Friday, 15 September 2023

राज्यातील सर्व आयटीआयमध्ये 'पीएम स्कील रन'चे आयोजन

 राज्यातील सर्व आयटीआयमध्ये 'पीएम स्कील रन'चे आयोजन

मंत्री मंगलप्रभात लोढा

 

            मुंबईदि. 14 : राज्यातील युवक -युवतींमध्ये कौशल्य विकासाबाबत जनजागृती व्हावी यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर रोजी सकाळी ७ ते ८ या वेळेत राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थाद्वारे (आयटीआय) 'पीएम स्कील रनहा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात सर्वांना सहभागी व्हावेअसे आवाहन कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नावीन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.

         मंत्री श्री.लोढा म्हणाले की१७ सप्टेंबर रोजी सकाळी ७ ते ८ या वेळेत हा उपक्रम राबविण्यात येईल. प्रथमव्दितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विजेत्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जवळच्या आयटीआयमध्ये संपर्क साधता येईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य विकास विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. कौशल्य विकास विभाग कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी सर्व शासकीय व खासगी आयटीआयचे बळकटीकरण करून विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण देण्यासाठी जागतिक दर्जाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर आहे.

              आयटीआयच्या सर्व उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंहमहाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे आयुक्त डॉ.रामास्वामी एनव्यवसाय  शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी यांनी केले आहे.

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या खात्यामध्येकर्ज योजनेंतर्गत ४ कोटी रक्कम जमा

 अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या खात्यामध्येकर्ज योजनेंतर्गत ४ कोटी रक्कम जमा


- मंत्री अब्दुल सत्तार


            मुंबई, ‍‍दि. १४ : केंद्र शासनाकडून मुदत कर्ज योजनेअंतर्गत १६ कोटी रुपये निधी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळास उपलब्ध झाला आहे. महामंडळास उपलब्ध झालेल्या १६ कोटी निधीपैकी आज ४.०२ कोटी रुपये ऑनलाईन पद्धतीने अर्जदार व विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले असल्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.


            मंत्री श्री. सत्तार म्हणाले की, आज वितरीत करण्यात आलेल्या ४.०२ कोटी रकमेमधील मुदत कर्ज योजनेंतर्गत व्यवसायासाठी ८१ लाभार्थ्यांना २.३५ कोटी रुपये इतकी रक्कम वितरीत करण्यात आली आहे व शैक्षणिक कर्ज योजनेतंर्गत १६७ विद्यार्थ्यांना १.६७ कोटी रुपये रक्कम वितरीत करण्यात आली आहे. केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेंतर्गत प्राप्त झालेला १६ कोटी निधी जलद गतीने अल्पसंख्याक समाजातील अर्जदार व विद्यार्थी यांना वितरीत करण्याबाबतच्या सूचना महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक यांना मंत्री श्री. सत्तार यांनी यावेळी दिल्या.


         मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ हे राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास एवम वित्त निगम, नवी दिल्ली (एनएमडीएफसी) यांची राज्य वाहिनीकृत यंत्रणा म्हणून महाराष्ट्रात कार्यरत आहे. एनएमडीएफसी मार्फत कर्ज स्वरुपात प्राप्त होणाऱ्या निधीतून मुदत कर्ज योजना, सूक्ष्म पतपुरवठा योजना, डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजना या योजनांची अंमलबजावणी महामंडळामार्फत राज्यामध्ये करण्यात येते.

मृद व जलसंधारण विभागांतील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अभियंत्यांचा गौरव करणार

 मृद व जलसंधारण विभागांतील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या

अभियंत्यांचा गौरव करणार

- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

 

            मुंबई दि. 14 : सार्वजनिक बांधकाम व जलसंपदा विभागांमार्फत अभियंत्यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल दरवर्षी पुरस्कार देण्याची परंपरा आहे. त्याच धर्तीवर आता मृद व जलसंधारण विभागांतील उल्लेखनीय कार्य केलेल्या अभियंत्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली.

            भारतरत्नसर विश्वेश्वरय्या यांचा 15 सप्टेंबर हा जन्मदिवस दरवर्षी अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने मृद व जलसंधारण विभागांतर्गत कार्यरत व उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अभियंत्यांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्याचा शासनाने निर्णय घेतला असून याबाबतचे धोरण लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही मंत्री श्री. राठोड यांनी सांगितले.

