Thursday, 14 September 2023

बैल पोळ्यानिमित्त कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या शेतकरी बांधवांना शुभेच्छा

 बैल पोळ्यानिमित्त कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या शेतकरी बांधवांना शुभेच्छा


            मुंबई दि. 13 : “कृषीप्रधान भारतात शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या बैलांचा सण म्हणजे, बैल पोळा! यानिमित्ताने सर्व शेतकरी बांधवांना माझ्या मनापासून शुभेच्छा!”, असा संदेश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील शेतकरी बांधवांना दिला आहे.


            राज्यातील बहुतांश भागात व विशेष करून मराठवाड्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही, परतीच्या पावसाने पाण्याची कमी भरून निघेल, अशा अपेक्षा असल्या तरीही खरीप हंगामातील पिकांवर संकट आहे. या काळात राज्य सरकार सर्वार्थाने शेतकऱ्यांना दिलासा व आधार देण्यासाठी खंबीरपणे पाठिशी उभे राहील. शेतकऱ्यांना हक्काचा पीक विमा मिळण्यासाठी शासन कटिबद्ध राहून निर्णय घेत आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री व दोन्हीही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून अन्य आवश्यक उपाययोजना देखील करण्यात येतील, असा विश्वास यानिमित्ताने मंत्री श्री. मुंडे यांनी व्यक्त केला आहे.


            संकट असले तरी पारंपरिक सण-उत्सव साजरे करण्याची आपली परंपरा राहिली आहे. राज्यातील शेतकरी बांधवांना दिलासा देण्याची जबाबदारी ही सरकारची आहे, सोबतच शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात, सण-उत्सवात देखील आम्ही सहभागी आहोत, असेही यानिमित्ताने मंत्री श्री. मुंडे यांनी म्हटले आहे.


००००

आरोग्य क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाच्या उपयोगाने भारत जगात आदर्श ठरेल

 आरोग्य क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाच्या उपयोगाने भारत जगात आदर्श ठरेल


- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू


            मुंबई, दि. 13 : डिजिटल तंत्रज्ञान उपयोगात आणण्यामध्ये भारत उत्साहाने पुढे येत आहे. भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेची प्रशंसा जगात होत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर छोटे शहर आणि गावांना डिजिटल अर्थव्यवस्थेशी जोडण्यात भारत जगात उत्तम उदाहरण बनले आहे. सप्टेंबर 2021 मध्ये आयुष्मान भारत डिजिटल मिशनची सुरुवात करण्यात आली. डिजिटल तंत्रज्ञानाच्या आरोग्य क्षेत्रातील उपयोगामुळे भारत या क्षेत्रात जगामध्ये आदर्श ठरेल, असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला.


             आयुष्मान भव: या 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान राबविण्यात येणाऱ्या मोहिमेचे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गांधीनगर, गुजरात येथील राजभवनात करण्यात आले. या कार्यक्रमाचे वेब लिंकद्वारे थेट प्रसारण सह्याद्री अतिथी गृह येथील मोहिमेच्या राज्यस्तरीय कार्यारंभ दिन कार्यक्रमात करण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे कार्यक्रमास राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत, अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सचिव नवीन सोना उपस्थित होते.


            राष्ट्रपती पुढे म्हणाल्या, की देशाने कोविड साथ रोगाच्या काळात खूप चांगल्या कामाचे उत्तम उदाहरण जगासमोर ठेवले. देशातील शास्त्रज्ञ, डॉक्टर, नर्सेस, अन्य आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी तसेच कुशल प्रशासन व नेतृत्वाच्या जोरावर यामधून देश बाहेर पडला. जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबविली. लोकसहभागातून अशक्यप्राय वाटणारे हे काम शक्य करून दाखविले.


            प्रधानमंत्री क्षय रोग मुक्त भारत अभियानात उल्लेखनीय काम करणाऱ्या जिल्ह्यांना पुरस्कृत करण्याचे काम प्रशंसनीय असून क्षयरोग निर्मूलनात निक्षय मित्र म्हणून काम करणाऱ्या मित्रांचा सन्मानही स्पृहणीय आहे. आयुष्मान भव: मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी लोकसहभाग देण्याचे आवाहनही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यावेळी केले.


              केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांनी मोहिमेची विस्तृत माहिती देत मोहीम यशस्वी करून प्रत्येकाला दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले.


 कार्यक्रमाला आरोग्य विभागातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.


००००



Wednesday, 13 September 2023

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी 15 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज सादर करता येणार

 प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

15 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज सादर करता येणार

            नवी दिल्ली 13 : प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी 15 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून करण्यात आले आहे. या पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याची तारीख 31 ऑगस्ट 2023 पर्यंत होती. आता ती वाढवून 15 सप्टेंबर 2023 पर्यंत करण्यात आलेली आहे.


            महिला आणि बाल विकास मंत्रालय दरवर्षी मुलांची ऊर्जा, दृढनिर्धार, क्षमता, उमेद आणि उत्साहाचा गौरव करण्यासाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीपी) प्रदान करत असते.


            या पुरस्कारासाठी 18 वर्षांपेक्षा कमी वय असलेले तसेच भारताचे नागरिकत्व आणि रहिवासी असलेले मुले, मुली या पुरस्कारासाठी अर्ज करु शकतात किंवा कोणीही भारतीय नागरिक देखील पुरस्कारासाठी पात्र असणा-या मुला-मुलींचे नामांकन करु शकतात. प्राप्त अर्जांची छाननी प्रथम छाननी समितीव्दारे केली जाते. अंतिम निवड राष्ट्रीय निवड समितीव्दारे केली जाते. 26 डिसेंबर 2023 रोजी वीर बाल दिवस या दिवशी पुरस्कार जाहीर केले जातील. मा. राष्ट्रपती यांच्याकडून नवी दिल्ली येथे दरवर्षी जानेवारी महिन्यात होणाऱ्या विशेष समारंभात विजेत्यांना पुरस्कार प्रदान केले जातात. पुरस्काराचे स्वरुप पदक, रोख एक लाख रुपये बक्षीस, प्रमाणपत्र व प्रशस्तीपत्र असे आहे.


            अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेची संपूर्ण माहिती तसेच पुरस्कारांसाठीचे अर्ज https://awards.gov.in या संकेतस्थळाच्या माध्यमातूनच स्वीकारण्यात येणार आहे.

एसटी बसचे आरक्षण आता आयआरसीटीसीवरुनही करता येणार

 एसटी बसचे आरक्षण आता आयआरसीटीसीवरुनही करता येणार

            मुंबई, दि. १३ :- एसटी महामंडळाच्या बस प्रवासासाठी आता आयआरसीटीसीवरुनही आरक्षण करता येणार असून यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीमध्ये आज सामंजस्य करार करण्यात आला.


            मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी एसटी महामंडळ व इंडियन रेल्वे कॅटरिंग ॲण्ड टुरिझ्म कॉर्पोरेशन (IRCTC) यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सामजंस्य करारावर सह्या केल्या. महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळ (एम.एस.आर.टी.सी) अर्थात एस.टी. महामंडळ व रेल्वेच्या आय.आर.सी.टी.सी. यांच्या दरम्यान आरक्षण व्यवस्थापन प्रणाली संदर्भात हा सामंजस्य करार करण्यात आला.


            यामुळे इंडियन रेल्वे कॅटरिंग ॲण्ड टुरिझ्म कॉर्पोरेशनच्या संकेतस्थळावरुन (https://www.bus.irctc.co.in) प्रवाशांना एसटीचे तिकीट देखील आरक्षित करता येणार आहे. 


            रेल्वेच्या एकूण प्रवासी संख्येपैकी ७५ टक्के प्रवासी इंडियन रेल्वे कॅटरिंग ॲण्ड टुरिझम कॉर्पोरेशनच्या संकेतस्थळावरुन तिकीट आरक्षित करतात. या सर्व प्रवाशांना आता एसटी बसचे तिकीटदेखील आरक्षित करणे शक्य होईल. त्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येमध्ये वाढ होणार आहे. तसेच प्रवाशांना रेल्वे आणि एसटीच्या संयुक्त प्रवासाचे नियोजन करणे शक्य होईल, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.


            या करारप्रसंगी परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव पराग जैन - नैनुटिया, आय.आर.सी.टी.सी. च्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती सीमाकुमार आदी उपस्थित होते.


