Tuesday, 22 August 2023

पुना गेम*' म्हणजेच आजचे जगप्रसिद्ध ' *बॅडमिंटन*'...!!!

 ' *पुना गेम*' म्हणजेच आजचे जगप्रसिद्ध ' *बॅडमिंटन*'...!!!


बॅडमिंटन हा आज जगप्रसिद्ध खेळ आहे. जगभरात हा  बॅडमिंटन खेळ खूप मोठ्या प्रमाणात खेळला जातो.

भारतातील प्रत्येक गल्लीमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तसेच निवांत वेळेत, रात्री, लोक बॅडमिंटन खेळताना आपल्याला बघायला मिळतात. परंतु  बॅडमिंटन या खेळाची जन्मभूमी कोणती हे फारसे लोकांना माहिती नसते किंवा काळाच्या ओघात लोक या बॅडमिंटन खेळाला *परदेशी खेळ समजून* मोकळे होतात. 


परंतु या बॅडमिंटन खेळाचा जन्म हा बाहेरच्या देशात नव्हे तर चक्क 

पुण्यामध्ये झालेला आहे. तसे म्हणायला गेले तर बॅडमिंटन हा खेळ 'पुणेरी खेळ' आहे. इंग्रजांची सत्ता पुण्यामध्ये स्थापन झाल्यानंतर पुणे परिसरामध्ये  खडकी येथे इंग्रजांची कायमस्वरूपी छावणी होती. पुण्यातील खडकी येथे ऑल सेंट्स चर्च आहे. या ऑल सेंट्स चर्चच्या ईशान्य दिशेला 'फ्रियर रोड' आहे. या 'फ्रियर' रस्त्याच्या जागेवर पूर्वी एक मोकळी बखळ होती. हीच बखळ किंवा सध्याचा 'फ्रियर रोड' आजच्या जगप्रसिद्ध बॅडमिंटन या खेळाची जन्मभूमी. 


'खडकी' येथील छावणीमध्ये इंग्रज सैनिक त्यांना ज्यावेळेस कामांमधून निवांत वेळ मिळत असे तेव्हा छावणी मधील सध्याच्या 'फ्रियर रोड' येथील मोकळ्या जागेमध्ये दोघे जण किंवा दोन जोड्या एकमेकांच्या समोर उभे राहून वल्ह्याच्या आकाराच्या फळ्या बनवून बुचाची वर्तुळाकार चकती, बऱ्याच वेळेस यामध्ये दारूच्या बाटलीचे बूच असायचे. हे हवेत उडवून टोलवून खेळत असत. ही 'बुचाची चकती' खाली पडू न देता टोलविणे एवढाच या खेळाचा भाग होता. 


जेव्हा ही 'बुचाची चकती' वल्ह्यासारख्या फळीने हवेमध्ये उडवून मारली जात असे तेव्हा ही 'बुचाची चकती' हवेमध्ये स्पष्ट दिसावी यासाठी स्वतः खाऊन फस्त केलेल्या 'कोंबड्यांची पिसे' या 'बुचाच्या चकतीला' चिकटवित असत किंवा खोचून ठेवीत असत. या 'पिसे' लावलेल्या 'बुचाच्या चकतीला' गंमत म्हणून इंग्रज अधिकारी 'बर्ड' असे संबोधत असत. तसेच हा हवेमध्ये उडणारा 'पक्षी' सतत इकडून तिकडे फिरत असे म्हणून म्हणून त्याला 'येरझारा करणारा कोंबडा' किंवा  *शटल कॉक* असे म्हणत. अशा प्रकारे 'बॅडमिंटन' या खेळाचा जन्म झाला त्याला इंग्रजांनी  *पुना गेम* असे नाव दिले. 


इ.स १८७० साली काही इंग्रज सैनिक हे जेव्हा आपल्या घरी म्हणजेच 'इंग्लड' येथे जाण्यास निघाले तेव्हा मायदेशी जाणाऱ्या या इंग्रज सैनिकांनी 'बॅडमिंटन' या खेळाचे साहित्य म्हणजे खास 'पुणेरी शैलीने' बनवलेले 'शटल कॉक' म्हणजेच मराठी मधला 'येरझारा करणारा कोंबडा' आपल्या सोबत 'इंग्लंड' येथे घेऊन गेले. संपूर्ण भारतामधून पहिले विदेशात गेलेले 'क्रीडा साहित्य' हे *पुण्यामधून* गेले होते हे विशेष. तसेच भारतीय 'क्रीडा साहित्याची' ही पहिली 'निर्यात' होती. 


