Tuesday, 11 July 2023

राज्य शासनातर्फे उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धाराज्यात प्रथम येणाऱ्या मंडळास मिळणार पाच लाख रुपयांचे पारितोषिक

 राज्य शासनातर्फे उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धाराज्यात प्रथम येणाऱ्या मंडळास मिळणार पाच लाख रुपयांचे पारितोषिक


- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार


 


            मुंबई, दि. १० : राज्यात १९ सप्टेंबर २०२३ पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहेत. राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांना अनुक्रमे पाच, अडीच आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार असून या स्पर्धेत अधिकाधिक मंडळांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याचे वने, मत्स्य व्यवसाय व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.


            राज्यात सन २०२२ मधील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यात आले होते. त्या अनुषंगाने सन २०२३ मध्ये राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पारितोषिक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठीचा निधी आणि या पुरस्कारसाठीचे निकष याबाबतीत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे, असेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.


            राज्य समितीकडे जिल्हास्तरीय समितीने निवड केलेल्या ४४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी वरील प्रमाणे तीन विजेत्या गणेशोत्सव मंडळांना वगळून उर्वरित ४१ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास राज्य शासनाकडून प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.


            या पुरस्कारासाठीच्या २४ लाख ६० हजार रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या पुरस्कारांसाठी निवड होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी विविध निकष असतील. त्यांना गुण दिले जातील. या स्पर्धेत धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल, असे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.


            या स्पर्धेसाठी पर्यावरणपूरक मूर्तीसाठी दहा गुण, पर्यावरणपूरक सजावट (थर्मोकोल, प्लास्टिक विरहीत) १५ गुण, ध्वनिप्रदूषण रहित वातावरणासाठी पाच गुण, पाणी वाचवा, मुलगी वाचवा, अंधश्रद्धा निर्मूलन आदी समाजप्रबोधन, सामाजिक सलोख्यासंदर्भातील सजावट, देखाव्यासाठी २० गुण, स्वातंत्र्याच्या चळवळीसंदर्भात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्ताने सजावट, देखाव्यासाठी २५ गुण असतील. गणेशोत्सव मंडळाने रक्तदान शिबिर, वर्षभर गडकिल्ले संवर्धन, पर्यावरण रक्षण, सेंद्रीय शेती, सौर ऊर्जेबद्दल जागरुकता निर्माण करणे, रुग्णवाहिका (ॲम्ब्युलन्स) चालविणे, वैद्यकीय केंद्र चालविणे आदी सामाजिक कार्यासाठी २० गुण, शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, आरोग्य आदीबाबत केलेल्या कार्याबद्दल १५ गुण, महिला, ग्रामीण भागातील वंचित घटकांच्या शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक आदीबाबत केलेल्या कार्यासाठी १५ गुण, पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धांसाठी १० गुण, पारंपरिक, देशी खेळांच्या स्पर्धेसाठी १० गुण असतील. गणेश भक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधा उदा. पाणी, प्रसाधनगृह, वैद्यकीय प्रथमोपचार, वाहतुकीस अडथळा येणार नाही, असे आयोजन, आयोजनातील शिस्त, परिसरातील स्वच्छतेसाठी प्रत्येकी पाच असे २५ गुण मिळून अशी १५० गुणांची ही स्पर्धा असणार आहे.


            या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई- मेल आयडीवर १० जुलै ते ५ सप्टेंबर २०२३ या कालावधीत नोंदणी करावी.


            विजेत्यांच्या निवडीसाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी या समितीचा अध्यक्ष असेल. याशिवाय या समितीत शासकीय कला महाविद्यालयातील कला प्राध्यापक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, आरोग्य अधिकारी, पोलिस अधिकारी सदस्य असतील, तर जिल्हा नियोजन अधिकारी सदस्य सचिव असतील. निवड समिती प्रत्यक्ष उत्सवस्थळी भेट देतील तसेच मंडळाकडून व्हीडीओग्राफी व कागदपत्र जमा करुन घेतील. जिल्हास्तरीय समितीकडून प्रत्येक गणेशोत्सव मंडळाबाबत अभिप्रायासह गुणांकन करण्यात येईल. सदर समिती मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या ४ जिल्ह्यातून प्रत्येकी ३ व अन्य जिल्हयातून प्रत्येकी १ उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची शिफारस करुन त्यांची नावे सर्व कागदपत्र व्हीडीओसह राज्य समितीकडे सादर करेल.


            जिल्हास्तरीय समितीकडून शिफारस केलेल्या याद्यांमधून तीन विजेते क्रमांक निवडीसाठी राज्यस्तरावर समिती असेल. या समितीत सर जे. जे. कला विद्यालयाचे अधिष्ठाता, वरिष्ठ प्राध्यापक अध्यक्ष् असतील, तर पोलीस महासंचालक कार्यालयातील वरिष्ठ गट ‘अ’ मधील अधिकारी सदस्य, तर राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य जनसंपर्क अधिकारी सदस्य सचिव असतील. राज्यस्तरीय समिती ही जिल्हास्तरीय समिती मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या ४ जिल्ह्यांतून प्रत्येकी ३ व अन्य जिल्हयातून प्रत्येकी १ याप्रमाणे एकूण ४४ प्राप्त शिफारशीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमधून गुणांकन व संबंधित कागदपत्राच्या आधारे पहिल्या ३ विजेत्यांची निवड करतील.


            राज्य समितीकडे जिल्हास्तरीय समितीने निवड केलेल्या ४४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी वरील प्रमाणे तीन विजेत्या गणेशोत्सव मंडळांना वगळून उर्वरित ४१ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास राज्य शासनाकडून प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. 


००००

ज्येष्ठ नागरिक, महिला, बालकांच्या सुरक्षेसाठीअत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा

 ज्येष्ठ नागरिक, महिला, बालकांच्या सुरक्षेसाठीअत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


 


            मुंबई, दि. 10 : ज्येष्ठ नागरिक, महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस प्रशासनाला दिले.


            राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय अर्ध वार्षिक गुन्हे परिषदेचे आयोजन मुंबईतील पोलीस मुख्यालयात करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.


            यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री तथा गृह मंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव मनोज सौनिक, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रजनीश सेठ उपस्थित होते. परिषदेस पुणे ग्रामीण, कोल्हापूर, अहमदनगर, सांगली, नाशिक ग्रामीण, अकोला, सातारा, वाशीम, उस्मानाबाद (धाराशीव), नागपूर ग्रामीण, सोलापूर ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, कोविड कालावधीत राज्य पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानासह पोलिसांना प्रशिक्षण देण्यात यावे. देशातील आदर्श पोलीस दल म्हणून महाराष्ट्राच्या पोलीस दलाचा नावलौकीक आहे. भविष्यातही हा नावलौकीक कायम राखण्यासाठी प्रयत्न करावे, त्यासाठी शासन सर्व सहकार्य करेल.


            “राज्यातील सर्व पोलीस अधिकारी या परिषदेच्या माध्यमातून एकत्र आले आहेत. पोलीस दलाला अधिक सक्षम आणि संवेदनशील बनविण्यासाठी परिषदेत चर्चा व्हावी, उपाययोजना आखण्यात याव्यात यासाठी शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल. शासनाचे निर्णय, योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविणे महत्त्वाचे असून, या कार्यात पोलीस दल महत्त्वाचा घटक आहे. पोलीस आणि रुग्णवाहिका,अग्निशमन दल यांनी समन्वयाने काम केल्यास प्रभावीपणे काम करता येईल” असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


            मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, राज्यस्तर ते तालुकास्तरापर्यंत गुन्हेगारी, सायबर गुन्हे, अमली पदार्थांची तस्करी रोखणे, जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठीच कारवाई, संघटित गुन्हेगारी मोडीत काढणे, दहशतवादी हल्ले, सागरतटीय रस्त्यावर सुरक्षा वाढविणे, अपघात होऊ नयेत यासाठी उपाययोजना करणे, समाजात कायदा व सुव्यवस्था राखणे असे पोलीस दलाचे कामकाज अभिनंदनीय आहे. पोलीस आणि नागरिक हे एकमेकांना पूरक आहेत, नागरिकांशी संवाद वाढविल्यास त्यांच्यातली भीती दूर होईल आणि पोलीसांप्रति आदर वाढेल, तसेच गुन्हेगारावर जरब बसण्यासाठी मदत होते, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


            यावेळी खंडाळा येथील प्रशिक्षण केंद्राला सर्वोत्तम क्षेत्रीय प्रशिक्षण केंद्र म्हणून गौरविण्यात आले. शशिकांत बोराटे यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच 2021 चा सर्वोत्तम पोलीस स्थानक प्रथम पुरस्कार शिवाजी नगर पोलीस ठाणे, कोल्हापूर पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे, द्वितीय पुरस्कार देगलूर पोलीस ठाणे, नांदेड पोलीस निरीक्षक भगवान धबडगे, तृतीय पुरस्कार वाळूंज पोलीस ठाणे औरंगाबाद, पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, चौथा पुरस्कार अर्जुनी मोर पोलीस ठाणे, गोंदिया पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांना, पाचवा पुरस्कार राबोडी पोलीस ठाणे, ठाणे पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांचा प्रमाणपत्र आणि करंडक देऊन सत्कार करण्यात आला.


            पोलीस अधिकाऱ्यांनी यावेळी विविध गुन्ह्यासंदर्भात आकडेवारीसह सादरीकरण केले.

गुन्हे सिद्धीचा दर वाढविण्यासाठीनवीन निर्णय तातडीने घेणार : उपमुख्यमंत्री


            गुन्हे सिद्ध करताना विविध अडचणी येतात. मात्र, शासन निर्णयाची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या परिषदेतून प्राप्त सूचना, शासन निर्णयात करावयाच्या सुधारणा, प्रमाणित पद्धतीमध्ये करावयाच्या सुधारणा संदर्भातील सूचना यांचे एकत्रीकरण करून प्रस्ताव सादर करावा. त्यानुसार तातडीने नवीन निर्णय निर्गमित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.


            अमली पदार्थांच्या धोक्याचा सामना करण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करावी. उदयोन्मुख तपासात सायबर (लैंगिक शोषण, कर्ज फसवणूक ) या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सर्वसमावेशक व्यासपीठ शासन तयार करीत आहे. यामध्ये समाजमाध्यमासंदर्भात सर्व संस्थांचा समावेश असेल. या व्हर्चुअल इको सिस्टिममुळे पोलीस यंत्रणेला सायबर गुन्हेगारी नियंत्रण आणि कारवाईसाठी सहकार्य लाभणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी मनुष्य बळ वाढविण्यात येईल. यासाठी बाह्य यंत्रणेचा वापर करणे गरजेचे असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.


            सेवा प्रशिक्षण कार्यक्रमात प्रशिक्षण विश्लेषक आवश्यक असून, प्रत्येकाने हे प्रशिक्षण पूर्ण करणे गरजेचे असल्याचे महासंचालक यांनी सांगितले. विद्याशाखा आणि अभ्यासक्रमही महत्त्वाचा आहे, ज्या विषयाचे प्रशिक्षण आहे त्याच विषयाचे प्रशिक्षण द्यायला हवेत, असेही त्यांनी सांगितले.


००००




 

धुळे-इंदूर रेल्वे मार्ग लवकर पूर्ण करणारसुलवाडे-जामफळ योजनेच्या कामास निधी कमी पडू देणार नाही

 धुळे-इंदूर रेल्वे मार्ग लवकर पूर्ण करणारसुलवाडे-जामफळ योजनेच्या कामास निधी कमी पडू देणार नाही


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


धुळे जिल्ह्याच्या विकासासाठी शासन कटिबद्ध - उपमुख्यमंत्री अजित पवार


             धुळे, दि. 10 जुलै 2023 (जिमाका) - जिल्ह्याला सुजलाम सुफलाम बनविणाऱ्या सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेच्या कामासह धुळे शहराच्या विकास कामांना निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. धुळे-इंदूर रेल्वे मार्गाचे भूसंपादनाचे काम जलदगतीने सुरू असून हा रेल्वे मार्गही लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.


