Wednesday, 26 July 2023

राष्ट्रीय कृषी विकास योजनेसह राष्ट्रीय कृषी यांत्रिकीकरण

 राष्ट्रीय कृषी विकास योजनेसह राष्ट्रीय कृषी यांत्रिकीकरणअभियानातील लाभार्थींचे अनुदान लवकरच देणार


- कृषीमंत्री धनंजय मुंडे


            मुंबई, दि. 26 : राष्ट्रीय कृषी विकास योजना व राष्ट्रीय कृषी यांत्रिकीकरण अभियानातील अनुदान वितरण करण्याची प्रक्रिया सुरू असून, उर्वरित लाभार्थींचे अनुदानही लवकरच वितरित करण्यात येणार असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत दिली.


                 चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रीय कृषी यांत्रिकीकरण अभियानांतर्गत पात्र लाभार्थींना कृषी साहित्यांचे अनुदान मिळणेबाबतचा प्रश्न सदस्य प्रतिभा धानोरकर यांनी उपस्थित केला होता.


                 मंत्री श्री. मुंडे म्हणाले की, सन 2023 24 या आर्थिक वर्षात मे 2023 पर्यंत कृषी यांत्रिकीकरण उपअभियानांतर्गत 383, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेतील 181 व राकृवियो अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण प्रकल्प अंतर्गत 99 लाभार्थी अनुदानासाठी प्रलंबित होते. या लाभार्थींपैकी कृषी यंत्रिकीकरण उपअभियानातील 121 लाभार्थींचे, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेतील 64, तसेच राकृवियो अंतर्गत कृषी यंत्रिकीकरण प्रकल्पअंतर्गत 38 लाभार्थींच्या अनुदानाचे वितरण करण्यात आलेले आहे. निधी उपलब्धतेनुसार उर्वरित लाभार्थींना अनुदान देण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याचे मंत्री श्री. मुंडे यांनी सांगितले.


            या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सुभाष देशमुख यांनी सहभाग घेतला.


***


प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत पात्र लाभार्थींच्या फेरनोंदीबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा

 प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत पात्र  लाभार्थींच्या फेरनोंदीबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा


- ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन


            मुंबई, दि. 26 : सर्वसामान्यांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत प्रपत्र 'ड' मध्ये तांत्रिक कारणामुळे अपात्र ठरलेल्या लाभार्थींपैकी पात्र असलेल्या लाभार्थींच्या नोंदी पुन्हा करण्याकरिता केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे, असे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत सांगितले.


            ‘राज्यातील घरकुल योजनेतील अडचणी’ यासंदर्भात विधानसभा सदस्य समीर कुणावर यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती.


            मंत्री श्री. महाजन म्हणाले की, देशातील प्रत्येक नागरिकाला हक्काचे घर मिळावे, म्हणून केंद्राच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य शासनाकडून रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवाज योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना यांसारख्या घरकुल योजना सुरू आहेत.


            याशिवाय इतर मागासवर्गीय प्रवर्गातील लोकांना पक्के घर उपलब्ध व्हावे, यासाठी १० लाख घरे बांधण्याचे नियोजन करण्यात आले असून यासाठी १२ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.


            विविध घरकुल योजनांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे, असेही मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी विधानसभेत सांगितले.


राज्यातील पॅथॉलॉजी लॅब नोंदणीबाबत धोरण ठरवणार

 राज्यातील पॅथॉलॉजी लॅब नोंदणीबाबत धोरण ठरवणार


- प्रा. डॉ.तानाजी सावंत


              मुंबई, दि. 26 : राज्यातील पॅथॉलॉजी लॅब नोंदणीबाबत धोरण ठरवण्यासाठी आरोग्य विभागाचे अतिरिक्त सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येणार आहे, असे आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.


             "सांगली येथील वैदय योगेश माहिमकर यांनी केलेल्या एका प्रयोगात त्यांच्याकडे येत असलेल्या मधुमेहग्रस्त रुग्णांचे रक्त सांगलीमधील वेगवेगळ्या ४ नामांकित लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविले, त्यानंतर या चारही लॅबचे रिपोर्ट हे वेगवेगळे असल्याचे धक्कादायक प्रकार निदर्शनास आले आहेत. अशा लॅबवर शासन काय कारवाई करणार ? अशी लक्षवेधी विधानपरिषद सदस्य अनिकेत तटकरे यांनी मांडली होती.त्याला उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रा. डॉ.तानाजी सावंत बोलत होते.


            आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत म्हणाले की, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील वैद्य योगेश माहिमकर हे मागील १८ ते १९ वर्षांपासून बाहयरुग्ण विभागांतर्गत आयुर्वेदिक प्रॅक्टीस करीत आहेत. त्यांनी एकाच मधुमेही रुग्णाचे रक्तनमुने सांगलीतील चार वेगवेगळ्या नामांकित लॅबमध्ये पाठवले आणि त्या चारही लॅबमधील रिपोर्टमध्ये खूप मोठी तफावत दिसून येत असल्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल केली आहे, परंतु त्यासंबंधी त्या कोणत्याही आस्थापनांकडे उदाहरणार्थ सिविल सर्जन किंवा महानगरपालिका यांच्याकडे कोणत्याही प्रकारची लेखी तक्रार केली नाही. त्यामुळे या विषयाबाबत चौकशी करण्यात आलेली नव्हती. मात्र हे प्रकरण नागरिकांच्या जीविताशी निगडित असल्याने संबंधित विषयाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमून यामध्ये दोषी असणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याबाबत सूचना देण्यात येतील.


             आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत म्हणाले की, सद्यस्थितीत पॅथॉलॉजी लॅब रजिस्ट्रेशनचा कोणताही कायदा राज्यामध्ये लागू नाही. त्यामुळे प्रयोगशाळांची नोंदणी राज्यातील कोणत्याही आस्थापनेमध्ये होत नाही.राज्यातील सर्व पॅथॉलॉजी लॅब नोंदणीबाबत धोरण ठरवण्यासाठी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येणार आहे. त्यानुसार त्याबाबत एक निश्चित नियमावली तयार करण्यात येईल, असेही ते म्हणाले.


            या लक्षवेधीच्या चर्चेत विधान परिषद सदस्य प्रवीण दरेकर, भाई गिरकर, भाई जगताप,अॅड अनिल परब यांनी सहभाग घेतला.


*****

केस गळती थांबवा.*

 *केस गळती थांबवा.*



*आवळ्याचे चुर्ण तयार करुन हे चुर्ण दह्यात मिसळून घ्‍यावे. यानंतर आवळा आणि दह्याची पेस्‍ट तयार करून केसाच्‍या मुळाला लावावी. एका तासानंतर केस स्‍वच्‍छ धुवावेत. आठवड्यातून दोन वेळा हा प्रयोग केल्‍यानंतर डोक्‍यावर केस यायला लागतील.


*शिकाकाईच्‍या बीयामध्‍ये थोडे पाणी टाकून बारिक करून घ्‍यावे. रात्रभर पेस्‍ट थंड असेलल्‍या ठिकाणी ठेवावी. सकाळी हे पेस्‍ट केसाला लावून अर्ध्‍या तासानंतर केस स्‍वच्‍छ करावे. हे पेस्‍ट केसासाठी नॅचरल शॅम्‍पूचे काम करते. याचा वापर वारंवार केल्‍यानंतर केस गळतीची समस्‍या दूर होते.


*जास्‍वदांच्‍या फुलाचा रस काढून घ्‍या. या रसाने केसाची मसाज करा. एका तासानंतर केस स्‍वच्छ करावेत. केस दाट होण्‍याबरोबरच काळे होतात.


*जटामांसी या वनस्पतीला नारळाच्‍या तेलामध्‍ये उकळून हे तेल थंड झाल्‍यानंतर बॉटलमध्‍ये भरावे. रोज रात्री हे तेल डोक्‍याला लावल्‍यानंतर केस गळणार नाहीत.


*झेंडूचे फुल बारीक करून त्‍याचा रस काढा. हा रस नारळाच्‍या तेलात टाकून उकळून घ्‍या. हे तेल थंड झाल्‍यानंतर बाटलीत भरून ठेवा. हे तेल रोज केसाला लावल्‍यानंतर केस गळणार नाहीत.


 *ऑलिव्ह ऑइल मध्‍ये एक चमचा मध आणि एक चमचा दालचीनी व एक चमचा जेष्ठमध पावडर टाकून पेस्‍ट तयार करावी. स्‍नान करण्‍याआगोदर ही पेस्‍ट डोक्‍याला लावावी. पंधरा मिनिटा नंतर केस कोमट पाण्‍याने स्‍वच्‍छ करावेत. काही दिवसात केस गळती बंद होईल.


*दोन लीटर पाण्‍यामध्‍ये आवळ्याचे चुर्ण, लिंबाची पाने टाका. दोन लीटर पाणी आर्धे होईपर्यंत उकळत ठेवा. या पाण्‍याने आढवड्यातून दोन वेळा केस स्‍वच्‍छ करा. यामुळे केस गळती थांबते.


*माहिती आवडली असेल तर इतर ग्रुपवर शेअर करा 📲*




पीएम किसान योजनेतील लाभार्थींना 14 व्या हप्त्याचे गुरुवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण

 पीएम किसान योजनेतील लाभार्थींना 14 व्या हप्त्याचे

गुरुवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण


            मुंबई दि. 26 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. 27 जुलै रोजी सकाळी 11 वाजता राजस्थानमधील सिकर येथे केंद्रीय कृषी मंत्रालयाच्यावतीने आयोजित 'पीएम किसान संमेलन' कार्यक्रमाच्या निमित्ताने पीएम किसान सन्मान योजनेतील 8.5 कोटी लाभार्थींच्या खात्यावर पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्याची रक्कम एका क्लिकद्वारे वितरित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी वेबलिंकच्या माध्यमातून सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत केले.


