Tuesday, 21 March 2023

जिल्हा वार्षिक आणि राज्य योजनेच्या निधी वापराबाबत समिती गठीत

 जिल्हा वार्षिक आणि राज्य योजनेच्या निधी वापराबाबत समिती गठीत.

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

          मुंबई, दि. 21 : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्हा स्तरावर विविध योजना राबविण्यात येत असतात. याशिवाय आदिवासी उपयोजना आणि सामाजिक न्याय विभागाच्या अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गतही विविध योजना राबविण्यात येतात. जिल्हा योजना आणि राज्य योजनेतून खर्च होणाऱ्या निधीच्या वापराबाबत दिशा निश्चित करण्यासाठी समिती गठीत करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.


          याबाबत सदस्य ॲड. आशिष जयस्वाल यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.


          उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सदर समितीमध्ये विधानसभा सदस्य आशिष जयस्वाल, उपमुख्यमंत्री कार्यालयातील सचिव श्रीकर परदेशी आणि नियोजन विभागाचे सचिव यांची एक समिती गठीत करण्यात येईल आणि दोन महिन्यात अहवाल मागवून याबाबतचे शासन आदेश निर्गमित करण्यात येतील. या योजनेच्या अंमलबजावणीच्या अधिकाराचे विकेंद्रीकरण करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.


000

नाशिक येथील एकलहरे विद्युत केंद्रातीलजुने संच बंद न करता पुनर्विकसीत करणार

 विधानसभा लक्षवेधी सूचना :


नाशिक येथील एकलहरे विद्युत केंद्रातीलजुने संच बंद न करता पुनर्विकसीत करणार


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


       मुंबई, दि. 21 : नवीन वीज धोरणातील नियमानुसार अधिक वीज दर असेल तर वीज खरेदी करणे शक्य होणार नाही आणि मग त्याचा बोजा ग्राहकांवर पडेल. त्यामुळे एकलहरे औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील जुने संच बंद न करता ते पुनर्विकसीत करुन विजेची क्षमता वाढविण्यासाठी ते सुरुच ठेवली जातील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.


          याबाबत विधानसभा सदस्य सरोज आहिरे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.


          उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, राज्यातील विजेची क्षमता वाढविण्यासाठी हे संच सुरुच ठेवले जातील. मात्र शासनाने नवीन धोरण आखले आहे. त्यानुसार उत्पादन खर्च कमी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. ज्या ठिकाणी वाहतुकीसाठी अधिक सुलभ व कमी खर्च, कोळशाची उपलब्धता तसेच आवश्यक त्या सुविधा सहज उपलब्ध असतील अशा ठिकाणी विजेचे प्रकल्प विकसित करण्यात येत आहे. तसेच ग्रीड स्थिरतेसाठी पंपस्टोरेज करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.


००००

बोगस डॉक्टर प्रकरणी एक महिन्याच्या आतवरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी

 बोगस डॉक्टर प्रकरणी एक महिन्याच्या आतवरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            मुंबई, दि. 21 : सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील रुरल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च सेंटर अँड हॉस्पिटल मायणी येथील संस्थेत बोगस व्यवहार करून बोगस डॉक्टर तयार केल्याच्या गंभीर तक्रारींची दखल राज्य शासनाने घेतली असून या प्रकरणातील सर्वांची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून एक महिन्याच्या आत चौकशी करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.


            विधानसभा सदस्य जयकुमार गोरे यांनी याबाबतची लक्षवेधी मांडली.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, हा तपास दडपण्याचा प्रकार करणाऱ्या संबंधित डीवायएसपी आणि तपास अधिकारी यांची अकार्यकारी पदावर बदली करून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येईल आणि त्यांची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात येतील.

Maa तुझे सलाम मातृभूमी,+मातृ प्रेम



 Salute बनता है 

विद्यार्थी केंद्रबिंदू ठेऊन दर्जेदार शिक्षण देण्याचे शासनाचे धोरण

 .विद्यार्थी केंद्रबिंदू ठेऊन दर्जेदार शिक्षण देण्याचे शासनाचे धोरण

- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर


            मुंबई, दि. 21 : विद्यार्थी हा शिक्षण विभागाच्या विविध योजना आणि उपाययोजनांचा केंद्रबिंदू आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी जे जे करणे आवश्यक आहे त्या उपाययोजना करून त्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याचे शासनाचे धोरण असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत सांगितले.


            सदस्य वजाहत मिर्झा यांनी खासगी शिकवणी वर्गावर निर्बंध असावेत यासंदर्भात उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना मंत्री श्री केसरकर यांनी खासगी शिकवणी वर्गाबाबत शासन हस्तक्षेप करीत नाही, असे सांगितले.


            याबाबत अधिक माहिती देताना मंत्री श्री. केसरकर म्हणाले, विद्यार्थ्यांनी खाजगीत कुठे शिक्षण घ्यावे, यावर शासनाचे बंधन नाही. तथापि, खासगी शिकवणी वर्ग खासगी असले तरीही त्याठिकाणी विद्यार्थ्यांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात की नाही यासंदर्भात तपासणी करण्यात येईल. विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करण्यासाठी नियमित अभ्यासक्रमाव्यतिरिक्त शिक्षणावरही शासनामार्फत भर दिला जात आहे. आता पुस्तकांमध्ये कोरी पाने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती देऊन अभ्यासक्रम अधिक दर्जेदार होण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.


            या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री अनिकेत तटकरे, गोपीचंद पडळकर, एकनाथ खडसे, अमोल मिटकरी, धीरज लिंगाडे, ॲड. मनीषा कायंदे आदींनी सहभाग घेतला.

बंधारे बांधून तीनशे हेक्टर जमीन सिंचनाखाली आणणार

 बंधारे बांधून तीनशे हेक्टर जमीन सिंचनाखाली आणणार


- डॉ. तानाजी सावंत


            मुंबई, दि. 21 : रायगड जिल्ह्यातील पहुर येथे बंधारा उभारणीबाबत सर्वेक्षण करण्याचे निर्देश विभागाला दिले आहेत. या बंधाऱ्यामुळे त्या परिसरातील ३०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असल्याची माहिती मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी विधानसभेत दिली.


            विधानसभा सदस्य अमीन पटेल यांनी पहूर कालव्यासाठी भूसंपादन न केल्यामुळे कालव्याअभावी सिंचनाचे उद्दिष्ट पूर्ण न झाल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला.


            मंत्री श्री. सावंत म्हणाले की, पहूर कालव्याच्या भूसंपादनात स्थानिक शेतकऱ्यांनी सतत विरोध केला असल्यामुळे भूसंपादन करणे आतापर्यंत शक्य झाले नाही. सद्यस्थितीत दिल्ली - मुंबई औद्योगिक कॉरिडॉर (DMIC)साठी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील जमीन संपादित झाली असल्याने सिंचन करणे शक्य नाही. भविष्यात डीएमआयसी कडून पाण्याची मागणी प्राप्त झाल्यास सदर पाणीसाठा हा औद्योगिक वापरासाठी डीएमआयसीला देणे किंवा हा प्रकल्प मालकी हक्काने डीएमआयसीला हस्तांतरित करून प्रकल्प खर्चापेक्षा जास्त महसूल गोळा करणे शक्य आहे.


            यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य अशोक चव्हाण, हरिभाऊ बागडे यांनी सहभाग घेतला.

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील उद्यानातील सोयी सुविधांबाबत विकास आराखडा तयार करणार

 मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील उद्यानातील

सोयी सुविधांबाबत विकास आराखडा तयार करणार


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            मुंबई, दि. 21 : मुंबईकरांसाठी शहराचा विकासात्मक बदल करण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्वच उद्यानामध्ये पुरेशी स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सोय, विद्युत दिवे, सुरक्षा याबाबत विकास आराखडा (डीपीआर) तयार करण्याचे महापालिका आयुक्तांना निर्देश दिले आहेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.


            विधानसभा सदस्य आशिष शेलार यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.


            मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मुंबई महानगरपालिका हद्दीतील हायवेला चांगल्या दर्जाची स्वच्छतागृहे बांधण्यात येतील. महानगर पालिका क्षेत्रातील उद्यानांमध्ये ज्येष्ठ नागरिक तसेच मुले येत असतात. त्यांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्यात येईल. पोशा नाखवा मैदानातील दिव्यांच्या दुरुस्तीचे आदेश तत्काळ देण्यात येतील, असेही मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले.


            यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवार सदस्य छगन भुजबळ, नाना पटोले, योगेश सागर, अजय चौधरी यांनी सहभाग घेतला.


००००

Featured post

Lakshvedhi