Wednesday, 12 July 2023

विकासकामांचापालकमंत्री दीपक केसरकर यांनी घेतला आढावा

 विकासकामांचापालकमंत्री दीपक केसरकर यांनी घेतला आढावा


            मुंबई, दि. 11 : दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध वारसा स्थळ आणि पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या बाणगंगा तलाव परिसराचे सौंदर्यीकरण आणि विकास करण्यात येणार आहे. यासंदर्भातील कामांचा शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आढावा घेतला. जिल्हा नियोजन समिती आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला जात आहे.


            पहिल्या टप्प्यात तलावातील अतिक्रमीत बांधकामे काढून परिसरात धार्मिक स्थळाला साजेशी रोषणाई करणे, परिसरातील घरांना एकसारखी रंगसंगती करणे, तलावातील वाहून जात असलेले पाणी थांबवणे ही कामे हाती घेण्याची सूचना श्री.केसरकर यांनी यावेळी केली. याचबरोबर नैसर्गिक सौंदर्याला बाधा न येता तलावाकडे जाणाऱ्या पोहोच रस्त्यांची दुरूस्ती, ज्येष्ठ नागरिकांना आधारासाठी रेलिंग, कपडे बदलण्यासाठी खोली, स्वच्छतागृह आदी कामे करण्यात यावीत, असे त्यांनी सांगितले. या परिसरातील झोपडीधारकांना इतरत्र हलविणे, तलावातील अतिरिक्त माशांची व्यवस्था आदींबाबत म्हाडा, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण, महानगरपालिका, मत्स्यव्यवसाय विभाग आदींची एकत्रित बैठक आयोजित करण्याची सूचनाही त्यांनी केली.


            यावेळी सल्लागार संस्थेमार्फत परिसर विकासाबाबत सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. या बैठकीस बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त संगीता हसनाळे यांच्यासह जीएसबी, काशीमठ आदी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


00000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi