Wednesday, 12 July 2023

शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये नवीन वेळापत्रकविद्यार्थ्यांना स्वयंअध्ययन व खेळाकरिता पुरेसा वेळ

 शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये नवीन वेळापत्रकविद्यार्थ्यांना स्वयंअध्ययन व खेळाकरिता पुरेसा वेळ

आदिवासी विकास विभागाचा खुलासा

            शासकीय /अनुदानित आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांकरिता स्वयंअध्ययन व खेळ यांकरिता पुरेसा वेळ मिळावा तसेच राज्यातील सर्व शासकीय /अनुदानित आदिवासी आश्रमशाळांमध्ये एकसमान शाळेचे वेळापत्रक असावे, यासाठी शाळेच्या नियमित वेळेमध्ये बदल करुन शासकीय व अनुदानित आदिवासी निवासी आश्रमशाळेची वेळ सकाळी 8. 45 वाजता ते दुपारी 4.00 वाजता ठेवण्याबाबत व त्याची अंमलबजावणी दिनांक 10 जुलै, 2023 पासुन करण्याबाबत दिनांक 5 जुलै, 2023 रोजीच्या पत्रान्वये निर्देश देण्यात आलेले आहेत.


            दिनांक 5 जुलै, 2023 रोजीच्या शासन पत्रान्वये दिलेल्या निर्देशास अनुलक्षून आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी त्यांच्या स्तरावरुन नवीन शालेय वेळापत्रक तयार करुन क्षेत्रीय अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आलेले आहेत. या नवीन वेळापत्रकाप्रमाणे सकाळच्या नास्त्याची वेळ सकाळी 7.30 ते 8.00 वाजता असून डॉ. सुभाष साळुंखे समितीने केलेल्या शिफारशींच्या आधारे याआधी तयार केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे सकाळी 7.45 ते 8.30 वाजता नास्त्याची वेळ आहे, तर नवीन वेळापत्रकाप्रमाणे दुपारच्या जेवणाची वेळ दुपारी 12.30 ते 13.30 अशी असून याआधीचे वेळापत्रकाप्रमाणे दुपारचे जेवणाची वेळ 12.45 ते 13.45 अशी आहे. यामध्ये केवळ 15 मिनिटांचा फरक आहे, तर नविन वेळापत्रकाप्रमाणे रात्रीचे जेवणाची वेळ 18.30 ते 19.30 अशी असून पुर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे 19.30 ते 20.30 अशी आहे. नवीन वेळापत्रकाप्रमाणे झोपण्याची वेळ 21.30 ते 5.30 अशी असून या कालावधीचा विद्यार्थ्यांच्या भोजनाशी ताळमेळ करणे संयुक्तिक होणार नसून दोन जेवणामध्ये जास्त अंतर आहे असे म्हणणे उचित नाही.


            वास्तविक, शासकीय /अनुदानित आश्रमशाळा या निवासी असून या आश्रमशाळांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययन व खेळ यांकरिता पुरेसा वेळ मिळावा याकरिता नविन वेळापत्रक तयार करण्यात आलेले असून विद्यार्थ्यांचे आरोग्य, अभ्यास, भोजन व इतर सोयी-सुविधा याकडे दुर्लक्ष होऊ नये व विद्यार्थ्यांवर पूर्ण वेळ लक्ष ठेवण्याकरिता सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना आश्रमशाळा परिसरात राहण्याबाबत दिनांक 24 ऑगस्ट, 2021 रोजीच्या शासन परिपत्रकान्वये सूचना देण्यात आलेल्या आहेत.


००००

विकासकामांचापालकमंत्री दीपक केसरकर यांनी घेतला आढावा

 विकासकामांचापालकमंत्री दीपक केसरकर यांनी घेतला आढावा


            मुंबई, दि. 11 : दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध वारसा स्थळ आणि पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या बाणगंगा तलाव परिसराचे सौंदर्यीकरण आणि विकास करण्यात येणार आहे. यासंदर्भातील कामांचा शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आढावा घेतला. जिल्हा नियोजन समिती आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला जात आहे.


            पहिल्या टप्प्यात तलावातील अतिक्रमीत बांधकामे काढून परिसरात धार्मिक स्थळाला साजेशी रोषणाई करणे, परिसरातील घरांना एकसारखी रंगसंगती करणे, तलावातील वाहून जात असलेले पाणी थांबवणे ही कामे हाती घेण्याची सूचना श्री.केसरकर यांनी यावेळी केली. याचबरोबर नैसर्गिक सौंदर्याला बाधा न येता तलावाकडे जाणाऱ्या पोहोच रस्त्यांची दुरूस्ती, ज्येष्ठ नागरिकांना आधारासाठी रेलिंग, कपडे बदलण्यासाठी खोली, स्वच्छतागृह आदी कामे करण्यात यावीत, असे त्यांनी सांगितले. या परिसरातील झोपडीधारकांना इतरत्र हलविणे, तलावातील अतिरिक्त माशांची व्यवस्था आदींबाबत म्हाडा, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण, महानगरपालिका, मत्स्यव्यवसाय विभाग आदींची एकत्रित बैठक आयोजित करण्याची सूचनाही त्यांनी केली.


            यावेळी सल्लागार संस्थेमार्फत परिसर विकासाबाबत सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. या बैठकीस बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त संगीता हसनाळे यांच्यासह जीएसबी, काशीमठ आदी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


00000

सप्तशृंगी येथील बस अपघातात मृत्युमुखी महिलेच्या वारसाला एसटी तर्फे दहा लाख

 सप्तशृंगी येथील बस अपघातात मृत्युमुखी महिलेच्या वारसाला एसटी तर्फे दहा लाख


जखमींवर शासकीय खर्चाने उपचार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            मुंबई, दि. १२ : नाशिकमधील कळवण येथे सप्तशृंगी गड घाटात एस टी बसच्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या वारसाला दहा लाख रुपयांची मदत एसटी महामंडळामार्फत देण्यात येणार आहे. या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे घटनास्थळी दाखल झाले आहेत.


            खामगाव आगाराची बस सप्तशृंगी गडावरून आज सकाळी खामगावच्या दिशेनं निघाली होती. त्यावेळी घाटातील गणपती टप्प्यावरुन बस थेट ४०० फुट दरीत कोसळली. बसमध्ये २२ प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. गडावरील स्थानिक रहिवाशी आणि शासकीय यंत्रणांकडून मदतकार्य सुरू झालं आहे.


            जखमी प्रवाशांना वणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काहींना प्राथमिक उपचार करून नाशिक येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. पाच रुग्णांना नाशिक येथे हलविण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.


००००

अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन चा स्तुत्य

 अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन चा स्तुत्य


उपक्रम 

अलिबाग, ता. 29

सामाजिक बांधिलकी जपत रायगड फोटोग्राफर अॅड ्व्हिडीओग्राफर्स असोसिएशन  शी संलग्न अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन आणि  अलिबाग - मुरुड मेडिकल असोसिएशन  यांच्या संयुक्त विद्यमाने वेश्वी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. वेश्वी  ग्रामपंचायतीच्या उपसरपंच आरती पाटील यांच्या हस्ते या शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. 

अलिबाग - मुरुड मेडिकल असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. उजवल जैन, डॉ. अमेय केळकर, डॉ. समीर धाटावकर, डॉ. अनघा भगत,  डॉ. गणेश गवळी,  डाॅ. राजाराम हुलवन,  डाॅ. अश्विनी हुलवान  यांनी विद्यार्थ्यांची कान, नाक, घसा, छाती, पोट, हृदयाचे ठोके, रक्त प्रमाण, दातांची तपासणी करून मोफत औषधं दिली. 


यावेळी रायगड फोटोग्राफर्स अॅड व्हिडीओग्राफर्स असोसिएशन चे उपाध्यक्ष समीर मालोदे, खजिनदार  जितेंद्र मेहता, शाळेचे मुख्याध्यापिका अश्विनी लांगी, वेश्वी चे माजी सरपंच प्रफुल पाटील, ग्रामपंचायत सदस्य अनंत मुळूस्कर, जुई शेळके, रुपाली गुरव, अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन चे अध्यक्ष तुषार थळे, कार्याध्यक्ष सुदेश माळी, सहकार्याध्यक्ष सुबोध घरत, उपाध्यक्ष राकेश दर्पे, सचिव विकास पाटील, खजिनदार विवेक पाटील, सहखजिनदार प्रणेश पाटील, सल्लागार सुरेश खडपे, सचिन आसरानी,  शाळेतील शिक्षक निर्मला शिरसाठ, नरेश गायकवाड, रवींद्र साळुंखे व विद्यार्थी उपस्थित होते. 


अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक बांधिलकी ठेवून काम करीत आहे. या संस्थेमार्फत शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य विषयक उपक्रम राबविले जातात.त्याचा फायदा ग्रामीण भागातील सर्वच स्तरातील घटकाला चांगल्या पध्दतीने होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनच्यावतीने वेश्वी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी  शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात एकूण ६३ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. 


-----------

फोटोओळी : अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन व  अलिबाग - मुरुड मेडिकल असोसिएशन  यांच्या संयुक्त विद्यमाने वेश्वी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी करताना डाॅक्टर्स.

बाभळीच्या शेंगांचे औषधीय व गुणकारी फायदे.....*

 *बाभळीच्या शेंगांचे औषधीय व गुणकारी फायदे.....*


आयुर्वेदात अशा अनेक वनौषधी आणि वनस्पती आहे, ज्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर आहे यातिल बाभळीच्या शेंगांना फार मौल्यवान मानले जाते. खुपच गुणकारी आहे तर बघू या फायदे...


  *(१)गुडघेदुखी कमी होते...*

बाभळीच्या शेंगांचे चूर्ण उपयुक्त आहे. व्रुध्दापकाळात सांधेदुखी, ही सामान्य समस्या आहे आणि गुडघेदुखी तर चाळीशीनंतर चालू होते. तेव्हा या शेंगांचे चूर्ण सकाळ संध्याकाळ कोमट पाण्याबरोबर घ्यावे हे चूर्ण कोणत्याही आयुर्वेद शाॅपला नक्कीच मिळेल, याने काही दिवसांतच गुडघेदुखी समूळ नष्ट होते.


*(२)डोकेदुखी दूर होते.*.* वाढता ताण-तणाव, चिंता, धावपळ, यामुळे. सतत डोकेदुखी असणं ही समस्या घरोघरी आढळून येते, अशा वेळी बाभुळ शेंगाचि पावडर कोमट पाण्याबरोबर घ्यावी, लगेच आराम मिळतो..


*(३) स्त्रियांसाठी शेंगांचे चूर्ण फायदेशीर आहे...*

आजकाल बहुतेक महिलांना ल्यूकोरिया चा त्रास होतो, श्वेतप्रदर, पांढरे पाणी जाणे, अशा समस्या बहुतेक महिलांना होतात. तेव्हा या शेंगांचे चूर्ण सकाळ संध्याकाळ कोमट पाण्याबरोबर घ्यावे. याने आराम मिळतो नक्कीच.


*(४) पुरुषांसाठी या शेंगांचे चूर्ण फायदेशीर ठरते...*

बाभळीच्या शेंगांचे चूर्ण पुरुषांना देखील फायदेशीर आहे. ज्यांना धातूक्षयाचा त्रास असेल. त्यांनी हि पावडर. नियमितपणे कोमट पाण्याबरोबर घेतल्यास फायदा होतो. वंध्यत्व दूर होते.


*(५) पाठदुखी कंबरदुखी...* या त्रासात आराम देण्यासाठी बाभळीच्या शेंगांचे चूर्ण फायदेशीर आहे. एकाच स्थितीत बराच वेळ बसल्यामुळे पाठदुखी कंबरदुखी चा त्रास होतो, आजकाल बहुतेक लोक बसून काम करतात त्यामुळे पाठदुखी देखिल सामान्य समस्या आहे, तेव्हा हि पावडर उपयुक्त ठरते, जेवणानंतर एक चमचा भरून चूर्ण कोमट पाण्याबरोबर घ्यावे. याने छान आराम मिळतो नक्कीच. जमल्यास हि पावडर दूधासोबत घेतल्यास स्नायू बळकट होतात.


*(6) जूलाबाच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी बाभळीच्या शेंगांचे चूर्ण फायदेशीर आहे...*

बरेच वेळा, बाहेरच्या खाण्यामुळे, पोट खराब होऊन पातळ जुलाब होतात, अतिसार होतो, गळल्यासारखे होते, यांच्यावर शेंगांचे चूर्ण हे रामबाण औषध आहे, थोडं चूर्ण पाण्यासोबत घेतल्यास आराम मिळतो.


*(७) अशक्तपणा, कमजोरी वाटणे, यावर जर तुम्ही शारिरीक दृष्ट्या अशक्त असाल तर तुम्ही बाभळीच्या शेंगांचे चूर्ण पाण्यात किंवा दुधात मिसळून रोज एक वेळा सेवन करू शकता आणि वाटलं तर मधात मिसळून चाटण म्हणून घ्या. 


.तेव्हा वरील फायदे बघता बाभळीच्या शेंगांचे चूर्ण अतिशय मौल्यवान औषध आहे आणि सहज आयुर्वेद दुकानात मिळतं. जरुर हि पावडर घरात असू द्यावी.


*आयुर्वेद अभ्यासक सुनिता सहस्रबुद्धे, निरामय आयुर्वेद व होमिओपॅथी प्रचार,*

*डॉ. सुनील इनामदार.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


डॉक्टर आनंद कुलकर्णी, पीएचडी, सायकोलॉजी.,

 डॉक्टर आनंद कुलकर्णी, पीएचडी, सायकोलॉजी.


त्यांनी तीन टेक्निक डेमोसह दाखवलेले आहे. अतिशय चांगल्या प्रकारे तुमच्या शरीरावर त्याचा कसा परिणाम होतो, शरीरातली निगेटिव्ह एनर्जी कशी निघून जाते, खूप छान समजावून सांगितलेला आहे. पॉझिटिव्ह एनर्जी कशी मिळवायची? त्यासाठी हा व्हिडिओ आवर्जून पहावा.

स्वच्छता मॉनिटर्स उपक्रम व्यापक प्रमाणावर राबविणार

 स्वच्छता मॉनिटर्स उपक्रम व्यापक प्रमाणावर राबविणार


- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर


            मुंबई, दि. 11 : विद्यार्थ्यांना ‘स्वच्छता मॉनिटर्स’ बनविणाऱ्या ‘लेटस् चेंज’ उपक्रमात मागील वर्षी विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदविला होता. याचे सकारात्मक परिणाम लक्षात घेता हा उपक्रम यावर्षी अधिक व्यापक प्रमाणावर राबविण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.


            मागील वर्षी 2 ऑक्टोबर ते 24 डिसेंबर 2022 या कालावधीत लेटस् चेंज प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर्स जबाबदारी स्वीकारण्यास प्रोत्साहित करण्याचा उपक्रम राबविण्यात आला होता. यास विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याने यावर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात हा उपक्रम व्यापक प्रमाणावर राबविण्याबाबत मंत्री श्री.केसरकर यांनी आज आढावा घेतला. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव इम्तियाज काझी, उपसचिव समीर सावंत, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, कक्ष अधिकारी मृणालिनी काटेंगे, लेटस् चेंज प्रकल्पाचे रोहित आर्या आदी उपस्थित होते. तर, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी तसेच विभागीय आणि जिल्हा पातळीवरील अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.


            मंत्री श्री.केसरकर म्हणाले, आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीने परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. समाजातील निष्काळजीपणा दूर करणे हा स्वच्छता मॉनिटर्स उपक्रमाचा उद्देश असून विद्यार्थ्यांनी समजावून सांगितले तर त्याचा सकारात्मक परिणाम होत असल्याचा अनुभव आहे. मागील वर्षी या उपक्रमात 12 हजारांहून अधिक शाळा सहभागी झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर यावर्षी राज्यातील सर्वच शाळांनी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी 22 जुलै 2023 पर्यंत नोंदणी करावी, त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांनी देखील यात सहभागी होऊन सर्वांनी एकत्रितपणे अभियान म्हणून हा उपक्रम राबवावा, असे आवाहन त्यांनी केले. तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यात येणार असल्याने त्यांच्या अभ्यासावर परिणाम होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी शिक्षणाधिकारी तसेच मुख्याध्यापकांना केल्या.


            या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांमार्फत नागरिकांना स्वच्छता राखण्याचे आणि मुख्यत: कचरा न होऊ देण्याचे काम करणे अपेक्षित आहे. यासाठी शाळांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावयाचे असून विद्यार्थ्यांनी त्यांच्या केलेल्या कामाचे व्हिडिओ समाज माध्यमांवर पोस्ट करावयाचे आहेत. या अंतर्गत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना 2 ऑक्टोबर 2023 रोजी गौरविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.


00000

Featured post

Lakshvedhi