येथे देण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. 


            ज्येष्ठ गिर्यारोहक व हिमालयाचे अभ्यासक हरीश कपाडिया यांना राज्यपालांच्या हस्ते 'शिखर सावरकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर मोहन हुले यांना 'शिखर सावरकर युवा साहस पुरस्कार' प्रदान करण्यात आला. यावर्षीचा 'शिखर सावरकर दुर्ग संवर्धन पुरस्कार' ऐतिहासिक किल्ल्यांच्या परिरक्षणासाठी कार्य करणाऱ्या 'दुर्गवीर प्रतिष्ठान' या संस्थेला देण्यात आला. दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने अजित राणे, नितीन पाटोळे व संतोष हसूरकर यांनी पुरस्कार स्वीकारला.


            पावसाळ्याच्या दिवसांत किल्ल्यांवर होणाऱ्या पार्ट्यांबाबत वाचतो, त्यावेळी मनाला वेदना होतात असे सांगून स्थानिक लोकांच्या मदतीने किल्ल्यांच्या वारश्याचे जतन केल्यास आणि जबाबदार पर्यटनाला चालना दिल्यास त्यातून किल्ल्यांचे रक्षण होईल आणि रोजगार निर्मिती देखील होईल, असे राज्यपालांनी सांगितले.


            स्वातंत्र्यवीर सावरकर जातीभेदाचे कडवे विरोधक होते. त्यामुळे जातीभेद समाप्त करणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल, असे राज्यपालांनी सांगितले. हिमालयन जर्नलचे संपादक व ज्येष्ठ गिर्यारोहक हरीश कपाडिया यांनी हिमालय पर्वत शृंखलेच्या केलेल्या अध्ययनाचा गौरव करून राज्यपालांनी त्यांचे 'शिखर सावरकर जीवन गौरव' पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले. 


            स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 50 व्या पुण्यतिथीच्या वर्षी काही गिर्यारोहकांनी हिमाचल प्रदेश येथे आजवर सर केले नाही, असे शिखर सर केले होते. त्या शिखराला 2018 मध्ये 'शिखर सावरकर' हे नाव दिले गेले, अशी माहिती स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी यावेळी दिली. सावरकर हे साहसाचे पुरस्कर्ते होते. गिर्यारोहण हे साहसी तसेच संघटनात्मक कार्य असल्यामुळे सावरकर स्मारकातर्फे गिर्यारोहकांना 2020 पासून 'शिखर सावरकर' पुरस्कार दिले जातात, अशी माहिती त्यांनी दिली.


            गिर्यारोहक हरीश कपाडिया यांनी त्यांना मिळालेला पुरस्कार त्यांचे सुपुत्र हुतात्मा लेफ्टनंट नवांग कपाडिया यांना समर्पित करीत असल्याचे यावेळी सांगितले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक संस्थेतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेश वराडकर व स्वप्नील सावरकर उपस्थित होते. 


००००

Featured post

Lakshvedhi