Wednesday, 30 August 2023

सलाम मुंबई' कार्यक्रमासाठी नेटके नियोजन करण्याचेमुख्यमंत्र्यांचे निर्देश

 सलाम मुंबई' कार्यक्रमासाठी नेटके नियोजन करण्याचेमुख्यमंत्र्यांचे निर्देश


भारतीय लष्कराकडून आयोजन


 


            मुंबई, दि. ३० :- भारतीय लष्कराच्या वतीने आयोजित करण्यात येणारा 'सलाम मुंबई' कार्यक्रम मोठ्या संख्येने नागरिकांना पाहता यावा, यासाठी नेटके नियोजन केले जाईल. त्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग आणि मुंबईतील सर्व यंत्रणा सहकार्य करतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.


            'सलाम मुंबई' या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत लेफ्टनंट जनरल एच. एस. काहलों यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांना मुख्यमंत्री शिंदे यांनी आश्वस्त केले.


            सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे श्री. काहलों यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना या कार्यक्रमाच्या संकल्पनेबाबत माहिती दिली. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित होते.


            मुंबई शहरातील विविध समाजाभिमुख आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सुविधा पुरविण्यात अथकपणे कार्यरत अशा यंत्रणा, संस्था यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला जातो, ज्यामध्ये भारतीय लष्करासह विविध सशस्त्र सेना दलांचा सहभाग घेतला जातो. यात सेनादलाची वाद्यवृंद पथके आणि रणगाडे, लष्करी वाहने आदींचा सहभाग राहणार आहे. हा कार्यक्रम जास्तीत जास्त नागरिकांना, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी आदींना पाहता यावा यादृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.


0000

पाणथळ जागांसोबतच कांदळवनांच्या संरक्षणासाठी प्रभावी कारवाई करावी

 पाणथळ जागांसोबतच कांदळवनांच्या संरक्षणासाठी प्रभावी कारवाई करावी


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश


 


            मुंबई, दि. ३० : राज्यातील पाणथळ जागांसोबतच कांदळवनांचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अधिक प्रभावीपणे कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. नॅशनल वेटलॅण्ड ॲटलसनुसार राज्यात असलेल्या सुमारे २३ हजार पाणथळ जागांचे सर्वेक्षण केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त संस्थेकडून करावे. त्याबाबतचे अहवाल वर्षभरात प्राधिकरणासमोर ठेवण्यात यावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


            मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र पाणथळ प्राधिकरणाची पाचवी बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी यावेळी सादरीकरण केले. या बैठकीस महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. गोविंदराज, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आदी उपस्थित होते.


            देशभरात पाणथळ जागांचे संरक्षण करण्यात येत असून अशा जागांना रामसर दर्जा देण्यात येतो. देशात एकूण ७५ रामसर क्षेत्र असून त्यापैकी महाराष्ट्रात नांदूर - माध्यमेश्वर (नाशिक), लोणार सरोवर (बुलडाणा), ठाणे खाडी असे तीन रामसर क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. राज्यात सुमारे सव्वा दोन हेक्टर क्षेत्रात २३ हजार पाणथळ जागा असून त्यांचे सर्वेक्षण मान्यता प्राप्त संस्थेकडून करून त्याबाबतचा अहवाल तयार करण्यात यावा. जिल्हाधिकाऱ्यांनी या कामाला प्राधान्य देत आपल्या जिल्ह्यातील पाणथळ जागांची माहिती संबंधित संस्थेच्या मदतीने वर्षभरात संकलित करावी, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


            समुद्र किनाऱ्यांच्या रक्षणासाठी कांदळवनांचे महत्त्व लक्षात घेता, त्यांचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. विशेषत: खासगी जमिनीवरील कांदळवनांच्या जतन आणि संवर्धनासाठी प्रभावीपणे सनियंत्रण करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. कांदळवन नष्ट करणाऱ्यांवर प्रभावीपणे कारवाई करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.


०००००

सोनिया, राहुल गांधीना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर नेणार का?

 सोनिया, राहुल गांधीना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर नेणार का?


आमदार अतुल भातखळकर यांचा उद्धव ठाकरे यांना खडा सवाल


मुंबई : ज्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी कधीही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहण्यासाठी साधे एक ट्विट केले नाही, अशा मायलेकांसह तथाकथित धर्मनिरपेक्ष नेत्यांना घेउन उद्या उद्धव ठाकरे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाणार का? असा खडा सवाल भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी विचारला आहे. गुरुवारी होणाºया ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

आमदार भातखळकर म्हणाले, उद्या ‘इंडिया’ नामक एक बोगस आघाडी उद्धव ठाकरे यांच्या निमंत्रणावरून मुंबईत येत आहे. या निमित्ताने माझे उद्धव ठाकरे यांना काही प्रश्न आहेत. त्याची उत्तरे उद्धव ठाकरे यांनी द्यावीत. ज्या राहुल गांधीनी नेहमी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची बदनामी केली. त्या राहुल गांधींची स्वा. सावरकर यांच्या मुद्दयावरून कानउघडणी करणार का? आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री याच बोगस आघाडीच्या माध्यमातून तुमचा पाहुणचार घेण्यासाठी मुंबईत येत आहेत, त्यांना बेळगाव आणि सीमाभागातील मराठी बांधवांवर केले जाणारे अत्याचार, त्यांचे प्रश्न हे विषय उपस्थित करून त्यांना खडेबोल सुनावणार का? असे प्रश्न आमदार भातखळकर यांनी उपस्थित केले आहेत. या प्रश्नांची उत्तरे उद्धव ठाकरे यांनी आधी द्यावीत आणि मगच त्यांनी तथाकथित ‘इंडिया’ आघाडीविषयी बोलावे, असेही आमदार भातखळकर म्हणाले.

लोखंडवाला १२० फूट डीपी रोड वाहतुकीसाठी पुन्हा खुला

 लोखंडवाला १२० फूट डीपी रोड वाहतुकीसाठी पुन्हा खुला


- रोड तर होणारच : आमदार अतुल भातखळकर यांचा इशारा

- लोखंडवाला म्हाडा १२० फूट डीपी रोड अ‍ॅक्शन कमिटीच्या आंदोलनाला यश


मुंबई : मागाठाणे ते गोरेगाव हा लोखंडवालामधून जाणारा १२० फुटी डीपी रोड पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांच्या प्रयत्नामुळे तसेच लोखंडवाला म्हाडा रेसिडेंट १२० फूट डीपी रोड अ‍ॅक्शन कमिटीच्या वतीने मंगळवार, २९ रोजी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर महापालिकेने तेथे लावण्यात आलेले बॅरिकेट्स हटवले. याशिवाय पोलिसांनी तेथे ठेवलेले दगड हटवून सामान्य नागरिकांसाठी हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला आहे.

२५ जुलै रोजी या रस्त्यामधील भिंत पाडून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. त्यानंतर काहींनी रस्त्यातच खांब रोवले. नुकतेच तेथे बॅरिकेट्स लावून रस्ता कायमस्वरूपी बंद करण्याचा प्रकार घडल्यानंतर लोखंडवाला म्हाडा रेसिडेंट १२० फूट डीपी रोड अ‍ॅक्शन कमिटीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सुधीर शिंदे, शिशिर शेट्टी यांसह कमिटीचे सदस्य सहभागी झाले होते. आमदार अतुल भातखळकर यांच्या रेट्यामुळे आणि कमिटीच्या आंदोलनामुळे हा रस्ता खुला करण्यात यश आले आहे.

याबाबत बोलताना आमदार भातखळकर म्हणाले, हा १२० फूट डीपी रोड आहे. हा रस्ता होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. हे कायद्याचे राज्य आहे. त्यामुळे कायद्यानुसार याबाबत कार्यवाही होईल. यापूर्वी तेथील स्थानिक रहिवासी मला भेटायला आले होते, तेव्हा त्यांना यातून समन्वयातून मार्ग काढू. लोखंडवाला म्हाडा १२० फूट अ‍ॅक्शन कमिटी आणि स्थानिक रहिवासी यांची बैठक घेउन मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, असे त्यांना सांगितले होते. मात्र अशा पद्धतीने दादागिरी करून कोण रस्ता बंद करत असेल तर ते होउ देणार नाही, असे भातखळकर म्हणाले.

