Friday, 9 June 2023

मूल मतिमंद असण्याचे कारण काय ?*

 *➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖*

   *मूल मतिमंद असण्याचे कारण काय ?*

*➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖*


बुद्ध्यांक ७० पेक्षा कमी असलेली मुले मतिमंद (Mentally retarded) समजली जातात. मतिमंदपणा हा आजार नसुन अनेक कारणांमुळे दिसून येणारा परिणाम आहे. 


जन्मापासून वा लहानपणापासून दिसून आलेला बौद्धिक विकासाचा अभाव, दैनंदिन आयुष्यातील तडजोडी न करता येणे या सर्वाच्या एकत्रित परिणामाला मतिमंदत्व असे म्हणतात.


मतिमंदत्व ही एक मोठ्या प्रमाणावर आढळणारी समस्या आहे. जगातील ३% व्यक्ती मतिमंद असतात. भारतात सुमारे २.५ कोटी व्यक्ती मतिमंद असाव्यात, असा अंदाज आहे.


शरीरातील गुणसूत्रात होणाऱ्या बदलांमुळे वा रोगांमुळे मूल मतिमंद होऊ शकते. गरोदरपणामध्ये रूबेला, सायटोज्दुब्लो विषाणू यांचा संसर्ग झाल्यास तसेच काही औषधे घेतल्यास वा एक्सरे सारख्या किरणोत्सर्गाचा दुष्परिणाम झाल्यास जन्मणारे मूल मतिमंद होऊ शकते. 


जन्माच्या वेळेस झालेली दुखापत, प्राणवायुचा अभाव इत्यादी मुळेही मतिमंदत्व येऊ शकते. मेंदूचा जंतुसंसर्ग, डोक्याला इजा-अपघात, शिसे व पारा यांमुळे झालेली विषबाधा यांमुळेही मतिमंदत्व येऊ शकते. 


बाळंतपणाच्या वेळी ४० वर्षाहून जास्त वय असलेल्या मातांची मुले मतिमंद निपजण्याची शक्यता जास्त असते. मातेचे कुपोषण, बालका मधील कुपोषण, आयोडीनचा अभाव, जवळच्या रक्ताच्या नात्यात होणारी लग्नं; अशा कारणांमुळेही मतिमंदत्व येऊ शकते.


एकदा मतिमंदत्व निर्माण झाल्यावर उपचार करणे कठीणच असते. त्यामुळे मतिमंद मुले जन्माला येणार नाहीत, यासाठी प्रयत्न करणे योग्य होईल.


गरोदरपणात मातेला व्यवस्थित पोषण देणे, क्ष किरण तपासण्या टाळणे, प्रौढावस्थेत मातृत्व टाळणे, गर्भास हानीकारक औषधी न देणे, रुबेला सारख्या रोगाची प्रतिबंधक लस देणे, आयोडीनचा पूरक पुरवठा करणे, प्रसूतीपूर्व सेवा योग्य रीतीने पुरवणे; या उपायांमुळे मतिमंद मुले जन्माला येण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.


*डाॅ. अंजली दिक्षित व डाॅ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*


*➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi