खंडकरी शेतकरी वाटप जमिनीचा भोगवटा
वर्ग १ करण्याच्या प्रस्तावावर लवकरच धोरणात्मक निर्णय
- महसूल मंत्री विखे पाटील
मुंबई, दि. 26 : खंडकरी शेतकरी यांना वाटप करण्यात आलेल्या क्षेत्राचा दर्जा भोगवटा वर्ग २ असा निश्चित करण्यात आला आहे. अशा जमिनींचा भोगवटा वर्ग - २ वरून भोगवटा वर्ग - १ करण्याबाबतचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर ठेवून धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत सांगितले.
राज्यातील पुणे, अहमदनगर, सोलापूर, नाशिक, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद या सात जिल्ह्यांमधील महाराष्ट्र शेती महामंडळ कामगारांच्या अडचणी संदर्भात विधानसभा सदस्य दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती.
मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, शेती महामंडळाच्या 14 मळ्यांवरील कामगारांना पायाभूत सुविधा, त्यांना हक्काचे घर उपलब्ध व्हावे, म्हणून शेती महामंडळाकडे शिल्लक असलेल्या जमिनीपैकी घरकुलसाठी काही जागा देण्यात यावी अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. या सर्व कामगार बांधवांना हक्काचे घर उपलब्ध व्हावे, यासाठी शासन सकारात्मक असून याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.
0000
No comments:
Post a Comment