            मंत्री श्री. राठोड म्हणाले कीमृद व जलसंधारण विभागांतर्गत साखळी सिमेंट नाला बांधनाला खोलीकरण व रूंदीकरण करणेजुन्या जलसंरक्षणांचे पुनर्जीवन करणेअस्तित्वातील लघु पाटबंधारे संरचनांची (केटी वेअर/साठवण बंधारा) यांची दुरूस्ती करणेपाझर तलावलघु सिंचन तलाव दुरूस्ती व नुतनीकरण व क्षमता पुनर्स्थापित करणेपाणलोट विकासाची कामे करण्यात येतात. सदर कामांची/संरचनांची संकल्पना तयार करून व इतर उपकरणांचा/संगणकांचा वापर करून संकल्पचित्रे व कामांचे सविस्तर आराखडे बनविताना अभियंत्यांचे कौशल्य पणाला लागते व त्यामुळे अशा अभियत्यांची सेवा समाजपयोगी ठरते. सबब अशा तांत्रिक संवर्गातील अभियंत्यांचे प्रशासकीय व तांत्रिक कौशल्य विचारात घेऊन त्यांचा वैयक्तिक पुरस्कार देऊन गौरव करणे न्यायोचीत ठरते

            मृद व जलसंधारण विभागांतर्गत कार्यरत व उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अभियंत्यांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्याचा शासनाने निर्णय घेतला असून याबाबतचे धोरण लवकरच जाहीर करण्यात येईल असेही मंत्री श्री. राठोड यांनी सांगितले.

000000

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फेशुक्रवारी अभियंता, कर्मचाऱ्यांचा गौरव

 सार्वजनिक बांधकाम विभागातर्फेशुक्रवारी अभियंता, कर्मचाऱ्यांचा गौरव


 


            मुंबई, दि. १४ : अभियंता दिनानिमित्त राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे विभागातील अभियंता आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव सोहळा शुक्रवार १५ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता षण्मुखानंद सभागृह (माटुंगा, मुंबई) येथे आयोजित करण्यात आला आहे.


            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अभियंता व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येईल. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (सार्वजनिक उपक्रम वगळून) उपस्थित राहतील. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा पाटणकर- म्हैसकर यांची प्रमुख उपस्थिती राहील.


            सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) सदाशिव साळुंखे, सचिव (इमारती) संजय दशपुते, मुं. म. प्र. वि. प्रा. चे सचिव सुनील वांढेकर, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे सचिव खंडेराव पाटील, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, सुधाकर मुरादे यांची विशेष उपस्थिती राहील, असे सार्वजनिक बांधकाम, मुंबई मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रमोद बनगोसावी, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता रणजित हांडे यांनी कळविले आहे.


०००००

नवीन आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालयांना मंजुरीसह श्रेणीवर्धन व पदभरतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी

 नवीन आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालयांना मंजुरीसह

 श्रेणीवर्धन व पदभरतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी

- उपमुख्यमंत्री अजित पवार

 

मुंबईदि. १४ :- राज्यातील वरुडमोर्शीअर्जुनी मोरगावसडक अर्जुनीतुमसरपुसदचंदगडगडहिंग्लजआजरावसमतगंगापूरखुलताबादऔंढा नागनाथअकोलेसंगमनेरसुरगाणाशिरूरआंबेगावमंचरबारामतीखेडमोहोळअहमदनगर आदी तालुक्यातील नवीन प्राथमिक तसेच उप आरोग्य केंद्रेउप जिल्हा रुग्णालयांना मंजुरी देण्याबरोबरचरुग्णालयांचे श्रेणीवर्धनपदभरतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात यावी. रुग्णालयांना वैद्यकीय चाचणी आणि अद्ययावत उपचार यंत्रणा उपलब्ध करावी. औषधांचा पुरवठा नियमित सुरु राहीलयाची दक्षता घ्यावी. रुग्णांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावीअसे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आरोग्य यंत्रणा प्राधान्याने सक्षम करण्यात येत आहे. कोविड संकट काळात आरोग्य यंत्रणेचे महत्व आपल्याला समजले आहे. त्यामुळे आरोग्य सुविधांच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत उपस्थित लोकप्रतिनिधींना दिला.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत विविध कामांना वित्त विभागाची मान्यता व निधी उपलब्ध करण्याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार सर्वश्री यशवंत माने, मनोहर चंद्रिकापुरे, राजू कारेमोरे हे प्रत्यक्ष, तर सतीश चव्हाण, देवेंद्र भुयार, दिलीप मोहिते, डॉ. किरण लहामटे, नितीन पवार, राजेश पाटील, चंद्रकांत नवघरे हे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते. यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, आरोग्य सेवा आयुक्त धीरजकुमार, तसेच संबंधित जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून नवीन उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये सुरू करण्याची मागणी येत आहे. अस्तित्वात असलेल्या शासकीय रुग्णालयांमध्ये खाटांची संख्या वाढवून त्यांचे श्रेणीवर्धन करण्याची मागणीही होत आहे. या पार्श्वभूमीवर नवीन उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्ररुग्णालय यांना मान्यता देणे, खाटांची संख्या वाढवून श्रेणीवर्धन करणे याबाबत सर्वंकष निकष ठरवण्यात यावेत. निकष ठरवताना २०२१ ची वाढीव लोकसंख्या आणि आरोग्य केंद्रांमधील अंतर लक्षात घेऊन आरोग्य विभागाचा बृहत आराखडा मंत्रिमंडळासमोर आणावा. या सुविधा देतांना आदिवासी भाग, आकांक्षित तालुक्यांचा प्राधान्याने विचार करावा. त्यांच्यासाठी वेगळे निकष ठरवावेत, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

रुग्णालयांच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण होण्यापूर्वी पदनिर्मितीची प्रक्रिया सुरू करण्यात यावी. ज्याठिकाणी रुग्णालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे, अशा ठिकाणी फर्निचर देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी देण्यात येईल. त्यानुसार सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील. आरोग्य सेवा अत्यावश्यक सेवा असल्याने या विभागातील डॉक्टर, नर्सेस, अधिकारी, कर्मचारी  सेवानिवृत्त होण्यापूर्वी, त्यांच्या पदांसाठी किमान ३ महिने आधी भरती प्रक्रिया सुरू करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. लोकप्रतिनिधींची मागणी विचारात घेऊन आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रांची बांधकामे सध्याच्या निकषांच्या आधारे तातडीने पूर्ण करावीत. यासाठी १५व्या वित्त आयोगातील निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले.

शिरूर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय पाबळ, मलठण, आंबेगाव तालुक्यातील तळेघर ग्रामीण रुग्णालयास मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल. राजणी (ता. आंबेगाव), करंदी (ता. शिरूर) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केले जाईल. पिंपरखेडा, कारेगाव व पिंपळे खालसा (ता. शिरूर) येथे नवीन उपकेद्र मंजूर करण्यात येईल. मंचर उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली. खेड येथे ट्रामा केअर युनिट निर्माण करणे, चाकण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करणे व डायलिसीस सेंटर सुरू करण्यासही मंजुरी देण्यात आली. निरावागज (ता. बारामती)  व जेरवाडी (ता. खेड) येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्याबाबत बैठकीत निर्देश देण्यात आले.

मोहोळ (जि. सोलापूर) येथे उपजिल्हा रूग्णालय मंजूर करणे, अकोले तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र मंजुरी, बोटा (ता. संगमनेर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे व अकोले ग्रामीण रूग्णालयाचे श्रेणीवर्धन करणे, सुरगाणा (जि. नाशिक) व पारनेर (जि. अहमदनगर) येथील ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन, ढवळपुरी (ता. पारनेर) येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणे, गंगापूर (जि. औरंगाबाद) येथील ट्रॉमा केअर युनिटचे अपूर्ण बांधकाम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले.

