Monday, 11 September 2023

कर्मचारी व कामगार संघटना यांच्यात सुसंवाद वाढवा - विश्वास पाठक



 कर्मचारी व कामगार संघटना यांच्यात सुसंवाद वाढवा


- विश्वास पाठक


वीज कंपन्यांतील मानव संसाधन व कामगार विभागाच्या

अधिकाऱ्यांची सक्षमीकरण परिषद (मल्हार-२०२३)

            मुंबई, दि. ११ : अन्न, वस्त्र व निवारा या माणसाच्या मूलभूत गरजांप्रमाणेच वीज ही मानवाची अत्यावश्यक मुलभूत गरज बनली आहे. या महत्त्वाच्या सेवा क्षेत्रात काम करताना वीज कंपन्यांतील मानव संसाधन व कामगार विभागाने सातत्याने कर्मचारी व कामगार संघटना यांच्यात सुसंवाद वाढविला पाहिजे, असे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी सांगितले.


            महापारेषणच्या वतीने महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या तीनही वीज कंपन्यांतील मानव संसाधन व कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांची दोन दिवसीय सक्षमीकरण परिषद (मल्हार-२०२३) रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, भाईंदर येथे आयोजित केली आहे. त्या परिषदेत श्री. पाठक बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महापारेषणचे संचालक (मानव संसाधन) सुगत गमरे, महावितरणचे संचालक (मानव संसाधन) अरविंद भादीकर, महानिर्मितीचे कार्यकारी संचालक (मानव संसाधन) धनंजय सावळकर, महापारेषणचे मुख्य व्यवस्थापक सुधीर वानखेडे, महावितरणचे मुख्य महाव्यवस्थापक (मा.सं.) भूषण कुलकर्णी उपस्थित होते.


            श्री. पाठक म्हणाले की, भारताचा वेगाने विकास होत आहे. वीज क्षेत्रातही आमुलाग्र बदल होत आहेत. महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या तीनही कंपन्या महत्त्वाच्या आहेत. यामध्ये मानव संसाधन विभागाची भूमिका खूप मोठी व व्यापक आहे. त्यासाठी त्यांनी वेगळा विचार केला पाहिजे. खासगी वीज कंपन्यांशी स्पर्धा करताना आपण अधिकारी, कर्मचारी व कामगार संघटनेमध्ये सुसंवाद ठेऊन पारदर्शी कारभार ठेवला पाहिजे.


            परिषदेच्या सुरूवातीला महापारेषणचे संचालक श्री. गमरे यांनी प्रास्ताविकातून परिषदेमागची भूमिका विषद केली. तीनही कंपन्यांमध्ये मानव संसाधन व कामगार अधिकाऱ्यांशी समन्वय रहावा, यासाठी ही परिषद आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले.


            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार व्यवस्थापक महेश आंबेकर यांनी मानले.

बळीराजावरचे संकट दूर कर, राज्यभर समाधानकारक पाऊस पडू दे

 बळीराजावरचे संकट दूर कर, राज्यभर समाधानकारक पाऊस पडू दे


- मुख्यमंत्री यांची भीमाशंकराकडे प्रार्थना


            पुणे दि. 11 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. “बळीराजावरचे संकट दूर कर, राज्यभर समाधानकारक पाऊस पडू दे. राज्यावरचे संकट दूर होऊन राज्य सुजलाम - सुफलाम होऊ दे; राज्यातील सर्व घटकांना सुख, समाधान आणि आनंद मिळू दे”, अशी प्रार्थना भगवान भीमाशंकराकडे केल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.


            पूजेनंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा भीमाशंकर देवस्थान ट्रस्टच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, देवस्थानचे अध्यक्ष ॲड. सुरेश कौदरे आदी उपस्थित होते.


        भाविकांच्या दर्शनात कोणताही खंड न पडता मुख्यमंत्री महोदयांची पूजा संपन्न झाली. मुख्यमंत्री महोदयांकडून पूजा सुरू असताना भाविकांचे दर्शनही अखंडपणे सुरू होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, “भाविक श्रद्धेने आणि भक्तीभावाने येथे दर्शनाला येत असतात. मी दरवर्षाप्रमाणे यावर्षीही श्रावणी सोमवारी दर्शनासाठी आलो आहे. येथे लाखो भक्त येत असल्याने शासनाने १४८ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. आतापर्यंत त्यातील ६८ कोटी रुपये विविध सुविधांवर खर्च करण्यात आला आहे. येथे येणाऱ्या भाविकांची कुठलीही गैरसोय होणार नाही, अशा सर्व मूलभूत सुविधा शासनाच्या माध्यमातून दिल्या जातील. परिसरात स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि स्नानगृहाची व्यवस्था करण्याचे तसेच परिसरातील आदिवासी पाड्यात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत”, असेही ते म्हणाले.


------

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविणे आणखी झाले सोपे; सीएमएमआरएफ अॅप्लिकेशनवर अर्ज भरून मदत मिळविता येणार

 मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविणे आणखी झाले सोपे;

सीएमएमआरएफ अॅप्लिकेशनवर अर्ज भरून मदत मिळविता येणार


14 महिन्यात 13 हजाराहून अधिक रुग्णांना 112 कोटी 12 लाखांची मदत वितरित

            मुंबई, दि.10 : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत अवघ्या 14 महिन्यात 13 हजाराहून अधिक गोरगरीब -गरजू रुग्णांना एकूण 112 कोटी 12 लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित केली आहे. आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविणे आणखी सोपे झाले असून यासाठी मंत्रालयात येण्याची आवश्यकता भासणार नाही. सीएमएमआरएफ या अँप्लिकेशनवर अर्ज भरुन मदत मिळविता येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली आहे.


            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मागील वर्षी पहिल्याच जुलै महिन्यात १७८ रुग्णांना ७६ लाखांची मदत देण्यात आली. नंतर ऑगस्ट महिन्यात २४४ रुग्णांना १ कोटी १ लाख, सप्टेंबर महिन्यात ३१९ रुग्णांना १ कोटी ८६ लाख, ऑक्टोबर महिन्यात २७६ रुग्णांना २ कोटी ३५ लाख, नोव्हेंबर महिन्यात ५२७ रुग्णांना ४ कोटी ५० लाख, डिसेंबर महिन्यात १०३१ रुग्णांना ८ कोटी ५२ लाख, जानेवारी २०२३ मध्ये १०३२ रुग्णांना ८ कोटी ९० लाख तर फेब्रुवारी २०२३ मध्ये १२७४ रुग्णांना १० कोटी ५९ लाख, मार्च २०२३ मध्ये १४६९ रुग्णांना ११ कोटी ९३ लाख, एप्रिल मध्ये ११९० रुग्णांना ९ कोटी ९१ लाख, मे मध्ये १३२९ रुग्णांना ११ कोटी २५ लाख, तर जून मध्ये १७२८ रुग्णांना १४ कोटी ६२ लाख, जुलै १४८८ रुग्णांना १२ कोटी ७२ लाख, तर ऑगस्ट मध्ये विक्रमी १५६७ रुग्णांना १३ कोटी १४ लाख, रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.


            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशीलतेमुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये अनेक-विविध आजारांचा समावेश देखील करण्यात आला आहे. यामध्ये अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, कर्करोगावरील शस्त्रक्रिया, केमोथेरपी, डायलिसिस, जन्मतः मूकबधिर लहान मुलांच्यासाठी अत्यावश्यक असणारी कॉकलीयर इनप्लांट शस्त्रक्रिया, सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, विद्युत अपघात, भाजलेले रुग्ण, जन्मतः लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे.


            मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांचे प्राण वाचविण्यात यश मिळविले आहे. यामुळे अनेक रुग्णांना अक्षरशः जीवनदान मिळाले आहे. गोरगरीब गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून अर्थसहाय्य केले जाते. या निधीचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी केले आहे

.


00000


 


 


Saturday, 9 September 2023

मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी ‘सखी निवास’ करिता प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

 मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी ‘सखी निवास’ करिता प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

 

मुंबई दि.९ : जिल्हयातील नोकरी करणाऱ्या महिलांना नोकरीच्या ठिकाणी राहत असलेल्या शहरात सुरक्षित आणि सोयीस्कर निवासाची व्यवस्था होण्यासाठी केंद्र शासनामार्फत सखी निवास ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतंर्गत मुंबई उपनगर येथे सहा सखी निवास भाडेतत्वावरील इमारतीमध्ये कार्यान्वित करण्यात येणार आहेत. या योजनेसाठी केंद्र शासनाने निश्चीत केलेल्या संस्था तसेच एजन्सीज कडून  दिनांक १८ सप्टेंबर२०२३ रोजी कार्यालयीन वेळेपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

         नोकरी करणा-या महिलांना नोकरीच्या ठिकाणी सुरक्षित आणि सोयीस्कर पध्दतीने निवासाच्या व्यवस्थेकरिता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार "मिशन शक्ती" अंतर्गत संबल" आणि सामर्थ्य" या दोन योजना राबविण्यात येत आहेत. सदर योजनेतील ‘सामर्थ्य’ या उपयोजनेत नोकरी करणाऱ्या महिलांकरीता ‘सखी निवास’ या घटक योजनेचा समावेश आहे. मुंबई उपनगर या जिल्हयात सध्या कार्यरत असलेल्या नोकरी करणाऱ्या महिलांच्या वसतिगृहांव्यतिरिक्त आणखी नविन ०६ सखी निवास कार्यान्वित करावयाची आहेत.

         या योजने अंतर्गतचे प्रस्ताव सादर करण्यासाठी आवश्यक असलेली सविस्तर माहिती केंद्र शासनाचे दि. १४ जुलै २०२२ रोजी ‘मिशन शक्ती’ या योजनेच्या मार्गदर्शक सुचनाप्रस्ताव सादर करावयाच्या अर्जाचा नमुना, अर्ज सादर करण्याची सर्वसाधारण पध्दतसंस्था एजन्सीच्या पात्रतेचे निकषसखी निवासासाठी आवश्यक असलेली इमारत व भौतिक सोयीसुविधा,अनुदानकर्मचारी वर्गशासन निर्णय इ. सर्व सविस्तर माहिती आयुक्तमहिला व बाल विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या https://www.wcdcommpune.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

      मुंबई उपनगर जिल्हयात केंद्र शासन पुरस्कृत ‘सखी निवास’ योजना कार्यान्वित करुन ती केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचना व राज्य शासनाचे शासन निर्णय व या संबंधीचे वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या सुचनेनुसार सदरची योजना राबविण्यास इच्छुक असलेल्या संस्था  तसेच एजन्सीकडून याद्वारे दि.१८ सप्टेंबर२०२३ रोजी कार्यालयीन वेळेपर्यंत प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

       तरी याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय मुंबई उपनगर प्रशासकीय इमारत १ ला मजलादुसरा टप्पाआर. सी मार्गचेंबूरमुंबई -७१दूरध्वनी: ०२२-२५२३२३०८ येथे संपर्क करावा असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बी. एस. नागरगोजे यांनी केले आहे.

गोविंदा आला रे आला भारतीय त्योहार

 



Featured post

Lakshvedhi