'पुणेरी शैलीमध्ये' बनवलेले 'शटल कॉक' हे 'इंग्लंड' मध्ये पोहोचले आणि तेथील सैनिकांमध्ये हा 'पुना गेम' अधिकाधिक प्रसिद्ध होऊ लागला. तेव्हा ह्या 'पुना गेम' बाबत *ग्लुस्टरशायर* या परगण्यात राहणाऱ्या *ड्युक ऑफ न्यू फोर्ट* हा राजघराण्याशी संबंधित असलेला उमराव याच्यापर्यंत ह्या पुना गेम बाबत बातमी जाऊन पोहोचली. हा 'उमराव' क्रीडाप्रेमी होता तसेच हा 'उमराव' सतत नवीन क्रीडाप्रकारांच्या शोधात असे. 


त्याच्या कानावर जेव्हा 'पुना गेम' बद्दल माहिती पोहोचली तेव्हा ज्या इंग्रज सैनिकांना 'पुना गेम' बद्दल माहिती होती त्या इंग्रज सैनिकांना आपल्या राहत्या घरी बोलवून घेतले. 'पुना गेम' माहिती असलेले इंग्रज सैनिक 'पुना गेम' कसा खेळायचा याचे प्रात्यक्षिक दाखवायला 'ग्लुस्टरशायर' येथे पोहोचले आणि त्यांनी 'उमरावाला' आणि आमंत्रित लोकांना जेव्हा 'पुना गेम' दाखवला. त्यांना तो इतका आवडला की त्याचे सगळ्या 'इंग्लंड' देशामध्ये फार कौतुक झाले आणि संपूर्ण 'इंग्लंड' देशामध्ये हा खेळ खेळला जाऊ लागला.


तसेच या 'पुना गेम' बद्दल कसे खेळतात याची प्रात्यक्षिके दाखवली गेली ते ठिकाण म्हणजे 'ड्युक ऑफ न्यू फोर्ट' यांचे 'बॅडमिंटन' गाव. इंग्लंडमधील 'बॅडमिंटन' गावी इंग्रजांनी 'पुना गेम' ह्या खेळाचे प्रात्यक्षिक दाखवले गेले  म्हणून तेथील लोकांनी या 'पुना गेम' या खेळाचे नाव 'गेम ऑफ बॅडमिंटन' असे केले. यामुळे पुण्यामध्ये जन्मलेल्या 'पुना गेम' हे नाव इंग्रजांनी पुसून टाकले. 


परंतु काही वर्षांमध्ये 'ईस्ट इंडिया कंपनी' सोबत येणाऱ्या अधिकाऱ्यांनी हा 'पुना गेम' म्हणजेच बॅडमिंटन' इ.स. १८७७ च्या सुमारास इंग्लंड येथून परत भारतामध्ये आणला. आणि या 'पुना गेम' म्हणजेच आत्ताचे 'बॅडमिंटन' या खेळाचे नियम तत्कालीन भारतामधील 'कराची' (सध्या पाकिस्तान) येथे या 'पुना गेम' उर्फ 'बॅडमिंटन' खेळाची नियमावली पुस्तिका बनवली गेली. आजपर्यंत या 'पुना गेम' म्हणजेच 'बॅडमिंटन' याच्या नियमावलीमध्ये फारच थोडे बदल करण्यात आलेले आहेत. 


*असा हा पुण्यातील 'खडकी' येथे जन्म झालेला 'पुना गेम' आज जगभर 'बॅडमिंटन' या नावाने प्रसिद्ध आहे.* हा खेळ पुण्याने जगाला दिलेली एक देणगीच आहे हे नक्की.


*संदर्भग्रंथ:-*


१. *क्रीडा ज्ञानकोश:*- सुरेशचंद्र नाडकर्णी

२. *A Journey To The Badminton World:- Zuyan Wang.*

३. *शहर पुणे एका सांस्कृतिक संचिताचा मागोवा*:- सुरेशचंद्र नाडकर्णी, संपादक अरुण टिकेकर, निळूभाऊ लिमये फाउंडेशन, २०००.

Monday, 21 August 2023

स्थानिक वैधमापन अधिकाऱ्यांकडूनवजन काट्यांची पडताळणी व मुद्रांकन बंधनकारक

 स्थानिक वैधमापन अधिकाऱ्यांकडूनवजन काट्यांची पडताळणी व मुद्रांकन बंधनकारक


             मुंबई, दि.21: वैधमापन शास्त्र अधिनियम 2009 व त्याखालील नियमांनुसार सर्व प्रकारचे वजन व काटे यांचे आयात, उत्पादन, दुरुस्ती अथवा विक्री करावयाची असल्यास वैधमापन शास्त्र यंत्रणेकडून उत्पादनासाठी उत्पादक परवाना, दुरूस्ती परवाना अथवा विक्रीसाठी परवाना घेणे आवश्यक आहे. सर्व वजनकाट्यांची स्थानिक वैधमापन अधिकाऱ्यांकडून पडताळणी व मुद्रांकन करून घेणे बंधनकारक आहे. वजनकाट्यांची वेळेत पडताळणी व मुद्रांकन झालेले आहे किंवा नाही याची खात्री करावी व याबाबत कुठलीही तक्रार असल्यास dyclmmumbai@yahoo.in येथे ई-मेल करावा, असे आवाहन सहनियंत्रक, वैधमापन शास्त्र, मुंबई यांनी केले आहे.


               परवाने न घेता राज्यात खुल्या बाजारात वजनकाट्यांची उत्पादन, दुरुस्ती व विक्री सुरु असल्याच्या तक्रारी वैधमापन शास्त्र विभागाकडे येत आहेत. तसेच चीनमधून येणाऱ्या अप्रमाणित वजनकाट्यांचीसुद्धा कमी दरात राज्यात खुल्या बाजारात विक्री केली जात आहे. या काट्यांना राज्य किंवा केंद्र शासनाची वैधानिक मान्यता नाही. सदरचे वजनकाटे अप्रमाणित असल्यामुळे ग्राहकहित साधले जात नाही. तसेच बाजारात अनधिकृत व्यक्ती त्यांचे स्टीकर वजनकाट्यांना लाऊन त्यांची अनधिकृत विक्री करीत आहेत. तरी ग्राहकहिताच्या दृष्टिकोनातून व्यापारी वर्ग, वजनमाप उपयोगकर्ते व ग्राहकांनी परवानाधारक व्यक्तीकडूनच वजन काट्यांची खरेदी अथवा दुरूस्ती करावी, असे आवाहनही सीमा बैस, सहनियंत्रक, वैधमापन शास्त्र विभाग यांनी केले आहे.


0000

राज्यातील सर्व गोवंशीय पशुधनाचे ७ दिवसांत१०० टक्के लसीकरण करावे

 राज्यातील सर्व गोवंशीय पशुधनाचे ७ दिवसांत१०० टक्के लसीकरण करावे


- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील


 


            मुंबई, दि. २१ : राज्यातील गोवंशीय पशुधनामध्ये विषाणूजन्य व संसर्गजन्य लम्पी चर्मरोगाचा प्रादूर्भाव झाला आहे. या रोगाचा प्रादूर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात लम्पी चर्मरोग प्रतिबंधात्मक लसीकरण ७३ टक्के करण्यात आले आहे. उर्वरित लसीकरण ७ दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना सर्व संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. लसीकरण करून घेण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची राहील, असे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.


            मंत्री श्री. विखे पाटील यांनी रॉयल स्टोन या शासकीय निवासस्थान येथून राज्यातील लम्पी चर्मरोगाविषयी दूरदृश्यप्रणालीद्वारे आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे सचिव तुकाराम मुंडे उपस्थित होते. दूरदृश्यप्रणालीद्वारे आयुक्त हेमंत वसेकर यांच्यासह सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, कृती दलाचे सदस्य उपस्थित होते.


आतापर्यंत ७३ टक्के गोवर्गीय पशुधनाचे Goat Pox लसीकरण


            मंत्री श्री विखे पाटील म्हणाले की, राज्यात एकूण १ कोटी ४१ लाख गोवर्गीय पशुधन आहे. आतापर्यंत ७३ टक्के गोवर्गीय पशुधनाचे गोट पॉक्स (Goat Pox) लसीकरण झाले आहे. १.०२ कोटी उर्वरित लसीकरण एक आठवड्यात पूर्ण करण्यासाठी नियोजनाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात मार्च २०२३ ते २० ऑगस्ट २०२३ पर्यंत एकूण ३२ हजार ७० पशुधन लम्पी बाधित आहे. त्यापैकी २० हजार ८९८ बरे झाले असून सक्रिय रुग्ण ८हजार ६२३, मृत पशुधन २ हजार ७७५ सक्रिय पशुरुग्ण असणारे जिल्हे २५ असून, सन २०२३-२४ मध्ये १.४१ कोटी लसी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.


पशुपालकांमध्ये जागरुकता निर्माण करणे आवश्यक


            मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, ग्रामपंचायत व नगरपंचायत यांच्याकडील यंत्रणेच्या मदतीने बाह्य कीटक नियंत्रणासाठी (Vector Control) उपाययोजना तातडीने व नियमितपणे राबविण्याची आवश्यकता आहे. यासाठी परिसरामध्ये वेळोवेळी फवारणी व स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.


            स्थानिक स्वराज्यसंस्थांच्या मदतीने या रोगाबाबत पशुपालकांमध्ये जागरुकता निर्माण करणे आवश्यक आहे, ज्यामध्ये रोगाची माहिती त्वरित देणे, बाधित जनावरांचे विलगीकरण, गोठ्यांची व परिसराची स्वच्छता इत्यादीबाबत पशुपालकांना ग्रामसभांच्या माध्यमातून माहिती द्यावी.


भरपाईच्या प्रस्तावांना तत्काळ मान्यता


            या रोगाने मृत्यूमुखी पडणाऱ्या पशुधनाची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने करण्यासाठी ग्रामपंचायत यंत्रणेचा सहभाग घ्यावा. केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार, विलगीकरण, प्रतिबंधात्मक उपाययोजना व मृत पशुधनाची विल्हेवाट इत्यादींबाबत काटेकोर पालन करावे.


            सन २०२३-२४ मध्ये या आजाराने मृत पावलेल्या पशुधनाच्या मालकांना नुकसानभरपाई देण्याबाबत जिल्हास्तरीय समितीकडून पात्र प्रस्तावांना मान्यता देण्याबाबतची कार्यवाही तत्काळ करावी.


            बाजार भरविण्यासंदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांना प्रतिबंध करण्यासंबंधीचे निर्देश


            आंतरराज्य, आंतरजिल्हा बाधित जनावरांच्या वाहतुकीच्या अनुषंगाने या गोवंशीय पशुंचे २८ दिवसांपूर्वी लसीकरण झालेले नाही, अशा पशुधनाच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यासंबंधीचे तसेच आवश्यकतेनुसार बाजार भरविण्यासंदर्भात प्रतिबंध करण्यासंबंधीचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचे मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले.


दिरंगाई केल्यास तत्काळ कारवाई करणार


            सचिव श्री. मुंडे म्हणाले की, लंपी चर्म रोग हा केवळ गोवंश वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. हा रोग कीटकांपासून पसरतो. हा आजार गाई व बैलांपासून किंवा गाईच्या दुधापासून मानवामध्ये संक्रमित होऊ शकत नाही. त्यामुळे भीती बाळगू नये. मृत पशुधनाविषयी प्रत्यक्षात अधिकाऱ्यांनी तपासणी करावी. साथीचे इतरही आजार पशुधनास होऊ शकतात, यावरही उपचार करावेत. कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत असतील, तर आयुक्त किंवा आपण स्वत: उपलब्ध राहू. लम्पी आजार निर्मूलनासाठी सबंधित कोणत्याही स्तरावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिरंगाई केल्यास तत्काळ कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


0000

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतूनआता खतांसाठीही 100 टक्के अनुदान मिळणार

 भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतूनआता खतांसाठीही 100 टक्के अनुदान मिळणार

- कृषीमंत्री धनंजय मुंडे

           

            मुंबई, दि. 21 : राज्याचे माजी कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने फलोत्पादन विभागाकडून सुरू असलेल्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत 15 फळ पिकांचा समावेश करण्यात आला असून या अंतर्गत खड्डे खोदणेठिबक सिंचन यासारख्या कामांना 100 टक्के अनुदान देण्यात येते. त्याचबरोबर आता या योजनेतून आवश्यक खतांसाठी देखील 100 टक्के अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

            फळबाग लागवड अंतर्गत ठिबक सिंचन करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून अनुदान देण्यात येते. त्यामुळे आता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून ठिबक ऐवजी सर्व प्रकारच्या आवश्यक खतांसाठी 100 टक्के अनुदान देण्यात येणार असून यासाठी अर्थसंकल्पात 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंतीच्या दिवशी घोषित केली आहे.

            राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करत मंत्री श्री. मुंडे यांनी आवश्यकता भासल्यास 100 कोटींच्या तरतुदीमध्ये आणखी वाढ करण्यात येईल, अशी माहिती देखील ट्विटर द्वारे दिली आहे.

            राज्य सरकारने 06 जुलै2018 रोजी भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना राबविण्यास मान्यता दिलेली असून या अंतर्गत 15 फळ पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. खड्डे खोदणेकलमे लागवड करणेपीक संरक्षणनांग्या भरणेठिबक सिंचनाद्वारे पाणी देणेइत्यादी कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना शासन 100 टक्के अनुदान देते.

            यापैकी ठिबक सिंचनाचे अनुदान राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून मिळत असल्यानेभाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये ठिबक सिंचन ऐवजी आता सर्व प्रकारच्या खतांसाठी 100 टक्के अनुदान दिले जाणार आहे.

धनगर, मेंढपाळ बांधवांची भटकंती थांबवण्यासाठीकाळानुरुप सुधारणा आवश्यक

 धनगर, मेंढपाळ बांधवांची भटकंती थांबवण्यासाठीकाळानुरुप सुधारणा आवश्यक


- उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार

            मुंबई, दि. २१ :- धनगर, मेंढपाळ बांधवांची फिरस्ती थांबवून त्यांच्या जीवनात काळानुरुप सुधारणा केली पाहिजे. त्याअनुषंगाने मेंढ्यांच्या पालन-पोषणासाठी चराई क्षेत्रालगतची जमीन अर्धबंदिस्त निवाऱ्यासाठी प्रायोगिक तत्वावर उपलब्ध करुन दिल्यास मेंढपाळ, धनगर बांधवांच्या सामाजिक, आर्थिक विकासासाठी उत्पन्नाचा शाश्वत स्रोत निर्माण होऊ शकेल. यादृष्टीने पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाने आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिल्या.


            राज्यातील धनगर, मेंढपाळ समाजाच्या समस्या सोडवणे तसेच विकासयोजनांच्या अंमलबजावणीबाबत आज उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बैठकीला माजी खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार दत्तात्रय भरणे, मेंढपाळ धनगर विकास मंचचे अध्यक्ष संतोष महात्मे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, वनविभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या सचिव अंशू सिन्हा, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढे, पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त डॉ. एच. एस. वसेकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शशांक कांबळे आदींसह वरिष्ठ अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत मेंढपाळ धनगर विकास मंचाच्या वतीने धनगर बांधवांच्या समस्यांबद्दल सादरीकरण करण्यात आले.


            वाढत्या शहरीकरणामुळे गायरान जमिनी, चराऊ कुरणे आदी क्षेत्र कमी होऊ लागले आहे. चराऊ क्षेत्राची कमतरता ही धनगर समाजाची मोठी समस्या आहे. पावसाळ्यात शेतात पिके असतात आणि चारा उपलब्ध नसतो. अशा परिस्थितीत मेंढ्यांसाठी अर्धबंदिस्त निवाऱ्याची व्यवस्था प्रायोगिक तत्वावर उपलब्ध करुन दिल्यास अनेक प्रश्न सुटू शकतील. अर्धबंदिस्त निवाऱ्यामुळे मेंढ्यांचं आरोग्य सुधारुन त्यांचं वजन वाढेल. मेंढ्यांच्या उत्तम संकरीत जाती निर्माण करणे शक्य होईल, यादृष्टीनं विचार करण्यात यावा. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध केला जाईल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिला.


००००

गिरणी कामगारांच्या घरांसाठीच्या अर्जांची छाननी तीन महिन्यांत पूर्ण करावी

 गिरणी कामगारांच्या घरांसाठीच्या अर्जांची छाननी तीन महिन्यांत पूर्ण करावी


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश


            मुंबई, दि. 21 : गिरणी कामगारांच्या घरांसाठी प्राप्त अर्जांची छाननी प्रक्रिया तीन महिन्यात पूर्ण करावी. मुंबईत घरे देता यावी याकरिता घरांचा साठा वाढवावा, तसेच ठाणे व राजगोळी, कोन-पनवेल येथील घरांची तातडीने दुरुस्ती करून पाच हजार घरांची लॉटरी प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश देतानाच गिरणी कामगारांच्या घरांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.


            सह्याद्री अतिथीगृह येथे गिरणी कामगारांच्या प्रश्नांसदर्भात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार धैर्यशील माने, राहुल शेवाळे, आमदार सर्वश्री कालिदास कोळंबकर, सदा सरवणकर, प्रकाश सुर्वे, अतुल भातखळकर, सुनील राणे, प्रकाश आबिटकर, मंगेश कुडाळकर, प्रकाश आवाडे, माजी आमदार नरसय्या आडम, मुख्य सचिव मनोज सौनिक, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, गोविंदराज, एमएमआरडीएचे मुख्य नियोजनकार मोहन सोनार यांच्यासह गिरणी कामगारांच्या विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले की, गिरणी कामगारांना, त्यांच्या वारसांना हक्काची घरे मिळाली पाहिजे ही सरकारची प्रामाणिक भूमिका आहे. त्यासाठी कार्यवाहिला गती देण्यात आली असून गेल्या काही महिन्यांत दोन टप्प्यांत गिरणी कामगारांना सदनिकेच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले आहे. गिरणीकामगार, त्यांच्या वारसांनी आता पर्यंत सुमारे १ लाख ७४ हजार अर्ज म्हाडाकडे केले आहेत. त्यांची छाननीप्रक्रिया अधिक गतिमान करण्याचे निर्देश दिले असून ही छाननीप्रक्रिया तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पात्र- अपात्र संख्या निश्चित होऊ शकेल.


            कोन-पनवेल येथील घरांची दुरुस्ती तातडीने पूर्ण करावी, तसेच ठाणे राजगोळी येथील सदनिकांची दुरुस्ती एमएमआरडीएने तातडीने हाती घ्यावी, जेणेकरून त्याठिकाणच्या पाच हजार घरांची लॉटरी काढण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोन - पनवेल येथील घरांची सोडतप्रक्रिया पूर्ण करुन कामगारांना दसऱ्यापर्यंत सदनिकांची चावी देण्यात यावी, असे मुख्यमंत्री म्हणाले.


            मुंबईत ‘टेक्स्टाईल मिल’ म्युझियमचे काम तातडीने सुरू करावे, अशा सूचना मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आल्या. याठिकाणी गिरणी कामगारांच्या मुला-मुलींना काम देण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.


            मुंबई महानगर क्षेत्रात गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी कल्याण तालुक्यात सुमारे २१ हेक्टर जागा उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले असून त्याबाबतचा प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळासमोर सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.


            प्रधानमंत्री आवास योजनेतून गिरणी कामगारांना घरे देण्याच्या विकल्पाबाबत यावेळी सादरीकरण करण्यात आले. त्याचबरोबर सोलापूर, नागपूर, कोल्हापूर, सातारा येथील मूळ रहिवासी असलेल्या गिरणी कामगारांच्या घरांबाबत त्यांच्या इच्छेनुसार मुंबईबाहेर घरे देण्याबाबतही चर्चा करण्यात आली.


            गेल्या काही महिन्यांत गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी ज्या गतिमानपणे कार्यवाही सुरू आहे, त्याबद्दल उपस्थित लोकप्रतिनिधी आणि गिरणी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी समाधान व्यक्त करत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.