खुलताबाद (जि. औरंगाबाद), चंदगड (जि. कोल्हापूर), उपजिल्हा रुग्णालय मोर्शी व वरूड (जि. अमरावती) येथे नवीन ट्रॉमा केअर युनिट सुरू करणे, वसमत (जि. हिंगोली) येथील स्त्री रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करणे, साळना (ता. औंढा नागनाथ) येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण करणे, बाभूळगाव (ता. वसमत) येथील आरोग्य केंद्राच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देणे, वरूड (जि. अमरावती) येथे १०० खाटांचे महिला व शिशु रुग्णालयास मान्यता देणे, टेंभूरखेडा (ता. वरूड), पिंपळखुटा व रिद्धपूर (ता. मोशी) येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करणे, खेड व लोणी (जि. अमरावती) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करणे, मोरगाव अर्जुनी व सडक अर्जुनी (जि. गोंदिया) ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करणे, तुमसर (जि. भंडारा) येथील उपजिल्हा रुग्णालयाचे व मोहाडी ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करणे, पुसद (जि. यवतमाळ) येथे नवीन स्त्री रुग्णालय मंजूर करणेबाबत कार्यवाही करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या आहेत.

0000

निलेश तायडे/विसंअ/

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ‘गट - क’ संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीचा निकाल जाहीर

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ‘गट - क’

संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीचा निकाल जाहीर

 

मुंबई, दि. १४ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट- क सेवा (मुख्य) परीक्षा - २०२२ लिपिक - टंकलेखक (मराठी /इंग्रजी) व कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. तो आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट-क सेवा (मुख्य) परीक्षा - २०२२, मधील लिपिक टंकलेखक (मराठी / इंग्रजी) व कर सहायक या संवर्गातून टंकलेखन कौशल्य चाचणीकरिता पात्र ठरलेल्या विज्ञापित पदसंख्येच्या तीन पट उमेदवारांची यादी अनुक्रमे दिनांक ०३ मे २०२३ व दिनांक १८ मे, २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. या उमेदवारांची टंकलेखन कौशल्य चाचणी आयोगामार्फत दिनांक २४ व २५ जुलै, २०२३ रोजी घेण्यात आली होती. या टंकलेखन कौशल्य चाचणीचा संवर्गनिहाय निकाल आज १४ सप्टेंबर, २०२३ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

00000

राजू धोत्रे/विसंअ/

 


जी 20 अंतर्गत आर्थिक समावेशनासाठीजागतिक भागीदारीची चौथी बैठक मुंबईत सुरु

 जी 20 अंतर्गत आर्थिक समावेशनासाठीजागतिक भागीदारीची चौथी बैठक मुंबईत सुरु


एमएसएमईना सक्षम करण्यासाठी डिजिटल सार्वजनिक


पायाभूत सुविधा या विषयावर परिसंवाद


 


            मुंबई, दि. 14 : मुंबईत आजपासून 16 सप्टेंबर 2023 पर्यंत जी 20 अंतर्गत आर्थिक समावेशनासाठी जागतिक भागीदारीची (जीपीएफआय) चौथी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत, जीपीएफआयद्वारे राबवण्यात येत असलेल्या तीन वर्षांच्या आणि आता अंतिम वर्षात असलेल्या आर्थिक समावेशन कृती योजना 2020 च्या उर्वरित कामावर चर्चा समाविष्ट असेल. डिजिटल आर्थिक समावेशन तसेच लघु आणि मध्यम उद्योगांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा होईल.


            या बैठकीपूर्वी 14 सप्टेंबर 2023 रोजी एमएसएमईना सक्षम करण्यासाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा यासंदर्भात एक परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि आर्थिक समावेशन ही बैठकीशी संबंधित कार्यक्रमांपैकी एक मालिका असून जीपीएफआय कार्यगटाअंतर्गत भारताच्या जी 20 अध्यक्षतेने आयोजित केली आहे. वित्त मंत्रालयाचे (आर्थिक व्यवहार), सचिव अजय सेठ, रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर टी. रबी शंकर, (आंतरराष्ट्रीय वित्त निगम) उपाध्यक्ष मोहम्मद गौलेद तसेच एलडीसी वॉचचे जागतिक समन्वयक आणि अमेरिकेतील नेपाळचे माजी राजदूत डॉ. अर्जुनकुमार कार्की यांनी या परिसंवादात आपले विचार मांडले.


            "डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांद्वारे उच्च आर्थिक वृद्धीसाठी एमएसएमई" आणि "पतहमी आणि एसएमई कार्यक्षेत्र" या दोन प्रमुख विषयांवर आंतरराष्ट्रीय तज्ञांचा समावेश असलेला परिसंवाद झाला. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांद्वारे एमएसएमईला उर्जा देण्यासंदर्भातील पहिल्या परिसंवादाचे संचालन एसएमई फायनान्स फोरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी मॅथ्यू गेमर यांनी केले. या परिसंवादात भारतीय लघु उद्योग विकास बँकेचे (सिडबी) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शिवसुब्रमण्यम रामन, भारतीय स्टेट बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक अश्विनी कुमार तिवारी, सहमतीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बी. जी. महेश, एफएमओचे मुख्य कार्यकारी अधिकारी मायकेल जोंगनील, मास्टरकार्डच्या लघु आणि मध्यम उद्योग कार्यकारी विभागाच्या उपाध्यक्ष जेन प्रोकोप यांनी सहभाग घेतला. समृद्ध करणाऱ्या चर्चेने एमएसएमईच्या आर्थिक समावेशनाला झपाट्याने पुढे नेण्यासाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या भूमिकेबद्दल मौल्यवान मुद्दे समोर आले.


            इजिप्तच्या पतहमी कंपनीच्या (सीजीसी) व्यवस्थापकीय संचालक नागला बहर यांनी पतहमी आणि लघु आणि मध्यम उद्योग (एसएमई) व्यवस्थेसंदर्भातील दुसऱ्या परिसंवादाचे संचालन केले. परिसंवादामध्ये एईसीएमच्या महासचिव कॅटरिन स्टर्म, सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी पतहमी निधी ट्रस्टचे (सीजीटीएसएमई) मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप वर्मा, कफलाहचे मुख्य कार्यकारी अधिकारी होमम हाशेम, आणि केओडीआयटीएचे उपसंचालक वूइन पार्क यांचा समावेश होता.


            नवी दिल्ली येथे झालेल्या जी 20 नेत्यांच्या शिखर परिषदेमध्ये, नेत्यांकडून जीपीएफआयने भारताच्या अध्यक्षतेखाली तयार केलेल्या, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा (डीपीआय) आणि जी 20 आर्थिक समावेशन कृती योजना (एफआयएपी) 2023 द्वारे आर्थिक समावेशन आणि उत्पादकता वाढीसाठी जी 20 धोरण शिफारशी या दोन महत्त्वपूर्ण दस्तऐवजांना मान्यता देण्यात आली.


            पुढील दोन दिवसांत, आर्थिक समावेशासाठी जागतिक भागिदारीतील (जीपीएफआय) सदस्य , डिजिटल आर्थिक समावेशासाठी जी - 20 जीपीएफआय उच्चस्तरीय तत्त्वे, वित्तप्रेषण योजनांचे अद्ययावतीकरण आणि एसएमई वित्तपुरवठ्यातील सामान्य अडथळ्यांवर मात करण्यासाठी एसएमई सर्वोत्तम पद्धती आणि नाविन्यपूर्ण साधनांच्या अंमलबजावणीबाबतच्या जीपीएफआयच्या कामावर चर्चा करतील. जीपीएफआय बैठकीचा एक भाग म्हणून, 16 सप्टेंबर 2023 रोजी “डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांद्वारे आर्थिक समावेशनात प्रगती करणे : डिजिटल आणि वित्तीय साक्षरता आणि ग्राहक संरक्षणाद्वारे ग्राहकांचे सक्षमीकरण” या विषयावर एक परिसंवाद देखील आयोजित केला जाईल.


            जीपीएफआय कार्यगटासाठी उल्लेखनीय कामगिरी म्हणजे, अलीकडेच, नवी दिल्ली येथे झालेल्या जी 20 नेत्यांच्या शिखर परिषदेमध्ये, नेत्यांकडून जीपीएफआयने भारताच्या अध्यक्षतेखाली तयार केलेल्या, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा (डीपीआय) आणि जी 20 आर्थिक समावेशन कृती योजना (एफआयएपी ) 2023 द्वारे आर्थिक समावेशन आणि उत्पादकता वाढीसाठी जी 20 धोरण शिफारशी या दोन महत्त्वपूर्ण दस्तऐवजांना मान्यता देण्यात आली, असे अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाचे आर्थिक सल्लागार चंचल सरकार यांनी कार्यक्रमापूर्वीच्या पत्रकार परिषदेत सांगितले.



* * *


Featured post

Lakshvedhi