Wednesday, 24 May 2023

महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिकशैक्षणिक संस्था अधिनियमात सुधारणा

 महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिकशैक्षणिक संस्था अधिनियमात सुधारणा


 


            मुंबई, दि. 23 : महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) अधिनियम, 2015 मध्ये कलम 11 च्या पोटकलम 3 मध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत.


            याबाबत राज्य शासनाने राजपत्र प्रसिद्ध केले असून त्यानुसार दहा वर्षांहून कमी नसेल इतक्या कालावधीसाठी भारतीय सनदी लेखापाल संस्थेचे सदस्य असलेले असे दोन नामांकित सनदी लेखापाल सदस्य असणार आहे. तसेच दहा वर्षांहून कमी नसेल इतक्या कालावधीसाठी भारतीय व्यय आणि परिव्यय लेखा संस्थेचे सदस्य असलेले दोन नामांकित परिव्यय लेखापाल किंवा प्रख्यात अर्थतज्ज्ञ सदस्य असणार आहेत. त्याचप्रमाणे आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संचालक, आयुष सदस्य असणार असून सह सचिवाच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसेल असा राज्य शासनाचा अधिकारी सदस्य सचिव असेल.


             अध्यक्षास राज्यातील कोणत्याही विद्यापीठाच्या कुलसचिवास जेव्हा त्या विद्यापीठाच्या व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संबंधित शुल्क नियामक प्राधिकरणाचे कामकाज करावयाचे असेल, तेव्हा निमंत्रित सदस्य म्हणून निमंत्रित करता येईल. त्याचप्रमाणे अध्यक्षास उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण, वैद्यकीय व आरोग्य विभाग, वास्तूशास्त्र, कृषी, आयुर्वेद, औषध वैद्यकशास्त्र, समचिकित्साशास्त्र, दंतवैद्यकशास्त्र, परिचर्या किंवा औषध निर्माणशास्त्र शिक्षण क्षेत्रातील कोणत्याही व्यक्तींना किंवा अधिकाऱ्यांना देखील त्यांचे मत घेण्यासाठी निमंत्रित करता येईल. अशा तज्ज्ञ निमंत्रितांना शुल्क नियामक प्राधिकरणाच्या बैठकांच्या कामकाजामध्ये सहभागी होता येईल. परंतु, त्यांना मतदानाचा हक्क असणार नाही, अशा सुधारणा अधिनियमात करण्यात आल्याचे राजपत्रात नमूद करण्यात आले आहे.


००००

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतमहाराष्ट्रातील 70 हून अधिक उमेदवार यशस्वी

 केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतमहाराष्ट्रातील 70 हून अधिक उमेदवार यशस्वी


        नवी दिल्‍ली, 23 : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत देशातील एकूण 933 उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी राज्यातील 70 हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. राज्यातून डॉ. कश्मिरा संखे प्रथम तर देशात तिने 25 वा क्रमांक पटकाविला आहे.  


             केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वर्ष 2022 च्या मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर झाला. या निकालात पहिल्या 100 उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील 7 पेक्षा जास्त उमेदवारांचा समावेश आहे. 


