Wednesday, 12 July 2023

अन्न व औषध प्रशासन विभागाचातक्रार क्रमांक होणार सुलभ

 अन्न व औषध प्रशासन विभागाचातक्रार क्रमांक होणार सुलभ


            मुंबई, दि. १२ : नागरिकांना भेसळमुक्त अन्न मिळावे, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे १८००-२२२-३६५ या विनामूल्य क्रमांकावर तक्रार करता येते. हा क्रमांक मोठा असल्याने तो नागरिकांच्या लक्षात राहत नाही आणि तक्रारीदेखील अत्यल्प येत असल्याचे निदर्शनास आले. हा क्रमांक बदलण्याच्या सूचना नागरिकांकडून आल्या आहेत. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी हा क्रमांक बदलण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे लवकरच हा क्रमांक तीन आकडी होणार आहे. तीन आकडी क्रमांक झाल्यावर नागरिकांना अन्न भेसळीविषयी तक्रार करणे सुलभ होणार

 आहे.


विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्यांबाबत जागरूकतानिर्माण करण्यासाठी विविध उपक्रम

 विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्यांबाबत जागरूकतानिर्माण करण्यासाठी विविध उपक्रम


            मुंबई, दि. 12 : पौष्टिक तृणधान्यांचे महत्त्व विचारात घेता नागरिकांमध्ये तृणधान्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने संयुक्तराष्ट्र संघाने 2023 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.


            या उपक्रमांतर्गत 1 ते 14 ऑगस्ट या कालावधीत कृषी विभागातील अधिकाऱ्यांमार्फत विद्यार्थ्यांना तृणधान्य पिके, त्यांची पौष्टिकता, त्यांचे आहारातील समावेशाचे फायदे याबाबत माहिती दिली जाणार आहे. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित प्रभात फेरीमध्ये याबाबत जनजागृती केली जाईल. 1 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर या पोषण पंधरवड्यात शाळा आणि तालुकास्तरावर पालक, नागरिक आणि योजनेअंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्यासाठी तृणधान्य आधारित पाककृती स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल. यातील सर्वोत्कृष्ट तीन पाककृतींसाठी अनुक्रमे पाच हजार, तीन हजार 500 आणि दोन हजार 500 रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत 1 ते 15 ऑक्टोबर या कालावधीत ‘तृणधान्य आणि त्यांचे दैनंदिन आहारातील महत्त्व’ याविषयी विद्यार्थ्यांसाठी निबंध तसेच वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करून उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या पहिल्या तीन विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.


            केंद्र सरकारने ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, कोदो, कुटकी, सावा, राजगिरा आदी पिकांचे वर्गीकरण हे पौष्टिक तृणधान्य म्हणून केले आहे. भारत हा जगातील तृणधान्य पिकवणारा प्रमुख देश आहे. तथापि, सध्या आपल्या राज्यात व देशात तृणधान्यांचे क्षेत्र कमी होत असल्याचे चित्र पाहायला मिळते. यामुळे विविध उपक्रमांच्या माध्यमातून तृणधान्यांचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच दैनंदिन आहारात त्यांचा समावेश होण्यासाठी राज्य शासनामार्फत ‘महाराष्ट्र मिलेट मिशन’च्या माध्यमातून प्रयत्न सुरू झाले आहेत. विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच तृणधान्य व त्याची पौष्टिकता याचे महत्त्व कळावे या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्याबाबत शालेय शिक्षण विभागाचे सह सचिव इम्तियाझ काझी यांनी परिपत्रक जारी केले आहे.


000



 

पुणे विभागीय अधिस्विकृती समिती सदस्यपदी गोरख तावरे यांची निवड

 पुणे विभागीय अधिस्विकृती समिती सदस्यपदी गोरख तावरे यांची निवड




कराड - राज्य शासनाच्या अधिस्विकृती समितीच्या पुणे विभागीय सदस्यपदी कराड येथील दैनिक सामनाचे प्रतिनिधी व साप्ताहिक राजसत्यचे संपादक गोरख तावरे यांची निवड करण्यात आली आहे. सदरची निवड ही तीन वर्षासाठी आहे.




11 जुलै रोजी राज्य अधिस्विकृती समिती व अधिस्वीकृती समिती गठीत करण्यात आली आहे. राज्य अधिस्विक्कृती समितीवरील 27 सदस्य तसेच 9 विभागीय अधिस्विकृती समित्यांवरील 45 सदस्यांच्या नेमणुकी करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये पुणे विभागातील समितीमध्ये कराडचे दैनिक सामनाचे प्रतिनिधी व साप्ताहिक राजसत्यचे संपादक गोरख तावरे यांच्या नावाचा समावेश आहे. पुणे, सातारा, सोलापूर जिल्हासाठी म्हणजे पुणे विभागीय समितीच्या सदस्यपदी गोरख तावरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.




कराडहून गेल्या 35 वर्षांपासून गोरख तावरे हे दैनिक सामनासाठी प्रतिनिधी म्हणून काम करीत आहेत. तसेच सकारात्मक पत्रकारितेसाठी गोरख तावरे नेहमी आग्रही असून ते पत्रकारितेमध्ये कार्यरत आहेत. तसेच साप्ताहिक राजसत्य हे सुमारे 27 वर्षापासून कराडमधून प्रसिद्ध होत आहे. महाराष्ट्र संपादक परिषदेमध्ये कार्यकारणी सदस्य म्हणून गोरख तावरे काम करीत आहेत.




गोरख तावरे यांच्या नियुक्तीबद्दल महाराष्ट्र संपादक परिषदेचे अध्यक्ष संजय मलमे(मुंबई), प्रकाश कुलथे(श्रीरामपूर), अनंत उर्फ राजू पाध्ये(मुंबई), गजानन कदम(मुंबई), एकनाथ बिरवटकर(मुंबई), एस.के. जाधव(मुंबई), राजेंद्र मोहिते (तळबीड/मुंबई), सातारा जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, माहिती अधिकारी हेमंतकुमार चव्हाण, असोसिएशन स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आप्पासाहेब पाटील(सांगली), राष्ट्रीय सचिव प्रवीण पाटील(वारणानगर), प्रदेशाध्यक्ष प्रदीप कुलकर्णी(बिड), सुमित कुलकर्णी(श्रीरामपूर), चंद्रशेखर गायकवाड(सोलापूर), रंगराव शिंपूकडे(सांगली), हरि येवले (नाशिक), सम्राट सलगर (कागल), नेताजी मिश्राम (चंद्रपूर), मराठी पत्रकार परिषदेचे सातारा जिल्हाध्यक्ष हरीश पाटणे, सुजित आंबेकर (सातारा), रवींद्र बेडकीहाळ (फलटण), कराडचे प्रा. अशोक चव्हाण सचिन देशमुख, हेमंत पवार, देवदास मुळे, खंडू इंगळे, संतोष शिंदे, इलाई मुल्ला, प्रमोद सुकरे यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक संपादक, ज्येष्ठ पत्रकार व पत्रकारांनी प्रत्यक्ष भेटून व दूरध्वनीद्वारे अभिनंदन केले


 आहे.

कोल्हापूर चित्रनगरी खुली करावी

 

कोल्हापूर चित्रनगरी खुली करावी


- सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार


 


मुंबई, दि. 11 : कोल्हापूर येथील चित्रनगरीतील विकास कामे वेगाने मार्गी लावून नूतनीकृत चित्रनगरी मे-2024 पर्यंत चित्रीकरणासाठी खुली करून द्यावी, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.


सह्याद्री अतिथीगृहात कोल्हापूर चित्रनगरीच्या नूतनीकरण आणि प्रस्तावित विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत मंत्री हसन मुश्रीफ, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, कोल्हापूर चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील, प्रकल्प व्यवस्थापक दिलीप भांदिगरे, कला दिग्दर्शक संतोष फुटाणे, वास्तू विशारद इंद्रजित नागेशकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


या बैठकीत कोल्हापूर चित्रनगरी येथे सुरु असलेल्या विविध कामांसंदर्भातील सादरीकरण व्यवस्थापकीय संचालक श्री. पाटील यांनी केले. यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी त्या अनुषंगाने विविध कामांची तपशीलवार माहिती घेतली. कोल्हापूर येथील चित्रनगरीतील प्रस्तावित विकास कामांमध्ये चित्रीकरणासाठी बंगला, चाळ, नवीन वाडा, मंदिर, तीन वसतिगृहे, अद्ययावत रेल्वे स्थानक, दोन नवीन बंदिस्त स्टुडिओ अशी चित्रीकरण स्थळे, अंतर्गत रस्ते, वीज व पाणी पुरवठा, मलनि:स्सारण अशा पायाभूत सुविधांचा समावेश आहे. त्याचबरोबर पर्यटानाला चालना देणारे विविध उपक्रम आणि स्थळेही येथे विकसित करण्यात येणार आहेत. चित्रीकरणासोबतच येथे पर्यटनाला चालना मिळेल, अशा पद्धतीने विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. ही कामे वेळेत पूर्ण व्हावीत. यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराला संधी उपलब्ध होण्याबरोबरच राज्यातील चित्रपट व मालिका निर्मिती संस्थांसाठी ही दुसरी चित्रनगरी चित्रीकरणासाठी उपलब्ध होणार आहे. यामुळे येथील विकासालाही अधिक चालना मिळेल, असे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.


                                                0


मुंबईसह राज्यातील विद्यापीठांना सहकार्य

 मुंबईसह राज्यातील विद्यापीठांना सहकार्य करण्यासअमेरिकेतील सेंट लुईस विद्यापीठ उत्सुक


आगामी काळात भारत मानव संसाधनांचा सर्वात मोठा निर्यातदार देश असेल


- डॉ. एरिक ऍम्ब्रेख्त


 


            जगातील युवा देश असलेला भारत हा प्रतिभासंपन्न लोकांचा देश असून आगामी काळात भारतातील कौशल्य प्रशिक्षित लोक जगातील अनेक देशांना व अर्थव्यवस्थांना मदत करताना दिसतील, असे नमूद करून भारत हा मानवी संसाधनांच्या बाबतीत जगातील सर्वात मोठा निर्यातदार देश असेल, असे प्रतिपादन अमेरिकेतील सेंट लुईस विद्यापीठाचे सहयोगी प्रोव्होस्ट डॉ. एरिक ऍम्ब्रेख्त यांनी केले आहे.    


            २०५- वर्षे जुन्या सेंट लुईस विद्यापीठाच्या एका शिष्टमंडळाने डॉ. एरिक ऍम्ब्रेख्त यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राचे राज्यपाल तसेच कुलपती रमेश बैस यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. 


            मुंबई विद्यापीठासह महाराष्ट्रातील इतर विद्यापीठांसोबत कौशल्य प्रशिक्षणासह विविध विषयांवर सहकार्याची क्षेत्रे ठरविण्यासाठी विद्यापीठाचे शिष्टमंडळ भारत भेटीवर आले असल्याचे त्यांनी सांगितले.


            भारतीय विद्यार्थ्यांना परवडणारे शिक्षण, दुहेरी पदवी व कौशल्य प्रशिक्षण देण्याबाबत तसेच शिक्षकांच्या सक्षमीकरणाबाबत आपण प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.


शिक्षकांना प्रशिक्षणासाठी अमेरिका व स्पेन येथे पाठविणार


            सेंट लुईस विद्यापीठाचे शैक्षणिक कॅम्पस अमेरिकेतील मिसौरी व स्पेनमधील माद्रिद येथे असून भारतातून शिक्षकांना प्रशिक्षणासाठी तेथे पाठविले जाईल किंवा तेथील शिक्षकांना भारतात प्रशिक्षण देण्यासाठी पाठवले जाईल असे त्यांनी सांगितले.    


            सेंट लुईस विद्यापीठ जनसंवाद व सहकार्य, नेतृत्वगुण, रचनात्मक चिंतन व गहन चिंतन ही कौशल्ये प्रदान करते तसेच विद्यार्थ्यांना आभासी माध्यमातून इंटर्नशिप, कार्यशाळा व स्पर्धांच्या माध्यमातून शैक्षणिक कार्यक्रमात सहभागी करून घेते अशी माहिती त्यांनी दिली.  


            महाराष्ट्रात सहा समूह विद्यापीठांसह एकूण २६ विद्यापीठे असून तीस लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत अशी माहिती देताना सेंट लुईस विद्यापीठाने विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या किंमतीमध्ये जागतिक दर्जाचे शिक्षण द्यावे अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.


            यावेळी सेंट लुईस विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय सहकार्य विभागाचे उपाध्यक्ष लूशेन ली, सल्लागार सुंदर कुमारसामी व जागतिक उपक्रम विभागाच्या संचालिका अनुशिका जैन उपस्थित होत्या.


००००

St. Louis University seeks MoU with Mumbai University


            A high level academic delegation from the 205 - year old Saint Louis University, Missouri, USA led by Associate Provost Eric Armbrecht met Maharashtra Governor and Chancellor of universities Ramesh Bais at Raj Bhavan, Mumbai on Tue (11 July).


            The delegation is in India to explore collaboration opportunities with the University of Mumbai and other universities in Maharashtra.


            The delegation told the Governor that the University will work in the areas of giving hands down practical experience and learning essential skills such as Communications and Collaborations, Leadership, Critical Thinking and Creative Thinking. 


            Welcoming the delegation, the Governor expressed the hope that the St. Louis University will work closely with universities in Maharashtra to Skill, Reskill and Upskill youths.


            Associate Vice President of Global Engagement Dr. Luchain Lee, Advisor Sundar Kumarswami and Director of Global Initiat

ives Anushika Jain were among those present.


शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये नवीन वेळापत्रकविद्यार्थ्यांना स्वयंअध्ययन व खेळाकरिता पुरेसा वेळ

 शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये नवीन वेळापत्रकविद्यार्थ्यांना स्वयंअध्ययन व खेळाकरिता पुरेसा वेळ

आदिवासी विकास विभागाचा खुलासा

            शासकीय /अनुदानित आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांकरिता स्वयंअध्ययन व खेळ यांकरिता पुरेसा वेळ मिळावा तसेच राज्यातील सर्व शासकीय /अनुदानित आदिवासी आश्रमशाळांमध्ये एकसमान शाळेचे वेळापत्रक असावे, यासाठी शाळेच्या नियमित वेळेमध्ये बदल करुन शासकीय व अनुदानित आदिवासी निवासी आश्रमशाळेची वेळ सकाळी 8. 45 वाजता ते दुपारी 4.00 वाजता ठेवण्याबाबत व त्याची अंमलबजावणी दिनांक 10 जुलै, 2023 पासुन करण्याबाबत दिनांक 5 जुलै, 2023 रोजीच्या पत्रान्वये निर्देश देण्यात आलेले आहेत.


            दिनांक 5 जुलै, 2023 रोजीच्या शासन पत्रान्वये दिलेल्या निर्देशास अनुलक्षून आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी त्यांच्या स्तरावरुन नवीन शालेय वेळापत्रक तयार करुन क्षेत्रीय अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आलेले आहेत. या नवीन वेळापत्रकाप्रमाणे सकाळच्या नास्त्याची वेळ सकाळी 7.30 ते 8.00 वाजता असून डॉ. सुभाष साळुंखे समितीने केलेल्या शिफारशींच्या आधारे याआधी तयार केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे सकाळी 7.45 ते 8.30 वाजता नास्त्याची वेळ आहे, तर नवीन वेळापत्रकाप्रमाणे दुपारच्या जेवणाची वेळ दुपारी 12.30 ते 13.30 अशी असून याआधीचे वेळापत्रकाप्रमाणे दुपारचे जेवणाची वेळ 12.45 ते 13.45 अशी आहे. यामध्ये केवळ 15 मिनिटांचा फरक आहे, तर नविन वेळापत्रकाप्रमाणे रात्रीचे जेवणाची वेळ 18.30 ते 19.30 अशी असून पुर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे 19.30 ते 20.30 अशी आहे. नवीन वेळापत्रकाप्रमाणे झोपण्याची वेळ 21.30 ते 5.30 अशी असून या कालावधीचा विद्यार्थ्यांच्या भोजनाशी ताळमेळ करणे संयुक्तिक होणार नसून दोन जेवणामध्ये जास्त अंतर आहे असे म्हणणे उचित नाही.


            वास्तविक, शासकीय /अनुदानित आश्रमशाळा या निवासी असून या आश्रमशाळांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययन व खेळ यांकरिता पुरेसा वेळ मिळावा याकरिता नविन वेळापत्रक तयार करण्यात आलेले असून विद्यार्थ्यांचे आरोग्य, अभ्यास, भोजन व इतर सोयी-सुविधा याकडे दुर्लक्ष होऊ नये व विद्यार्थ्यांवर पूर्ण वेळ लक्ष ठेवण्याकरिता सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना आश्रमशाळा परिसरात राहण्याबाबत दिनांक 24 ऑगस्ट, 2021 रोजीच्या शासन परिपत्रकान्वये सूचना देण्यात आलेल्या आहेत.


००००

विकासकामांचापालकमंत्री दीपक केसरकर यांनी घेतला आढावा

 विकासकामांचापालकमंत्री दीपक केसरकर यांनी घेतला आढावा


            मुंबई, दि. 11 : दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध वारसा स्थळ आणि पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या बाणगंगा तलाव परिसराचे सौंदर्यीकरण आणि विकास करण्यात येणार आहे. यासंदर्भातील कामांचा शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आढावा घेतला. जिल्हा नियोजन समिती आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला जात आहे.


            पहिल्या टप्प्यात तलावातील अतिक्रमीत बांधकामे काढून परिसरात धार्मिक स्थळाला साजेशी रोषणाई करणे, परिसरातील घरांना एकसारखी रंगसंगती करणे, तलावातील वाहून जात असलेले पाणी थांबवणे ही कामे हाती घेण्याची सूचना श्री.केसरकर यांनी यावेळी केली. याचबरोबर नैसर्गिक सौंदर्याला बाधा न येता तलावाकडे जाणाऱ्या पोहोच रस्त्यांची दुरूस्ती, ज्येष्ठ नागरिकांना आधारासाठी रेलिंग, कपडे बदलण्यासाठी खोली, स्वच्छतागृह आदी कामे करण्यात यावीत, असे त्यांनी सांगितले. या परिसरातील झोपडीधारकांना इतरत्र हलविणे, तलावातील अतिरिक्त माशांची व्यवस्था आदींबाबत म्हाडा, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण, महानगरपालिका, मत्स्यव्यवसाय विभाग आदींची एकत्रित बैठक आयोजित करण्याची सूचनाही त्यांनी केली.


            यावेळी सल्लागार संस्थेमार्फत परिसर विकासाबाबत सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. या बैठकीस बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त संगीता हसनाळे यांच्यासह जीएसबी, काशीमठ आदी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


00000

Featured post

Lakshvedhi