Friday, 21 April 2023

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी..!*

 *स्मरणशक्ती वाढवण्यासाठी..!* 


मेंदूला तीक्ष्ण करण्यासाठी आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांचे सेवन करतात. मात्र, ही औषधे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.


स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करू शकता. हे पदार्थ खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होऊ शकते. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आहारात पुढील गोष्टींचा समावेश करा.


*भोपळ्याच्या बिया (Pumpkin seeds)* 


भोपळ्याच्या बिया आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. या बियांचे नियमित सेवन केल्याने शरीर निरोगी राहते आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. कारण भोपळ्याच्या बियांमध्ये फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, विटामिन सी इत्यादी घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे भोपळ्याचे बियांचे सेवन करणे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.


*हळद (Turmeric)* 


हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. हे गुणधर्म स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात. हळदीमध्ये आढळणारे कर्क्यूमिन मेंदूला तीक्ष्ण बनवतात. त्याचबरोबर हळदीचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते. हळदीच्या सेवनाने शरीर मोसमी आजारांपासून दूर राहते.


*सुकामेवा (Dry fruits)* 


स्मरणशक्ती मजबूत करण्यासाठी तुम्ही सुक्यामेव्याचे सेवन करू शकतात. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर आणि आयरन आढळून येते, जे स्मरणशक्ती तीक्ष्ण करण्यास मदत करते. सुक्या मेव्याचे सेवन केल्याने लक्षात ठेवण्याची क्षमता वाढते. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही बदाम आणि अक्रोडाचे सेवन करू शकता.


*ब्रोकोली (Broccoli)* 


ब्रोकोली आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ब्रोकोलीमध्ये फायबर, पोटॅशियम, आयरन, सोडियम यासारखे घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात. त्याचबरोबर ब्रोकोलीमध्ये विटामिन के आढळून येते, जे स्मरणशक्ती वाढवते.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



अननस खाण्याचे 6 आयुर्वेदिक फायदे.....*

 *अननस खाण्याचे 6 आयुर्वेदिक फायदे.....*


*१). वजन कमी करण्यास उपयुक्त...*

अननसात फॅटचे प्रमाण नाममात्र असते. त्यामुळे ते वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. अननसमध्ये आढळणारे घटक लठ्ठपणाविरोधी घटक म्हणून काम करतात. हे लिपोजेनेसिसची प्रक्रिया देखील नियंत्रित करतात. ज्यामुळे शरीरातील 🧍🏻‍♂️चरबीचे प्रमाण कमी होते. इतकेच नाही तर ते लिपोलिसिसच्या प्रक्रियेला गती देते. ज्यामुळे चरबी आणि इतर लिपिड अधिक त्वरीत नष्ट होतात.


*२). हृदयासाठीही फायदेशीर...*

अननसाचे नियमित सेवन करणे देखील हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे केवळ हृदयाला विविध प्रकारच्या नुकसानीपासून वाचवते असे नाही तर त्यात असलेले ब्रोमेलेन हृदयाच्या पेशींना मरण्यापासून रोखते. हे शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित ठेवते. ज्यामुळे रक्ताभिसरण व्यवस्थित राहते. याशिवाय, ते मृत ऊतकांचा आकार देखील कमी करते. ज्यामुळे रक्ताभिसरणात कोणताही अडथळा येत नाही.


*३) सर्दी आणि फ्लू मध्ये फायदेशीर...*

अननसमध्ये भरपूर व्हिटॅमिन सी देखील आढळते. ज्यामुळे ते सर्दी आणि फ्लूमध्ये खूप फायदेशीर आहे. जेव्हा सर्दी असते तेव्हा श्लेष्माचा पडदा अनेकदा फुगतो आणि जास्त श्लेष्मा जमा होऊ लागतो. अननसमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करतात.


*४) रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास उपयुक्त...*

अननसमध्ये व्हिटॅमिन सी, मॅंगनीज, थायामिन, रिबोफ्लेविन, पायरीडॉक्सिन, कॉपर यांसारखे अनेक सूक्ष्म पोषक घटक आढळतात. ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. यासोबतच कौमेरिक अॕसिड, फेरूलिक अॕसिड, क्लोरोजेनिक अॕसिड, इलाजिक अॕसिड अशी अनेक नैसर्गिक रसायने अननसात आढळतात. जे शरीराला आतून मजबूत बनवण्यास मदत करतात.


*५). रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास होते मदत...* 

अननस खाल्ल्यानेही रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त आणि सोडियमचे प्रमाण कमी असल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. तथापि, जर तुम्ही रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी औषधे घेत असाल, तर हा त्याचा पर्याय नाही आणि ते घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.


*६) कर्करोग रोखण्यासाठी उपयुक्त...*

कर्करोग हा एक असा आजार आहे, ज्याचा यशस्वी आणि पूर्णपणे प्रभावी उपचार आजही जगभरातील डॉक्टर शोधत आहेत. तथापि, अननसमध्ये असे अनेक घटक आढळून आले आहेत जे कर्करोगापासून बचाव करण्यासाठी उपयुक्त आहेत. अननसात आढळणारे ब्रोमेलेन हे एन्झाइम शरीरात कर्करोगाच्या पेशी तयार होण्यास प्रतिबंध करते, असे एका संशोधनातून दिसून आले आहे. एवढेच नाही तर ते मृत पेशींना नैसर्गिकरित्या साफ करते. ज्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो.


*वैद्य तुषार साखरे,*

*सुनील इनामदार.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺



विद्यापीठांनी नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, शैक्षणिक वेळापत्रक, गुणांकन कार्यपद्धतीचे नियोजन करावे

 विद्यापीठांनी नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, शैक्षणिक वेळापत्रक, गुणांकन कार्यपद्धतीचे नियोजन करावे


- चंद्रकांत पाटील


            मुंबई, दि. २० : नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक त्या शैक्षणिक उपाययोजना करून विद्यापीठांनी शैक्षणिक वेळापत्रक व गुणांकन कार्यपध्दतीचे अचूक नियोजन करावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.


            कैवल्यधाम, लोणावळा येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्यावतीने दिनांक १९ व २० एप्रिल २०२३ रोजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंमलबजावणीच्या अनुषंगाने गठीत केलेल्या सुकाणू समितीच्या समवेत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री श्री. पाटील यांचे अध्यक्षतेखाली चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.


            मंत्री श्री. पाटील म्हणाले, राज्यातील विद्यापीठे व उच्च शिक्षण संस्थांमध्ये गुणात्मक बदल करण्यासाठी परीसस्पर्श सारखी योजना राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. विद्यार्थी हिताला अधिक प्राधान्य देऊन विद्यापीठे व महाविद्यालयांनी मेजर, मायनर व जेनेरिक विषयाच्या अनुषंगाने अभ्यासक्रम रचना, ॲकॅडेमिक बँक क्रेडीट्सची नोंदणी, प्रवेश प्रक्रियेचे स्वरुप यांचे योग्य नियोजन करावे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासनाच्यावतीने आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.


            राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सर्वसमावेशक, कौशल्याधिष्ठित असल्याने शैक्षणिक क्षेत्रातील सर्व घटकांपर्यंत धोरणाची वैशिष्ट्ये, कार्यपद्धती व शासनाद्वारे करण्यात येत असलेले प्रयत्न माध्यमांपर्यंत पोहचविण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच, विद्यापीठ, महाविद्यालय यांच्या नॅक मूल्यांकन व एनआयआरएफ गुणांकनाबाबत डॉ. आर. एस. माळी यांनी मार्गदर्शन केले.


            उच्च शिक्षण क्षेत्रात गुणात्मक विकास, उद्योगजगताशी समन्वय, बहुविद्याशाखीय शिक्षणपद्धतीचा अंगीकार होण्यासाठी कला शिक्षणाची सुविधा इतर अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन शिक्षण क्षेत्रात माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, माध्यम क्षेत्राचा सहभाग, नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणीबाबत या चर्चासत्रात दिशानिश्चिती करण्यात आली. तसेच कौशल्य आधारित अभ्यासक्रमाची रचना होण्यासाठी व्यवसाय व उद्योग क्षेत्रातील तज्ञांचाही या चर्चासत्रात प्रत्यक्ष सहभाग होता.


            राज्यातील अकृषी विद्यापीठे, संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालयांत आगामी शैक्षणिक वर्ष २०२३- २४ पासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० लागू करण्यासाठी करावयाची कार्यवाही व त्याअनुषंगाने धोरणात्मक निर्णय या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली.


            यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, विकासचंद्र रस्तोगी, सुकाणू समितीचे प्रमुख डॉ. नितीन करमळकर व इतर सदस्य, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सर्व उपसचिव, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, मराठा चेम्बर्स ऑफ कॉमर्स अध्यक्ष दिपक करंदीकर, उद्योजक रामभाऊ भोगले, संजीव मेहता, माध्यम क्षेत्रातील तज्ञ श्रीरंग गोडबोले, आयटी तज्ञ, दीपक हार्डीकर तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे संजय नलबलवार हे उपस्थित होते.


            यावेळी सुकाणू समितीने राज्य शासनास सादर केलेला अंतरीम अहवाल स्वीकृत करण्यात आला.


0000

राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील विविध शिष्टमंडळांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

 राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील विविध शिष्टमंडळांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट.

अवकाळीमुळे शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीचा तगादा नको

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबई, दि. २० : अवकाळी पाऊस, गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेता नाशिक जिल्ह्यातील अल्प कर्जदार शेतकऱ्यांकडे कर्ज वसुलीसाठी तगादा लावू नये, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.


            महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विविध शिष्टमंडळांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची भेट घेतली. यावेळी आमदार राजू पाटील, अमित ठाकरे, माजी आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर आदी यावेळी उपस्थित होते.


            यावेळी नाशिक जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने कर्जधारक शेतकऱ्यांच्या जमिनीचे जप्ती व लिलाव काढल्याबद्दल शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली होती. सध्याची परिस्थितीत लक्षात घेता अल्प कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांकडून वसुलीसाठी तगादा लावू नये असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


            या बैठकीत काजू बी साठी हमी भाव जाहीर करणे, वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास, सिडको गृहनिर्माण लॉटरी सोडतधारकांच्या विविध समस्या, दादर मासळी मंडईच्या व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनाबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना या मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याबाबत सूचना दिल्या

नागरी सेवा दिनानिमित्त शुक्रवारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री

 नागरी सेवा दिनानिमित्त शुक्रवारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीतप्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचा होणार सन्मान.

            मुंबई, दि. २० : नागरी सेवा दिनानिमित्त राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धा २०२२-२३ च्या राज्यस्तरीय विजेत्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे पारितोषिके देवून गौरविण्यात येणार आहे.


            सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने (प्रशासकीय सुधारणा, रचना व कार्यपद्धती) नागरी सेवा दिन कार्यक्रम २०२३ चे आयोजन शुक्रवार २१ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमात शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार अरविंद सावंत, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांची प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिली आहे.


            या संपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रसारण माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाज माध्यमांच्या पुढील लिंकवरुन पाहता येईल.


यू ट्यूब – https://youtube.com/live/1yC5xw0jxts?feature=share


फेसबुक - https://www.facebook.com/events/1274511780160163/


ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR


०००

नाशिकवासियांच्या आरोग्य सुविधांमध्ये भर ;

 नाशिकवासियांच्या आरोग्य सुविधांमध्ये भर ;


नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जमीन हस्तांतरणास शासनाची मंजुरी


- मंत्री दादाजी भुसे


            मुंबई, दि. २० : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित ४३० रुग्णखाटांचे रुग्णालय स्थापन करण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे. या नवीन महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयांच्या विस्तारीकरणांसाठी मौजे म्हसरुळ ता.जि. नाशिक येथील सर्व्हे नं. क्र. २५७ क्षेत्र १४.०० हे. आर. जागा उपलब्ध करुन देण्यात आली असल्याची माहिती बंदरे व खनिकर्म मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. याबाबत शासन ज्ञापन गुरुवारी दि. २० एप्रिल २०२३ रोजी काढण्यात आले आहे.


            महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे विद्यापिठाची स्वतःची पदवी व पदव्युत्तर संस्था सुरु करण्यासाठी दि. ०५ एप्रिल २०२१ रोजीच्या शासनाने मान्यता दिली होती. तसेच पदवी अभ्यासक्रमासाठीच्या पायाभूत सुविधांच्या आधारावर अत्याधुनिक अतिविशेषोपचार आरोग्य सेवा व संशोधनास चालना देण्यासाठी "महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था स्थापन करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्यामुळे या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे नाशिकवासियांच्या आरोग्य सुविधांमध्ये भर पडणार असून उत्तर महाराष्ट्राचे वैद्यकीय महाविद्यालय, पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था यांचे स्वप्न साकार होणार असल्याचे मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.


            लवकरच नवीन शासकीय महाविद्यालयाचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती मंत्री श्री. भुसे यांनी दिली.

कामगारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी एल-20 उपयुक्त

 कामगारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी एल-20 उपयुक्त

- कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे.

            मुंबई, दि. २० : कामगार ही एक मोठी ताकद असून त्यांना सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे. त्यादृष्टीने जी 20 परिषदेच्या अंतर्गत असलेले एल 20 हे उपयुक्त माध्यम असल्याचे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी सांगितले.


            परेल येथील नारायण मेघाजी लोखंडे विज्ञान संस्थेत आयोजित लेबर - 20 च्या प्रास्ताविक बैठकीत मंत्री श्री.खाडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कामगार आयुक्त संतोष देशमुख, मजदूर संघाचे माजी अध्यक्ष सी. के. साजीनारायण, अनिल डुमणे, श्री.येलोरे, बापू दरड, इतर संबंधित उपस्थित होते.


            मंत्री श्री.खाडे म्हणाले की, यावर्षी जी-20 चे अध्यक्षपद भारताला मिळणे ही आनंदाची गोष्ट आहे. जी 20 च्या निमित्ताने 20 विविध क्षेत्रातील गटांची निर्मिती केलेली असून त्यात उद्योग, विज्ञान, स्टार्ट-अप, शेती, वैचारिक, शिक्षण, आरोग्य, ऊर्जा, युवा असे वेगवेगळे गट आहेत. यातील लेबर-20 हा एक गट आहे. हा जी-20 च्या सदस्य देशांतील कामगार या विषयाचा गट आहे. या गटात सदस्य देशातील कामगार संघटनेचे प्रतिनिधी एकत्र येवून विविध कामगार विषयावर चर्चा करतात, त्यावर एकमत करून ते विषय सदस्य देशांनी आपल्या देशामध्ये राबवावे असे अपेक्षित आहे.


            एल 20 ने सामाजिक सुरक्षा आणि महिलांचे भविष्यातील कामाचे स्वरूप, सहभाग, कामाच्या ठिकाणी वातावरण, गुणवत्ता वाढ हे विषय निवडलेले आहे. जे कामगारांना अधिक सुविधायुक्त आणि त्यांच्या सामाजिक सुरक्षेची व्याप्ती वाढवणारे वातावरण उपलब्ध करून देण्यासाठीच्या महत्वपूर्ण सुधारणा सुचवले, असे श्री.खाडे म्हणाले.


             महिला या कौशल्यपूर्ण, वेळेत काम करण्याची क्षमता असलेल्या समाजातील महत्त्वाचा घटक असून त्यांच्या अधिकारांसाठी देखील एल 20 निश्चितच उपयुक्त ठरेल. कामगारांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा, यासाठी शासन प्रयत्नशील असून माथाडी कामगारांना मूलभूत सोयीसुविधा कामाच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यासंदर्भात रेल्वे प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. तसेच सुरक्षा रक्षकांच्या वेतनात वाढ करण्याचाही निर्णय विभागाने घेतला असल्याचे श्री.खाडे यांनी सांगितले.


            कामगार आयुक्त संतोष देशमुख म्हणाले की, कामगार विषयाशी संबंधित एल 20 याची व्याप्ती मोठी आहे. शासन, प्रशासन आणि कामगार संघटना यांच्या सर्वांच्या एकत्रित सहकार्याने ही संकल्पना यशस्वी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


            सी. के. साजीनारायण म्हणाले की, जागतिक स्तरावर महत्त्वाचे स्थान असलेल्या जी 20 चे यजमान पद भारताला मिळाले ही अभिमानास्पद बाब आहे. त्याअंतर्गत एल 20 च्या माध्यमातून कामगार क्षेत्रात भरीव स्वरूपात सकारात्मक बदल घडवून अधिक चांगल्या पद्धतीने कामगारांसाठी कल्याणकारी कामे करण्याची संधी मिळाली आहे.


            कार्यक्रमास विविध उद्योग, कामगार संघटनांचे प्रतिनिधी, संबंधित उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi