Wednesday, 14 June 2023

पाचवी, आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीत वाढ

 पाचवी, आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीत वाढ


 


            पाचवी, आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करून त्यांना अधिक प्रोत्साहन देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.


            उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा योजनेत आता पाचवीसाठी ५ हजार रुपये प्रति वर्ष आणि आठवीसाठी ७ हजार ५०० प्रति वर्ष अशी शिष्यवृत्ती राहील. ही शिष्यवृत्ती २०२३-२४ पासून लागू राहील. संच एच आणि संच आय करिता २० हजार पेक्षा कमी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा काढून टाकण्यात आली आहे. पाचवी नंतर ३ वर्षांकरिता आणि आठवी नंतर २ वर्षांकरिता शिष्यवृत्ती देण्यात येते. मात्र, गेल्या १३ वर्षात यात वाढ झाली नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पाचवीच्या विद्यार्थ्यांस दर महिन्याला ५०० रुपये आणि आठवीच्या विद्यार्थ्यांस दरमहिन्याला ७५० अशी शिष्यवृत्ती मिळेल. ही शिष्यवृत्ती १० महिन्यांसाठी असते.


सध्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीकरिता किमान २५० रुपये ते कमाल १००० रुपये प्रति वर्ष तर माध्यमिक शिष्यवृत्तीसाठी किमान ३०० ते कमाल १५०० प्रति वर्ष एवढी संचनिहाय शिष्यवृत्ती देण्यात येते.

Tuesday, 13 June 2023

अनुसूचित जाती विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्यात सुधारणा

 अनुसूचित जाती विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्यात केंद्राप्रमाणे सुधारणा;सर्व अभिमत विद्यापीठे, खाजगी महाविद्यालयांना लागू


            अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्यात केंद्राप्रमाणे सुधारणा करण्याचा तसेच त्याचा लाभ सर्व अभिमत विद्यापीठे, खाजगी महाविद्यालयांना देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.


 भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेच्या सुधारित मार्गदर्शक सूचना केंद्राने दिल्या असून त्या देखील राज्यात लागू करण्यात येतील. 


            अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना उच्च शिक्षण घेणे,त्यांच्या गुणवत्तेत वाढ करणे आणि डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेवून उच्च विद्या विभुषित होणे, हा उद्देश ठेवून अनुसूचित जाती (नवबौध्दासह) विद्यार्थ्याकरीता भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना 1959-60 पासून राज्य शासनामार्फत राबविण्यात येत आहे. मार्च 2021 पासून या योजनेंतर्गत 2020-21 ते 2025-26 या वर्षांकरीता दिलेल्या सुधारीत मार्गदर्शक सूचना राज्यात लागू करण्यात येतील.


निर्वाह भत्त्यात सुधारणा करण्यात आली असून यासाठी 6 कोटी 50 लाख इतक्या वाढीव खर्चास देखील मान्यता देण्यात आली. ही योजना केंद्र आणि राज्यामध्ये 60:40 अशी राबविण्यात येते. सुधारित निर्वाह भत्त्याचे दर पुढील प्रमाणे आहेत :-


            वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गटांप्रमाणे 4 हजार रुपये ते 13 हजार 500 रुपये तर वसतीगृहात न राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गटांप्रमाणे 2 हजार 500 ते 7 हजार रुपये असे सुधारित दर असतील. शिष्यवृत्तीचा लाभ थेट विद्यार्थ्याच्या बँक खात्यात जमा होईल.


-----०-----

स्वातंत्र्य सैनिकांना घरांसाठी जमिनीकरिता उत्पन्न मर्यादा वाढविली

 स्वातंत्र्य सैनिकांना घरांसाठी जमिनीकरिता उत्पन्न मर्यादा वाढविली


 


            स्वातंत्र्य सैनिकांना घरांसाठी म्हणून जमीन देण्याकरिता एकत्रित मासिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा 10 हजार रुपयांवरून 30 हजार रुपये वाढविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.


            राज्यातील किमान मासिक वेतनामध्ये मोठी वाढ झालेली आहे. त्यानुसार स्वातंत्र्य सैनिकांच्या कौटुंबिक उत्पन्नमर्यादेत वाढ करणे आवश्यक होते. ज्या स्वातंत्र्य सैनिकांकडे किंवा त्यांच्या कुटुंबियांकडे निवासी जागा नाही त्यांना 2500 चौ. फू. मर्यादेत जमीन देण्यात येईल. त्यासाठी त्यांना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत स्वातंत्र्य सैनिक कक्षाची सहमती घेऊन महसूल विभागाकडे तसा प्रस्ताव दाखल करण्यात येईल.


------०

मानसिक आजारमुक्त व्यक्तिंकरिता चार जिल्ह्यांत 16 पुनर्वसनगृह होणार

 मानसिक आजारमुक्त व्यक्तिंकरिता चार जिल्ह्यांत 16 पुनर्वसनगृह होणार


 


            मानसिक आजारमुक्त व्यक्तिंकरिता चार जिल्ह्यांत स्वयंसेवी संस्थामार्फत 16 पुनर्वसनगृह स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.


            पहिल्या टप्प्यामध्ये नागपूर, पुणे, ठाणे व रत्नागिरी येथे ही पुनवर्सनगृह स्थापन करण्यात येतील. या पुनर्वसनगृहांमध्ये 18 ते 55 वयोगटातील तसेच 55 वर्षांवरील वयोगटातील ज्येष्ठ अशा दोन्ही वयोगटातील पुरुष व महिलांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण 16 पुनर्वसनगृहे सुरु करण्यात येतील. या पुनर्वसनगृहांच्या खर्चापोटी पाच कोटी 76 लाख रुपयांच्या तरतुदीसदेखील बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच पुढील टप्यामध्ये प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या शिफारशीनुसार मानसिक आजारमुक्त व्यक्तिंची संख्या वाढल्यास, ती विचारात घेऊन आवश्यकतेनुसार पुनर्वसनगृहांच्या संख्येत वेळोवेळी वाढ करण्याच्या तरतुदीसही मान्यता देण्यात आली.


            मानसिक आजारमुक्त व्यक्तिंना पुढील उपचाराची गरज नसते किंवा ज्या मानसिकमुक्त व्यक्ती बेघर आहेत किंवा त्यांचे कुटुंबीय स्वीकारत नाहीत अशांसाठी ही पुनर्वसनगृहे असतील. पुनर्वसनगृहाने प्रवेश देण्यात आलेल्या व्यक्तीस विविध प्रकारचे कौशल्यपूर्ण प्रशिक्षण द्यावयाचे आहे. त्याचप्रमाणे त्यांचे पुनर्वसन करणे, समुपदेशन करणे, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करणे, त्यांचा निवास, भोजन, क्रीडा व मनोरंजन, स्वच्छता, संरक्षण आदी बाबींची जबाबदारी घ्यावयाची आहे. पुनर्वसनगृह चालविणाऱ्या स्वयंसेवी संस्थेस 12 हजार रुपये प्रती व्यक्ती प्रती महिना सहायक अनुदान देण्यात येईल. अशा संस्थांची निवड करण्यासाठी राज्य स्तरावर निवड समिती असेल.

औषध घेताना या चुका करणं पडू शकतं महागात, जाणून घ्या काय टाळावं.....!*

 *औषध घेताना या चुका करणं पडू शकतं महागात, जाणून घ्या काय टाळावं.....!*


काही पदार्थांचं कॉम्बिनेशन हे प्रत्येकवेळी बरोबरच ठरेल असं नाही. याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणामही होऊ शकतो. म्हणून कोणतेही डॉक्टर आपल्या रूग्णांना औषध वेळेवर घेण्यासोबतच आहारावरही लक्ष देण्यास सांगतात. कारण आजारी असताना आपण जे खातो त्याचा आपल्या औषधांवरही प्रभाव पडत असतो. अशात औषध घेताना कोणते पदार्थ किंवा पेय टाळले पाहिजे हेही डॉक्टर सांगतात. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


*केळी...*

आजारी असताना अनेकदा लोक केळी खातात. केळींमध्ये असणारं पोटॅशिअम आरोग्यासाठी फायदेशीर असतं. पण जर तुम्ही ब्लड प्रेशरची औषधे घेत असाल जसे की, कॅप्टोप्रिल, एंजियोटेनसिन इत्यादी घेत असाल तर केळीसहीत इतरही पोटॅशिअम असलेली फळे किंवा पदार्थ खाऊ नये. याने हृदयाचे ठोके वाढू शकतात.