दिवाळी अंकासोबतची अनोखी भेट !(भवताल दिवाळी अंकाच्या

 



दिवाळी अंकासोबतची अनोखी भेट !(भवताल दिवाळी अंकाच्या
गोष्टी- २)

‘भवताल’ ने भेट म्हणून दिलेला दगड, पाणी, बिया आम्ही जपून ठेवल्या आहेत...’ मध्यंतरी एक वाचक भेटले. त्यांनी हे आवर्जून सांगितले. हे एकच वाचक नव्हेत, तर अनेक जणांनी ही भेट जपून ठेवली आहे. काय आहेत या भेटी, त्याच्यामागचे धोरण / कारण आणि त्या प्रत्यक्षात कशा अस्तित्त्वात आल्या? त्याचीच ही गोष्ट.


नागरिकांना निसर्ग, पर्यावरणाच्या घटकांशी जोडणे, त्याद्वारे त्याबाबतची सजगता निर्माण करणे आणि त्या अनुषंगाने काही तरी कृती करण्यासाठी प्रवृत्त करणे हा ‘भवताल’ च्या विविध उपक्रमांमागचा प्रमुख उद्देश. हे करण्यासाठी लोकांना आपल्या उपक्रमांकडे आकर्षित करावे लागते. मग दिवाळी अंकाच्या दृष्टीने असे काय करता येईल, जेणेकरून लोक अंकाकडे आणि त्याच्या विषयांकडे आकर्षित होतील?... याबाबत सतत विचार सुरू असतो. त्यातून काही भन्नाट कल्पना प्रत्यक्षात आल्या आहेत. त्याची सुरुवात झाली, २०१६ च्या ‘दगडांच्या देशा’ या खडक विशेषांकापासून.


खडक या विषयावर संपूर्ण अंक काढणे ही कल्पनाच लोकांना आश्चर्याची वाटली होती. त्याच्यासोबतची भेट हा तर मोठा चर्चेचा विषय बनला आणि ‘भवताल’ बद्दल अनेकांच्या मनात कुतूहल निर्माण झाले. आपला खडक समजून घेताना त्याची छोटीशी झलक पाहता आली, हाताळला आली तर किती मजा येईल? असा विचार माझ्या मनात आला. लहानपणी कधीतरी पुस्तकांच्या प्रदर्शनात एका पुस्तकमध्ये असाच एक खडा पाहिला होता. कदाचित, तेसुद्धा मनावर कुठेतरी कोरले गेले असेल. दगडांच्या अंकावर काम करत असताना हा विचार उफाळून आला.


काय देऊया - कसं देऊया? याचे नियोजन सुरू झाले. अंकासोबत काय द्यायचे? याची स्पष्ट कल्पना होती. आपल्याकडे आढळणाऱ्या काळ्या खडकात अनेक पोकळ्या असतात. त्यामध्ये अतिशय सुंदर दिसणारे, विविधरंगी स्फटिक सापडतात. प्रत्येक स्फटिक दुसऱ्यापेक्षा वेगळा. असे हजारो-लाखो, नव्हे अगणित स्फटिक खडकात दडलेले आहेत. तेच अंकासोबत द्यायचे, हे पक्के केले.


पण हे आणायचे कुठून? त्या वेळी एकच नाव डोळ्यापुढे आले- श्री. महंमद मक्की. ते आपल्याकडील खनिजांचे, स्फटिकांचे संग्राहक. महाराष्ट्रातील खनिजांबरोबरच जगभरातील विविध खनिजे, जीवाश्म व अशा कितीतरी धमाल गोष्टींचा संग्रह त्यांच्याकडे आहे. आपल्याकडील खनिजे ते जगभरच्या प्रदर्शनांमध्ये पोहोचवतात. काही खनिजे एक्पोर्टही करतात. विशेष म्हणजे हे सारं लोकांनी पाहावं, हाताळावं, त्याचा अनुभव घ्यावा यासाठी ते प्रयत्नशील असतात. प्रदर्शने भरवतात, असे संच शाळांना भेट देतात. त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्याकडे फारच उत्कृष्ट स्फटिक असतात. त्यातून निघालेले, उरलेले छोटे तुकडे आमच्यासाठी पुरेसे होते. त्यांनाही ही कल्पना आवडली आणि त्यांच्याकडील असे उरलेले मटेरियल देऊ केले.


काय द्यायचे ते मिळवले खरे, पण अंकासोबत द्यायचे कसे? त्यावर बराच काथ्याकूट करावा लागला. तरीही मार्ग निघत नव्हता. श्री. मक्की यांनी सुचवल्यानुसार एकांकडून सव्वा इंच बाय सव्वा इंच या आकाराच्या जाड कागदाच्या दर्जेदार डब्या विकत घेतल्या. दुसरीकडे खड्यांपैकी आकर्षक, पण आकाराने लहान (डबीत बसतील असे) स्फटिक निवडले. ते डब्यांमध्ये चिकटवले. अर्थातच, ही प्रक्रिया वेळखाऊ होती आणि खर्चिकसुद्धा! पण त्यातूनही मार्ग निघाला. पुढचा प्रश्न होता. या डब्या स्फटिकांसकट अंकासोबत द्यायच्या कशा?


त्यासाठी अंकाच्या पॅकिंगवर काम करावे लागणार होते. स्फटिक असलेली डबी अंकातच खाच करून बसवावी, असा विचार आला. प्रत्यक्षात अंकाची जाडी आणि डबीची जाडी यांचा मेळ बसत नव्हता. डबी जवळपास दुप्पट जाडीची होती. अंकाची छपाई, बाइंडिंग, पॅकेजिंग अशा गोष्टींची जबाबदारी असणारा श्री. सतीश पड्ये विविध कल्पना लढवित होता, पण प्रश्न काही सुटत नव्हता. अंक छापून घेणे, त्याच्याच बरोबरीने यातून मार्ग काढणे अशी दुहेरी जबाबदारी त्याच्यावर होती. शेवटी त्यानेच मार्ग काढला. पुठ्ठा व फोम वापरून एक पॅड तयार केले. त्यात अंक बसवला. त्याच्या वरच्या बाजूला पुठ्ठ्यामध्ये खाच करून डबी बसेल अशी रचना केली. फोम व अंक यांची एकूण जाडी स्फटिकाच्या डबीइतकी भरत होती. हे सारं एकत्र राहण्यासाठी वरून कव्हरची आवश्यकता होती. शिवाय अंकाचे कव्हर आणि त्याच्यासोबतचा स्फटिकही दिसायला हवा... त्यामुळे नाइलाजाने कव्हर म्हणून प्लास्टिकची पिशवी वापरावी लागली.


मार्ग निघाला. अंक, स्फटिक, सारं व्यवस्थित बसलं. अंकाच्या या पॅकची जाडी दुप्पट झाली. पण त्याला इलाज नव्हता. हे सारं वाचकांच्या पसंतीला उतरलं. अनेक जण ‘भवताल’ च्या दिवाळी अंकाशी जोडले गेले. त्याच वेळी काहींनी प्लास्टिक वापरल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली. आम्हीही ती नम्रपणे स्वीकारली.


पुढच्या वर्षी देवराई विशेषांक होता. त्याच्यासोबत आपल्याकडील वनस्पतींच्या (वेली, वृक्ष, झुडपे) यांच्या बिया देण्याचे ठरले. एका छोट्या डबीत अशा पाच प्रकारच्या बिया दिल्या. त्यातल्या गुंजेच्या बियांमुळे सर्वच बियांमध्ये रंग भरला गेला.


त्या पाठोपाठच्या अंकाचा विषय होता, परंपरागत जलव्यवस्था! या निमित्ताने सिंहगडावरील सुमारे सातशे-आठशे वर्षे जुन्या देव टाक्याचे पाणी देण्याचे ठरले. त्यानुसार काचेच्या कुप्यांमध्ये पाणी भरून ते प्रत्येक अंकासोबत भेट म्हणून दिले.


अंकातील दर्जेदार मजकूर, त्याची मांडणी उत्कृष्ट, छपाईसुद्धा कुठेही तडजोड नाही हे केल्यावरही अशी भेट देण्याचा विचार... म्हणजे, वाचकांना अधिकाधिक देण्याची इच्छा! त्यातून त्यांना आनंद मिळत असेलच, पण ‘भवताल’ टीमला त्यापेक्षा कितीतरी जास्त आनंद मिळतो, हे निश्चित!


- अभिजित घोरपडे


संस्थापक - संपादक, भवताल


 


(‘भवताल’ ची जडणघडण आणि प्रवासाबाबत वाचकांना माहिती देण्यासाठी हा उपक्रम...)


( क्रमश: )



--



भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and 

sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com

Featured post

Lakshvedhi