Saturday, 10 June 2023

जलवाहतुकीस प्रोत्साहन आणि पर्यटनास चालना

 जलवाहतुकीस प्रोत्साहन आणि पर्यटनास चालना देण्यासाठीफ्लोटिंग जेट्टी व इतर सुविधा निर्माण करणार


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


 


            मुंबई, दि ९ :- जलवाहतूकीस प्रोत्साहन आणि पर्यटनास अधिक चालना देण्यासाठी मुंबईतील 'एनसीपीए' परिसरातील समुद्र किनारी फ्लोटिंग जेट्टी, फ्लोटेल वेटिंग एरिया प्लॅटफॉर्म व इतर अनुषंगिक सुविधा निर्माण करण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


            मेघदूत निवासस्थान येथे फ्लोटेल प्रकल्पाबाबत बैठक झाली. यावेळी आमदार मदन येरावार, बंदरे विकास विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटिया, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी हे उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, राज्यात जलवाहतुकीस प्रोत्साहन देण्यात येत असून मुंबईतील 'एनसीपीए' परिसरातील समुद्र किनारी फ्लोटिंग जेट्टी, पार्किंग लॉन्स, प्रतिक्षालये व इतर अनुषंगिक सुविधा निर्माण करण्यात येतील. याव्दारे पर्यटन विकासालाही अधिक चालना मिळेल. यांसारख्या प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. सर्व संबंधित विभागांनी यासंदर्भात समन्वयाने कार्यवाही करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले.



----000----


मुंबईच्या डबेवाले कामगारांच्या घरकुलांसाठी धोरण लवकरच

 मुंबईच्या डबेवाले कामगारांच्या घरकुलांसाठी धोरण लवकरच


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            मुंबई दि ९ :- मुंबई डबेवाले कामगार यांच्यासाठी घरकुले उपलब्ध करून देण्यासंदर्भात लवकरच धोरण निश्चित करण्यात येईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


            मेघदूत निवासस्थान येथे मुंबई डबेवाले कामगार यांच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने बैठक झाली. यावेळी आमदार श्रीकांत भारतीय, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, 'म्हाडा'चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, नूतन मुंबई टिफीन बॉक्स सप्लायर्स चॅरीटी ट्रस्टचे प्रतिनिधी हे उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई डबेवाले कामगार यांना घरकुले उपलब्ध करून देण्यासंदर्भात लवकरच धोरण निश्चित करण्यात येईल. तसेच प्रधान मंत्री आवास योजनेच्या धर्तीवर राज्यस्तरीय योजना करण्यासंदर्भातही अभ्यास करण्यात येईल. यामुळे यांसारख्या अन्य इतर घटकांनाही लाभ मिळू शकेल. शहरे विकसित करताना विविध प्रकल्पांच्या उभारणीत गृहनिर्माणाचा साकल्याने विचार करण्यात येत असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.


            मुंबईतील डबेवाले हे चाकरमान्यांची निस्वार्थपणे सेवा करीत आहेत. मुंबई हेच त्यांचे कार्यक्षेत्र असल्याने मुंबई व नजिकच्या परिसरात त्यांच्यासाठी घरकुले उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे मत आमदार श्रीकांत भारतीय यांनी यावेळी मांडले.

हायटेक महाराष्ट्रासाठी.. नवे आयटी धोरणनव उद्यमी देणार - ज्ञान नेतृत्व अर्थव्यवस्था

 हायटेक महाराष्ट्रासाठी.. नवे आयटी धोरणनव उद्यमी देणार - ज्ञान नेतृत्व अर्थव्यवस्था


• राज्यात 95 हजार कोटींची गुंतवणूक


• 3.5 लाख रोजगार निर्मिती


• 10 लाख कोटी निर्यातीचे उद्दिष्ट


       महाराष्ट्र राज्य हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे. देशात सर्वाधिक परकीय गुंतवणूक राज्यात येते, निर्यातीतही राज्य अग्रेसर आहे. उद्योगासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा आणि कुशल मनुष्यबळ यांची उपलब्धता यामुळे जागतिक गुंतवणुकदारांचे महाराष्ट्र हे नेहमीच पसंतीचे ठिकाण राहिले आहे. स्टार्टअप व इनोव्हेशन या क्षेत्रातही राज्याने आघाडी घेतली आहे. सर्वात जास्त स्टार्टअप व इनोव्हेशन प्रकल्प राज्यात आहेत. या नव्या संकल्पना आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानातील नाविन्यतेला चालना देवून महाराष्ट्र राज्याला 'ज्ञान नेतृत्व अर्थव्यवस्था' म्हणून स्थापित करण्यासाठी आता राज्याने नवे माहिती आणि तंत्रज्ञान धोरण जाहीर केले आहे.    


            नव्या माहिती तंत्रज्ञान धोरणामुळे 95 हजार कोटींची नवीन गुंतवणूक आकर्षित करण्याचे उद्दिष्ट असून याद्वारे साडेतीन लाख एवढ्या रोजगाराची संधी निर्माण होणार आहे. तसेच 10 लाख कोटी एवढ्या निर्यातीचे लक्ष्य साध्य करण्याचे लक्षांक ठेवण्यात आले आहे.सर्वंकष धोरण तयार व्हावे आणि आयटी क्षेत्रातील उद्योजकांच्या आवश्यकतेनुसार नवे आयटी धोरण तयार व्हावे म्हणून मागील काही वर्षात 32 बैठका, 2 चर्चासत्र व 5 सादरीकरण झाले. त्याचप्रमाणे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध भागधारकांशी वेळोवेळी चर्चा करण्यात आली. झालेली चर्चा तसेच या पूर्वीची माहिती तंत्रज्ञान धोरणे राबवितांना विभागाला आलेल्या अनुभवाच्या आधारे, महाराष्ट्र राज्याचे नवीन माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा - 2023 चे प्रारूप तयार करण्यात आले.


इज ऑॅफ डुईंग बिजनेसला मिळेल प्रोत्साहनसिंगल टेनॉलॉजी इंटरफेस :


            राज्यात व्यवसाय करतांना व्यवसायिकांना कोणतीही अडचण येऊ नये आणि व्यवसाय वाढीत सुलभता असावी यासाठी माहिती तंत्रज्ञानामध्ये इज ऑॅफ डुईंग बिझनेसला प्रोत्साहन देण्यात येत आहे. राज्य शासन माहिती तंत्रज्ञान इंटरफेस (MAHITI) सुरू करणार आहे. त्याद्वारे कालबद्ध मंजुरी, घटक नोंदणी, प्रोत्साहन आणि इतर विस्तार सेवा आणि मैत्रीद्वारे सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.


  स्टार्टअप व इनोव्हेशन :


            उदयोन्मुख तंत्रज्ञानातील नाविन्येतला चालना देण्यासाठी आणि महाराष्ट्र राज्याला 'ज्ञान नेतृत्व अर्थव्यवस्था' म्हणून स्थापित करण्याकरिता महाराष्ट्र हब (M-Hub) उपक्रम आहे. सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम, नवउद्यमशील घटक, उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रातील उबवण केंद्र (incubation center) यांना आर्थिक सहाय्य देण्याकरिता 500 कोटी एवढा निधी उभारण्यात येणार आहे.


वॉक टू वर्कः 


            राज्यातील माहिती तंत्रज्ञान उद्याने व माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण विकसित करण्याकरिता पात्रता निकष आणि क्षेत्र वापर विषयक निकष शिथिल करण्यात येणार आहेत. भविष्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी निवाऱ्याची सोय उपलब्ध करून देण्यात येईल. म्हणजेच अगदी (वॉक टू वर्क) चालत जाऊन कार्यालयात पोहचता येणार आहे, प्रवासाची दगदग वाचेल, वेळ वाया जाणार नाही. यामुळे कुटुंबाला अधिक वेळ देता येणार आहे.


भविष्यातील कौशल्ये:


            भविष्यातील रोजगारक्षमता आणि कौशल्यांना प्रोत्साहन देण्यावर या धोरणात भर देण्यात आला आहे. भविष्यात आयटी क्षेत्रात काम करण्यासाठी वेगळ्या प्रकारची कौशल्ये लागणार आहेत. (एआय जॉब) कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील संशोधन वैज्ञानिक, सोल्यूशन आर्किटेक्ट, डेटा वैज्ञानिक, ऑप्टिकल वैज्ञानिक, एम्बेडेड सोल्यूशन्स अभियंता यासारखे सुपर स्पेशलाइज्ड नोकरीच्या भूमिकेत मान्यता प्राप्त कर्मचारी असलेल्या कंपन्यांना यासाठी प्रोत्साहन दिले जाईल.


टॅलेंट लॉंचपॅड :


            राज्यभरातील माहिती तंत्रज्ञान व माहिती क्षेत्रासाठी 'टॅलेंट लॉचपॅड' विकसित करण्यासाठी उद्योग विभाग, कौशल्य विकास विभाग आणि उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग एकत्रितरित्या काम करतील. सध्याची महाविद्यालये, कौशल्य संस्था आणि कौशल्य अभ्यासक्रम उपलब्ध करून देणारी प्रशिक्षण केंद्रे यांच्यासाठी स्पर्धा आयोजित केल्या जातील आणि हेकेथॉनद्वारे मदत केली जाईल.


प्रादेशिक विकास : 


            झोन- 1 वगळता इतर प्रादेशिक क्षेत्रामध्ये गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी या क्षेत्राच्या शाश्वत आणि संतुलित प्रादेशिक विकासाला प्रोत्साहन देण्यात येईल. तसेच मोठ्या माहिती तंत्रज्ञान घटकांसह सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमांच्या वाढीस सहाय्य करण्यासाठी हस्तक्षेप करण्यात येईल.


उद्योगाधारित कार्यप्रणाली / संरचना:


            महाराष्ट्र हब (M-Hub)अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी Chief Operating Officer यांची महाराष्ट्राचे तंत्रज्ञान राजदूत (Technology Ambassador) म्हणून नियुक्ती करण्यात येईल. त्यांच्याद्वारे खाजगी क्षेत्राच्या दृष्टिकोनातून धोरण आणि कार्यप्रदर्शन आदेशाचे (Performance Mandate) प्रतिनिधित्व आणि व्यवस्थापन करणे व राज्याच्या माहिती तंत्रज्ञान उद्योगामध्ये जागतिक सर्वोत्तम पद्धती राबविण्यात येतील.


कामगिरीचे सनियंत्रण :


            जागतिक बाजारपेठेच्या गतिशीलतेशी जुळवून घेण्यासाठी या धोरणाच्या कामगिरीचा शक्तीप्रदान समितीमार्फत वेळोवेळी आढावा घेण्यात येईल. समितीमार्फत जागतिक मागणी तसेच महाराष्ट्राची भविष्यातील गरज ओळखून धोरणामध्ये आवश्यक त्या सुधारणा वेळोवेळी करण्यात येतील.


एव्हीजीसी आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रास सहाय्य :


            राज्याच्या एव्हीजीसी आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रास (AL-ML, Big Data, Robotics etc) विशिष्टपणे सहाय्य करण्यासाठी धोरणामध्ये आर्थिक व बिगर आर्थिक प्रोत्साहनांचा अंतर्भाव करून गुणवत्ता, जागा, निधी व भरती प्रक्रिया इत्यादी करीता सहाय्य करण्यात येईल.


हायब्रिड वर्कींग :


            राज्य शासनाद्वारे कामगारांच्या सहकार्याने कामकाज पार पाडण्यासाठी सक्रियपणे प्रोत्साहन दिले जाईल. शहरी केंद्रांमधील गर्दी कमी करणे, माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा क्षेत्रासाठी 24X7 काम करण्याची परवानगी देणे आणि कार्यालयातील नॉन क्रिटिकल कर्मचाऱ्यांसाठी घरबसल्या कामांना मदत करणे हा यामागील उद्देश आहे.


माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा घटकांना प्रोत्साहने


            राज्यभरात माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा घटकांच्या विकासाला चालना देण्यासाठी या धोरणाद्वारे मुद्रांक शुल्क सवलत, भाडेखर्च, विद्युत खर्च, मालमत्ता कर व वीज दर इत्यादीमध्ये सवलती दिल्या जातील. रोजगार निर्मिती होण्यासाठी उदयोन्मुख तंत्रज्ञान घटकांना विशिष्ट प्रोत्साहने दिली जाणार आहेत.


            डेटा सेंटरचे विकसन करण्यासाठी या क्षेत्राला मानक वाहनतळ निकषांपासून सूट,(standard parking norms) उद्योग आणि पायाभूत सुविधा विषयक दर्जा तसेच पात्र घटकांना खुल्या प्रवेशासाठी (Open Access) अपारंपरिक ऊर्जा मिळवण्याची आणि डेटा सेंटर पार्कसाठी कॅप्टिव्ह पॉवर प्लॉट विकसित करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच वित्तीय व बिगर वित्तीय प्रोत्साहने अनुज्ञेय करण्यात आली आहेत.


            उदयोन्मुख तंत्रज्ञान यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, 3डी प्रिंटींग, इंटरनेट ऑफ थिंग्स आणि रोबोटिक्स, नॅनो टेक्नोलॉजी इत्यादींचा समावेश असलेल्या उद्योग - 4.० यांच्या वाढीसाठी या धोरणांतर्गत थेट सहकार्य करणे, राज्यात माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा घटकांमध्ये उच्च रोजगारक्षम आणि गुणवत्तापूर्ण मनुष्यबळाची निर्मिती सुनिश्चित करण्याकरिता या धोरणांतर्गत कौशल्य विकासाच्या अभ्यासक्रमावर (Super Specialized Job Roll) लक्ष केंद्रित करण्यात आले असून त्याकरिता कौशल्य विकास विभाग व उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांचेशी समन्वय ठेवून कार्य करण्यात येणार आहे


००००


मुंबईत सप्टेंबर २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय महिला धोरणाबाबत परिषदेचे आयोज

 मुंबईत सप्टेंबर २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय महिला धोरणाबाबत परिषदेचे आयोजन


विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची


मेक्सिकोच्या वाणिज्य दूतांबरोबर चर्चा


            मुंबई, दि. ९ : भारत आणि मेक्सिकोच्या पुढाकाराने सप्टेंबर २०२३ मध्ये मुंबई येथे आंतरराष्ट्रीय महिला धोरणाबाबत परिषद होणार आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि मेक्सिकोचे महावाणिज्य दूत ॲडॉल्फ गार्सिया एस्ट्राडा यांच्यात या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या रुपरेषेवर आज प्रारंभिक चर्चा झाली.


            मेक्सिकोचे महावाणिज्य दूत श्री. एस्ट्राडा यांनी आज दुपारी विधानभवनात उपसभापती डॉ. गोऱ्हे यांची भेट घेवून परिषदेबाबत सविस्तर चर्चा केली. या परिषदेत भारतासह मेक्सिको,कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, स्पेन या देशातील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, या परिषदेचे सूक्ष्म नियोजन करण्यात येईल. त्याचा वेळोवेळी आढावा घेण्यात येईल. या परिषदेत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, विधीमंडळाचे सदस्य, माध्यम प्रतिनिधी तसेच महिलांचे सक्षमीकरण, आरोग्य, सामाजिक, आर्थिक विकासासाठी कार्यरत स्वयंसेवी संस्था, स्त्री आधार केंद्रांच्या पदाधिकाऱ्यांसह राज्याच्या विविध भागातून प्रतिनिधी सहभागी होतील.


            या परिषदेत महिलांच्या सुरक्षेवर प्रामुख्याने चर्चा होईल. त्यात महिलांची कौटुंबिक आणि सार्वजनिक सुरक्षा, मानवी हक्क आणि महिला, अवैध मानवी वाहतूक, महिलांवरील हिंसाचाराला प्रतिबंध, महिला विकासासाठी नावीण्यपूर्ण संकल्पना आणि तंत्रज्ञानाचा वापर करणे आदी विषयांचा समावेश असेल. जपानमध्ये महिलांबाबतच्या गुन्ह्यांमध्ये दोष सिद्धीचे प्रमाण ९९ टक्के आहे. या पार्श्वभूमीवर जपानच्या राजदूतांनाही या परिषदेत निमंत्रित करून त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न होणार आहे, असेही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. मेक्सिकोचे वाणिज्यदूत श्री. एस्ट्राडा यांनी स्थलांतरीत होणाऱ्या महिलांचे प्रश्न, मेक्सिकोचे महिला केंद्रीत परराष्ट्र धोरण याविषयीची माहिती दिली

.


०००००


’ योगासने तुम्हाला ठेवतील बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून दूर.....*

 *‘ही’ योगासने तुम्हाला ठेवतील बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून दूर.....*


योगासने हे अनेक आजारांवर उपयोगी ठरतात. तुम्ही जर नियमीतपणे योगासने करत असाल तर तुम्ही दिर्घकाळ निरोगी आयुष्य जगू शकता. आज आपण अशाच काही योगासनांबद्दल जाणून घेणार आहोत, जे तुम्हाला बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून दूर ठेवण्यास मदत करतील.


*पवनमुक्तासन...* 

पाठीवर झोपा. आपले गुडघे वाकवा आणि आपल्या मांड्या पोटापर्यंत आणा, आपले गुडघे आणि घोटे एकत्र ठेवा. आपले हात पायभोवती आणा आणि त्यांना एकत्र करा. तुमची मान वर करा आणि तुमची हनुवटी तुमच्या छातीवर आणा. 4-5 सेकंद या स्थितीत रहा आणि नंतर तुमच्या पूर्वीच्या स्थितीमध्ये या.


*मलासन...*

 चटईवर पाय पसरून उभे राहा. त्यानंतर आपले गुडघे हळूहळू खाली वाकवा. छायाचित्रात दाखवल्याप्रमाणे आपली कंबर आणि तळवे समांतर राहातील याची काळजी घ्या. हे आसन करताना तुमच्या पाठीचा कणा आणि मान सरळ ठेवा. परत तुमच्या पूर्वीच्या स्थितीमध्ये या.


*बालासन...*

 हे आसन करताना सर्वप्रथम तुम्ही योगा चटईवर गुडघे टेकून, दोनही पायाच्या मदतीने तुमचे शरीरी पुढच्या बाजूला झुकवा, त्यानंतर दोन्ही हात सरळ एका दिशेत पुढे करा. हे आसन करताना तुमच्या पायाचे तळवे हे वर आसावेत तसेच गुडघ्यांमध्ये थोडे अंतर राहील याची काळजी घ्या. हे आसन करताना डोक्याने चटईला स्पर्श करा. चार ते पाच सेंकद श्वास घ्या आणि नंतर सोडा. पुन्हा आपल्या पूर्वीच्या स्थितीमध्ये या.


*भुजंगासन...*

हे आसन करताना तुम्ही जमिनीवर पोटाच्या मदतीने झोपा. त्यानंतर छायाचित्रात दाखवल्याप्रमाणे दोन्ही हातावर दाब देत डोके वर करा. हे करत असताना तुमच्या पायाचे तळवे जमिनीवरच राहातील यांची काळजी घ्या. त्यानंतर हळूहळू कपाळ वर घ्या, आणि वर पहा. त्यानंतर एक दीर्घ श्वास घेत हळूहळू आपले हात वर करा. हे आसन करत असताना हाताची कोपरे सरळ राहातील यांची काळजी घ्या. याच स्थितीमध्ये तुम्ही तुमची छाती वर घ्या. काही काळ याच स्थितीमध्ये राहा. त्यानंतर पुन्हा तुमच्या पूर्वीच्या स्थितीमध्ये या.


*डॉ. संतोष ढगे,*

*डॉ. सुनील इनामदार.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


राज्य उत्पादन शुल्क विभागाच्याभरती प्रक्रियेस तात्पुरती स्थगिती

 राज्य उत्पादन शुल्क विभागाच्याभरती प्रक्रियेस तात्पुरती स्थगिती


 


            मुंबई, दि. ९ : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिपत्याखालील लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान व जवान नि वाहन चालक (गट क) आणि चपराशी (गट ड) संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरण्याकरीता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या https://stateexcise.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ३० मे २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या भरती प्रक्रियेतील जवान संवर्ग हा राज्यस्तरीय संवर्ग घोषित करून ही भरती प्रक्रिया व वाढीव पदे व त्या अनुषंगाने संभाव्य रिक्त पदे विचारात घेवून एकत्रितपणे भरती प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे. त्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे. त्यामुळे या भरती प्रक्रियेस तात्पुरत्या स्वरूपात शासन निर्देशान्वये स्थगिती देण्यात येत आहे, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सहआयुक्त सुनील चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.


            या भरती प्रक्रियेसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत ते अर्ज ग्राह्य धरले जातील. मात्र, अर्जामध्ये तांत्रिक दुरुस्ती करणे गरजेचे असल्यास तशा सूचना यथावकाश कळविण्यात येतील. तसेच भरती प्रक्रियेची सुधारित जाहिरात सुद्धा यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल, असेही सहआयुक्त श्री. चव्हाण यांनी म्हटले आहे.


००००

अनुदानित आश्रमशाळांच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक

 अनुदानित आश्रमशाळांच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक


-- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


 


            मुंबई दि ९ :- राज्यातील स्वयंसेवी संस्थांद्वारा संचलित अनुदानित आश्रमशाळांच्या विविध मागण्यांसंदर्भात सकारात्मक विचार करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


            मेघदूत निवासस्थान येथे स्वयंसेवी संस्थांद्वारा संचलित अनुदानित आश्रमशाळांबाबत बैठक झाली. यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव प्रदीपकुमार व्यास, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, विद्यार्थ्यांचे परिपोषण अनुदान वाढवणे तसेच आकस्मिक व सानुग्रह अनुदान यासंदर्भातील स्वयंसेवी संस्थांद्वारा संचलित अनुदानित आश्रमशाळांच्या विविध मागण्यांसंदर्भात सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करण्यात येत असून या मागण्यांबाबत सर्व संबंधित विभागांची एकत्रित बैठक घेण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.


            विद्यार्थ्यांचे परिपोषण अनुदान, आकस्मिक अनुदान, सानुग्रह अनुदान व वेतनश्रेणी यासंदर्भातील विविध मागण्या संघटनेच्या वतीने यावेळी मांडण्यात आल्या.



----000----


Featured post

Lakshvedhi