*आंबट फळं...*

 जेव्हा तुम्ही औषधे घेता, तेव्हा आंबट फळं खाऊ नये. आंबट फळं ५० पेक्षा अधिक औषधांना प्रभावित करू शकतात. याने शरीरात वेगवेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात. या समस्या टाळण्यासाठी औषधे घेत असाल तर लिंबू, संत्री, द्राक्ष, लोणचं, चिंच खाऊ नका.


*चहा-कॉफी...*

औषधे ही गरम गोष्टींमुळे खराब होतात. औषधांचं कोटिंग आधीच गरम पाण्यासोबत नष्ट होतं आणि त्याचा योग्य तो फायदा तुम्हाला मिळत नाही. अशात बरं होईल की, तुम्ही चहा-कॉफी किंवा कोणत्याही गरम पदार्थासोबत किंवा पेयासोबत औषध घेऊ नये. औषधे थंड किंवा नॉर्मल पाण्यासोबत घ्यावीत.


*डेअरी प्रॉडक्ट्स...*

 डेअरी उप्तादने जसे की, दूध, पनीर, दही आणि मलाई सारखे पदार्थ तुमच्या शरीरात काही एन्टीबायोटिक औषधांचा प्रभाव निकामी करू शकतात. दुधातील कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम सारख्या खनिजांनी प्रोटीनसोबत काही रिएक्शन होतात. याने काही औषधांचा प्रभाव कमी होतो.


*अल्कोहोल...* अल्कोहोलसोबत औषधे अजिबात घेऊ नये. औषधांमध्ये असे अनेक केमिकल्स असतात, जे अल्कोहोलसोबत रिएक्शन करू शकतात. अशात औषधांचा फायदा होण्याऐवजी याने जीवाला धोकाही होऊ शकतो.


*कोल्ड ड्रिंक्स...*

 सोडा आणि कोल्ड ड्रिंक्ससोबत औषधे घेण्याची चूक अजिबात करू नका. अशात औषध तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं.


*कुमार चोप्रा,*

*डॉ. सुनील इनामदार.*

.

🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


कंत्राटी ग्रामसेवकांचे मानधन वाढविले

 कंत्राटी ग्रामसेवकांचे मानधन वाढविले


 


            कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात १० हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सध्या या ग्रामसेवकास सहा हजार रुपये दरमहिना मिळतात. आता ते १६ हजार मिळतील.


राज्यात सध्या २७ हजार ९२१ ग्रामपंचायती असून १८ हजार ६७५ नियमित ग्रामसेवकांची पदे आहेत. त्यापैकी १७ हजार १०० पदे भरली असून १५७५ पदे रिक्त आहेत. वर्ष २००० पासून ग्रामसेवकांची पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येतात. कृषी सेवक, ग्राम सेवक, शिक्षण सेवक यांच्या मानधनात वाढ झाल्यामुळे कंत्राटी ग्राम सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव होता. यापूर्वी वर्ष २०१२ मध्ये वाढ करण्यात आली होती. यासाठी १ कोटी ५७ लाख ५० हजार रुपयांचा आर्थिक भार पडेल.

सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी 1500 कोटी रुपयांस मंजुरी

 सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी 1500 कोटी रुपयांस मंजुरी


 


            गेल्या वर्षी सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे बाधीत शेतकऱ्यांना 1500 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.


            सुमारे 15.96 लाख हेक्टर बाधित क्षेत्रातील 27.36 लाख शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल.


            राज्य शासनामार्फत ‘सततचा पाऊस’ नवीन आपत्ती घोषित करुन मदत देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या 5 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. त्याप्रमाणे शेतीपिकांच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारित दराने व निकषानुसार मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.


            केंद्र शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे दर सुधारित केले आहेत. त्यानुसार जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रतिहेक्टर 8500 रुपये, बागायत पिकांच्या नुकसानीसाठी 17 हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 22500 रुपये प्रति हेक्टर अशी दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यात येईल. 


-----

Featured post

Lakshvedhi