Thursday, 16 March 2023

अहिंसा रन " मॅरॅथॉनचे आयोजन

 अहिंसा रन " मॅरॅथॉनचे आयोजन


छत्रपती संभाजीनगर / प्रतिनिधी - सकल जैन समाजाची सामाजिक धार्मिक आणि राष्ट्रीय कार्यात सक्रिय असणाऱ्या "जितो " या संस्थेच्या माध्यमातून भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवच्या निमित्ताने जितो महिला शाखाच्या माध्यमातून दि. ०२ एप्रिल - २०२३ रोजी संपूर्ण देशातील ५५ मोठ्या महानगरात आणि २५ विदेशातील शहरात एकाच वेळी एकाच दिवशी "अहिंसा रन " मॅरॅथॉन चे आयोजन करण्यात आले असून या मॅरॅथॉन अहिंसा रन मध्ये अधिकाधीक सर्व समाजाच्या नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन जितो समाजातील महिला शाखेच्या अध्यक्षा डिंपल पगारिया व पदाधिकारी मंडळाने केले आहे.अपेक्स चेअरपर्सन संगीताजी ललवानी यांच्या मार्गदर्शनाखाली गिनीज बुक ऑफ रेकॉड आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये दर्ज होणार आहेत.

१० कि. मी., ५ कि. मी., ३ कि. मी., अशा प्रकारे हि मॅरॅथॉन अहिंसा रन होणार असून दि. ०२- एप्रिल - २०२३ वार: रविवार सकाळी ०५:३० वाजता कर्णपुरा मैदान येथून हि मॅरॅथॉन सुरु होईल. याचे रजिस्ट्रेशन लिंक द्वारे करण्यात येत आहे. संपूर्ण देशात शांतता, सदभावना, बंधुता, एकता, आणि अहिंसा या संदेशाचा प्रचार प्रसार व “जगा आणि जगू दया” या संदेशाचा प्रचार देश वासियांच्या मनात रुजविण्यासाठी हे प्रमुख उध्दीष्टे असल्याचे जितो कडून देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रात देण्यात आले आहे.

या अहिंसा रनच्या यशस्वीतेसाठी जितो राज्य उपाध्यक्ष रवि खिवंसरा, चॅप्टर चेअरमन पारस ओस्तवाल, चॅप्टर सेक्रेटरी दिनेश मुथा, महिला शाखा चेअरपर्सन डिंपल पगारिया, सेक्रेटरी प्रिया मुथ्था, दर्शू फुलफगर, नीता सेठिया, सारिका चंडालिया, संगीता कोटेचा, स्वरूची मुगदिया, राखी जैन, सोनल जैन, पल्लवी ओस्तवाल, रंजू जैन, स्वाती महारा, युथ विंग चेअरपर्सन सुरक्षा कटारिया, युथ विंग सेक्रेटरी मिहीर बंब यांनी केले आहे. तसेच या अहिंसा रनचे गोल्ड स्पॉन्सर मंगलम वेडिंग डेस्टीनेशन आहे.


सोबत मॅरेथॉनची नोंदणी लिंक पाठवली आहे - 

https://registrations.indiarunning.com/ahimsa-run-aurangabad

मराठा समाज आरक्षणासाठी कटिबद्ध,पूर्ण ताकदीने न्यायालयीन लढा लढणार

 मराठा समाज आरक्षणासाठी कटिबद्ध,पूर्ण ताकदीने न्यायालयीन लढा लढणार


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


अधिवेशनानंतर दिल्लीत टास्क फोर्सची बैठकलक्षवेधी सूचनेवरील चर्चेत मुख्यमंत्र्यांची ग्वाही.

            मुंबई, दि. १६ : - मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी शासन कटिबद्ध आहे. त्यासाठी पुरेपूर आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातील. पूर्णपणे ताकदीने हा न्यायालयीन लढा लढला जाईल. त्यासाठी आवश्यक तिथे केंद्र सरकारची मदत घेतली जाईल. विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर दिल्ली येथे जाऊन वकिलांची टास्क फोर्स आणि संबंधित सर्वांना एकत्र घेऊन बैठक घेतली जाईल. त्या बैठकीला मी स्वतः उपस्थित राहीन, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत दिली. मराठा समाज आरक्षणाशी संदर्भात उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मराठा समाज आरक्षणातील २०१८ पासून ते ५ मे २०२१ पर्यंतचे टप्पे विस्ताराने मांडले. आरक्षण रद्द झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाची समीक्षा करण्यासाठी न्या. दिलीप भोसले यांची समिती नियुक्त केली होती. या समितीने शिफारस केल्याप्रमाणे पुढची पावले टाकली जात आहेत. यात पुनर्विचार याचिका दाखल करणे, निष्कर्षाला आव्हान आणि एसईबीसी सवलतीबाबत आयोग नियुक्त करणे तसेच राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडेही दाद मागणे, अशा अनेक गोष्टीवर कार्यवाही सुरु आहे. त्यासाठी मराठा समाज आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीही मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काम करत असल्याबाबतची माहितीही मुख्यमंत्र्यांनी आपल्या उत्तरात दिली.


            मराठा समाज आरक्षणाच्या अनुषंगाने एका व्यापक शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर आर्थिक स्वरुपाच्या अशा सुविधा देण्यात कुठलीही कमतरता ठेवली नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले की, वसतिगृह सुविधा, शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती यासोबतच आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या पतपुरवठ्याची मर्यादाही १५ लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे. महामंडळाच्या भागभांडवलाच्या अटीबाबत राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत तसेच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री यांच्याकडेही पाठपुरावा केला जात आहे. या महामंडळासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी अर्थसंकल्पाताही भरीव तरतूद केली आहे. मराठा समाजातील तरुणांना सोयी सुविधा मिळाव्यात, रोजगार संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी नवीन योजना सुरु केल्या आहेत. यात कुणबी मराठा दाखले मिळावेत यासाठी समिती स्थापन केली आहे.


            विशेषतः मराठवाडा व विदर्भातील निजामशाहीतील सनदा आणि करार आदी राष्ट्रीय दस्तावेजांचाही अभ्यास केला जात आहे. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह योजनेसाठी भरीव निधीची तरतूद केली आहे. विद्यार्थ्यांना डीबीटीच्या माध्यमातूनही निर्वाहभत्ता देण्यात येत आहे. सारथी संस्थेस आतापर्यंत ३८९ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना, छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्त्व विकास व संगणक कौशल्य प्रशिक्षण, राजमाता जिजाऊ सारथी कौशल्य विकास प्रशिक्षण, श्रीमंत मालोजीराजे भोसले सारथी इंडो-जर्मन टूल रुम अंतर्गत प्रशिक्षण यावरही भर देण्यात येत आहे. सुमारे एक लाख मराठी युवकांना रोजगार-स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहोत. मराठा समाज आरक्षण आंदोलनात शहीद झालेल्या तरुणांच्या कुटुंबातील २० व्यक्तिंना राज्य परिवहन महामंडळात सेवेत दाखल करून घेतले आहे. यात कुणालाही वाऱ्यावर सोडले जाणार नाही. कोपर्डी खून खटल्याची तातडीने सुनावणी घेण्याचे निर्देश दिले आहेत, असेही मुख्यमंत्र्यानी नमूद केले.


            सर्वोच्च न्यायायालयाने आरक्षण रद्द करण्यापूर्वी निवड झालेल्या पण नियुक्ती न झालेल्या १ हजार ५५३ उमेदवारांना अधिसंख्य म्हणून नियुक्ती दिली. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत त्यांना ओबीसी च्या सर्व सवलती, लाभ दिले जातील. यात ओबीसीं बांधवांच्या सवलती, लाभांमध्ये कुठेही तडजोड केली जाणार नाही. त्यांच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही, ही काळजी घेतली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


            मराठा समाज आरक्षणासाठी या विषयातील ज्येष्ठ , अनुभवी विधीज्ज्ञांचा टास्क फोर्स गठीत केला आहे. त्यामध्ये अॅड. हरिष साळवे यांच्यासह, अॅड. रोहतगी, पटवालिया, अॅड. विजयसिंह थोरात, अॅड. अक्षय शिंदे यांचा समावेश आहे. मराठा समाज आरक्षणाचा न्यायालयीन लढा जिंकूच. त्यासाठी वकिलांची फौज, आरक्षणासाठी प्रय़त्नशील अशा सर्वांना विश्वासात घेऊन हा लढा पूर्णपणे ताकदीने लढू, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.


00000

भोगवटादार रुपांतरणासाठीच्याअधिमूल्य आकारणीच्या कालावधीस मुदतवाढ

 भोगवटादार रुपांतरणासाठीच्याअधिमूल्य आकारणीच्या कालावधीस मुदतवाढ


- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील


            मुंबई, दि. 16 : भोगवटादार वर्ग 2 आणि भाडेपट्टयाने दिलेल्या शासकीय जमिनीच्या भोगवटादार वर्ग 1 मधील रुपांतरणासाठी आकारावयाच्या अधिमूल्य आकारणीच्या कालावधीस मुदतवाढ देण्यात येणार आहे. ही मुदतवाढ 7 मार्च 2024 पर्यंत असून लवकरच मुदतवाढीबाबतची अधिसूचना निर्गमित करण्यात येईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी विधानसभेत सांगितले.


            विधानसभा सदस्य मंगेश कुडाळकर यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये भोगवटादार वर्ग 2 आणि भाडेपट्टयाने प्रदान केलेल्या जमिनींना भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरित करण्याबाबतची तसेच वर्गवारीनुसार बाजार मूल्याच्या 10 ते 15 टक्के रक्कम आकारणे याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. याला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी उत्तर दिले.


            श्री. विखे- पाटील म्हणाले की, शासनाने यापूर्वी वेळोवेळी भोगवटादार वर्ग 2 आणि भाडेपट्टयाने प्रदान केलेल्या जमिनींना भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरित करण्याबाबतचे नियम प्रसिध्द केले आहेत. शासनाने कब्जेहक्काने/भोगवटादार वर्ग 2 च्या धारणाधिकारावर अथवा भाडेपट्टयाने प्रदान केलेल्या शासकीय जमिनीच्या धारणाधिकाराचे सवलतीच्या दराने अधिमूल्याची रक्कम भरुन भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरण करण्याचा कालावधी 7 मार्च 2022 रोजी संपला आहे. सन 2020 ते 2022 पर्यंत कोविड पार्श्वभूमीवर सवलतीच्या दराने अधिमूल्य आकारणीच्या कालावधीस मुदतवाढ मिळण्यासाठी प्रारुप अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करुन हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या होत्या. आता मात्र अधिमूल्यांच्या वरील सवलतीच्या दरांना 7 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून लवकरच याबाबत अधिसूचना काढण्यात येणार आहे. अधिमूल्याच्या दरामध्ये नियम प्रसिध्द केल्यापासून 3 वर्षांच्या कालावधीसाठी 7 मार्च 2022 पर्यंत सवलतीचे दर 10 ते 25 टक्क्यांपर्यत आकारण्याची तरतूद होती. आता हे सवलतीचे दर किती असतील याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येतील.


००००

केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर अन्नधान्याऐवजीचीथेट रोख रक्कम हस्तांतरित करण्यात येणार

 केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर अन्नधान्याऐवजीचीथेट रोख रक्कम हस्तांतरित करण्यात येणार

                   - मंत्री रवींद्र चव्हाण

        मुंबई, दि. १६ : आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांतील केशरी शिधात्रिकाधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर अन्नधान्याऐवजीची थेट रोख रक्कम हस्तांतरित करण्यात येणार असल्याचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.


            विधानसभा सदस्य संतोष दानवे, अतुल भातखळकर आणि सुलभा खोडके यांनी राज्यातील केशरी शिधापत्रिकाधारकांना धान्यांऐवजी थेट रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबतचा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात विचारला होता.


            श्री. चव्हाण म्हणाले की, राज्यातील आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांतील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या धर्तीवर सवलतीच्या दराने अन्नधान्याचा पुरवठा करण्याची योजना कार्यान्वित आहे. गेल्या काही काळापासून केंद्र शासनामार्फत राज्यातील केशरी शिधापत्रिकाधारकांना देण्यात येणारा गहू आणि तांदूळ देण्यात येत नसल्याने लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे. आता प्रति माह प्रति लाभार्थी 150 रुपये इतकी रक्क्म लाभार्थींच्या आधारसंलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.


000





 



लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातीलसामूहिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बंद नाही

 लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातीलसामूहिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बंद नाही


                                      - उद्योग मंत्री उदय सामंत


        मुंबई, दि. १६ : लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रामधील सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र (सीईटीपी) प्रकल्प बंद नसल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत सांगितले. 


            विधानसभा सदस्य रवींद्र वायकर, आदिती तटकरे, संग्राम थोपटे यांनी लोटे येथील औद्योगिक वसाहतीतील सामूहिक सांडपाणी प्रकल्पाच्या साठवण टाकीतील गाळ काढण्याबाबतचा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात विचारला होता.


            मंत्री श्री. सामंत म्हणाले की, लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रामधील सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र (सीईटीपी) च्या साठवण टाकीतील गाळ काढण्याचे काम जानेवारीमध्ये मे. लोटे परशुराम प्रायव्हेट एनव्हायरमेंट को - ऑप सोसायटीमार्फत सुरु करण्यात आले. काही कारणांमुळे गाळ काढण्याचे काम मंदावले असले तरी आता गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले आहे. सध्या सांडपाणी प्रक्रिया करण्याचे काम सुरुळीत सुरु आहे. येणाऱ्या काळात राज्यातील सर्व सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रांचा आढावा घेण्यात येईल.

नवीन शैक्षणिक वर्षापूर्वी ३० हजार शिक्षकांची नावे पवित्र पोर्टलवर

 नवीन शैक्षणिक वर्षापूर्वी ३० हजार शिक्षकांची

नावे पवित्र पोर्टलवर


                               - शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर


        मुंबई, दि. 16 : शालेय शिक्षण विभागामार्फत शिक्षकांची भरती करण्यात येत असून नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी 30 हजार शिक्षकांची नावे पवित्र पोर्टलवर येतील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.


            विरोधी पक्ष नेते अजित पवार, सदस्य दिलीप वळसे- पाटील, धनंजय मुंडे, रोहित पवार, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, डॉ. देवराव होळी, हरिभाऊ बागडे यांनी टेट परीक्षा घेऊन शिक्षण भरती करण्याबाबतचा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात विचारला होता.


            मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, कोरोनामुळे गेल्या काही काळापासून शिक्षक भरती झालेली नव्हती. मात्र फेब्रुवारी – मार्च 2023 मध्ये टेट परीक्षा आयोजित करण्यात आली असून याद्वारे राज्य शासन जवळपास 30 हजार शिक्षक भरती करणार आहे. विशेष म्हणजे शिक्षकांचा पदभरतीसाठी टेट परीक्षा एका वर्षात दोन वेळा घेतली जाणर आहे.


            2017 नंतर आता 2023 मध्ये टेट परीक्षा घेण्यात येत आहे. गेल्या वेळी 12 हजारांहून अधिक शिक्षकांची भरती करीत असून 7 हजार 930 शिक्षकांची भरती करण्यात आली होती. आता शिक्षक भरती प्रक्रियेसाठी 80 टक्के पदे भरण्याची परवानगी मिळाल्याने 30 हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. राज्यात असलेल्या अतिरिक्त शिक्षकांना इतर ठिकाणी समायोजित करण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. टेट परीक्षेत दोषी असलेल्यांवर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री श्री. केसरकर यांनी यावेळी सांगितले.


000

पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाचे अपूर्ण कामलवकरच पूर्ण करणार

 पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाचे अपूर्ण कामलवकरच पूर्ण करणार


- सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण


            मुंबई, दि. १६ : पुणे जिल्ह्यातील अपूर्ण राहिलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम (पीएन 25) लवकरच पूर्ण करण्यात येईल. पावसाळ्यापूर्वी 1200 मीटर रस्त्याचे, तर डिसेंबरपर्यंत 4.5 किमी रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येणार असल्यापचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चच्हाण यांनी सांगितले.


            सदस्य संजय जगताप, छगन भुजबळ, चंद्रकांत भिंगारे आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातला नॅशनल हायवे 962 ते पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा सासवड-नारायणपूर-कापूरहोळ रस्त्याच्या कामाबाबातचा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात विचारला होता.


            मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, येथील स्थानिक रहिवाशांनी या रस्त्याच्या कामाला हरकत घेतल्याने या रस्त्याचे काम अपूर्ण आहे. सध्या या रस्त्यावरील वर्दळ वाढली असून वाहनांची या रस्त्यावरुन ये जा करण्याची संख्याही वाढली आहे. त्यामुळे तातडीने या रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. पण तात्पुरते काम न करता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पावसाळ्यापूर्वी पहिल्या टप्प्यात 1200 मीटर रस्त्याचे काम तर डिसेंबरपर्यंत 4.5 किमी रस्त्याच्या पॅचचे काम, पूर्ण करण्यात येईल. यासाठी आवश्यक असणाऱ्या 25 कोटी रुपयांची पुरवणी मागणी करण्यात येईल. 1200 मीटर लांबीमध्ये 7 मीटर रुंदीचे काँक्रीटीकरणाचे काम मार्च 2023 च्या अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आले असून निविदा प्रक्रिया पूर्ण करुन काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे, असेही मंत्री श्री.चव्हाण यांनी सांगितले.

Featured post

Lakshvedhi