लोखंडवाला १२० फूट डीपी रोड वाहतुकीसाठी पुन्हा खुला
- रोड तर होणारच : आमदार अतुल भातखळकर यांचा इशारा
- लोखंडवाला म्हाडा १२० फूट डीपी रोड अॅक्शन कमिटीच्या आंदोलनाला यश
मुंबई : मागाठाणे ते गोरेगाव हा लोखंडवालामधून जाणारा १२० फुटी डीपी रोड पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांच्या प्रयत्नामुळे तसेच लोखंडवाला म्हाडा रेसिडेंट १२० फूट डीपी रोड अॅक्शन कमिटीच्या वतीने मंगळवार, २९ रोजी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर महापालिकेने तेथे लावण्यात आलेले बॅरिकेट्स हटवले. याशिवाय पोलिसांनी तेथे ठेवलेले दगड हटवून सामान्य नागरिकांसाठी हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला आहे.
२५ जुलै रोजी या रस्त्यामधील भिंत पाडून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. त्यानंतर काहींनी रस्त्यातच खांब रोवले. नुकतेच तेथे बॅरिकेट्स लावून रस्ता कायमस्वरूपी बंद करण्याचा प्रकार घडल्यानंतर लोखंडवाला म्हाडा रेसिडेंट १२० फूट डीपी रोड अॅक्शन कमिटीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सुधीर शिंदे, शिशिर शेट्टी यांसह कमिटीचे सदस्य सहभागी झाले होते. आमदार अतुल भातखळकर यांच्या रेट्यामुळे आणि कमिटीच्या आंदोलनामुळे हा रस्ता खुला करण्यात यश आले आहे.
याबाबत बोलताना आमदार भातखळकर म्हणाले, हा १२० फूट डीपी रोड आहे. हा रस्ता होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. हे कायद्याचे राज्य आहे. त्यामुळे कायद्यानुसार याबाबत कार्यवाही होईल. यापूर्वी तेथील स्थानिक रहिवासी मला भेटायला आले होते, तेव्हा त्यांना यातून समन्वयातून मार्ग काढू. लोखंडवाला म्हाडा १२० फूट अॅक्शन कमिटी आणि स्थानिक रहिवासी यांची बैठक घेउन मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, असे त्यांना सांगितले होते. मात्र अशा पद्धतीने दादागिरी करून कोण रस्ता बंद करत असेल तर ते होउ देणार नाही, असे भातखळकर म्हणाले.
No comments:
Post a Comment