0000



 

राज्यातील सकारात्मक, शांततापूर्ण वातावरणबिघडवण्याचे काम कोणी करू नये

 राज्यातील सकारात्मक, शांततापूर्ण वातावरणबिघडवण्याचे काम कोणी करू नये

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबई, दि. 13 : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारचे सकारात्मक प्रयत्न असून मराठा समाजबांधवांनी कुठल्याही अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन करतानाच राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडेल, असा खोडसाळपणा कुणी करू नये, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले.


            घडलेले मुद्दे, प्रसंग आणि घटना मोडतोड करून सोशल मीडियावर फिरवले जात आहेत. शासन एकीकडे या संवेदनशील विषयावर ठोस भूमिका आणि निर्णय घेत असताना या पार्श्वभूमीवर समाजात सोशल मीडियातून गैरसमज निर्माण करण्याचा आणि सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा प्रकार योग्य नाही, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीनंतर झालेल्या मुद्द्यांवर सकारात्मक बोलू या, अशी चर्चा मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार करीत असताना आमचा संवाद ‘सोशल मीडिया’वरून चुकीच्या पद्धतीने संपादित करून फिरविणे अत्यंत खोडसाळपणाचे आहे. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारे आहे.


            मराठा आरक्षणाबाबत सरकार सुरुवातीपासून संवेदनशील असून कायद्याच्या चौकटीत बसेल, असे आरक्षण देण्याबाबत सरकार प्राधान्याने काम करीत आहे. तसेच मराठा आरक्षणाबाबत पहिल्यांदाच अशा सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्र बोलावून या विषयी एकमत घेण्यात आले आहे. शासनाने इतकी चांगली आणि सकारात्मक भूमिका घेतली असताना, संवादाचा मार्ग प्रशस्त केला असताना खोडसाळपणे आणि व्हीडिओ क्लिप चुकीच्या पद्धतीने संपादित करून लोकांच्या मनात गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत.


            आपल्या राज्याची ही संस्कृती नाही. राज्यात असलेले सकारात्मक वातावरण बिघडवण्याचे काम कोणी करू नये, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आवाहन केले आहे.


००००

कांदिवली पूर्व विधानसभेत होणार ‘मेरी माटी मेरा देश’चा जागर ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन

 कांदिवली पूर्व विधानसभेत होणार ‘मेरी माटी मेरा देश’चा जागर

ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन


आमदार अतुल भातखळकर यांची माहिती


मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशासाठी बलिदान दिलेल्या महान स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण व्हावे, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘मेरी माटी मेरा देश’ या अभियानचे आयोजन कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघात करण्यात आले आहे. रविवार, १७ सप्टेंबर रोजी विधानसभा क्षेत्रातील सर्व वॉर्डामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केले आहे.

रविवारी वॉर्डनिहाय व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. जमा करण्यात आलेली माती एकत्र करण्यासाठी ‘अमृत कलश’ घेउन सर्वत्र रथयात्रा निघणार असून यामध्ये माती एकत्र केली जाणार आहे. वॉर्ड क्रमांक २३ मध्ये सकाळी १०.३० वाजता पोयसर येथील पं. दिनदयाळ उपाध्याय मैदान येथे खा. गोपाळ शेट्टी हे मार्गादर्शन करणार आहेत. वॉर्ड क्रमांक २४ मध्ये सकाळी १०.३० वाजता ठाकूर कॉम्प्लेक्स येथील प्रमोद नवलकर उद्यान गेट येथे गणेश खणकर, वॉर्ड क्रमांक २७ मध्ये सकाळी १० वाजता लोखंडवाला सर्कल आणि वॉर्ड क्रमांक २८ मध्ये सकाळी १०.३० वाजता माँ वैष्णोदेवी मित्र मंडळ शेड, हनुमाननगर येथे आमदार अतुल भातखळकर, वॉर्ड क्रमांक २९ मध्ये सकाळी १० वाजता नारीशक्ती चौक, अशोकनगर येथे महामंत्री संजय उपाध्याय, वॉर्ड क्रमांक ३६ मध्ये सकाळी १० वाजता प्रभू निकेतन हॉटेल जवळ, मालाड पूर्व येथे आमदार योगेश सागर, वॉर्ड क्रमांक ४४ मध्ये सकाळी १० वाजता बापा सीताराम चौक, धनजीवाडी येथे जे. पी. मिश्रा, वॉर्ड क्रमांक ४५ मध्ये सकाळी १०.३० वाजता राणी सती फाटक येथे मंडल अध्यक्ष आप्पा बेलवलकर हे मार्गदर्शन करणार आहेत.



देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण व्हावे, त्यांच्या योगदानाची माहिती नव्या पिढीला व्हावी, या हेतूने हे अभियान राबवले जात आहे. यानिमित्ताने वॉर्ड निहाय ७५ झाडे लावण्याचाही उपक्रम राबवण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी व्हावे, असेही आमदार भातखळकर म्हणाले.

कामगारांसाठीच्या 'तपासणी ते उपचार' योजनेतप्रत्येक जिल्ह्यात ५ रुग्णालये व रोग निदान केंद्र संलग्न करणार

 कामगारांसाठीच्या 'तपासणी ते उपचार' योजनेतप्रत्येक जिल्ह्यात ५ रुग्णालये व रोग निदान केंद्र संलग्न करणार


                         - कामगारमंत्री सुरेश खाडे 


 


            मुंबई, दि. १३ : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून कामगारांसाठी 'तपासणी ते उपचार' ही आरोग्य योजना राबविण्यात येत असून योजनेंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात ५ रुग्णालये व रोग निदान चाचणी केंद्र संलग्न करण्यात येणार आहेत. यात कामगारांच्या कुटुंबाला दोन लाखांपर्यंतचे उपचार मिळणार असून पाच हजारांची औषधे आणि २३ तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत. या योजनेत कामगाराच्या संपूर्ण कुटुंबाला लाभ मिळणार असल्याची माहिती कामगारमंत्री तथा कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष सुरेश खाडे यांनी दिली.  


            महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार यांच्या हितासाठी कल्याणकारी मंडळ विविध योजना राबवत असून यापुढेही कामगारांचे आरोग्य, घरकुल, मुलांचे शिक्षण यावर भर देणार असल्याचे, मंत्री श्री. खाडे यांनी सिटू संघटनेने कामगारांसाठी केलेल्या विविध मागण्यासंदर्भात आयोजित बैठकीत सांगितले.   


            कामगार विभाग, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ आणि सिटू संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक मंत्रालयातील परिषद सभागृहात झाली. बैठकीला कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, कामगार आयुक्त सतिश देशमुख, कामगार कल्याण मंडळाचे सचिव विवेक कुंभार, कामगार विभागाचे वरिष्ठ अधिकारी, सिटूचे अध्यक्ष डॉ. डी.एल. कराड, महासचिव कॉ. भरमा कांबळे, उपाध्यक्ष कॉ. शिवाजी मगदूम व इतर सदस्य उपस्थित होते.


            कामगारांच्या पाल्यांना बी.फार्म. करण्यासाठी २५ हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते, या रकमेत वाढ करण्यासोबतच पी.एच.डी. आणि एम.फील. करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. बांधकाम कामगारांना 'मध्यान्ह भोजन' ही योजना अतिशय उत्तमप्रकारे सुरू आहे. यात कुठलाही बदल करण्यात येणार नाही. या योजनेच्या माध्यमातून लाखो नोंदणीकृत कामगारांना मोफत जेवण मिळत असल्याचेही मंत्री श्री. खाडे यांनी सांगितले.  


            मुंबई व राज्यातील इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी कामगारांना नाक्यावर थांबण्यासाठी शेड उभारणी करणार असून त्याठिकाणी पाणी, स्वच्छतागृह यासारख्या मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, तसेच कामगारांच्या मदतीसाठी लवकरच हेल्पलाईन सुरू करणार असून कामगार विभागात लवकरच भरती प्रक्रिया राबवणार आहे. त्याचबरोबर राज्यात मोठ्या संख्येने बांधकाम चालू आहे. यातून मंडळाचा उपकर वाढविण्यासाठी कामगार संघटनांनीही सहकार्य करावे, असे आवाहन मंत्री श्री. खाडे यांनी यावेळी केले.   

Featured post

Lakshvedhi