Friday, 24 March 2023

मुंबईतील कबुतरखान्यांना वारसा दर्जा नाही

 मुंबईतील कबुतरखान्यांना वारसा दर्जा नाही


- मंत्री उदय सामंत


            मुंबई, दि. 24 : मुंबईत सुमारे नऊ ठिकाणी कबुतरखाने असून कोणत्याही कबुतरखान्याला हेरिटेज (वारसा) दर्जा प्राप्त नाही अथवा असा दर्जा देता येणार नाही, असे मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले.


            सदस्या श्रीमती उमा खापरे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती.


            मंत्री श्री. सामंत म्हणाले की, मुंबईत गेट वे ऑफ इंडिया, जी.पी.ओ., एन.एस.रोड पेट्रोल पंप, ऑगस्ट क्रांती मैदान, गिरगांव चौपाटी, नवजीवन सोसायटी, मलबार हिल, एम.एस. अली रोड जंक्शन व दादर या प्रमुख ठिकाणी कबुतरखाने असून येथे बऱ्याच वर्षापासून कबुतरांना खाण्यासाठी दाणे टाकले जातात. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के.ई.एम. रुग्णालयातील श्वसनविकार चिकित्सा व पर्यावरण प्रदूषण संशोधन केंद्रामार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये कबुतरांची विष्ठा व पर यामध्ये फंगल स्पोर्स (Fungal spores) आढळून आली होती. यामुळे माणसांना एक्सट्रेंसिक ॲलर्जिक ॲलव्होलिटीस (Extrensic Allergic Alveolitis) हा आजार होऊ शकतो. या आजाराची खोकला, दम, ऑक्सिजनची पातळी कमी होणे इत्यादी लक्षणे दिसू शकतात. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता व आरोग्य उपविधी, २००६ नुसार, अघोषित क्षेत्रात पक्षी वा प्राण्यांना खायला घातल्यास, सार्वजनिक ठिकाणी उपद्रव माजवणे या कलमांतर्गत प्रति घटना ५०० रूपये इतका दंड आकारला जातो. मागील तीन महिन्यांत सार्वजनिक ठिकाणी पक्ष्यांना खायला घालून उपद्रव माजविल्याबाबत १०,००० रूपये इतका दंड महानगरपालिकेमार्फत वसूल करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.


            या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य निरंजन डावखरे यांनी सहभाग घेतला.

प्रकल्पग्रस्तांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक उन्नतीसाठी राज्य शासन उपाययोजना करणार

 प्रकल्पग्रस्तांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक उन्नतीसाठीराज्य शासन उपाययोजना करणार.


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            मुंबई, दि. 24 : प्रकल्पग्रस्त जमिनी देतात. म्हणूनच मोठमोठे विकास प्रकल्प उभे राहतात. त्यामुळे राज्याच्या विकासात प्रकल्पग्रस्तांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी राज्य शासन आवश्यक त्या सर्व उपाययोजना करेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत सांगितले. रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्य विकास, उद्योग आदी माध्यमातून त्यांना उन्नतीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. 


            सदस्य एकनाथ खडसे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.


            याबाबत सविस्तर माहिती देताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राज्य शासनामार्फत २१ जानेवारी १९८० च्या शासन निर्णयान्वये प्रकल्पग्रस्त अथवा त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींना शासकीय सेवेतील भरतीमध्ये एकूण जागांच्या किमान पाच टक्के पर्यंत सर्वोच्च प्राथम्यक्रम देण्यात आले होते. तथापि, त्यानंतर उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात दिलेल्या विविध निर्णयांनुसार शासकीय, निमशासकीय आणि अधिपत्याखालील सर्व कार्यालयांमधील रिक्त पदे भरण्याबाबत सर्व प्रसारमाध्यमांतून जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज मागविण्यात यावेत, असे निर्देश दिले. त्यानुसार १९ नोव्हेंबर २००३ रोजी शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले. यानंतर देखील न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांवरील निर्णयानंतर शासनाने २७ ऑक्टोबर २००९ च्या शासन निर्णयानुसार सुधारित आदेश निर्गमित केले. त्यानुसार प्रकल्पग्रस्तांच्या नियुक्त्या जाहिरातीशिवाय व त्यांची सेवाप्रवेश अर्हता व गुणवत्ता डावलून करता येणार नाहीत.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, प्रकल्पग्रस्तांना न्याय देणे आवश्यक आहे, ही शासनाची भूमिका आहे. प्रकल्पग्रस्तांची संख्या सुमारे चार लाख आहे. त्या तुलनेत नोकऱ्या मिळण्याची संख्या अल्प आहे. ही सद्य:स्थिती लक्षात घेता न्यायालयाचा अवमान न होता अन्य मार्गांनी प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यासाठी मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागांच्या सचिवांची समिती नेमण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसित ठिकाणी जागा दिल्यानंतर त्यांना कब्जेहक्काची रक्कम माफ करण्याबाबत तपासून निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी अन्य एका उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितले.


            या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री राम शिंदे, शशिकांत शिंदे, प्रवीण दरेकर आदींनी सहभाग घेतला.

चौकलशी वधू वर परिचय मेळावा

 


दुसऱ्या चे भले करा

 🌿🌹दुसऱ्या चे भले करा🌹🌿


     *एकदा श्री कृष्ण आणि अर्जुन फिरायला बाहेर पडले. वाटेत त्यांना एक माणूस भीक मागताना दिसला. अर्जुनाला त्याची दया आली आणि त्यांनी त्याला सुवर्णमुद्रांनी भरलेले एक पोते दिले.*

*या अचानक धनलाभाने तो माणूस अतिशय प्रसन्न झाला. मनात आपल्या सुखी संसाराची स्वप्ने रंगवत आपल्या घराच्या दिशेने जाऊ लागला. पण त्याचे दुर्भाग्य त्याची सोबत सोडायला तयार नव्हते. वाटेत चोरांनी त्याला अडवले आणि सुवर्णमुद्रांनी भरलेले ते पोते चोरून घेऊन गेले.*

*तो माणूस दुःखी मनाने आपल्या चरितार्थासाठी पुन्हा भीक मागू लागला.*


*अर्जुनाला जेव्हा तो भीक मागताना दिसला तेव्हा त्यांनी त्याचे कारण विचारले.*

*सर्व हकिकत ऐकल्यानंतर अर्जुनाला त्याची दया आली. आणि त्याला एक मौल्यवान माणिक दिले. ते घेवून तो घरी पोहोचला. त्याच्या घरात एक जुने मडके होते. त्याचा वापर गेल्या कित्येक दिवसात झाला नव्हता. चोरीच्या भीतीने त्याने ते माणिक त्या मडक्यात लपवून ठेवले.*

*अजूनही त्याचे दुर्भाग्य त्याची सोबत सोडायला तयार नव्हते. दमल्यामुळे त्याला गाढ झोप लागली. त्याच वेळी त्याची पत्नी नदीवर पाणी भरण्यासाठी गेली होती. वाटेत धक्का लागून तिचे मडके पडून फुटले.*


*तिने विचार करुन घरी असलेले जुने मडके घेऊन पाणी भरायला नदीवर गेली. मडके स्वच्छ धुऊन चांगले पाणी भरून घरी आली. माणिक पाण्यात पडले.*

*माणसाला जेव्हा हे कळले तेव्हा तो खूप दुःखी झाला.*

*चरितार्थासाठी पुन्हा भीक मागू लागला.*


*अर्जुन आणि श्री कृष्णाला जेव्हा तो भीक मागतांना दिसला तेंव्हा त्यांनी त्याचे कारण विचारले.*

*सर्व हकिकत ऐकल्यानंतर त्यांना वाटले की यांच्या नशिबात सुख नाही आहे. आपण काही तरी करुया की जेणे करुन हा यातून बाहेर पडेल.*


*आता यापुढे देवाची कृपा सुरु झाली. श्रीकृष्णाने त्या माणसाला दानात फक्त दोन रुपये दिले.*


*अर्जुन म्हणाला "प्रभू मी दिलेल्या सुवर्णमुद्रा आणि माणिक या माणसाचे दारिद्रय घालवू शकले नाही तर या दोन रुपयांनी काय होणार?"*

*हे ऐकून श्रीकृष्ण फक्त हसले आणि अर्जुनाला त्या माणसाच्या मागावर जायला सांगितले.*


*तो माणूस चालता चालता विचार करू लागला की दोन रुपयात धड एका माणसाचे जेवण पण होत नाही आणि देवाने असे कसे केले? ही देवाची कसली कृपा?*

*चालत असतांना त्याची नजर एका मासे मा-यावर गेली. त्याच्या जाळ्यात एक छोटा मासा तडफडत होता. माणसाने* *विचार केला की दोन रूपयात आपले पोट भरणार नाही पण या माश्याचा जीव वाचू शकतो.*


*सौदा करुन त्याने दोन रूपयांना तो मासा विकत घेतला. त्याला आपल्या कमंडलूत घेतले. त्यात पाणी भरले आणि त्याला नदीत सोडायला निघाला.*


*प्रभूची लीला पाहा.... माश्याच्या तोंडातून काहीतरी बाहेर पडले. निर्धन माणसाने ते पाहिले तर काय आश्चर्य, माश्याने गिळलेला तोच माणिक होता तो की जो त्याने मडक्यात ठेवला होता.*

*तो माणूस अत्यानंदाने ओरडू लागला "सापडला, सापडला"*

*नेमका त्याबाजूने तो चोर चालला होता ज्याने याच्या सुवर्णमुद्रा लुटल्या होत्या.*

*त्याने माणसाला "सापडला सापडला" असे ओरडताना पाहिले. चोर घाबरला.* *चोराने विचार केला की याने मला ओळखले आहे आणि आता हा राजाकडे माझी तक्रार करील. घाबरुन त्याने चोरलेल्या सर्व सुवर्ण मुद्रा त्याला परत आणून दिल्या आणि क्षमा मागू लागला.*

*हे पाहाताच अर्जुनाने श्रीकृष्णाला नमस्कार केला. अर्जुन म्हणाला "जे काम पोतेभर सुवर्णमुद्रा आणि मौल्यवान* *माणिक करू शकले नाही ते आपल्या दोन रुपयांनी करुन दाखवले"*


*श्रीकृष्ण म्हणाले “अर्जुना हे सर्व आपल्या मनाचे खेळ आहेत. जेंव्हा तू पोतेभर सुवर्णमुद्रा आणि मौल्यवान माणिक त्याला दिलेस तेंव्हा त्याने फक्त स्वतःचा विचार केला पण दोन रुपये दिल्यानंतर त्याने दुस-याचा विचार केला. म्हणून जेंव्हा आपण दुस-याच्या दुःखाचा विचार करतो, दुस-याचे भले करतो तेंव्हा आपण देवाचे काम करतो. आणि तेंव्हा देव आपल्या सोबत असतो".*


*तात्पर्यः*

*"दान घेण्यात वाटणारे सुख हे क्षणिक असते; परंतु दान देण्याने जे सुख प्राप्त होते ते जीवनभर पुरत असते".*🌹🌿🌾

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानेघेतलेल्या प्रश्नमंजुषेला भरघोस प्रतिसाद.

 मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानेघेतलेल्या प्रश्नमंजुषेला भरघोस प्रतिसाद.

            मुंबई, दि. 23 : यंदाच्या महिला दिनानिमित्त मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रश्नमंजूषा आयोजित केली होती. या प्रश्नमंजूषेत स्त्री (२४४८), पुरुष (२३४९) आणि पारलिंगी (Transgender) (१७) यांनी सहभाग घेतला, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांनी दिली.


            ऑनलाईन घेतलेल्या या प्रश्नमंजूषेत स्त्री-पुरुष समानता, स्त्रियांनी विवाहानंतर नाव बदलावे की नाही, पारलिंगी महिला (Transwoman), पारलिंगी पुरुष (Transman) या घटकासंबंधी प्रश्न विचारण्यात आले होते. 


            या प्रश्नमंजुषेनुसार, समाजात स्त्री-पुरुष समानता येण्यासाठी पुरुषांनी दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे, असे ९५ टक्के स्त्री-पुरुषांनी, तर ८२ टक्के पारलिंगीं व्यक्तींना वाटते. तर पुरुषांना बदलण्याची गरज नाही असे पाच टक्के स्त्री-पुरुषांनी आणि १८ टक्के पारलिंगिंनी म्हटले आहे. विवाहानंतर स्त्रीने स्वतःचे नाव आणि आडनाव बदलावे, असे ६५ टक्के स्त्रियांना आणि ५१ टक्के पुरुषांना, आणि ५३ टक्के पारलिंगी व्यक्तींना वाटते. 


            विवाहानंतर नाव बदललेल्या स्त्रियांनी मतदार यादीतही आपले नाव बदलले आहे, असे ७५ टक्के स्त्रियांनी म्हटले आहे, तर विवाहानंतर नाव बदललेल्या कुटुंबातल्या स्त्रियांची मतदार यादीतही नावे बदलली आहेत, असे ७८ टक्के पुरुषांनी आणि ७७ टक्के पारलिंगी व्यक्तींनी म्हटले आहे.


            पारलिंगी महिला (Transwoman) व पारलिंगी पुरुष (Transman) यांच्याविषयी माहिती असल्याचे ७३ टक्के स्त्रियांनी, ७८ टक्के पुरुषांनी आणि विशेष म्हणजे ७१ टक्के पारलिंगी व्यक्तींनी म्हटले आहे, तर पारलिंगी महिला व पारलिंगी पुरुष यांच्याविषयी माहीत नसल्याचे २७ टक्के स्त्रियांनी, २२ टक्के पुरुषांनी आणि २९ टक्के पारलिंगींनी म्हटले आहे, अशी माहिती श्री.देशपांडे यांनी दिली आहे.


000


मेडीगड्डा प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रातील शिल्लकभूसंपादनाचे आपसमजुतीने दर निश्चित करणार

 मेडीगड्डा प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रातील शिल्लकभूसंपादनाचे आपसमजुतीने दर निश्चित करणार


- मंत्री दादाजी भुसे.

            मुंबई, दि. 23 : गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात तेलंगणा सीमावर्ती भागात गोदावरी नदीवर मेडीगड्डा प्रकल्प तेलंगणा सरकारने उभारला आहे. या प्रकल्पातील महाराष्ट्र हद्दीतील बुडीत क्षेत्रातील भूसंपादन शिल्लक असलेल्या क्षेत्राबाबत शेतकरी आणि दोन्ही राज्यांचे सरकार यांच्यामध्ये आपसमजुतीने दर निश्चित करून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.


            विधानपरिषदेत सदस्य रामदास आंबटकर यांनी या संदर्भात लक्षवेधी मांडली होती.


            मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले की, या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या गोदावरी नदी पात्रातील बुडीत क्षेत्रातील 235 हे. आर.जमीन थेट खरेदीने ताब्यात घेतल्या आहेत. सद्य:स्थितीत भूसंपादन अधिनियमानुसार प्रक्रिया सुरु होऊन ती अंतिम टप्प्यात आहे. तसेच उर्वरित 128 हेक्टर करीता भूधारकांस वाजवी व न्याय मोबदला देण्याच्या दृष्टीने निधी उपलब्ध करून देण्यासाठी तेलंगणा सरकारला कळविण्यात आले आहे. या संदर्भात योग्य तो समन्वय जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्यामार्फत केला जात आहे. या संदर्भात एक आढावा बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असेही मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी सांगितले.


            मेडीगड्डा बॅरेजच्या वरील भागात मुगापूर गावापर्यंत 11.3 किमी लांबीची संरक्षक भींत बांधण्यात आली आहे. तसेच बॅरेजच्या खालील भागात जमीन खरडून जाण्याचा प्रकार होत असल्यामुळे बॅरेजच्या खालील बाजूस संरक्षक भिंत बांधण्याबाबत जलसंपदा विभागाकडून उचित कार्यवाही करण्यात येत असल्याचे मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.


            या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य अभिजित वंजारी, एकनाथ खडसे यांनी सहभाग घेतला.

नवी मुंबईतील सुधारित विकास योजनेत नेरूळ स्थानकाजवळीलवाहनतळाच्या समस्येवर उपाययोजना करणार

 नवी मुंबईतील सुधारित विकास योजनेत नेरूळ स्थानकाजवळीलवाहनतळाच्या समस्येवर उपाययोजना करणार


-मंत्री उदय सामंत


            मुंबई, दि. २३ : नवी मुंबईतील सुधारित विकास योजना तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हा आराखडा अंतिम करताना नेरूळ स्थानकाजवळ असणाऱ्या वाहनतळाच्या समस्येवर उपाय योजना करण्यात येतील, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.


            सदस्य डॉ.मनीषा कायंदे यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती.


            मंत्री श्री.सामंत म्हणाले, नवी मुंबई येथे सिडकोची विकास योजना १ मार्च १९८० पासून अमलात आहे. त्यावेळी लोकसंख्या तीन लाख होती. आता लोकसंख्या सुमारे १६ लाख इतकी आहे. ही योजना सुधारित करणे आवश्यक असल्याने प्रारूप विकास योजना तयार करून सूचना व हरकती मागविण्यासाठी प्रसिद्ध केलेली आहे. ही योजना अंतिम करताना नेरूळ स्थानकाजवळील वाहनतळाची समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Featured post

Lakshvedhi