Saturday, 22 July 2023

शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणणार

 शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणणार


                                                 -मंत्री दीपक केसरकर


  मुंबई, दि.21 : शाळाबाह्य व स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी मिशन "झिरो ड्रॉप आउट" मोहीम राबवण्यात आली आहे. यामध्ये 9 हजार 305 बालके शाळाबाह्य आढळून आली आहेत. या शाळाबाह्य बालकांपैकी 9 हजार 4 बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात यश आले आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत दिली.


            राज्यात मोठ्या प्रमाणात शाळाबाह्य मुलांची संख्या वाढत असल्याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य सर्वश्री आशिष शेलार, अतुल भातखळकर, सुनील राणे यांनी उपस्थित केला होता.


            मंत्री श्री. केसरकर म्हणाले, शाळाबाह्य मुला मुलींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हक्क कायदा (आरटीई) समग्र शिक्षण योजना व मध्यान्ह भोजन यासारख्या विविध योजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. ठाणे जिल्ह्यात सिग्नल शाळेसारखे अभिनव प्रयोग राबविण्यात येत आहेत. अशा प्रकारच्या सिग्नल शाळा सुरू करता येतील किंवा कसे याबाबतीतही विचार करण्यात येईल, असेही मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.

संच मान्यता, शिक्षक भरती प्रक्रिया सुरू

 

विधानसभा प्रश्नोत्तरे बातमी क्रमांक -2


संच मान्यता, शिक्षक भरती प्रक्रिया सुरू


-मंत्री दीपक केसरकर


 


         मुंबई, दि.२१ : जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या प्राथमिक शाळांच्या सन 2022 -23 च्या संच मान्यतेनुसार एकूण 59 हजार 997 शाळांपैकी 54 हजार 193 शाळांच्या संच मान्यता झालेल्या आहेत. सन 2022 - 23 च्या आधार आधारित संच मान्यता करण्यात येत आहेत.


            स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या 85 टक्के आधार प्रमाणित झालेल्या शाळांच्या संच मान्यता करण्यात आलेल्या आहेत. संच मान्यता प्रक्रिया आणि शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत दिली.


           राज्यातील विद्यार्थ्यांचे संच मान्यतेच्या प्रक्रियेत आधारकार्ड अद्यावत करणेबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य अतुल भातखळकर, यामिनी जाधव, राम सातपुते, सुनिल राणे यांनी उपस्थित केला होता.  


        मंत्री श्री. केसरकर म्हणाले, राज्यातील एकूण 2 कोटी 11 लाख 44 हजार 467 विद्यार्थ्यांपैकी 1 कोटी 93 लाख 45 हजार 111 विद्यार्थ्यांचे म्हणजे जवळपास (91.49 टक्के) आधारकार्ड वैध आढळले आहे. उर्वरित 17 लाख 99 हजार 356 विद्यार्थ्यांपैकी 3 लाख 8 हजार 811 विद्यार्थ्यांनी अद्याप आधार कार्ड क्रमांक घेतलेले नाहीत. त्यापैकी आधार उपलब्ध नसलेल्या खाजगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या 26 हजार 773 इतकी आहे. 90 टक्क्यापेक्षा अधिक विद्यार्थी संख्या वैध झाल्यानंतर उर्वरित 10 टक्के विद्यार्थी आधार अवैध या कारणास्तव संच मान्यता येत नसल्याने मंजूर पदावर परिणाम होत असल्यास असे विद्यार्थी शाळेत नियमित येत असल्याची गटशिक्षणाधिकारी यांनी खात्री करून 58 हजार विद्यार्थी विचारात घेण्यात आले आहेत, अशी माहिती मंत्री श्री. केसरकर यांनी दिली.


0000

परभणी येथील तत्कालिन अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या गैरव्यवहार प्रकरणी

 परभणी येथील तत्कालिन अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या गैरव्यवहार प्रकरणी  प्रप्त अहवालावर आठ दिवसात कार्यवाही


-महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील


 


मुंबई, दि. 21 - परभणी येथील तत्कालीन अपर जिल्हाधिकारी यांनी केलेल्या अवैध वाळू उपसा, कुळ प्रकरणे, इनामी जमिनी, सुनावणी व इतर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी विभागीय चौकशीचा फेर प्रस्ताव देण्यात आला होता. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून आठ दिवसात शासन स्तरावरून कार्यवाही करण्यात येईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य अब्दुल्लाखान दुर्राणी यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता.


 


मंत्री श्री.विखे पाटील म्हणाले की, वाळू उपसा संदर्भात अनियमितता होऊन शासनाचे नुकसान होऊ नये तसेच त्याची तातडीने चौकशी व्हावी या अनुषंगाने माजी कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येत आहे. पुढील आठवड्यात सभागृहातील संबंधित सदस्यांची बैठक घेऊन त्यांच्या सूचना जाणून घेण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील सर्व विमानतळांच्या विकासासंदर्भातमुख्यमंत्र्यांच्या स्तरावर उच्चस्तरीय बैठक घेणार

 राज्यातील सर्व विमानतळांच्या विकासासंदर्भातमुख्यमंत्र्यांच्या स्तरावर उच्चस्तरीय बैठक घेणार


                                               - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            मुंबई, दि.२१ : राज्यातील सर्व विमानतळांच्या व्यापक विकासासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. सर्व विमानतळांच्या विकासासाठी नोडल एजन्सीची स्थापना करण्यात येणार असून मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने सर्वसमावेशक आराखडा तयार करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


            विधानसभेत या संदर्भात सदस्य अशोक चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.


            राज्यात सध्या २८ विमानतळे / धावपट्टया अस्तित्वात असून त्याव्यतिरिक्त ४ नवीन विमानतळे (नवी मुंबई, पुणे (पुरंदर), सोलापूर (बोरामणी), चंद्रपूर (मूर्ति-विहिरगांव)) उभारणे प्रस्तावित आहे. या २८ विमानतळांपैकी सद्य:स्थितीत ११ विमानतळे विमान प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत. त्यापैकी ४ आंतरराष्ट्रीय विमानतळे (मुंबई, नागपूर, पुणे व औरंगाबाद) असून, ७ विमानतळे (नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, शिर्डी, गोंदिया, जळगांव व जुहू) आंतरदेशीय प्रवासाकरिता नागर विमानन मंत्रालयाकडून परवाना प्राप्त असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, शिर्डी येथील विमानतळावर रात्रीच्या वेळी विमान उतरवण्यासाठी दैनंदिन परवानगी घ्यावी लागते,त्यामध्ये सुधारणा करुन कायमस्वरुपी ही परवानगी मिळवण्यासाठी केंद्राकडे कार्यवाही सुरु असून केंद्रिय मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांच्याशी बोलून ही परवानगी मिळवण्यात येईल. तसेच या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी साडे सहाशे कोटी रुपये खर्चाची टर्मिनल इमारत करण्यास मंजूरी देण्यात आली असून येत्या दोन-तीन महिन्यांतच त्याचे काम सुरु करण्यात येईल. शिर्डीसह ज्या ठिकाणी रात्रीच्या वेळी विमान उतरण्याची सुविधा नाही, ती उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. नांदेड विमानतळावर ही सेवा उपलब्ध आहे. तथापि, सध्या नांदेड विमानतळाचा परवाना नागर विमानन मंत्रालयाकडून रद्द करण्यात आला आहे.तिथे पूर्ववत ही सुविधा सुरु करण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल.


             राज्यातील ज्या ठिकाणी विमानतळ धावपट्टी विस्तारीकरणाची आवश्यकता आहे,त्याठिकाणी यासाठीची कार्यवाही,आवश्यक विस्तारित जागा ताब्यात घेण्यासाठीचा निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे कराड येथे मध्यवर्ती विमानतळाची आवश्यकता असून विमानतळ विकासाच्या उच्चस्तरीय बैठकीत यावर मार्ग काढण्यात येईल. तसेच तालुक्यांमध्ये हेलिपॅड तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या असून सोलापूर विमानतळाबाबत ही बैठक तातडीने घेतली जाईल.


            आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या असलेल्या मुंबई विमातनळावरुन राज्यातील नागपूर व औरंगाबाद या शहरांव्यतिरिक्त सिंधुदुर्ग व कोल्हापूर या विमानतळांकरिता उडान योजनेअंतर्गत विमानसेवा उपलब्ध आहे. तसेच, यापूर्वी उडान योजनेअंतर्गत नांदेड, नाशिक व जळगांव या शहरांकरिता ही विमानसेवा मुंबई विमानतळावरुन उपलब्ध होती. तथापि, कोणत्याही शहरास विमानसेवा सुरु होणे, हे सर्वस्वी प्रवाशांची मागणी व पुरवठा आणि त्यामुळे विमानसेवा पुरविणाऱ्या कंपनीच्या तांत्रिक व आर्थिक फायदा-तोट्याच्या गणितानुसार निश्चित होत असते. त्यावर सरकारचे वा विमानतळे विकसित करणाऱ्या संस्थांचे कसलेही नियंत्रण नसते.


            एअर रुग्णवाहिका व ड्रोन सुविधा राज्यात आपत्कालीन सेवा म्हणून राबविण्याकरिता प्रस्ताव आयुक्त, आरोग्य सेवा आयुक्त, आरोग्य सेवा कार्यालयाकडून सार्वजनिक आरोग्य विभागाला प्राप्त झाला आहे. सदर प्रस्तावानुसार राज्यात ठाणे, नागपूर, औरंगाबाद व कोल्हापूर या ठिकाणी हवाई रुग्णसेवा देण्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून प्रस्तावित आहे. तथापि, या योजनेकरिता विविध हवाई संचालनालयांच्या परवानग्या, हवाई वाहतूकीकरिता जागा उपलब्ध असणे महत्त्वाचे आहे तसेच केंद्र शासनाच्या नागरी विमान महासंचालनायाचे नियम लक्षात घेऊन राज्याचे हेलिपॅड धोरण. २५.०१.२०१८ च्या शासन निर्णयानुसार तयार करण्यात आले आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारित यवतमाळ, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि बारामती येथील विमानतळे आहेत. त्यापैकी नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद ही विमानतळे शासनाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे व्यवस्थापन व देखभालीसाठी हस्तांतरित केली होती. यवतमाळ व बारामती येथे विमानतळ विकसित करणेसाठी शासन व महामंडळाने जमिन संपादन व पायाभूत सुविधांवर भांडवली खर्च केला आहे.


            ही विमानतळे अद्ययावत ठेवण्यासाठी व्यवस्थापन व देखभालीकरिता मोठ्या प्रमाणावर आवर्ती खर्च होत होता व या विमानतळांपासून मिळणारे उत्पन्न अत्यंत कमी होते. त्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत सदर विमानतळांचे खाजगीकरण करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. खाजगीकरणाच्या माध्यमातून सदर विमानतळांचे सक्षमीकरण करणे आणि हवाई सेवा सुरु करण्यासाठी / राहण्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणे हा खाजगीकरणाचा मुख्य उद्देश होता.


            सध्याच्या गतीमान काळात राज्यातील जास्तीत जास्त शहरे विमानसेवेने एकमेकांना जोडण्याकरिता उडान योजनेअंतर्गत अमरावती व रत्नागिरी विमानतळ कार्यान्वित करण्याकरिता प्रयत्न सुरु असून अकोला (शिवणी) येथील विमानतळाचा उडान योजनेत नव्याने समावेश करण्याकरिता जून, २०२२ मध्ये महाराष्ट्र शासनाने नागर विमानन महानिदेशालयाकडे प्रस्तावदेखील पाठविला आहे.


            या विषयावर अनेक सदस्यांना बोलायचे असल्याने विधानसभा अध्यक्षांच्या दालनात यासंदर्भातील बैठक अधिवेशन संपण्यापूर्वी घेण्यात येणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावेळी सांगितले.


            या लक्षवेधीवरील चर्चेत मंत्री गुलाबराव पाटील यांनीही उत्तर दिले. सदस्य पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, अनिल देशमुख, अमित देशमुख, यशोमती ठाकूर, सुलभा खोडके, रोहित पवार, सुनील प्रभू, प्रणिती शिंदे, आदित्य ठाकरे यांनी सहभाग घेतला.


0000

मुंबई महापालिकेत पालकमंत्री कार्यालय सुरू

 मुंबई महापालिकेत पालकमंत्री कार्यालय सुरू



         मुंबई, दि.21: कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई महापालिकेत नव्याने सुरू करण्यात आलेल्या पालकमंत्री दालनात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की मुंबईतील पालकमंत्री कार्यालय हे जनतेसाठी कार्यरत राहणार आहे. आम्ही महापालिकेच्या कार्यालयात बसून, नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन, त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असेही मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी स्पष्ट केले.


            मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री या नात्याने आपण मुंबईत फिरलो, तसेच ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने काम केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


            यापूर्वी पालकमंत्री म्हणून आपण मुंबई उपनगरातील सर्व 15 वार्डमध्ये फिरलो. यावेळी 15 हजारपेक्षा अधिक नागरिकांच्या समस्या प्राप्त झाल्या, त्यातील 3 हजारपेक्षा अधिक समस्यांचे जागीच समाधान देखील केले! त्यातून जनतेच्या हक्काच्या या कक्षाची आवश्यकता अधोरेखित होते. याठिकाणी नागरिकांच्या अनेक समस्या मुख्य कार्यालयाशी निगडीत असल्याचे निदर्शनास आले. त्याचप्रमाणे मुंबई उपनगरचा पालकमंत्री या नात्याने, विविध बैठकीसाठी अधिकाऱ्यांना मंत्रालयात बोलवावे लागते. हे सर्व सुकर व्हावे, या हेतूने मुंबई महापालिका कार्यालयात पालकमंत्र्यांचे दालन सुरू करण्यात आल्याचेही मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.


मुंबई मधील अतिवृष्टी परिस्थितीची पाहणी


मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात जाऊन पालकमंत्री श्री. लोढा यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थीतीची पाहणी केली. मुंबई मध्ये होणाऱ्या पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन नागरिकांना होणार त्रास कमी करण्यासाठीची दक्षता प्रशासनातर्फे घेण्यात येत आहे.


0000

हातभट्टीची दारु विषारी रसायन संज्ञेत आणण्याबाबतन्यायालयीन निवाडे तपासून निर्णय

 हातभट्टीची दारु विषारी रसायन संज्ञेत आणण्याबाबतन्यायालयीन निवाडे तपासून निर्णय


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            मुंबई, दि. 21 – हातभट्टीची दारु हे विषारी रसायन या संज्ञेत येते का, याबाबत न्यायालयीन निवाडे तपासून पाहिले जातील आणि त्यानंतर या अनुषंगाने निर्णय घेतला जाईल. अवैध दारु विक्री आणि त्याच्या तस्करीच्या अनुषंगाने गृह आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने संयुक्त कारवाई करुन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही अधिक गतिमान केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.


            सदस्य अभिमन्यू पवार यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उत्तर दिले.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, हातभट्टी दारु विक्री करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याची राज्य शासनाची भूमिका आहे. एमपीडीए (महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस ॲक्टीव्हिटी) कायद्यानुसार अशांविरुद्ध काही ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. हातभट्टी दारु विक्री आणि त्याची वाहतूक प्रकरणी शिक्षेत वाढ करण्याची व्यवहार्यता तपासून पाहिली जाईल, असे त्यांनी सांगितले.


हातभट्टीमुक्त गाव संकल्पना राज्यात राबविण्याचा विचार-मंत्री शंभूराज देसाई


            या लक्षवेधीवर राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनीही तपशीलवार उत्तर दिले. ते म्हणाले की, राज्यात विविध ठिकाणी भरारी पथकांच्या माध्यमातून हातभट्टी दारु विक्री आणि वाहतुकीवर प्रतिबंध आणण्यासाठी धाडी टाकल्या जात आहेत. एमपीडीए अंतर्गत आतापर्यंत 11 गुन्हे दाखल करण्यात आले असून 69 प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय, हातभट्टी दारु मुक्त गाव ही संकल्पना राज्यात राबविण्याचा विचार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.


            दारुबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी विभागाने अधिकाऱ्यांना वाहने उपलब्ध करुन दिली आहेत. रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. मुंबईसह राज्यात रात्री दहानंतर दारु विक्री दुकाने सुरु असल्याच्या तक्रारी येत आहेत. असे प्रकार आढळल्यास सुरुवातीला दोन वेळा समज देऊन तिसऱ्या वेळी त्यांचा परवाना रद्द केला जाईल. वारंवार असे प्रकार घडले तर तेथील स्थानिक अधिकाऱ्यांनाही कसूर केल्याप्रकरणी कारवाई केली जाईल, असे मंत्री श्री. देसाई यांनी स्पष्ट केले.


            दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाने मागील वर्षीच्या तुलनेत 25 टक्के जास्त महसूल मिळविल्याची माहितीही त्यांनी उपप्रश्नाच्या उत्तरात दिली. याशिवाय, सन 2021-22 मध्ये अवैध दारु विक्री प्रकरणी 47 हजार गुन्हे दाखल होते, यावर्षी ही संख्या 51 हजार इतकी आहे, असे त्यांनी सांगितले.


 


लक्षवेधीवरील या चर्चेत सदस्य नाना पटोले, भारती लव्हेकर, रोहित पवार, राम सातपुते, अमीन पटेल, अतुल भातखळकर, संजय कुटे आदी सदस्यांनी भाग घेत

राज्यपालांनी घेतला कृषी विभागाच्या योजनांचा आढावानिधी पूर्णपणे खर्च होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना

 राज्यपालांनी घेतला कृषी विभागाच्या योजनांचा आढावानिधी पूर्णपणे खर्च होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना


          मुंबई दि. 21 :राज्यपाल रमेश बैस यांनी आज एका उच्च स्तरीय बैठकीत राज्यातील कृषी विभागाच्या विविध केंद्र - पुरस्कृत व राज्य योजनांचा राजभवन येथे आढावा घेतला.


            कृषी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. हा कणा बळकट राहण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम केले पाहिजे असे सांगताना कृषी योजनांचा राज्यातील शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ व्हावा या दृष्टीने अर्थसंकल्पीय निधी आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी पूर्णपणे खर्चित होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याची सूचना राज्यपालांनी यावेळी केली. कृषी विकासासंदर्भात काही धोरणात्मक अडचणी असल्यास आपण त्याबाबत शासनाशी चर्चा करु, असे राज्यपालांनी सांगितले. 


            कृषी योजनांचा लाभ राज्यातील अनुसूचित जाती व जमातीच्या लोकांपर्यंत प्रभावी पद्धतीने पोहोचत आहे किंवा कसे याबाबत आपणास अवगत करावे असे सांगताना फलोत्पादन विकासासंदर्भात आपण स्वतंत्रपणे आढावा घेऊ असे राज्यपालांनी सांगितले.


            कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनूप कुमार यांनी २०२३ - २४ या वर्षाकरिता कृषी क्षेत्रातील शासनाच्या उद्दिष्टांची तसेच २०२३ - २४ वर्षाकरिता अर्थसंकल्पीय तरतुदी व नव्या उपक्रमांची माहिती दिली.     


            राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक परिमल सिंह, 'स्मार्ट प्रकल्प' संचालक कौस्तुभ दिवेगावकर, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे यांनी देखील यावेळी सादरीकरण केले व आपापल्या विभागांच्या कामाची माहिती दिली. 



Governor reviews progress of Schemes of State Agriculture Department


          Maharashtra Governor Ramesh Bais reviewed the implementation of various state and centrally sponsored schemes being implemented by the State Agriculture Department at Raj Bhavan Mumbai on Fri (21 July).


            Additional Chief Secretary of Agriculture Anoop Kumar gave an Overview of Agriculture in Maharashtra and presented the document on Vision for Agriculture Development for the year 2023-24.


            Commissioner Agriculture Sunil Chavan, Project Director PoCRA Parimal Singh, Project Director SMARTAGRI Kaustubh Diwegaonkar, Director Mahabeej Sachin Kalantre and senior officials

 were present.


0000


Featured post

Lakshvedhi