(25) कश्मिरा संखे, (28) अंकिता पुवार, (54) रूचा कुलकर्णी, (57) आदिती वषर्णे, (58) दिक्षिता जोशी, (60) श्री मालिये, (76) वसंत दाभोळकर, (112) प्रतिक जरड, (127) जान्हवी साठे, (146) गौरव कायंडे पाटील, (183) ऋषिकेश शिंदे, (214) अर्पिता ठुबे, (218) सोहम मनधरे, (265) दिव्या गुंडे, (266) तेजस अग्निहोत्री, (277) अमर राऊत, (278) अभिषेक दुधाळ, (281) श्रुतिषा पाताडे, (287) स्वप्निल पवार, (310) हर्ष मंडलिक, (348) हिमांषु सामंत, (349) अनिकेत हिरडे, (370) संकेत गरूड, (380) ओमकार गुंडगे (393) परमानंद दराडे, (396) मंगेश खिल्लारी, (410) रेवैया डोंगरे (445) सागर खरडे, (452) पल्लवी सांगळे (463) आशिष पाटील, (470) अभिजित पाटील, (473) शुभाली परिहार, (493) शशिकांत नरवडे, (495) दीपक यादव, (517) रोहित करदम, (530) शुभांगी केकण, (535) प्रशांत डगळे, (552) लोकेश पाटील, (558) ऋत्विक कोट्टे, (560) प्रतिक्षा कदम, (563) मानसी साकोरे, (570) सैय्यद मोहमद हुसेन, (580) पराग सारस्वत, (581) अमित उंदिरवडे, (608) श्रुति कोकाटे, (624) अनुराग घुगे, (635) अक्षय नेरळे, (638) प्रतिक कोरडे, (648) करण मोरे, (657) शिवम बुरघाटे, (663) राहुल अतराम, (665) गणपत यादव, (666) केतकी बोरकर, (670) प्रथम प्रधान, (687) सुमेध जाधव, (691) सागर देठे, (693) शिवहर मोरे, (707) स्वप्निल डोंगरे, (717) दिपक कटवा, (719) राजश्री देशमुख, (750) महाऋद्र भोर, (762) अकिंत पाटील, (790) विक्रम अहिरवार, (792) विवेक सोनवणे, (799) स्वप्निल सैदाने, (803) सौरभ अहिरवार, (828) गौरव अहिरवार, (844) अभिजय पगारे, (861) तुषार पवार, (902) दयानंद तेंडोलकर, (908) वैषाली धांडे, (922) निहाल कोरे. 


एक नजर निकालावर


 केंद्र शासनाच्या विविध सेवांमधील रिक्त जागांसाठी सप्टेंबर 2022 मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली. जानेवारी-मे 2023 दरम्यान परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या परीक्षेच्या निकालातील उत्तीर्ण 933 उमेदवारांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध सेवेतील पदांच्या नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. यामध्ये खुला (ओपन) गटातून –345, आर्थिक मागास प्रवर्गातून (ईडब्ल्यूएस) 99, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून(ओबीसी) – 263, अनुसूचित जाती प्रवर्गातून (एससी) – 154, अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 72 उमेदवारांचा समावेश आहे. एकूण यशस्वी उमेदवारांमध्ये 41 दिव्यांग उमेदवारांचा (14 ऑर्थोपेडिकली अपंग, 07 दृष्टीहीन, 12 श्रवणदोष आणि 08 एकाधिक अपंग) समावेश आहे. लोकसेवा आयोगाने 178 उमेदवारांची आरक्षित सूची (Reserve List) तयार केली आहे. यामध्ये सामान्य गट- 89, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस)- 28, इतर मागास वर्ग -52, अनुसूचित जाती- 05, अनुसूचित जमाती-04 उमेदवारांचा समावेश आहे. 


                        या रिक्त पदांवर उमेदवार होतील रूजू


भारतीय प्रशासन सेवा (आय.ए.एस.) या सेवेत शासनाकडे एकूण -180 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (ओपन) – 75, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 18 इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.) –45, अनुसूचित जाती (एस.सी.) – 29, अनुसूचित जमाती (एस.टी.) – 13 जागा रिक्त आहेत. उमेदवारांच्या गुणानुक्रमे रिक्त जागांवर यशस्वी उमेदवारांची निवड केली जाईल.


भारतीय विदेश सेवा (आय.एफ.एस.) या सेवेत शासनाकडे एकूण – 38 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (ओपन) – 15, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 04, इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.) – 10, अनुसूचित जाती (एस.सी.) – 06, अनुसूचित जमाती (एस.टी.) – 03 जागा रिक्त आहेत.


भारतीय पोलिस सेवा (आय.पी.एस.) या सेवेमध्ये एकूण – 200 जागा रिक्त आहेत, यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – 83, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 20, इतर मागास प्रवर्गातून - 53, अनुसूचित जाती प्रवर्गातून - 31, तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 13 उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे.


केंद्रीय सेवा गट अ - या सेवेमध्ये एकूण - 473 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) - 201, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 45 , इतर मागास प्रवर्गातून - 122, अनुसूचित जाती प्रवर्गातून - 69 तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून –36 उमेदवारांना नियुक्ती देण्यात येईल.


केंद्रीय सेवा गट ब - या सेवेमध्ये एकूण – 131 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) - 60, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 12 उमेदवार, इतर मागास प्रवर्गातून - 33, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 19 तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 07 उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.


एकूण 933 उमेदवारांपैकी 613 पुरुष आणि 320 महिलांची विविध सेवांमध्ये नियुक्तीसाठी आयोगाने शिफारस केली आहे, तर 101 उमेदवारांची निवड तात्पुरत्या स्वरुपाची असेल.


निकाल व यशस्वी उमदेवारांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील यशस्वींचेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनंदन

 केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील यशस्वींचेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनंदन


            मुंबई, दि. 23 :- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत यश मिळवणाऱ्या राज्यातील यशस्वी उमेदवारांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे. या परीक्षेत राज्यातून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या डॉ. कश्मिरा संखे यांचेही मुख्यमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केले आहे. डॉ. संखे यांच्यासह यशस्वी उमेदवारांना त्यांनी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.'सारथी' संस्थेच्या माध्यमातून या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांनीही लक्षणीय आणि घवघवीत यश मिळवले आहे, त्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी विशेष आनंद व्यक्त केला आहे.


            शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, ‘भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल होण्यासाठी अपार मेहनत आणि कष्ट करण्याची तयारी ठेवावी लागते. या परीक्षेत यश मिळवणाऱ्या सर्वच यशंवत, गुणवतांचे मनापासून अभिनंदन. या सर्वांच्या यशात त्यांच्या कुटुंबियांचीही साथ महत्त्वाचे ठरते. म्हणूनच या यशस्वी उमेदवारांसह, त्यांच्या कुटुंबियांचेही अभिनंदन. या सर्व यशस्वींकडून प्रशासकीय सेवेच्या आपल्या माध्यमातून समाजाची, पर्यायाने राज्य आणि देशाची सेवा घडेल, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी या सर्वांना पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत.


00०00

बृहन्मुंबई महानगरपालिकेची ऐतिहासिक वास्तू आणि आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे कामकाज पाहून भारावले जी-२० शिष्टमंडळ

 बृहन्मुंबई महानगरपालिकेची ऐतिहासिक वास्तू आणि आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे कामकाज पाहून भारावले जी-२० शिष्टमंडळ


            मुंबई, दि. २३ : जी-२० परिषदेच्या आपत्ती जोखीम सौम्यीकरण कार्यगटाची बैठक मुंबईत दिनांक २३ ते २५ मे २०२३ या कालावधीत होत आहे. या बैठकीसाठी आलेल्या शिष्टमंडळाने आज (दिनांक २३ मे २०२३) बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयास भेट दिली. महानगरपालिकेच्या ऐतिहासिक मुख्यालय इमारतीचे पुरातन वारसा दर्शन अर्थात हेरिटेज वॉक करण्यासह आपत्ती व्यवस्थापन विभागाचाही अभ्यास दौरा या शिष्टमंडळाने केला. मुख्यालयाची भव्यदिव्य व नेत्रदीपक वास्तूरचना पाहून शिष्टमंडळातील सदस्य भारावून गेले. तर, विविध नैसर्गिक आणि मानवनिर्मिती संकटांच्या वेळी करावयाचे प्रतिबंध, उपशमन आदींबाबतची महानगरपालिकेची सज्जता पाहून शिष्टमंडळाने कौतुक केले.


             बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अन्य वरिष्ठ अधिकारी यांच्यासह विविध मान्यवरांनी शिष्टमंडळातील सदस्यांचे मुख्यालयात स्वागत केले.


            जी-२० देशांच्या गटांच्या अध्यक्षपदाचा बहुमान यंदा भारताला मिळाला आहे. त्याचा एक भाग म्हणून देशातील विविध शहरांमध्ये निरनिराळ्या विषयांवर जी-२० देशांच्या कार्यगटांच्या बैठका होत आहेत. त्यातील 'आपत्ती जोखीम सौम्यीकरण' कार्यगटाची दुसरी बैठक मुंबईत आजपासून सुरू झाली आहे. सुमारे १२० पेक्षा अधिक प्रतिनिधी त्यात सहभागी आहेत.


            या प्रतिनिधींनी आज सायंकाळी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयास भेट दिली. महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने त्यांचे लेझीम आणि ढोलताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. या स्वागताने सर्व सदस्य भारावून गेले.


            मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला जी-२० सदस्यांनी भेट दिली. त्यावेळी महानगरपालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल यांनी स्वतः आपत्कालीन व्यवस्थापन विभागासह नियंत्रण कक्षाच्या कामकाजाबाबत माहिती दिली. निरनिराळ्या आपत्कालीन परिस्थितीच्या अनुषंगाने महानगरपालिकेकडून प्रतिबंध, उपशमन आणि सज्जतेसाठी केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या उपाययोजना, मुंबईवर आजवर आलेल्या विविध नैसर्गिक व मानवनिर्मित संकटांवेळी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने केलेली कामगिरी, आपत्कालीन व्यवस्थापन विभागाची सुसज्जता, जनसहभाग वाढविण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न आदींसंदर्भात विस्तृत माहिती शिष्टमंडळासमोर लघूचित्रफित तसेच कॉफी टेबल बुक यांच्या रुपाने देखील सादर करण्यात आली. संचालक (आपत्कालीन व्यवस्थापन) श्री. महेश नार्वेकर, प्रमुख अधिकारी (आपत्कालीन व्यवस्थापन) श्रीमती रश्मी लोखंडे यांनी संयोजन केले.


            त्यानंतर शिष्टमंडळाने गटागटाने बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या ऐतिहासिक वास्तूचा ‘हेरिटेज वॉक’ केला. मुख्यालय इमारतीची ऐतिहासिक माहिती, बांधकाम, वास्तूरचना, इतिहास आदींबाबत इत्थंभूत माहिती या सदस्यांना देण्यात आली. भव्यदिव्य अशा या वास्तूरचनेचे मूळ रुप जपण्यासाठी महानगरपालिकेने आजवर केलेल्या प्रयत्नांचे देखील पाहुण्यांनी कौतुक केले. सुमारे दोन ते तीन तासांच्या या भेटीदरम्यान शिष्टमंडळासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्वागत समारंभ देखील आयोजित करण्यात आला होता. एकंदरीतच, महानगरपालिकेने केलेल्या आदरातिथ्याने शिष्टमंडळ भारावून गेले.


मुंबईतील लोकप्रिय व्यंजनांचा पाहुण्यांनी घेतला आस्वाद


             बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या मध्यभागी असलेल्या प्रांगणात जी-२० शिष्टमंडळातील छोटेखानी स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला होता. मुंबईतील लोकप्रिय रुचकर व्यंजनांचा पाहुण्यांनी आस्वाद घेतला. पाणीपुरी, भेळ, मुंबई चाट, समोसा, वडापाव, पावभाजी, मुंबईचा मसाला चहा इत्यादी व्यंजनांचा यामध्ये समावेश होता. या व्यंजनांचा आस्वाद घेतल्यानंतर प्रतिनिधींनी भारतीय आणि खास मुंबईकर खानपान, खाद्यसंस्कृतीचे विशेष कौतुक केले. तसेच त्यांच्याबाबतची माहिती देखील जाणून घेतली.


पाहुण्यांनी केली बासरीवादकांना राग 'हंसध्वनी' वाजवण्याची फर्माईश


            बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील कोर्टयार्ड परिसरात पाहुण्यांसाठी खास बासरीवादन ठेवण्यात आले होते. पंडित भुपेंद्र बेलबन्सी यावेळी बासरीवर यमन राग वाजवत असताना पाहुणे त्यांच्याजवळ आले आणि त्यांनी या रागाचा आनंद घेतला. त्यानंतर लागलीच पाहुण्यांनी पंडित भुपेंद्र बेलबन्सी यांना राग 'हंसध्वनी' वाजवण्याची फर्माईश केली. पंडित बेलबन्सी यांनीही त्यांची फर्माईश पूर्ण केली. पाहुण्यांनी अशा प्रकारे भारतीय शास्त्रीय संगीतातील एका रागाची फर्माईश करून एक सुखद धक्का दिल्याची भावना पंडितजींनी यावेळी व्यक्त केली.


***

प्रेमाचं प्रतिक असलेल्या गुलाबाचा असाही वापर; वाढवा त्वचेचं सौंदर्य, असा तयार करा 'रोझ

 *प्रेमाचं प्रतिक असलेल्या गुलाबाचा असाही वापर; वाढवा त्वचेचं सौंदर्य, असा तयार करा 'रोझ फेसपॅक'.....*


काल अनेक कपल्स व्हॅलेंटाईन डे (Valentines Day) साजरा केला. प्रेमीयुगुल हे एकमेकांना वेगवेगळे गिफ्ट देऊन व्हॅलेंटाईन डे साजरा करतात. या दिवशी बरेच लोक आपल्या पार्टनरला गुलाब भेट म्हणून देतात. प्रेमाचं प्रतिक असणाऱ्या गुलाबाचा वापर विविध फेसपॅक तयार करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. गुलाबाचा वापर करुन फेसपॅक (Beauty Tips) कसा तयार करायचा? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. जाणून घ्या रोज फेस पॅक तयार करायची सोपीपद्धत...


*गुलाब पेस्ट तयार करण्याची सोपी पद्धत...*

गुलाबाचे विविध फेसपॅक तयार करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुलाबाची पेस्ट तयार करावी लागेल. ताज्या गुलाबाच्या पाकळ्या घ्या आणि त्या पाण्यानं स्वच्छ करा. या पाकळ्या मिक्समध्ये टाकून त्याची पेस्ट तयार करुन घ्यावी. या पेस्टचा वापर तुम्ही विविध फेसपॅक तयार करण्यासाठी करु शकता. 


*गुलाब हनी फेस पॅक(Honey And Rose Facepack)...*

तयार केलेल्या गुलाबाच्या पेस्टचा वापर करुन तुम्ही गुलाब हनी फेस पॅक तयार करु शकता. यासाठी गुलाबपेस्टमध्ये गुलाब पाणी आणि मध मिक्स करा. हा पॅक चेहऱ्याला 20 मिनिटे लावा. त्यानंतर थंड पाण्यानं चेहरा धुवा. या पॅकमुळे तुमच्या चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाईल आणि त्वचा हायड्रेट राहिल. तसेच चेहऱ्यावरील डाग देखील या फॅसपॅकमुळे कमी होतील.


*गुलाब चंदन फेसपॅक(Sandalwood And Rose Facepack)...*

गुलाबा पेस्टमध्ये चंदन पावडर मिक्स करा. त्यानंतर या मिश्रणात थोडे एक किंवा दोन चमचे दूध टाका. हा पॅक चेहऱ्यावर लावताना मसाज करा. हा पॅक जवळपास दहा मिनिटे चेहऱ्यावर ठेवा. त्यानंतर कोमट पाण्यानं चेहरा धुवा. या फेसपॅकमुळे चेहऱ्याचे स्क्रबिंग होते. त्यामुळे चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाते. 


*कोरफड जेल आणि गुलाबाचा पॅक (Aloe Vera And Rose Facepack)...*

गुलाबाच्या पेस्टमध्ये कोरफड जेल मिक्स करून चेहऱ्याला लावा. वीस मिनिटांनी चेहरा धुवा. या पॅकमुळे स्किन टायनिंग होते. तसेच चेहऱ्यावरील डाग देखील जातात. 


*कुमार चोप्रा,*

*सुनील इनामदार.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺



Tuesday, 23 May 2023

बहूगुणी स्टार फ्रुट ,करमाळ्याच फळ*

 *बहूगुणी स्टार फ्रुट ,करमाळ्याच फळ*



कोलेस्टेरॉल, मोटापा,शुगर,रक्ताचीकमी,कंबरदुखी, अंगदुखी, बीपी,हार्ट अँटँक हे फळ येऊन देत नाही. मुंबईत सर्वत्र दिसते,कापल्यावर हे फळ स्टार टाईप दिसते यास हिंदीत कमरख सुध्दा म्हणतात  

औषधी उपाय. १)कब्ज,पोटदुखी वर,अंगदुखी, गँस,छातीत कळ यात असलेल्या फायबर मुळे यावर आराम मिळतो दोन वेळ दोन मोठे तुकडे खा.

२)सुटलेल पोट,वाढलेल वजन,अनावश्यक चरबी

अँन्टी व्हिवेन नामक एन्झाईम मुळे शरीर प्रोटीन पचण्यास मदत होते.यात ग्लिसायनीक इंडेक्स ची मात्रा कमी असल्याने शरीरातग्लुकोज ची मात्रा कमी राहण्यास मदत होऊन वजन नियंत्रित रहाते.रोज दोन फळ खा.

३)विविध आजारात रोगप्रतिकारक शक्ती कमी होते ती यातील व्हिटॅमिन सी व अँन्टीआँक्सीडंन्ट गुळामुळे ती वाढते.रोज एक फळ खावे.थकवा जाऊन उर्जा मिळते.

४)ऐनिमीयात लाभदायक

फळातील व्हिटँमीन सी शरीरातील आयरन ला शोषून घेत असल्याने ते या आजारात फायदा होतो रोज दोन फोडी मोठ्या दोनवेळा खा.

५)कोलेस्टेरॉल 

ची मात्रा विक,अथवा अनियमीत असल्यास नियंत्रित करुन बँड कोलेस्टेरॉल ची वाढ रोखतो,व गुड कोलेस्टेरॉल वाढवतो.रोज एक फळ खावे.

६)हदयरोग

यातील फायबर, व पोट्याशियम मुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवतो.रोज एक फळ खावं.

७) खोकला, बाँडी डिटाँक्सीफिकेशन,रक्तगाठी होणे, साठीच्या आजारात लगेचच फरक दिसतो.


*

राज्याच्या विकासात आरोग्य, शिक्षण व पायाभूत सुविधादर्जेदार उपलब्धता महत्त्वाची

 राज्याच्या विकासात आरोग्य, शिक्षण व पायाभूत सुविधादर्जेदार उपलब्धता महत्त्वाची


- राज्यपाल रमेश बैस


            सातारा, दि. 23 : राज्याच्या सर्वांगीण विकासात आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांची दर्जेदार उपलब्धता महत्त्वाची ठरते. त्यादृष्टीने शासकीय यंत्रणांनी विकासकामे करण्याच्या सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी केल्या.


                  राजभवन महाबळेश्वर येथे जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांसोबत राज्यपालांची आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल महोदयांचे प्रधान सचिव संतोषकुमार, विशेष कार्य अधिकारी महेश गोलाणी, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिल्लारी, पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर जिल्हाधिकारी तथा राज्यपालांचे परिवार प्रबंधक अरुण आनंदकर यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.


                   पाणी जीवनासाठी अतिशय महत्त्वाचे असल्याचे सांगून राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, फार पूर्वीपासून मानवी वसाहती या पाण्याच्या काठी वसल्या आहेत. आजही पाण्याच्या काठीच शहरे विकसित होत आहेत. अलीकडे वातावरण बदलामुळे पाण्याच्या उपलब्धतेची परिस्थिती बदलत आहे. याचा विचार करून जल संधारणाची कामे करावीत. महाबळेश्वरच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. पावसाचे पाणी छोट्या छोट्या तलावांमध्ये साठवावे. प्रत्येक गावात लहान लहान तलाव बांधावेत. या तलावांमध्ये साठवलेले पाणी जमिनीत मुरून भूजल पातळी उंचावण्यास मदत होते. तसेच या पाण्याचा वापर ग्रामस्थांच्या दैनंदिन वापरासाठी ही होतो. डोंगर उतारावर पाणी अडवण्यासाठी छोटे छोटे बंधारे बांधावेत, या बाबत नेहमीच्या पठडीतील काम न करता थोडा वेगळा विचार करून काम केल्यास लोकांना चांगल्या सुविधा देता येतील, असेही राज्यपाल श्री बैस यांनी सांगितले.


                  प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा आढावा घेऊन राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, या आरोग्य योजनेमध्ये खासगी रुग्णालयांकडून करण्यात येणाऱ्या बिलांची पडताळणी करावी. कृषी विभागाने शेतकऱ्यांना जास्तीत जास्त योजनांचा लाभ द्यावा. कृषी प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणावर उभारण्यासाठी प्रयत्न करावेत. या प्रक्रिया उद्योगांमुळे शेतकऱ्यांना कृषी मालाला जास्तीचा भाव मिळण्यास मदत होणार आहे. तसेच एखाद्या वेळी बाजारात कमी भाव असल्यास कृषी मालाची साठवणूक करून भाव चांगला मिळाल्यावर तो बाजारात विकता येईल, अशा प्रकारच्या सुविधा उभारव्यात. चाकोरी बाहेर जाऊन चांगले काम करून नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही त्यांनी केल्या.


               यावेळी जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी जिल्ह्यातील विविध विभागांकडील योजनांचा सादरीकरणाद्वारे सविस्तर आढावा सादर केला. तसेच जलयुक्त शिवार योजनेचाही आढावा राज्यपाल श्री. बैस यांनी घेतला.

Featured post

Lakshvedhi