Friday, 9 June 2023

झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी३० जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 . झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी३० जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन


            मुंबई दि. ९ : राज्यातील मदरसांच्या आधुनिकीकरणासाठी अल्पसंख्याक विकास विभागामार्फत डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत सन २०२३-२४ या वर्षासाठी पात्र मदरशांकडून दि. ३० जून, २०२३ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.


            राज्यातील धर्मादाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत व मुंबई शहर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील मदरसांनी विहीत नमुन्यातील अर्ज जिल्हा नियोजन समिती, मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात करण्याचे आवाहन, मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हा नियोजन अधिकारी जी. बी. सुपेकर यांनी के

ले आहे.


सुटलेलं पोट कमी करण्यासाठी १० प्रभावी घरगुती उपाय*

 *सुटलेलं पोट कमी करण्यासाठी १० प्रभावी घरगुती उपाय*


आपण सुरुवातीला वजन वाढण्याकडे लक्ष देत नाहीत परंतु जेव्हा वजन जास्त प्रमाणात वाढते तेव्हा ते कमी करण्यासाठी घाम गाळत बसाव लागत. या घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही लवकर वजन कमी करू शकता.


*1. कांदा, आलं, लसूण, टोमॅटो, दालचिनी या पदार्थांमुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत मिळते.*


*2. आहारात मिठाचे प्रमाण जितके कमी करता येईल तेवढे करा*. कारण मिठातील सोडियममुळे शरीरात पाण्याचे प्रमाण वाढते आणि लठ्ठपणा वाढतो.


*3. रात्री झोपण्यापूर्वी ग्रीन टी प्यायल्यानं शरीराची पचनक्रिया वाढते. ज्यामुळं आपलं वजन कमी होण्यास मदत होते.*


*4. आहारात साखरेचे प्रमाण जितके कमी करता येईल तेवढे करा.* *साखरेऐवजी गुळ अथवा मधाचा वापर नक्कीच करू शकता.*


*5. आहारात नियमितपणे दही असेल तर त्यामुळे सडपातळ होता येईल.* पोटाची चरबी कमी करण्यासाठी दररोज सकाळी *कच्च्या लसणाची एक पाकळी खाल्यामुळे* पोटावर आलेली चरबी कमी होण्यासाठी मदत होईल.


*6. पूर्ण झोप झाली नाही* तर वजन वाढतं. झोप चांगली झाली तर पचनक्रिया वाढते आणि अतिरिक्त चरबी वाढत नाही. *सकाळी उपाशी पोटी कोमट पाण्यात एक चमचा मध टाकून घेतल्याने आपलं वजन कमी होण्यास मदत होते.*


*7. योगा केल्याने वजन घटण्यास मदत होते. पोट कमी करण्यासाठी नौकासन योग सर्वोत्तम आहे*. 


कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि थोडे मिठ मिसळून घ्या. दररोज सकाळी याचे सेवन केल्याने शरीरातील मेटाबॉलिजम चांगले राहाते आणि सोबतच तुमचे वजन कमी होण्यासही मदत होते.


*8. वजन कमी करायचे असल्यास स्वत:ला पहाटे पायी चालण्याची सवय लावा* यामुळे पोटावर आलेली चरबी कमी होण्यासाठी मदत होईल.


 *9 _रात्री उशिरा जेवन केल्याने पोटावरील चरबी वाढते_ .* त्यामुळे रात्री झोपण्याच्या २ तासाआधी जेवा.


*10. रात्रीचं जेवणा मध्ये हलका आहार घ्या. तेलकट, मसालेदार जेवण करू नका.* झोपण्याआधी शतपावली कण्यास विसरु नका. यामुळे पोटावर आलेली चरबी कमी होण्यासाठी मदत होईल.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे,




मूल मतिमंद असण्याचे कारण काय ?*

 *➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖*

   *मूल मतिमंद असण्याचे कारण काय ?*

*➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖*


बुद्ध्यांक ७० पेक्षा कमी असलेली मुले मतिमंद (Mentally retarded) समजली जातात. मतिमंदपणा हा आजार नसुन अनेक कारणांमुळे दिसून येणारा परिणाम आहे. 


जन्मापासून वा लहानपणापासून दिसून आलेला बौद्धिक विकासाचा अभाव, दैनंदिन आयुष्यातील तडजोडी न करता येणे या सर्वाच्या एकत्रित परिणामाला मतिमंदत्व असे म्हणतात.


मतिमंदत्व ही एक मोठ्या प्रमाणावर आढळणारी समस्या आहे. जगातील ३% व्यक्ती मतिमंद असतात. भारतात सुमारे २.५ कोटी व्यक्ती मतिमंद असाव्यात, असा अंदाज आहे.


शरीरातील गुणसूत्रात होणाऱ्या बदलांमुळे वा रोगांमुळे मूल मतिमंद होऊ शकते. गरोदरपणामध्ये रूबेला, सायटोज्दुब्लो विषाणू यांचा संसर्ग झाल्यास तसेच काही औषधे घेतल्यास वा एक्सरे सारख्या किरणोत्सर्गाचा दुष्परिणाम झाल्यास जन्मणारे मूल मतिमंद होऊ शकते. 


जन्माच्या वेळेस झालेली दुखापत, प्राणवायुचा अभाव इत्यादी मुळेही मतिमंदत्व येऊ शकते. मेंदूचा जंतुसंसर्ग, डोक्याला इजा-अपघात, शिसे व पारा यांमुळे झालेली विषबाधा यांमुळेही मतिमंदत्व येऊ शकते. 


बाळंतपणाच्या वेळी ४० वर्षाहून जास्त वय असलेल्या मातांची मुले मतिमंद निपजण्याची शक्यता जास्त असते. मातेचे कुपोषण, बालका मधील कुपोषण, आयोडीनचा अभाव, जवळच्या रक्ताच्या नात्यात होणारी लग्नं; अशा कारणांमुळेही मतिमंदत्व येऊ शकते.


एकदा मतिमंदत्व निर्माण झाल्यावर उपचार करणे कठीणच असते. त्यामुळे मतिमंद मुले जन्माला येणार नाहीत, यासाठी प्रयत्न करणे योग्य होईल.


गरोदरपणात मातेला व्यवस्थित पोषण देणे, क्ष किरण तपासण्या टाळणे, प्रौढावस्थेत मातृत्व टाळणे, गर्भास हानीकारक औषधी न देणे, रुबेला सारख्या रोगाची प्रतिबंधक लस देणे, आयोडीनचा पूरक पुरवठा करणे, प्रसूतीपूर्व सेवा योग्य रीतीने पुरवणे; या उपायांमुळे मतिमंद मुले जन्माला येण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.


*डाॅ. अंजली दिक्षित व डाॅ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*


*➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



वर्तमानाचा आनंद* हात तले सोडायचे पळत्याचे पाठी फिरायचे

वर्तमानाचा आनंद*

एक भिकारी असतो. तो एका शांत दुपारी, देवळाबाहेर बसून आरामात नुकत्याच कोणीतरी दिलेल्या भाजीभाकरीचा आस्वाद घेत असतो. त्याक्षणी त्याच्या मनात कोणतेही विचार नसतात. तो अतिशय न्युट्रल असतो. इतक्यात एक मनुष्य बाईकवरून येतो. तो भिकाऱ्याला बघून जवळ येतो आणि म्हणतो, “बरं झालं तुम्ही दिसलात. आज माझ्या आजोबांचं श्राद्ध होतं. मला अन्नदान करायचं होतं. गावात कोणी दिसतंय का ते आधी बघावं म्हणलं. तासभर झाला कोणीच दिसलं नाही. बरं झालं तुम्ही सापडलात. आलोच दहा मिनिटांत. श्रीखंड पुरी घेऊन आलो” इतकं बोलून निघून जातो. भिकाऱ्याचं समोर असलेलं जेवण आपोआपच मंदावतं. बाईकस्वार गेलाय त्या दिशेकडे नजर ठेवून तो बसतो. भाजीभाकरी बाजूला ठेवून वाट बघू लागतो. 


दहा मिनिटे, पंधरा मिनिटे. तासभर झाला तरी तो बाईकस्वार काही येत नाही. श्रीखंडपुरी खायला मिळेल ही आशा तीव्र असते. भिकारी वाट बघतो. पोटात कावळे ओरडत असतात. तो पक्वान्नाच्या आशेने क्षुब्ध होतो. 


मघाशीची शांत अवस्था संपते, डोकं फिरतं. तो गेलेला मनुष्य काही परत येत नाही. आता भिकारी कंटाळून समोरची भाजीभाकरी खाऊ लागतो. पण आता त्याची चव आवडेनाशी होते. भाजी बेचव तर भाकरी कडक वाटते. मनुष्य काही येत नाही, श्रीखंडपुरी मिळत नाही.


आपलंही असंच होतं बरेचदा. आपल्या हाती काहीतरी असतं. त्यापेक्षा भव्यदिव्य काही मिळावं अशी आशा असते (आशा, महत्वाकांक्षा नक्की असायला हवीच) पण ती आशा जेव्हा हतबलतेचं रुप घेते आणि प्रत्यक्षात काही मिळत नाही तेव्हा त्याक्षणी आपल्याकडे जे हाती आहे तेही नकोसं वाटू लागतं. त्याचीही किंमत क्षुल्लक होते. त्याचा आनंद आपण घेऊ शकत नाही ही फॅक्ट आहे. माझ्या मते आशेचा किरण दिसला तरी आनंद मानावा आणि विझला तर जे याक्षणी आपल्या नशिबी आहे त्या वर्तमानाचा आनंद घ्यावा...!


🌷🙏🌷

जमिनीवर बसून जेवणाचे 10 फायदे*

 *जमिनीवर बसून जेवणाचे 10 फायदे*


*१- पचन सुधारते*


जमिनीवर मांडी घालून बसल्याने, अर्धपद्मासनाची स्थिती निर्माण होते. तसेच जमिनीवर ताट असल्याने जेवणाचा घास घेण्यासाठी वाकावे लागते या सतत होणार्‍या शारीरिक हालचालीमुळे पोटाजवळील स्नायूंना चालना मिळते व पचनाची क्रियादेखील सुधारते.


*२-वजन घटवण्यास मदत होते* 


जमिनीवर बसून जेवल्याने, वजन कमी होण्यासही मदत होते. वजन वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे प्रमाणापेक्षा अधिक खाणे. जमिनीवर बसून जेवताना ‘वेगस नर्व्ह’ (पोटाकडून मेंदूला संकेत देणारी) भूक व जेवणाचे प्रमाण योग्यप्रकारे राखू शकते. टेबलापेक्षा जमिनीवर बसून जेवल्याने, जेवणाचा वेग मंदावतो व पोट आणि मेंदूतील समन्वयता सुधारते. परिणामी अतिप्रमाणात खाण्याची वृत्ती कमी होते व वजनही काबूत राहते.


*३-लवचिकता वाढवत*े 


पद्मासनात बसल्याने, पाठीचे, कमरेतील तसेच पोटाजवळील स्नायूंवर ताण आल्याने पचनसंस्थेचा मार्ग सुधारतो. अशा स्थितीत बसल्याने पोटावर ताण येण्याऐवजी जेवण पचण्यास व ग्रहण करण्यास मदतच होते. परिणामी पोटाजवळील स्नायूंवर ताण आल्याने शरीर लवचिक व आरोग्यदायी बनण्यास मदत होते.


*४-मन शांत होते व खाण्यावर लक्ष केंद्रित होते*


जमिनीवर बसून जेवल्याने मेंदू शांत होतो व तुमचे सारे लक्ष जेवणाकडेच राहते. मनाची अस्थिरता कमी झाल्याने, जेवणातून मिळणारी पोषणतत्त्वे शरीर अधिक उत्तमप्रकारे ग्रहण करण्यास समर्थ होते. 


*५-कुटुंबातील सदस्यांशी जवळीक वाढते*


दिवसातील किमान एका जेवणाचा आपल्या कुटूंबासोबत जरूर आनंद घ्यावा.दिवसभरातील क्षीण व ताणतणाव हलका होतो. तसेच एकमेकांशी बोलल्याने, काही समस्यांतून मार्ग शोधण्यास मदत होते व नकळत कुटूंबातील सदस्यांशी जवळीक वाढते.


*६-शरीराची स्थिती (पॉश्चर) सुधारते* 


शरीराची स्थिती उत्तम राखणे हे निरोगी आरोग्याचे गमक आहे.शरीरातील काही स्नायू व सांध्यांवरील अतिरिक्त ताण कमी करून थकवा कमी होण्यासदेखील मदत होते. जमिनीवर बसून जेवताना पाठीचा कणा ताठ राहतो व पोट, खांदा व पाठीच्या स्नायूंची योग्य प्रमाणात हालचाल होते.


*७-दीर्घायुषी बनवते* 


ही अतिशयोक्ती नाही. जमिनीवर बसून जेवल्याने आयुष्य वाढते. ‘European Journal of Preventive Cardiology’च्या अहवालात प्रसिद्ध केलेल्या अभ्यासानुसार, जमिनीवर मांडी घालून बसलेली व्यक्ती जर कशाचाही आधार न घेता उठली तर त्यांचे आयुष्यमान अधिक आहे, असे समजावे. कारण अशा स्थितीतून उठण्यासाठी शरीराची लवचिकता अधिक असणे गरजेचे आहे. आणि जी व्यक्ती उठू शकत नाही त्यांचा मृत्यू नजीकच्या 6 वर्षात होण्याची शक्यता 6.5 पटीने अधिक असते.


*८-गुडघे व कमरेतील सांधे मजबूत होतात*


Yoga for Healing या पुस्तकाचे लेखक पी.एस. वेंकटेशवरा यांच्यामते, पद्मासनामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते. पचन संस्थेसोबतच सांधेदुखीचा त्रास होत नाही. गुडघा, घोटा व कंबरेतील सांधे लवचिक राहिल्याने अनेक विकार दूर होण्यास मदत होते. जमिनीवर बसल्याने स्नायूंबरोबर सांध्यांची लवचिकतादेखील वाढते.


*९-चंचलता कमी होत*े 


मांडी घालून किंवा पद्मासनात बसल्याने नसांमधील थकवा कमी होतो. म्हणूनच जेवताना जमिनीवर मांडी घालून बसण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे मन, मेंदू व परिणामी शरीरातील त्रास कमी होतात.


*१०-हृदयाला होणारा रक्तपुरवठा सुधारतो* 


काही वेळेस जेवल्यानंतर तुम्हाला गरम होते किंवा घाम आल्याचे आठवते का ? हो हे शक्य आहे. कारण अन्नाचे पचन होण्यासाठी शरीराला उर्जेची अधिक गरज असते. खुर्चीवर बसण्याऐवजी जमिनीवर बसून जेवल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. तसेच पचनही सुधारते.



महाराष्ट्रातील काही ओबीसी जातींचा केंद्रीय यादीत होणार समावेश

 महाराष्ट्रातील काही ओबीसी जातींचा केंद्रीय यादीत होणार समावेश


- राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर


 


            नवी दिल्ली, 8 जून : महाराष्ट्रातील लोधी, लिंगायत, भोयर पवार, झांडसे या आणि इतर मागासवर्गीय जाती केंद्रीय यादीत सूचीबद्ध करण्याची प्रक्रिया राष्ट्रीय मागासवर्ग आयोग राबवत असल्याची माहिती राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी दिली.


            महाराष्ट्र सदनात राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्यावतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी श्री. अहीर यांनी ही माहिती दिली. त्यांनी मागील सहा महिन्यांत राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडून केलेल्या कामांची माहिती दिली. यामध्ये राज्यातील काही ओबीसीमध्ये असणाऱ्या जातींना केंद्रीय यादीत सूचीबद्ध करण्याबाबतची प्रक्रिया सूरू असल्याचे सांगितले. तसेच महाराष्ट्रात इतर मागासवर्ग आयोगाचे काम चांगले सुरू असल्याचेही ते यावेळी म्हणाले. यावेळी आयोगाचे सचिव राजीव रंजन उपस्थित होते.


            सन 1993 मध्ये राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची स्थापना करण्यात आली असून सन 2018 मध्ये या आयोगाला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला. आयोगाच्या सक्रियतेमुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना बळ मिळत आहे. शैक्षणिक सत्र वर्ष 2021-22 मध्ये वैद्यकीय क्षेत्रात घेतलेली झेप उल्लेखनीय असल्याचा उल्लेख करीत श्री. अहीर यांनी माहिती दिली, देशभरात अनुक्रमे 1500 आणि 2500 विद्यार्थ्यांना एम.बी.बी.एस व एम.डी. अभ्यासक्रमात प्रवेश मिळाला आहे.


            यासह केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय आणि सैनिक शाळेत सन 2020-21 पासून 27 टक्के आरक्षण सुरू करण्यात आले. यामुळे केंद्रीय विद्यालयात सन 2020-ते 2023 पर्यंत 1,29,414 विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळविला आहे, तर नवोदय विद्यालयात शैक्षणिक सत्र 2021-23 मध्ये 59,243 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. देशभरातील एकूण 33 सैनिकी शाळेत वर्ष 2021-22 मध्ये जवळपास 32.91 टक्के ओबीसी विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळविला आहे. आता सैनिकी शाळेत मुलींनाही प्रवेश देण्यात येत असल्याचा उपक्रम केंद्र सरकारच्या पुढाकाराने सुरू करण्यात आल्यामुळे त्याचा लाभ ओबीसी विद्यार्थीनीनाही होत असल्याचे श्री. अहीर यांनी सांगितले. 


            विद्यापीठांमध्ये ओबीसी विद्यार्थ्यांची संख्या वाढली असल्याचे श्री. अहीर यांनी नमूद करून सांगितले की, वर्ष 2014-15 च्या तुलनेत 2020-21 मध्ये 32.6 टक्क्यांनी विद्यार्थ्यांची वाढ झालेली आहे. तसेच वर्ष 2014-15 च्या तुलनेत वर्ष 2020-21 मध्ये 40.4 टक्के विद्यार्थींनींची वाढ झाली आहे.


महत्वाच्या राष्ट्रीय संस्थांमध्ये वर्ष 2014-15 च्या तुलनेत 2020-21 मध्ये जवळपास 71 टक्क्यांची उल्लेखनीय वाढ झाली असल्याचे श्री. अहीर यांनी नोंदविले.


            राष्ट्रीय मागासवर्ग वित्त महामंडळद्वारे आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 1,94,810 लाभार्थ्यांना 678.05 कोटी रूपयांच्या वार्षिक कार्य योजनेला कार्य मंजुरी प्रदान करण्यात आली. राष्ट्रीय मागास वर्ग वित्त आणि विकास महामंडळ, प्रधानमंत्री दक्षता आणि कुशल संपन्न हितकारी योजनाच्या अंतर्गत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांची अंमलबजावणी करीत आहे.


            बँकांच्या माध्यमातून विविध योजनातंर्गत ओबीसींना पुरेपूर लाभ दिला जात असल्याचे श्री. अहीर यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रीय बँकांमध्ये ओबीसींचे खाते मोठ्या प्रमाणात उघडण्यात आले असून त्यांना विविध योजनांचा लाभ दिला जात असल्याची माहिती श्री. अहीर यांनी दिली. यासह पेट्रोल पंप आणि गॅस एजेन्सी वाटपातही 27 टक्के आरक्षण दिले जात असल्यामुळे आता ओबीसी लोकांच्या जीवनस्तरात चांगला बदल होत असल्याचे चित्र दिसत असल्याचे श्री. अहीर यांनी सांगितले.


00000

खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ

 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ


केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय


            नवी दिल्ली 8 : सन 2023-24 या आर्थिक वर्षातील खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतींत वाढ करुन केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. या महत्त्वाच्या निर्णयाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने (सीसीईए) मंगळवारी मंजुरी दिली आहे.


            केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने (सीसीईए) विपणन हंगाम 2023-24 करिता सर्व अनिवार्य खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमतींमध्ये (एमएसपी) वाढ करण्याबाबत मंजुरी दिल्याच्या निर्णयानुसार तूर डाळीच्या किमान आधारभूत किमतीमध्ये प्रति क्विंटल ४०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. धान, मका आणि भुईमूगाच्या किमान आधारभूत किमतीमध्येही वाढ करण्यात आली आहे.


            विपणन हंगाम 2023-24 साठी खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमतीमध्ये वाढ ही केंद्रीय अर्थसंकल्प 2018-19 च्या घोषणांच्या अनुषंगाने करण्यात आली आहे, यामध्ये शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय अधिभारीत सरासरी उत्पादन खर्चापेक्षा किमान 1.5 पट पातळीवर किमान आधारभूत किंमत निश्चित करण्याची घोषणा करण्यात आली होती. बाजरी (82 टक्के) आणि त्यानंतर तूर (58 टक्के), सोयाबीन (52 टक्के) आणि उडीद (51 टक्के) यांच्या बाबतीत शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चापेक्षा अपेक्षित लाभ सर्वात जास्त असण्याचा अंदाज आहे. उर्वरित पिकांसाठी, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चापेक्षा किमान 50 टक्के लाभ असा अंदाज आहे.


            अलिकडच्या वर्षांत, सरकार या पिकांसाठी उच्च किमान आधारभूत किंमत देऊन,कडधान्ये, तेलबिया आणि पौष्टिक-तृणधान्ये/श्री अन्न व्यतिरिक्त इतर पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन देत आहे. याशिवाय, सरकारने शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांमध्ये वैविध्य आणण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय कृषी विकास योजना (आरकेव्हीआय ), राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (एनएफएसएम ) यासारख्या विविध योजना आणि उपक्रम सुरू केले आहेत.


            2022-23 च्या तिसऱ्या आगाऊ अंदाजानुसार, देशात एकूण अन्नधान्य उत्पादन 330.5 दशलक्ष टन इतके विक्रमी होईल, असा अंदाज आहे, हे उत्पादन मागील वर्ष 2021-22 च्या तुलनेत 14.9 दशलक्ष टनांनी जास्त असल्याची माहिती केंद्र सरकारकडून प्राप्त झाली आहे.


पिकनिहाय हमीभावातील वाढ (रुपये प्रति क्विंटल)


• कापूस मध्यम धागा- जुने दर - 6080, नवे दर - 6620, वाढ- 540


• कापूस लांब धागा- जुने दर - 6380, नवे दर- 7020, वाढ 640


• सोयाबीन- जुने दर- 4300, नवे दर - 4600, वाढ 300


• तूर- जुने दर - 6600, नवे दर- 7000, वाढ 400


• मका- जुने दर - 1962, नवे दर - 2090, वाढ 128


• मूग- जुने दर - 7755, नवे दर - 8558, वाढ 803


• उडीद - जुने दर- 6600, नवे दर- 6950, वाढ 350


• भुईमूग- जुने दर -5850, नवे दर- 6377, वाढ 527


• ज्वारी हायब्रीड- जुने दर - 2970, नवे दर - 3180, वाढ 210


• ज्वारी मालदांडी- जुने दर - 2990, नवे दर - 3225,वाढ 235


• भात सामान्य ग्रेड- जुने दर - 2040, नवे दर - 2183, वाढ 143


• भात ए ग्रेड -2060, नवे दर - 2203, वाढ 143


00000


अमरज्योत कौर अरोरा/वृत्त क्र.102 /8.6.2023



 

Featured post

Lakshvedhi