सु रक्षा बंधन

 


*नारळी पौर्णिमेला हे जरूर करा*

 *नारळी पौर्णिमेला हे जरूर करा*


. जर समुद्र. जवळ असेल तर नारळी पौर्णिमेला भरतीच्या वेळी एक नारळ घ्या त्यावर हळदी कुंकू अथवा. चंदनाचे. स्वतिक काढा त्याला तुपाच्या दिव्याने. ओवाळा तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण व्हावी अशी प्रार्थना करा जे काम व्हायचे आहे त्याचा मंत्र.म्हणा उदाहरणार्थ लग्नासाठी मंत्र शिक्षणासाठी. व्यवसायासाठी मुलाबाळांच्या कल्याणासाठी असे विविध मंत्र असतात तुम्हाला जो आवडेल तो मंत्र म्हणा. आणि तो नारळ. सागराला अर्पण करा नदी. सरोवर तलाव विहीर जलाशये तळे विहीर जवळ असेल तर तेथेही नारळ अर्पण करू शकता 



आनंद मत्तीकोप कुलकर्णी बेळगाव ९४४९४१०९११*

सिद्धगडच्या पुनर्वसनासाठी तातडीने प्रस्ताव सादर करावा

 सिद्धगडच्या पुनर्वसनासाठी तातडीने प्रस्ताव सादर करावा


- मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील


 


          मुंबई, दि. २९ : मुरबाड तालुक्यात भीमाशंकर अभयारण्यात सिद्धगड या ठिकाणी डोंगरावर वस्ती आहे. अतिवृष्टीमुळे येथील कुटूंबांना बाधित व्हावे लागले होते. त्यामुळे येथील कुटुंबांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. सिद्धगडच्या बाधित कुटुंबांचे पुनर्वसन करण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी आज दिले.


          सिद्धगड व बारवी धरण पुनर्वसनबाबत मंत्री दालनात आयोजित बैठकीत मंत्री श्री. पाटील बोलत होते. बैठकीला आमदार किसन कथोरे, कोकण विभागाच्या उपायुक्त रिता मेत्रेवार, ठाणे जिल्हा पुनर्वसन अधिकारी रेवती गायकर, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता प्रशांत उईके, सुरेश बांगर, रमेश येंदे आदी उपस्थित होते.


             सिद्धगडचे भूवैज्ञानिक सर्वेक्षण करण्यात आलेले आहे किंवा याबाबत तपासून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देत मंत्री श्री. पाटील म्हणाले, की सिद्धगडचे भूवैज्ञानिक सर्वेक्षण झालेले असल्यास अहवाल प्रस्तावासोबत देण्यात यावा. पुनर्वसनासाठी जागा निश्चित केली असल्यास त्याचे सध्याच्या वस्तीपासूनचे अंतर, जागा खासगी आहे की शासकीय आहे. खासगी असल्यास राबवावी लागणारी खरेदी प्रक्रिया, असा संपूर्ण प्रस्ताव सादर करावा. पुनर्वसनाबाबत महसूल, वन व पुनर्वसन विभागाची संयुक्त बैठक आयेाजित करावी.


           अंबरनाथ तालुक्यातील बारवी धरण महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे आहे. या धरणाच्या बाधीत गावांमध्ये 18 प्रकारच्या नागरी सुविधा दिलेल्या आहेत की नाही, दिलेल्या असल्यास कोणत्या सुविधा आहेत, त्यांची सद्यस्थिती कशी आहे, द्यावयाच्या असल्यास विभागाने करावयाच्या खर्चाची तरतूद, याबाबत विभागाने सविस्तर अहवाल येत्या 15 दिवसात सादर करण्याचे निर्देशही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी दिले. बैठकीला सिद्धगड येथील ग्रामस्थ, संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


****


निलेश तायडे/विसंअ/



 

Featured post

Lakshvedhi