            प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या संकल्पनेतून सन 2019 मध्ये शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने पीएम किसान सन्मान योजना सुरू करण्यात आली. याद्वारे देशातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना, त्यांच्या बँक खात्यात दरवर्षी 6 हजार रुपयांचे अर्थसहाय्य तीन हप्त्यात देण्यात येते.


            या योजनेच्या माध्यमातून प्रत्येकी 2 हजार रुपयांचे एकूण 13 हप्ते 11 कोटी शेतकऱ्यांना अशी एकूण 2 लाख 42 हजार कोटी रुपये रक्कम आतापर्यंत वितरित करण्यात आली असून, गुरुवारी 14 व्या हप्त्यापोटी साडे आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 18 हजार कोटी रुपये निधी वितरित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या किसान संमेलनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री श्री. मोदी हे देशातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.


            या कार्यक्रमात राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी वेबलिंकच्या माध्यमातून सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी मंत्री श्री. मुंडे यांनी केले आहे.


            किसान संमेलनाची वेबलिंक - http://pmevents.ncog.gov.in/ अशी आहे.


००००

खंडकरी शेतकरी वाटप जमिनीचा भोगवटा वर्ग १ करण्याच्या प्रस्तावावर लवकरच धोरणात्मक निर्णय

 खंडकरी शेतकरी वाटप जमिनीचा भोगवटा

वर्ग १ करण्याच्या प्रस्तावावर लवकरच धोरणात्मक निर्णय


- महसूल मंत्री विखे पाटील


            मुंबई, दि. 26 : खंडकरी शेतकरी यांना वाटप करण्यात आलेल्या क्षेत्राचा दर्जा भोगवटा वर्ग २ असा निश्चित करण्यात आला आहे. अशा जमिनींचा भोगवटा वर्ग - २ वरून भोगवटा वर्ग - १ करण्याबाबतचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर ठेवून धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत सांगितले.


            राज्यातील पुणे, अहमदनगर, सोलापूर, नाशिक, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद या सात जिल्ह्यांमधील महाराष्ट्र शेती महामंडळ कामगारांच्या अडचणी संदर्भात विधानसभा सदस्य दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती.


            मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, शेती महामंडळाच्या 14 मळ्यांवरील कामगारांना पायाभूत सुविधा, त्यांना हक्काचे घर उपलब्ध व्हावे, म्हणून शेती महामंडळाकडे शिल्लक असलेल्या जमिनीपैकी घरकुलसाठी काही जागा देण्यात यावी अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. या सर्व कामगार बांधवांना हक्काचे घर उपलब्ध व्हावे, यासाठी शासन सकारात्मक असून याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.


0000

नाशिक शहरातील तत्कालीन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनासक्तीच्या रजेवर पाठविणार

 नाशिक शहरातील तत्कालीन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनासक्तीच्या रजेवर पाठविणार


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            मुंबई, दि. २६ : नाशिक जिल्ह्यातील गंगापूर पोलिस ठाण्याचे तत्कालिन वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलेश माईणकर यांची सहपोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत एक महिन्याच्या आत चौकशी केली जाईल आणि तोपर्यंत संबंधित अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. तसेच सरकारी कर्मचारी यांच्यावर होणाऱ्या हल्ल्याप्रकरणी असलेल्या कलम ३५३ (अ) तरतुदीचा दुरुपयोग होत असल्यास पुढील तीन महिन्यांत यामध्ये सुधारणा केली जाईल, असे त्यांनी सांगितले.


            सदस्य सुहास कांदे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उत्तर दिले.


            ते म्हणाले की, सरकारी कर्मचारी यांच्यावर सातत्याने होणारे हल्ले लक्षात घेऊन ही तरतूद सन २०१७ मध्ये करण्यात आली होती. त्यांनाही कामकाज करताना संरक्षण असावे आणि या तरतुदीचा गैरफायदाही घेतला जाऊ नये, ही राज्य शासनाची भूमिका आहे. त्यामुळे यामध्ये निश्चितपणे सुधारणा केली जाईल, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.


            दरम्यान, नाशिक शहरातील तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येईल. संबंधित पोलीस अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे असलेल्या स्थावर आणि जंगम मालमत्तेची चौकशी करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.


            यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य यशोमती ठाकूर, भास्कर जाधव, आशिष जयस्वाल, देवयानी फरांदे आदींनी सहभाग घेतला.

Featured post

Lakshvedhi