            येथील एसआरपीएफ मैदानावर 'शासन आपल्या दारी' अभियानातंर्गत धुळे जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, मंत्री अनिल पाटील, खासदार डॉ. हीना गावित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अश्विनी पवार, आमदार किशोर दराडे, जयकुमार रावल, काशीराम पावरा, मंजुळाताई गावित, चिमणराव पाटील, मंगेश चव्हाण, महापौर प्रतिभा चौधरी आदी उपस्थित होते.


            'शासन आपल्या दारी' अभियानात धुळे जिल्ह्यात 3 लाख 21 हजारपेक्षा अधिक नागरिकांना लाभ देण्यात आला आहे, असे नमूद करून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, शासन आपल्या दारी या लोकाभिमुख कार्यक्रमास राज्यभरात उदंड प्रतिसाद मिळत आहे. शासनाच्या योजनांचा लाभ एकाच छताखाली नागरिकांना मिळत आहे. सरकारी कार्यालयांच्या चकरा सर्वसामान्यांना माराव्या लागू नये यासाठी शासनाला काम करावयाचे आहे. आदिवासी समाज संघटनेच्या मागण्यांवर बैठक घेऊन त्यांच्या मागण्यांची दखल घेतली जाईल. 


            गेल्या वर्षभरात शासनाने सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले. धुळे-नरडाणा-इंदूर रेल्वे मार्गाच्या कामासाठी केंद्र सरकार 50 टक्के व राज्याचा 50 टक्के निधी देणार आहे. त्यामुळे या रेल्वे मार्गाचे काम लवकरच मार्गी लागणार आहे.


धुळे जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्ध - उपमुख्यमंत्री अजित पवार


            सर्वसामान्यांना सरकारी कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागू नये यासाठी शासनच जनतेपर्यंत जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या माध्यमातून देशाचा झपाट्याने विकास होत आहे. तापी नदीमधील बॅरेजच्या पाण्याचा वापर वाढला पाहिजे, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. आर्थिक शिस्त ठेवत शासन सर्वसामान्यांसाठी सर्वांगीण काम करत आहे. पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळविण्यासाठी खर्च करण्याचे शासनाचे धोरण आहे. पाऊस नसल्याने पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे, असे नमूद करून धरण पाणीसाठ्याचे योग्य नियोजन प्रशासनाने करावे, अशी सूचनाही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केली.


            धुळे जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. धुळे जिल्ह्यात रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेतली आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक गाव-वाड्या-वस्त्यांपर्यंत रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यावर शासनाचा भर राहणार आहे. धुळे जिल्ह्यातील उद्योगांच्या विकासावरही शासनाचा भर राहील, असेही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


            पालकमंत्री श्री. महाजन म्हणाले की, धुळे जिल्ह्यात काही भाग आदिवासी बहूल आहे. त्यामुळे दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना आता कुठे जाण्याची गरज नाही. तुमच्या कामासाठी शासनच आता तुमच्या दारी आले आहे. प्रत्येकाला घर, प्रत्येक घरी शौचालय, वीज, पिण्याचे पाणी, गावांमध्ये जाण्यासाठी रस्ते, प्रत्येकाला अन्नसुरक्षा मिळाली पाहिजे. असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. महात्मा फुले आरोग्य योजनेत 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत करण्यात आले आहेत. एक रुपयात पीक विमा योजना, महिलांना एसटी तिकिटात 50 टक्के सवलत, 75 वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास, अशा सर्वसामान्यांच्या कल्याणकारी योजना शासन राबवत आहे. राज्य व देशात पायाभूत सुविधांचे जाळे तयार होत आहे. अक्कलपाडा धरण व सुलवाडे बॅरेज प्रकल्पामुळे धुळे जिल्ह्यातील लाखो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. केंद्रीय योजनेत या प्रकल्पांचा समावेश केल्याने कामांना गती येणार आहे. धुळे महानगरपालिकेला सुध्दा विकासकामांसाठी मुबलक निधी देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.


            यावेळी मान्यवरांच्या हस्ते शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाचे वितरण करण्यात आले. ज्येष्ठ लोक कलावंत नथ्थू ईशी, जितेंद्र भोईटे, संतोष ताडे, अरविंद भामरे, मांगू मगरे यांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते वृध्द कलावंत पेन्शन योजनेच्या लाभाचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. रोजगार मेळाव्यातून रोजगार मिळालेले दिनेश पाटील, चेतन गवळी, अमोल जाधव या तरूणांना यावेळी नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले.


            यावेळी धुळे जिल्ह्याने विविध योजनांच्या माध्यमातून दिलेल्या लाभांची माहिती देणारी दृकश्राव्य चित्रफित दाखविण्यात आली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे टोपी, उपरणे, महिला बचतगटांनी तयार केलेल्या खानदेशी पदार्थ देऊन स्वागत करण्यात आले. व्यासपीठावर याप्रसंगी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस., पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, मुख्यमंत्री जन कल्याण कक्षाचे राज्य मुख्य समन्वयक डॉ. अमोल शिंदे, महानगरपालिकेचे आयुक्त देविदास टेकाळे, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, परिविक्षाधीन सनदी अधिकारी सत्यम गांधी आदी उपस्थित होते.


            प्रास्ताविकात जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी ‘शासन आपल्या दारी’ अभियानात केलेल्या कामांची माहिती विशद केली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कृषी आणि कामगार, आदिवासी विभागाच्या लाभार्थ्यांना कामगार किट, ट्रॅक्टरचे वाटप केले. तसेच निवडक सरपंचाशी संवादही साधला. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी, धुळे जिल्ह्यातील आदिवासी समुदायातील विविध कलाकारांच्या कलापथकांनी स्थानिक आदिवासी नृत्य सादर केले.


एका छताखाली शासकीय विभागांच्या माहितीचे स्टॉल


            'शासन आपल्या दारी' अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात विविध शासकीय विभागांचे 34 स्टॉल उभारण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांसह इतर मान्यवरांनी आदिवासी विकास विभागाच्या स्टॉलला भेट देऊन लाभार्थ्यांना लाभाचे वितरण केले. या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती एकाच छताखाली मिळत मिळाल्यामुळे या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या माध्यमातून नागरिकांच्या लेखी समस्या, तक्रारी, निवेदने स्वीकारण्यात आली. जिल्हा सामान्य प्रशासन रूग्णालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरासही या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रोजगार मेळाव्यात एकूण 1800 युवकांनी नोंदणी केली. यापैकी 1250 युवकांची प्राथमिक निवड करण्यात आली, तर 215 उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या मेळाव्यात 15 विविध आस्थापना सहभागी झाल्या होत्या.


            यावेळी बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, खासदार डॉ. गावित, आमदार मंगेश चव्हाण, आमदार जयकुमार रावल यांनी मनोगत व्यक्त केले. राज्यगीताने कार्यक्रमाची सुरूवात झाली. तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश देवपूरकर यांनी केले.


000000



 

शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या अनुषंगाने१३ जुलै रोजी वाहतुकीत बदल

 शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या अनुषंगाने१३ जुलै रोजी वाहतुकीत बदल

            पुणे, दि. १० : पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे १३ जुलै रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’ व जेजुरी विकास आराखडा भूमीपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी लाभार्थी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने व अन्य वाहनांने मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहेत.


            वाहतुक कोंडी होऊ नये म्हणून १३ जुलै रोजी पहाटे ५ वाजेपासून ते सायं. ८ वाजेपर्यंत पुणे ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ आणि पुणे ते बारामती या मार्गावरील जड, अवजड व इतर वाहतूक बंद करुन अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.


            जेजुरी पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्यीतील वाहतूक : सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथून पुणे येथे जाण्याकरीता जेजुरी सासवडकडे येणारी जड, अवजड व इतर - वाहतुक पूर्णपणे बंद करुन त्यावरील वाहने ही निरा-मोरगाव-सुपा ते केडगाव चौफुला मार्गे पुणे-सोलापूर महामार्ग क्रमांक ६५ वरुन पुणे या मार्गे वळविण्यात येणार आहेत. पुण्याकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करुन बेलसर- कोथळे- नाझरे सुपे-मोरगाव रस्ता मार्गे बारामती-फलटण- सातारा या मार्गे वळविण्यात येणार आहे.


            वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्यीतील वाहतूक: बारामती व नीरा बाजूकडून जेजुरी मार्गे पुणे बाजुकडे जाणारी जड, अवजड व इतर वाहतूक पूर्णपणे बंद करुन ती मोरगाव- सुपा- केडगाव चौफुला मार्गे पुणे- सोलापूर महामार्ग क्रमांक ६५ वरुन पुणे या मार्गे वळविण्यात येणार आहे. 


            सासवड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हवीतील वाहतूक: पुणे बाजूकडून जेजुरी मार्गे फलटण - सातारा बाजुकडे जाणारी जड, अवजड व इतर वाहतूक पूर्णपणे बंद करुन सासवड- नारायणपूर-कापूरहोळ मार्गे सातारा - फलटण किंवा सासवड-वीर फाटा-परींचे- वीर- वाठार मार्गे लोणंद या मार्गे वळविण्यात येत आहे.


            वाहतुकीस लावलेले निर्बंध १३ जुलै रोजीच्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी येणाऱ्या वाहनांसाठी शिथील राहतील. नागरिकांनी वाहतूकीत केलेल्या बदलाची नोंद घेवून सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.


00

Monday, 10 July 2023

खानदानी ठेवा(Hereditary diseases).....*

 *खानदानी ठेवा(Hereditary diseases).....*


आई वडील आजी आजोबा यांच्याकडून जसे आपल्याला पैसा,घर, दाग दागिने हे इस्टेट या स्वरूपात मिळतात त्याचप्रमाणे दमा, डोकेदुखी, Constipation पासून ते Obesity, BP, Diabetes, Thyroid ते टक्कल असा आनुवंशिक रोगांचा अमूल्य ठेवा सुद्धा मिळत असतो.


आमच्या कुटुंबात पिढ्यानुपिढ्या हे आजार आहेत असे सांगणारे खूप भेटतात परंतु हा आनुवंशिक रोगांचा शाप नष्ट करण्यासाठी कुणीच प्रयत्न करताना दिसत नाही.


हे प्रयत्न खूप च अवघड आहेत असच सर्वांना वाटते किंवा घरी सगळ्यांना आहे म्हणून मला सुद्धा हा आजार झालाय किंवा होईल अशीच धारणा असते सगळ्यांची.


परंतु योग्य lifestyle follow केली, चुकीच्या गोष्टी टाळल्या की आनुवंशिक आजार सहज दूर करता येतात पण एकवेळ आम्ही चार गोळ्या जास्त घेऊ पण पथ्य सांगू नका, खाण्यावर बंधन घालू नका असाच ट्रेण्ड दिसतो हल्ली.


रोग होऊ च नये म्हणून प्रयत्न करणे हे खूप कमी खर्चाचे आणि सोपे आहे. जीभेवर थोडासा संयम ठेवला की 50% लढाई जिंकली च म्हणून समजा. कारण महागडे उपचार घेऊन सुद्धा त्रास कमी होत नाहीत असे आजार खूप बळावले आहेत हल्ली नवनवीन tests आणि investigation ची भर पडत आहे. या सगळ्यापासून लांब रहायचे असेल तर आज पासून च Healthy lifestyle चा अवलंब करा.


वेळच्या वेळी जेवण, अती तिखट, खारट आंबट पदार्थ कमी खाणे, सकाळी लवकर उठणे आणि रात्री लवकर झोपणे, चौरस आहार, नियमित व्यायाम, दोन्ही जेवणानंतर शत पावली, त्या त्या ऋतू मध्ये उपलब्ध असलेली फळे, भाज्या खाणे, Junk food न खाणेह्याच तर गोष्टी healthy lifestyle मध्ये येतात.


खरंच खूप अवघड आहे का हे follow करणं?

एकदा करून तर पहा. आपसूक तुमच्या लक्षात येईल की छोट्या छोट्या तब्येतीच्या तक्रारी कोणतेही औषध न घेता कमी करता येतात.


*सुनील इनामदार.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


तंबाखू मुक्त करण्याबाबत

 


भात झोडपणी स्वस्तात मस्त पहा तर खर,शेअर करा

 


Featured post

Lakshvedhi